तयेबा बेगम लिपीः समाजभान देणारी प्रतिभावंत

0

प्रसंग होता श्राईन एम्पायर गॅलरीमध्ये पार पडलेल्या इंडीया आर्ट फेअरचा सांगता समारंभ... एक लहानखुरी कलाकार तिच्या कलाकृती संदर्भात प्रेक्षकांच्या प्रश्नांना शांतपणे सामोरी जात होती... तिच्या कलाकृतीचे नावच होते रीकॉलिंग १... संपूर्णपणे स्टेनलेस स्टीलच्या रेझर ब्लेडस् ने बनविलेले ते एक शिवणयंत्र होते.... ही कलाकृती चांगलीच लक्षवेधी ठरली होती...

या कलाकाराचे नाव तयेबा बेगम लिपी... लिपी यांच्यासाठी खरे तर हा प्रतिसाद किंवा प्रेक्षकांची ही वहावा काही नविन नाही... २०१२ साली रेझर ब्लेडस् नेच बनविलेली ‘लव बेड’ ही त्यांची कलाकृती तर गगनहाईम संग्रहालायासारख्या एका नामाकींत संग्रहालयाच्या संग्रहात आहे. मात्र एवढ्या प्रतिथयश कलाकार असूनही इंडीया आर्ट फेअरमध्ये होणाऱ्या प्रशंसेचा स्विकार त्या अतिशय नम्रपणे करताना दिसत होत्या. “हा प्रतिसाद खरोखच अनपेक्षित होता,” ४५ वर्षीय लिपी सांगतात. “ही काही फार मोठ्या आकाराची कलाकृती नाही त्यामुळे इंडीया आर्ट फेअरसारख्या एवढ्या मोठ्या उपक्रमात लोकांचे त्याकडे लक्ष जाईल अशी माझी अपेक्षाच नव्हती. मी निवडलेल्या माध्यमाबाबत आणि त्याच्या अर्थाबाबत मला अनेक प्रश्न विचारले गेले. खरे तर या निमित्ताने त्यांचे लक्ष माझ्या रिव्हर्सल रिअॅलिटी या आणखी एका सोलो शो (वैयक्तीक प्रदर्शन) कडेही गेले,” त्या पुढे सांगतात.

शिवणयंत्राशी लिपी यांचे नाते खूपच जुने म्हणावे लागेल. ते शोधताना आपल्याला राणा प्लाझा दुर्घटनेच्या स्मरणार्थ मुनेम वासिफ आणि महाबुबुर रेहमान यांनी पाठशाला या साऊथ एशियन फोटोग्राफी स्कुलमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनापर्यंत मागे जावे लागेल. कपड्यांच्या कारखान्यात झालेल्या या दुर्घटनेत सुमारे हजार कामगार मृत्यूमुखी पडले होते. “ स्वतः एक छायाचित्रकार असलेल्या तस्लिमा लिमा या त्या दुर्घटनेच्या वेळी आपल्या सहकाऱ्यांसह मदत कार्यात सहभागी झाल्या होत्या. या मलब्यातून मृतदेह शोधण्याचे काम त्या करत होत्या. त्यावेळी जमिनीवर पडलेले एक यंत्र लिमा यांनी आपल्या ताब्यात घेतले होते,” त्यावेळची आठवण लिपी सांगतात आणि पुढे म्हणतात, “ पाठशाला येथील प्रदर्शनात ते यंत्र पहाताच मला त्याबद्दल वाटलेली प्रचंड आपुलकी पुढे आयुष्यभरासाठी माझ्याबरोबर कायम राहिली. तसेच लहानपणापासून मला स्वतःचे कपडे शिवण्याचाही छंद होताच. सुरुवातीला राणा प्लाझामधील यंत्रावरच काम करण्याचा माझा विचार होता पण शेवटी मी स्वतः ज्याच्याशी निगडीत आहे, असे यंत्र बनविण्याचा निर्णय घेतला.”

