वेध भारतातल्या बातमीचा आणि बातमीदारांचा....

वेध भारतातल्या बातमीचा आणि बातमीदारांचा....

Saturday February 27, 2016,

3 min Read

जग बदलतंय... अगदी झपाट्यानं. इतकं की अनेकदा त्याच्या वेगाचा अंदाज घेणं खूप कठिण जातंय. या वेगाचा अंदाज घेत जे आहे तसं मांडण्याचं काम बातमीदार अर्थात पत्रकार करतात. तंत्रज्ञानामुळे एका क्लिकवर जग आलंय. प्रिंट, टिव्ही, इंटरनेट आणि आता एपमुळे जागतिक पातळीवर रोज होणाऱ्या प्रत्येक बदलाचा साक्षीदार होता येतं. त्यावर आपलं मत तयार करता येतं. आणि आपल्याला व्यक्तही होता येतं. सिटीझन जर्नलिस्टची संकल्पना जगभरात रुढ झालेली असताना बातमी शोधणाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळेच समाजाची बदलेली घडी, समस्या आणि त्यावर असलेले उपाय याचा वेध घेणाऱ्या ऑस्ट्रेलियातल्या पत्रकारांना एक जागतिक व्यासपीठ देण्यासाठी वॉक्ले फाऊंडेशन काम करतंय. वॉक्ले फाऊंडेशननं आता जागतिक पातळीवर आपलं काम नेण्याची योजना आखली आहे. त्याचं लक्ष आशिया खंडात आहे. यासाठीच एशिया पॅसिफिक कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्याद्वारे आशियातल्या इतर देशांबरोबर भारतातल्या बातमी आणि बातमीदारांचा वेध घेण्यात येणार आहे.

image


मुंबईत नुकत्याच झालेल्या मुंबई फिल्म फेस्टीवल अर्थात मिफमध्ये ऑस्ट्रेलियातले पाच माहितीपट दाखवण्यात आले. या माहितीपटांचे विषय फारच वेगवेगळे होते. वॉक्ले फाऊंडेशनतर्फे हे पाचही माहितीपट मिफसाठी पाठवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातल्या समाजातली दुही दाखवणारे हे माहितीपट होते. शिवाय तिथल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा घेतलेला आढावा आणि गोरे आणि स्थानिक कृष्णवर्णीय लोकांमधली तेढ आणि त्याचे नातेसंबंध अश्या वेगवेगळ्या विषयांवर हे माहितीपट होते. “या माहितीपटांची निवड करताना आमच्या देशातल्या विविध घटकांचा सर्वकष समावेश असेल याची काळजी घेण्यात आली. एक माहितीपट तर थेट आमच्या राजकीय परिस्थितीवर विडंबन करणारा होता. तो तर एक रियालिटी शो सारखा होता. तिथल्या खऱ्या राजकारण्यांनी त्यात भाग घेतलाय. यातून आम्हाला हेच दाखवून द्यायचंय की आम्ही आमच्या देशातल्या बऱ्या वाईट दोन्ही गोष्टी जगासमोर मांडतोय. आमचा समाज कुठे आहे. आणि तो नक्की कुठे चाललाय हे सर्व जगाला सांगायला आम्हाला आवडतंय.” वॉक्ले फाऊंडेशनच्या जनरल मॅनेजर लुईसा ग्राहम सांगत होत्या. 

image


या माहितीपटांची आणखी एक खासियत म्हणजे या सर्वच्या सर्व तिथल्या स्थानिक मुक्त पत्रकारांनी बनवल्या होत्या. विविध न्यूज एजन्सीमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांपेक्षा मुक्त पत्रकारांनी तयार केलेल्या माहितीपटांची निवड करण्यामागे काही कारणंही होती. “ आम्ही मुक्त पत्रकारांना प्रोत्साहन देतोय. विविध ठिकाणी काम करताना अनेक बंधनं असतात. ज्याचा पेपर किंवा न्यूज चॅनल आणि रेडीयो आहे त्या मालकाचे लागेबंधे असल्यानं अनेक विषयांना तिथल्या पत्रकारांना हात घालता येत नाही. त्यामानाने मुक्तपत्रकारांना विचाराचं स्वातंत्र्य असतं. ते आमच्याकडे विषय घेऊन येतात. आमची कमिटी त्यावर अभ्यास करते आणि त्यानंतरच त्यांना फंडीग केलं जातं. असं करणारी वॉक्ले फाऊंडेशन ही जगातली एकमेव संस्था आहे असं म्हणायला हरकत नाही.“ लुईसा ग्राहम सांगत होत्या. 

image


वॉक्ले फाऊंडेशन आता ऑस्ट्रेलियाबाहेर आपला विस्तार आणि प्रचार करणार आहे. जगभरातल्या चांगल्या पत्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. “जगात इतकी विविधता आहे की, प्रत्येक देश प्रदेशांची समस्या वेगळी आहे. यामुळे ती समोर आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून जगभरातल्या पत्रकारांची मोट बांधून जग कसं आहे हे दाखवून देण्याचा वॉक्ले फाऊंडेशनचा प्रयत्न आहे” 

image


वॉक्ले फाऊंडेशनने आता आशियावर लक्ष केंद्रीत केलंय. एशिया पॅसिफिक या कार्यक्रमाअंतर्गत इथल्या पत्रकारांना एकत्र आणलं जातंय. खास करुन इथल्या मुक्त पत्रकारांना. आशियातल्या अनेक देशांमध्ये मुक्त पत्रकारिता ही संकल्पनाच नाहीए. बरं इथले पत्रकार पाश्चिमात्य देशांपेक्षा जास्त सजग आहेत. यामुळे त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते जगासमोर येऊन नवी दिशा मिळेल असा विश्वास वॉक्ले फाऊंडेशनला वाटतो.


image


भारतात बॉलीवुडचा बोलबाला आहे. पण माहितीपट किंवा रिपोर्टाज यांना तसं महत्त्व आलेलं नाही ही खूप दुर्दैवाची बाब आहे. यामुळे आता भारतातल्या जास्तीत जास्त पत्रकारांना शोधून त्यांच्याकडून माहितीपट बनवून घेण्यासाठी वॉक्ले फाऊंडेशन काम करतंय. या अनुशंगाने पत्रकारांचा विनिमय देखील घडून येणार आहे. यामुळे भारतातल्या पत्रकारांना ऑस्ट्रेलियात जाऊन काम करता येईल.

image


जगभरातले डॉक्युमेन्टरीचे मार्केट पाहता येत्या काळात भारतातल्या माहितीपटांना चांगली मागणी येईल अशी आशा वॉक्ले फाऊंडेशनला आहे. यामुळे या माहितीपटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वॉक्ले फाऊंडेशन प्रयत्न करणार आहे. यासाठीच सध्या भारतातल्या बातमी आणि बातमीदारांचा शोध शुरु झालाय.

image


आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कथा :

बियॉन्ड ऑस्ट्रेलिया – भारतीय डॉक्युमेन्ट्रीच्या शोधात