असे एक स्टार्टअप, जे वृद्धांचे आयुष्य सहज बनवते... ‘सिनीअर वर्ल्ड डॉट कॉम’!

असे एक स्टार्टअप, जे वृद्धांचे आयुष्य सहज बनवते... 
‘सिनीअर वर्ल्ड डॉट कॉम’!

Monday January 04, 2016,

3 min Read

आज प्रत्येकजण भारताला उदयास येणारी शक्ती म्हणून पहात आहे. जगभरातील देशांना भारताकडून खूप आशा आहेत. त्याचे कारण आहे की, भारताला जगातील सर्वात युवा देश मानले जाते. भारतात तरुणांची लोकसंख्या जगातील अन्य देशांपेक्षा खूप जास्त आहे. हेच कारण आहे की, भारतात आज जवळपास प्रत्येक उद्योगक्षेत्र तरुणांना लक्षात ठेवूनच काम करत आहे. वस्त्रोद्योग असो किंवा मग त्या मोबाईल कंपन्या असोत. खाद्यउद्योग असो, मनोरंजन उद्योग असो, किंवा कौशल्य विकासाचे क्षेत्र असो. प्रत्येक ठिकाणी तरुणांनाच सर्वात अधिक महत्व दिले जाते. मागील काही वर्षात अनेक स्टार्टअप आलेत, ज्यांचे केंद्र देखील तरुणच राहिले आहेत. हे स्टार्टअप खूप चांगले काम देखील करत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये ५५पेक्षा अधिक वयाच्या लोकांना सर्वात अधिक दुर्लक्षित केले जात आहे. उद्योगक्षेत्र देखील या वर्गाकडे विशेष लक्ष देत नाही. अशातच ‘सिनियर वर्ल्ड.कॉम’ नावाची एक स्टार्टअप समोर आली आणि त्यांनी या वर्गाला लक्षात ठेवूनच काम करणे सुरु केले. अनावरण झाल्यानंतर जवळपास एका वर्षातच त्यांच्या प्रयत्नाला खूप यश मिळत आहे.

image


‘सिनियर वर्ल्ड’ची सुरुवात २०१४ मध्ये झाली आणि कंपनीने ऑक्टोबर २०१५ इजी फोनच्या नावाने आपले पहिले उत्पादन बाजारात आणले. ‘इजी फोन’ एक असा फोन आहे, जो विशेष करून प्रौढांच्या गरजांना लक्षात ठेवून बनविण्यात आला आहे. या फोनचा वापर करणे खूपच सोपे आहे.

image


‘सिनियर वर्ल्ड’चे संस्थापक राहुल गुप्ता आणि एमपी दिपू आहेत. राहुल गुप्ता सीए आहेत, ज्यांनी जीई, एयरटेल आणि एसआरएफ फायनांस व्यतिरिक्त अन्य कंपन्यांमध्ये जवळपास २५वर्षे काम केले आहे. तसेच एमपी दिपू यांनी दूरसंचार उद्योगाला खूप जवळून पहिले आहे. या क्षेत्रात त्यांना जवळपास २०वर्षांचा अनुभव आहे. राहुल आणि दिपू खूप दिवसांपासून स्वतःचे काहीतरी करण्याच्या विचारात होते. त्याच दरम्यान राहुल यांच्या कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी राहुल यांनी विचार केला की, प्रौढांसाठी काहीतरी असे करावे ज्यामुळे ते दिवसभर व्यस्त राहण्यासोबतच त्यांचा मोकळा वेळ योग्य कामात व्यतीत करतील. त्यांच्या जीवनाचा एकटेपणा त्यांना जड जावू नये. ही बाब त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितली. ज्यांना ही कल्पना खूपच आवडली. दोघांनी या दिशेने काम करण्याचा विचार केला. नंतर २०१४मध्ये त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली.

image


राहुल सांगतात की, प्रौढांना आज प्रत्येक जण विसरला आहे. हा एक असा उपेक्षित वर्ग आहे, ज्यांच्यावर कुणी लक्ष देत नाही. ना कुठले उद्योग क्षेत्र, ना समाज आणि सरकार देखील त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाही. कुठलीही कंपनी आपले उत्पादन आणि सेवा या वर्गाला लक्षात ठेवून बनवत नाही, जे खूप चुकीचे आहे. एक व्यक्ती जी आपल्या तरुणपणात सर्व कर्तव्यांचे निर्वाहन करण्यासाठी खूप धावपळ करते. आपल्या कुटुंबाला सांभाळते, मात्र जेव्हा ते धावपळ करण्यास सक्षम नसतात तेव्हा ते वेगळे पडतात आणि कुणीही त्यांच्यावर लक्ष देत नाही. अशाच लोकांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या एकटेपणाला दूर करण्याच्या दिशेने सिनियर वर्ल्ड काम करत आहे.

image


सिनियर वर्ल्ड कंपनी मोबाईल लॉंच केल्यानंतर आता अनेक उत्पादने बाजारात आणण्याची योजना आखत आहेत, जे या लोकांसाठी खूप उपयोगी तर असेलच सोबतच त्यांच्या गरजांना देखील पूर्ण करतील, ज्यांच्याकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही.

‘सिनियर वर्ल्ड’ कंपनीच्या संकेतस्थळावर एक भाग छंदाचा देखील आहे. हा भाग विशेष करून त्या लोकांसाठी आहे, जे तरुणपणी व्यस्त असल्यामुळे आपल्या छंदाला जोपासू शकले नाहीत. या भागात जाऊन ते आपल्या शहरात होणा-या अनेक कार्यशाळा आणि क्लासेसची माहिती घेऊ शकतात आणि त्यात आपले नाव नोंदवू शकतात.

त्या व्यतिरिक्त संकेतस्थळावर एक भाग ब्लॉगचा देखील आहे. जेथे विभिन्न प्रकारच्या प्रेरणादायी गोष्टी आहेत. ज्याला वाचून प्रौढांमध्ये एक नवी उमेद जगेल आणि ते आयुष्याला सकारात्मकरित्या बघू शकतील आणि समाजाला देखील स्वतःकडून काहीतरी देऊ शकतील. आज अनेक असे प्रौढ लोक आहेत, जे समाजासाठी खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी केलेले काम समाजासाठी एक उदाहरण आहे. हे लोक अशाच लोकांच्या कथेला येथे प्रस्तुत करतात.

भविष्यात ‘सिनियर वर्ल्ड कंपनी’ आपल्या योजनांचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. राहुल सांगतात की, आमचा जवळपास १२लोकांचा एक गट सलग नव्या आणि कल्पक गोष्टींना वळण देण्याची तयारी करत आहे, जेणेकरून भारतातील प्रत्येक प्रौढ व्यक्ती स्वतःला कधीच एकटे आणि बेकार समजणार नाही. राहुल सांगतात की, या कामात आम्हाला तरुणांचा देखील खूप हातभार लागत आहे.

लेखक :आशुतोष खंटवाल

अनुवाद :किशोर आपटे.