हे झाले यंत्राविषयी... तर रेझर ब्लेडस् तर त्यांच्या बालपणीच्याच स्मृतींचा अविभाज्य भाग म्हणावा लागेल. त्या त्यांच्या कुटुंबातील अकरावे अपत्य होत्या आणि घरात आसपास कायमच बाळंतिणी असल्याचे त्यांना आठवते. त्याकाळी बाळांची नाळ कापण्यासाठी रेझर बेल्डचाच वापर केला जाई आणि याच स्मृतीला प्रतिसाद म्हणून त्यांनी रेझर ब्लेडस् ची निवड केली. “काही वर्षे एकाच मटेरियलवर काम केल्यानंतर, आता मला वाटते की या मटेरियलपासून मिळणारा पोत किंवा पृष्ठभाग हा माझ्या कलाकृतीला नक्कीच एक सहज प्रतिसाद देत असतो,” त्या सांगतात.

पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात हिंसेला तोंड द्यावे लागते आणि खूप दुःखही सहन करावे लागते. या हिंसेचे आणि दुःखाचे प्रतिबिंब लिपी यांच्या रेझर ब्लेड इन्स्टॉलेशन्स अर्थात कलाकृतींमध्ये प्रकर्षाने दिसते आणि त्याचबरोबर दिसते ते या महिलांनी टोकाच्या विपरीत परिस्थितीत दाखविलेली ताकद आणि लवचिकपणाही....

खरे तर रेझर ब्लेडस् च्या सहाय्याने त्यांनी पहिली कलाकृती बनविली ती पाकिस्तानमधील लाहोर येथील आरएम स्टुडीओमधील मुक्कामादरम्यान... २००८ साली.. आयत्या बनविलेल्या रेझर ब्लेडस् पासून त्यांनी सुरुवात केली. मात्र पुढे त्यांना आवश्यक वाटतील अशा आकाराचे स्टेनलेस स्टीलचे ब्लेड बनविण्यास सुरुवात केली. २०११ ला व्हेनिस बियानेलमध्ये अशाच एका कलाकृतीचे केलेले प्रदर्शन ही त्यांच्यासाठी कलाटणी देणारी घटना ठरली. यावेळी पहिल्यावहील्या बांगलादेशी पॅविलियनच्या त्या संचालकही होत्या. बिझार अॅन्ड द ब्युटीफुल या नावाची ही कलाकृती खऱ्या अर्थाने वेगळी ठरली. रेझर ब्लेडस् वापरुन बनविलेल्या त्या ‘ब्रा’ होत्या.

तसेच आजपर्यंतचे त्यांचे कदाचित सर्वाधिक नावाजलेले लव बेड हे शिल्पही स्टेनलेस स्टील ब्लेडस् वापरुन केलेले होते. गगनहाईम येथील नो कन्ट्रीः कंटेम्पररी आर्ट फॉर साऊथ ऐन्ड साऊथइस्ट एशिया आणि द एशिया सोसायटी हॉंगकॉंग सेंटर येथील प्रदर्शनात ते मांडण्यात आले होते. वसाहतवाद आणि हिंसा या पार्श्वभूमीवर स्वत्व, सीमा आणि प्रदेशांमध्ये कालानुरुप झालेले अभुतपूर्व परिवर्तन याबाबतच्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

कलेच्या क्षेत्रातील विविध प्रांतात त्यांची मुशाफीरी सुरु असते. पेंटीग, प्रिंटमेकींग, इन्स्टॉलेशन आणि व्हिडीओसारख्या विविध कलाप्रकारात त्या निपुण आहेत. तसेच आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून विविध विषयांवर त्या सातत्याने व्यक्त होत असतात. ज्यामध्ये लैंगिक राजकारण किंवा महिलांचे स्थान इत्यादींचा समावेश असतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास २०१० साली त्यांनी तयार केलेल्या ‘आय वेड मायसेल्फ’ या व्हिडीओचे देता येईल. यामध्ये त्यांनी एक पारंपारिक पोषाखातील एक नववधु आपल्या लग्नासाठी तयार होताना दाखवली होती आणि त्यानंतर तिचे केस कापून तिला मिशी लावून तिलाच वराचीही भूमिका दिली होती. त्यानंतर त्या दोघांना एकाच फ्रेममध्ये बाजूबाजूला पती-पत्नी म्हणून उभे केले होते आणि त्यादरम्यान या परिवर्तनाचा व्हिडीओ दाखविला होता. अशा प्रकारे दुहेरी व्यक्तीमत्व दाखवून लैंगिक साचेबद्धतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि स्त्री- पुरुष यांच्यातील गुणधर्म एकत्र राहू शकतात हे सत्यही अधोरेखित करण्यात आले.

२००२ साली स्थापन झालेल्या ब्रिट्टो आर्टस् ट्रस्टच्या त्या सहसंस्थापिका होत्या. बांगलादेशमध्ये कलाकारांकडूनच चालविले जाणारे हे पहिलेच पर्यायी व्यासपीठ होते. प्रदर्शने, परिसंवाद, सहयोग आणि देवाणघेवाणीच्या माध्यमातून बांगलादेशाबाहेरही या ट्रस्टचा विस्तार झाला. ब्रिट्टोचा ‘नो मॅन्स लॅंड’ हा नुकताच झालेला प्रकल्प भारत-बांगलादेश सीमेवरच आयोजित करण्यात आला होता. बांगलादेशमधील १५ कलाकार तर भारतातील ९ कलाकार या दरम्यान सीमेलगतच्या खेड्यांमध्ये राहिले आणि पारपत्राशिवाय एकमेकांकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

लैंगिक असमानतेबाबतचे भाष्यः

लैंगिक असमानता हा लिपी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांचा मोठा भाऊ पॉल हा स्वतः फाईन आर्टस् चा विद्यार्थी असतानाही त्यांना मात्र कलाकार बनण्यापासून परावृत्त करण्यात आले. “ सुदैवाने आणखी एक मोठा भाऊ ताहीमिदुल याने मात्र फाईन आर्टस् शिकण्यासाठी मला प्रोत्साहन दिले. मी केवळ एकाच वर्षासाठी माझ्या कुटुंबाकडून आर्थिक मदत घेतली आणि त्यानंतरचे पुढचे शिक्षण मात्र माझ्या स्वतःच्याच कमाईतून पूर्ण केले. याकाळात मी लहान मुलांच्या कला शाळेत आठवड्यातून दोन दिवस शिकवत असे तर काही वेळा संगीत शिकवत असे,” लिपी सांगतात. बांगलादेशातील ढाका विद्यापीठातून त्यांनी फाईन आर्टस् मधील एमएफए ही पदवी मिळविली आहे.

हा कठीण काळ आता भुतकाळ आहे. अनेक मान्यवर संस्थांमध्ये त्यांची प्रदर्शने भरत असून त्यांचे काम जोरात सुरु आहे. भारतातही त्यांनी बरेच काम केले आहे. येथील पॅलेट्ट आर्ट गॅलरी, द गिल्ड आणि एप्पॅराओ गॅलरीमधील प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला आहे.

त्याशिवाय त्यांनी अनेक महत्वाचे सोलो शो देखील केले आहेत. उदाहरणार्थ इंस्तंबुल येथील पाय आर्टवर्कस् मधील 'नेव्हर बीन इन्टीमेट' हा २०१३ चा शो, लंडनमधील पाय आर्टवर्कस् मधील २०१४ चा शो, ढाका आर्ट समिटमधील २०१४ चा सोलो प्रकल्प आणि महाबुबुर रेहमान यांच्यासह ला गलेरी, अलियान्झ फ्रान्सिस, ढाका येथील आर्टीफिशियल रियॅलिटी शो.

बांगलादेशमधील नामवंत कलाकार रेहमान हे लिपी यांचे पती आहेत. त्यांच्याकडून मिळालेला पाठींबा आणि प्रोत्साहनाबद्दल त्या भरभरुन बोलतात. “ आम्ही विद्यापीठात एकत्रच शिकल्याने सुमारे दोन दशकाहून अधिक काळ आमची मैत्री आहे. आमच्या नात्याच्या आणि कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच एकमेकांबरोबर केलेल्या चर्चा आणि संवाद माझ्या मते आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. माझी कलाकार म्हणून ओळख होण्यापूर्वीच महाबुबुर हे एक डायनॅमिक कलाकार म्हणून नावाजलेले होते. त्यांनीच मला एक कलाकार म्हणून घडविले. त्यांच्या सततच्या पाठींब्याशिवाय आज मी जी आहे, तशी बनूच शकले नसते,” त्या कृतज्ञतेने सांगतात.