चार पायांच्या खास मित्रांसाठी विशेष उत्पादनांची निर्मिती करणारे ‘हेडस् अप फॉर टेल्स’

0

कुत्र्याचा उत्कृष्ट गळपट्टा  असो किंवा सुयोग्य गादी, ऍक्सेसरीज असोत किंवा खेळणी किंवा खरारा अथवा अंगसफाई करण्याची काही उत्पादने, आपल्या चार पायांच्या खास मित्रासाठी सर्वोत्तम उत्पादने मिळावीत असाच बहुतेकांचा रास्त हट्ट असतो. मात्र प्रत्येक प्राण्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसार उत्पादने बनविणे गरजेचे असते. गरजेनुसार बनविलेल्या विशेष उत्पादनांचा अभाव हीच भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. राशी नारंग यांनाही या समस्येचा सामना तर करावाच लागला, पण याच अनुभवाने त्यांना हेडस् अप फॉर टेल्स (Heads Up For Tails) सुरु करण्यासाठी उद्युत्कही केले.


राशी तिच्य लॅब्रेडॉर मैत्रीण सारा समवेत
राशी तिच्य लॅब्रेडॉर मैत्रीण सारा समवेत

२००७ मध्ये राशी नुकत्याच न्युयॉर्क येथून भारतात परतल्या होत्या. त्यावेळी येथे त्यांची खऱ्या अर्थाने सखीसोबती होती ती ‘सारा’… लॅब्रेडॉर जातीच्या आपल्या या मैत्रिणीचे वर्णन करताना राशी यांना शब्द कमी पडतात. त्यांच्या मते जणू काही फर बॉलच असलेली ही सारा म्हणजे खट्याळपणा आणि प्रेम यांचे प्रतिकच... “तिच्यासाठी सर्वोत्तम तेच घेण्याची इच्छा असल्याने, मी कुटुंबातील माझ्या या सर्वात लाडक्या सदस्यासाठी एकदम स्टायलिश आणि सुंदरसुंदर वस्तूच मिळविण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या पर्यायांनी आणि त्या वस्तूंच्या दर्जाने माझे मुळीच समाधान झाले नाही,” तेहतीस वर्षीय राशी सांगतात.

साराच्या निमित्ताने कुत्र्यांसाठीच्या उत्पादनांचा शोध घेताना करावी लागलेली खटपट ही एका अर्थाने इष्टापत्तीच ठरली. कारण त्यातूनच एका नव्या उपक्रमाचा जन्म झाला. बाजारपेठेत या उत्पादनांची असलेली कमतरता पाहून, राशी यांनी लवकरच ‘हेडस् अप फॉर टेल्स’ या नावाने कुत्र्यांसाठी विशेष उत्पादनांच्या निर्मितीला सुरुवात केली.

हेडस् अप फॉर टेल्स ही स्टार्टअप पाळीव प्राण्यांसाठी अतिशय आरामदायक आणि उपयुक्त अशा वस्तूंचे उत्पादन करते. डिजाईन हे या संपूर्ण उत्पादन प्रक्रीयेच्या केंद्रस्थानी असते. कुत्र्यांसाठी खास गाद्या, कपडे, कॉलर्स, ऍक्सेसरीज, खेळणी, खरारा किंवा अंगसफाई करण्याची उत्पादने आणि प्राणीप्रेमींसाठीच्या खास उत्पादनांची निर्मिती करण्याचे काम ही स्टार्टअप करते. मुख्य म्हणजे, ग्राहकांना नक्की काय पाहिजे आहे, ते समजून घेत, त्यानुसार उत्पादने तयार करण्यावर विशेष लक्ष देण्यात येते.

