११व्या वर्षी डॉक्टरेटची उपाधी मिळवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारा 'अमन रहमान'!

0

ज्या वयात मुले नीट बोलू शकत नाही त्या वयात हा मुलगा संगणक (कॉम्पुटर) चालवायला शिकला व ज्या वयात मुले अभ्यास व खेळण्यात मग्न असतात त्या वयात या मुलाने कॉम्पुटर अॅनिमेशन द्वारे सिनेमा बनवायला सुरवात केली. आपला विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे देहरादून मध्ये रहाणारा १५ वर्षीय अमन रहमान आज कॉम्पुटर अॅनिमेशनवर देशात व परदेशात व्याख्यान देत आहे. हेच एक कारण आहे की त्याच्या नावाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जगातील सगळ्यात तरुण अॅनिमेशन प्रवक्त्याच्या रुपात नोंद झाली आहे.

अमन यांचा परिचय एवढ्यावरच थांबत नाही तर ‘लिटिल बिल गेट्स’ म्हणून जगामध्ये त्यांच्या नावाची दुसरी ओळख निर्माण झाली आहे. म्हणूनच जेव्हा अमन ११ वर्षाचे होते तेव्हा श्रीलंकेच्या कोलंबो ओपन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने कॉम्पुटर अॅनिमेशनच्या क्षेत्रात त्यांच्या कार्याला बघून त्यांना डॉक्टरेट उपाधीने सन्मानित केले आहे.

उत्तराखंडाच्या देहरादून मधील एका सामान्य कुटुंबातून आलेला अमन रहमान यांचे वडिल मोहंमद रहमान दुचाकीचे कारागीर(मेकॅनिक) आहेत. तरीही अमनने कॉम्पुटर अॅनिमेशनच्या जगात असे शिखर गाठले जिथे पोहचणे नक्कीच सोपे नाही.

कॉम्पुटर अॅनिमेशनच्या जगात राज करणारे अमन सांगतात की, "मी ३ वर्षाचा होतो तेव्हा माझी ओळख वडिलांनी घरी आणलेल्या जुन्या संगणकाशी झाली. पण माझ्या कुटुंबीयांनी संगणकाला हात न लावण्याची सक्त ताकीद दिली होती. जेव्हा माझा मोठा भाऊ संगणकावर काम करायचा तेव्हा माझी जिज्ञासा वृत्ती जागरूक झाली व मी कॉम्पुटर शिकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला कल्पना नव्हती की माझी ही इच्छा मला अॅनिमेशनच्या नवीन जगात घेऊन जाईल".

या पद्धतीने पहिल्यांदाच तीन वर्षाच्या अमन यांनी फॅल्श सॉफ्टवेअर पासून ‘डान्सिंग अल्फाबेट्स‘ बनवले. अमन यांच्या मतानुसार  "जेव्हा मी पहिल्यांदा माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये अॅनिमेशन बनवले, तेव्हा घरच्यांना खूप आनंद झाला व त्यांनी मला प्रोत्साहित केले. त्याच वेळेस अॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करण्याचा मी निर्णय घेतला".

मुलाच्या गुणवत्तेबद्दल खुश होऊन अमनचे वडिल त्यांना एका कॉम्पुटर सेंटरमध्ये घेऊन गेले. जिथे अॅनिमेशनच्या संदर्भातील अनेक कोर्स त्यांनी केले जसे एक्सप्लोरा डिजाईन,एरिना डिजाईन, जीका, सीआईए, सीएएडी व या प्रकारचे इतरही सॉफ्टवेअर ते शिकले. अमन यांना वाटते की अॅनिमेशनला कोणत्याही सीमा नसतात इथे प्रत्येक जण आपल्या कल्पना शक्तीचा वापर करू शकतो. अमन सांगतात की देवानंतर अॅनिमेटर हे एकमेव साधन आहे जे प्रत्येक गोष्टीची उत्तम निर्मिती करू शकतो. अॅनिमेशनशी जोडलेली २ डी व ३ डी डिप्लोमा व डिग्री कोर्स त्यांनी पूर्ण केला आहे. विशेष गोष्ट म्हणजे जिथे हा कोर्स वर्षात पूर्ण होतो तिथे अमन यांनी तो कोर्स ३ ते ६ महिन्यात पूर्ण केला.

अमन यांनी व्याख्यानाची सुरवात कशी केली

उत्तरादाखल अमन सांगतात, वयाच्या सहाव्या वर्षी कॉम्पुटर अॅनिमेशनच्या कोर्स दरम्यान वर्गशिक्षक नसतांना गंमतीने मी इतर विद्यार्थांना शिकवण्यासंदर्भात विचारणा केली, गंमतीत सुरु झालेली गोष्ट जेव्हा सत्यात परिवर्तीत झाल्यावर माझ्या हृदयाची धडधड वाढली पण मी मागे हटलो नाही व आपल्या वर्गात व्याख्यान दिले त्यामुळे प्रभावित होऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रशंसेनंतर माझी हिम्मत वाढली’’. जरी अमन यांनी व्यावसायिक रुपात व्याख्यान द्यायला वयाच्या आठव्या वर्षी सुरवात केली तरी त्यांचा हा प्रवास आजपर्यंत नियमानुसार सुरु आहे.

अमन यांनी देशाच्या अनेक भागात व्याख्याने दिली तसेच श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये सुद्धा पाहुणे वक्त्याच्या रुपात त्यांना आमंत्रित केले. अॅनिमेशन बद्दलची त्यांची आवड व त्यांच्या प्रतिभेला बघून पूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले आहे. आज या क्षेत्रातील त्यांच्या कामामुळेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर व युवराज सिंह त्यांचे चाहते झाले आहे.

देहरादून मधील एका शाळेत ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या अमनची सध्यातरी इच्छा आपला अभ्यास पूर्ण करून काही काळासाठी परदेशात जाण्याची आहे. कारण अॅनिमेशनच्या आधुनिक तंत्राबद्दल त्यांना अभ्यास करून आपल्या देशाने या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगतशील बनून अमेरिका, जपान, चीन मधील नागरिकांना हे तंत्र शिकण्यासाठी आपल्या देशात आमंत्रित करण्याची आहे. या व्यतिरिक्त ते एक स्वयंसेवी संस्था काढू इच्छिता जी फक्त अशा मुलांसाठी असेल ज्यांचे शिक्षण काही कारणांनी अपूर्ण राहिले असेल. या व्यतिरिक्त त्यांना स्वतःचे मोठे कार्यालय बनवण्याची इच्छा आहे जिथे दुसऱ्या देशांचे व्यावसायिक हॉलीवूड, बॉलीवूड सिनेमांशिवाय एका मोठ्या संस्थेसाठी काम करतील.

लेखक : हरीश
अनुवाद : किरण ठाकरे