ही बाजारपेठ म्हणजे एक अत्यंत आव्हानात्मक संधी असल्याचे राशी सांगतात. २००७ मध्ये तर यासारखे काही अस्तित्वाच नव्हते. पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांची बाजारपेठ अगदी विस्कळीत स्वरुपात होती आणि दिल्लीतील अगदी चांगल्याचांगल्या पाळीव प्राण्यांसाठीच्या दुकांनांना भेट दिल्यानंतर, राशी यांना दिसून आले की बहुतेक जणांना डीजाईन, व्यापार किंवा गुणवत्तेबाबत काहीच माहिती नव्हती. “ त्यामुळे मी स्वतःच ऑनलाईन स्टोअरच्या माध्यमातून मालाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आणि काही महिन्यांनंतर दिल्लीच्या अव्वल सिलेक्ट सिटीवॉल्कमध्ये छोट्या स्टॉलच्या माध्यमातूनही विक्री करण्यास सुरुवात केली. मी म्हणजे एक ‘वन पर्सन आर्मीच’ होते आणि माझ्या पहिल्या कर्मचाऱ्याची नेमणूक होईपर्यंत, म्हणजेच सुमारे सहा महिन्यांपर्यंत, मी वेड्यासारखे दिवसाला अठरा-अठरा तास काम करत असे,” राशी सांगतात.

कोणतीही माहिती नसलेल्या या प्रांतात पाऊल टाकणे, हे राशी यांच्यासाठी मोठे धाडसाचे काम होते. कार्डीफ विद्यापीठातून पदवीचे शिक्षण आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, राशी यांनी जगभरातील आघाडीच्या बॅंकींग फर्मस् साठी काम केले. जुन्या आठवणींना उजाळा देताना राशी सांगतात, की त्यांना नेहमीच कुत्र्यांसाठी निवारा सुरु करण्याची किंवा प्राण्यांसाठी असे काही तरी करण्याची इच्छा होती, ज्यातून त्यांना त्यांचे प्राण्यांबद्दलचे प्रेम व्यक्त करता येऊ शकेल. “आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षीच अशी संधी माझ्याकडे चालून आली,” राशी सांगतात.

सुरुवातीच्या दिवसांत अगदी योग्य असे मूळ नमुने मिळविणे हेच एक मोठे आव्हान होते. राशी सांगतात की, त्यांना स्वतःलाच शिंप्यांकडे, कच्च्या मालाच्या विक्रेत्यांकडे, डिजाईनर्सकडे आणि उत्पादकांकडे जावे लागत असे. सर्व काही एका चांगल्या तेलपाणी केलेल्या यंत्राप्रमाणे चालण्यासाठी म्हणून अनेक महिन्यांची मेहनत आणि पायपीट करावी लागली.


हेड्स अप फॉर टेल्सला सुरुवात केल्यानंतर वर्षभरानेच राशी यांच्या पतींची सिंगापूर येथे नियुक्ती झाली. याकाळात हेड्स अप फॉर टेल्स चे काम सुरुच ठेवण्यासाठी म्हणून त्यांना वर्षभरात अनेकदा तिथून इथे ये-जा करावी लागत असे. “आम्हाला अनेक लहान मोठ्या गुंतवणूकदारांकडून विचारणा होत होती, पण आम्हाला त्यांना खेदाने नाही म्हणावे लागत असे, कारण तेंव्हाची आमची स्थिती पहाता, यातून त्यांना मिळणाऱ्या परताव्याबाबत आम्हालाच आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे आठ वर्षे, एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी आम्ही कोणत्याही बाह्य गुंतवणूकदारांच्या मदतीशिवाय स्वतःच्याच बळावर हे काम सुरु ठेवले,” राशी सांगतात.

यावर्षी भारतात परत आल्यानंतर, हेडस् अप फॉर टेल्सने एचएनआय’ज (HNI’s) कडून त्यांचे सीड राऊंड भांडवल उभारले. दर साल तीस टक्क्यांनी वाढ होत असल्याचा आणि दर महा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमांतून एक हजाराहून अधिक ग्राहकांना सेवा देत असल्याचा, या टीमचा दावा आहे. सुलभ आणि सोयीचा असा खरेदीचा अनुभव देऊ करत असल्याचा हेडस् अप फॉर टेल्सचा दावा आहे आणि पाळीव प्राण्यांचे मालक, प्राणी कल्याण संस्था, विक्रेते, उत्पादक आणि उत्साही लोकांचा एक परस्परांशी संवाद साधणारा आणि प्रेमळ समुदाय तयार करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे. तसेच त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत ही स्टार्टअप अनेक संस्थांबरोबरही काम करत आहे.

“ ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादन तयार करुन देण्याची क्षमता, हा आमचा सर्वात मोठा युएसपी (युनिक सेलिंग पॉंईंट) आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टीची गरज असेल, जसे की वयस्कर कुत्र्यासाठी ऑर्थोपेडीक बेड, एखादी फन कॉलर किंवा कुटुंबातील लग्नसंमारंभासाठी शेरवानी किंवा टक्सिडो - आम्ही हे सर्व काही बनवू शकतो,” राशी सांगतात.

त्यांचे एक अतिशय खास तयार केलेले उत्पादन म्हणजे ‘वॅग बॉक्स’.... हा या प्रकारचा विशेष असा दर महा तयार केला जाणारा कुत्र्यांसाठीच्या भेटींचा बॉक्स असून, त्यामध्ये खास निवडलेल्या वस्तूंचा आणि ऍक्सेसरीजचा समावेश असतो.


गेल्या वर्षी या टीमने अमेरिकेत आपल्या कामाला सुरुवात केली तर येत्या वर्षात ते सिंगापूरमध्येही येणार आहेत. त्याचबरोबर देशभरातही अधिकाधिक प्राणीप्रेमींपर्यंत पोहचण्यासाठी म्हणून विक्रीची अनेक ठिकाणे सुरु करण्याची त्यांची इच्छा आहे. 

 नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘इंडीया पेट फुड मार्केट फोरकास्ट ऍन्ड ऑपोर्च्युनिटीज, २०१९’ या अहवालानुसार पाळीव प्राण्यांचे संगोपन आणि खाद्य यांची भारतातील बाजारपेठ २०१९ पर्यंत २७० बिलियन डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. जगभरात या विभागामध्ये वॅग.कॉम (अमेझॉनने घेतलेले), झुपप्लस (युरोप) आणि पेटसॅटहोम हे यशस्वी खेळाडू आहेत. त्याशिवाय भारतीय-अनुदानित खेळाडू जसे की डॉग्जस्पॉटही पुढे जाण्यास उत्सुक आहेत. देशातील सर्वाधिक भेटी मिळालेले पेट पोर्टल असल्याचाही त्यांचा दावा आहे. २०१५ मध्ये आपण देशभरात ७००,००० प्राणी उत्पादने वितरीत  केल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या ते दर महा साठ हजार मागण्या पूर्ण करत असून, त्यांचा बास्केट आकार सरासरी १,७०० रुपये एवढा आहे.

डॉग्जस्पॉटशिवाय नुकतेच सुरु झालेले टेल्सलाईफ आणि डॉगमायकॅट या कंपन्याही आहेत, ज्यांच्या संस्थापकांनी घरोघरी जाऊन उत्पादनाची विक्री करत, सुरुवात केली होती. त्याचबरोबर तुपी’ज ढाबा (Tup’is Dhaba) कडून घरी बनविलेले जेवण प्राणी मालकांपर्यंत पोहचवले जाते. आकाड्यांवर विश्वास ठेवायचे म्हटले तर, असे सांगितले जाते की भारतात या बाजारपेठेत  दोन अंकी वाढ अनुभवली आहे.युरोमॉनिटरच्या एका अहवालानुसार पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांची बाजारपेठ आगामी काही वर्षांत १०-१५ टक्क्यांनी वाढणार आहे. त्याचबरोबर आयआयफटीच्या मते सुमारे सहा लाख पाळीव प्राणी हे दर वर्षी दत्तक घेतले जातात.

शहरी भागांमध्ये एकत्र कुटुंबांची कमी होत चाललेली संख्या आणि खर्च करण्याजोग्या उत्पान्नात दरडोई होत असलेली वाढ, ही या बाजारपेठेतील वाढत्या मागणीमागची प्रमुख कारणे आहेत. मात्र अजुनही भारतातील ही बाजारपेठ जागतिक स्तरावरील दर्जापर्यंत पोहचण्यास आपल्याला आणखी काही काळ वाट पहावी लागेल.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

प्रेमळ प्राणी करतात ‘AAT’द्वारे रुग्णांवर प्रभावी उपचार

डॉगी आणि माऊसाठी कस्टमाईज कपडे आणि ऍक्सेसरीजचा देशातला एकमेव ब्रॅण्ड ‘पेट्रीओट’

पीडित हत्तींचे मधुर संगीताने मनोरंजन करणारा अवलीया संगीतकार


लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन