अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यांच्याशी धडाडीने लढणारे प्रामाणिक सनदी अधिकारी तुकाराम मुंढे! (भाग -१) 

3

ज्यावेळी कुणी अधिकारी जनहितासाठी काही धडक निर्णय घेतो त्यावेळी ते निर्णय हितसंबंधी किंवा वरिष्ठांच्या हिताचेच असतात असे नाही. ज्यावेळी हा अधिकारी वारंवार असे निर्णय घेत राहतो त्यावेळी काय होते? येथे अशीच कहाणी आहे भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची, ज्यांना १२ वर्षांच्या सेवाकाळात ९ वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागला याचे कारण म्हणजे त्यांचा प्रामाणिक आणि निधडा स्वभाव.


हा प्रसंग आहे ते सोलापूरला जिल्हाधिकारी असतानाचा २५ जुलै २०११ रोजी सायंकाळी साडेचार वाजता बीड अंबड जालना रस्त्यावर अंबड शहराजवळ पोलिस आणि सरकारी अधिकारी यांच्या समोर पाच हजारांचा प्रक्षुब्ध जमाव होता. एका भरधाव ट्रकने ठोकल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता, तेथील स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. मात्र तेथून प्रेत हटविण्यास जमावाने मनाई केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यांचे म्हणणे होते की या अपघात आणि मृत्यूला जबाबदार चालकाला त्यांच्या ताब्यात द्यावे जे शक्य नव्हते. ज्या अधिका-यांना या जमावाने गराडा घातला होता त्यात सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकारम मुंढे देखील होते. त्यांनी जमावाला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र जमाव प्रक्षुब्ध झाला त्यांनी दगड फेकण्यास सुरूवात केली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख तेथे हजर होते, १० जणांचे धडक कृती दल होते ते स्थिती हाताळू शकणार नव्हते ते जास्त कुमक मिळावी म्हणून प्रतिक्षा करत होते. त्यात काही तास लागणार होते. सहा वाजले तरी जमाव ऐकेना धडक जवांनानी लाठीचार्ज केला तरी त्याला दाद मिळाली नाही. हवेत गोळीबार केला तरी त्यात यश येत नव्हते. आता हे नक्की झाले होते की जमाव सरकारी अधिका-यांवर चाल करणार त्यात मुंढे आणि जिल्हा पोलिस प्रमुख होते. मुंढे म्हणाले की , “मला असे वाटते हा जमाव आमची हत्या करेल”. त्यावेळी सारे अधिकारी घाबरून काय करावे या संभ्रमात होते, मुंढे त्यांच्या सहका-यांना म्हणाले, “मी जिल्हा दंडाधिकारी आहे जे होईल त्याची जबाबदारी मी घेतो तुम्ही गोळीबार करा” धडक दलाने गोळीबार सुरू केला आणि तासाभरात जमाव पळून गेला, सारे काही पूर्ववत झाले. त्यानंतर राज्याचे पोलिस प्रमुख आणि काही मंत्री यांनी घटना स्थळी भेट देवून लोकांचे सांत्वन केले, जखमींना रूग्णालयात उपचार करण्यात आले. मुंढे यांनी या घटनेचा अहवाल सरकारला पाठवला जो विधीमंडळात सादर करण्यात आला.

२००५च्या सनदी अधिका-यांच्या तुकडीतील अधिकारी असणा-या तुकाराम मुंढे यांच्या जीवनातील हा एक प्रसंग होता, जे सध्या पुणे महानगर परिवहन मर्यादीत येथे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत. १२ वर्षाच्या सेवा काळात मुंढे कायम चर्चेत राहिले, त्यांना वाळू माफियांच्या धमक्या आल्या, त्यांच्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव आले आणि ऐकत नाही म्हणून  नऊ वेळा बदल्या केल्या. ही या बेधडक अधिका-याची कहाणी आहे, जे त्यांच्या धडक आणि नियमावर बोट ठेवत केलेल्या निर्णयाने चर्चेत आहेत.

बालपण शेतमजूरीत

बीड जिल्ह्यात ताडसोना या लहानश्या गावात तुकाराम यांचा जन्म झाला, सध्या पाच हजार लोकवस्ती असलेल्या या गावात त्यावेळी केवळ दोन हजार लोकवस्ती होती. ते आणि त्यांचे वडील बंधू यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. घरच्या संस्कारात तुकाराम यांना प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला.


बालपणीचे तुकाराम मुंढे
बालपणीचे तुकाराम मुंढे

मुंढे सनदी अधिकारी झाले ते त्यांच्या मोठ्या भावाची प्रेरणा घेवून जो त्यांच्या गावातील पहिला पदवीधारक आणि सरकारी अधिकारी होता. ज्यावेळी भाऊ आणखी शिकण्यासाठी बाहेर गेला त्यावेळी ते केवळ आठ वर्षांचे होते आणि वडीलांसोबत २५ एकर शेतीमध्ये काम करायला जात होते.

ते सांगतात, “ तिस-या वर्गात परिक्षा दिली आणि मी हाती नांगर धरला. मी पेरणीपासून रोपांना पाणी देण्यासारखी कामे केली, तरी देखील खायला पुरेसे अन्न नसे कारण जमीन सुपीक नव्हती. कुणीतरी शेतात काम करायला हवे होते त्यामुळे मला ते करावेच लागले. शेतावर राखण करण्यासाठी त्यांना थांबावे लागे, सकाळीच उठून ते शाळेत जात आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शेतात काम करत. दहावीच्या वर्गात जाई पर्यंत हा त्यांचा नित्यक्रम होता. ते कधी शाळेतून आल्यावर खेळायला गेले नाहीत किंवा सुटीत मौज केली नाही. भारनियमनामुळे रात्री दोनला उठून शेतीला पाणी द्यायला जावे लागे. आठवडा बाजारात जावून ते भाज्या विकत, ते म्हणतात की, शेतात सारी कामे करण्यापासून भाज्या बाजारात जावून विकण्यापर्यंतची सारी कामे मी करत असे”.

सर्वात महत्वाचे म्हणजे याचा दोष ते त्यांच्या कुटूंबियाना कधीच देत नाहीत, त्यांना घरच्या स्थितीची आणि संघर्षाची जाण आहे. ते पुढे सांगतात की, माझी आई हेच करत होती, वडील करत होते त्यामुळे मी देखील सहजतेने हेच केले. मी ते मनापासून केले, मला त्यासाठी कुणी जबरदस्ती केली नाही. ही शिस्त होती, त्यातून जीवनात वागण्याचा सच्चेपणा होता तो मला मिळाला. लहानपणापासून मी माझ्या कामावर पूर्ण लक्ष द्यायला त्यातून शिकलो.”

काळासोबत मुंढे कुटूंबिय बदलत गेले, विशेषत: यांच्या भावाने राज्य सेवा परिक्षा उत्तिर्ण केल्यानंतर त्यांच्या भावाने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले तरी त्यांचे इंग्रजी उत्तम होते त्यांनी त्यासाठी इंग्रजी बोलण्यासाठी शिकवणी केली. तुकाराम सांगतात की, “ आम्ही प्रचंड संघर्ष आणि हालाखीतून आलो त्यामुळे इतरांची तुलना कधीच केली नाही. मला काही अन्याय दिसला की खूप अस्वस्थ वाटते. काही लोक मला अतिसंवेदनशील आणि उद्दाम समजतात. पण निश्चयीपणा आणि उद्दामपणा यातील सीमारेषा खूपच धुसर असते, मी माझ्या भूमिका घेतल्या की ठाम असतो, हे माझ्या पार्श्वभूमीतून माझ्या जीवनानूभवातून आले आहे.”

तुकाराम दहावीनंतर औरंगाबादला आले, तो त्यांच्यासाठी सांस्कृतिक धक्का होता, ते गावातून आले होते त्यावेळेपर्यंत त्यांना सिनेमा काय असतो माहिती नव्हते त्यांनी पहिला सिनेमा वयाच्या १६व्या वर्षी पाहिला. त्यांना वृत्तपत्र काय ते माहिती नव्हते ते त्यांना गावात मिळतच नव्हते. दूरचित्रवाणी बाबत तर त्यांच्या मनात वेगळ्याच संकल्पना होत्या.

अकरावी आणि बारावीत ते विज्ञान शाखेत जाणार असे ठरले कारण त्यांच्या भावाने ते ठरवले होते. त्यानंतर त्यांनी भावाला त्यांना जिल्हाधिकारी व्हायचे आहे असे सांगितले त्यावेळी मुंढे म्हणतात की ते काय असते हे देखील मला नीट माहिती नव्हते. ते म्हणतात की “मला वाटले की मी प्रामाणिकपणे सनदीसेवा परिक्षा देईन, मला आलेल्या अनुभवातून मला ते सहज शक्य आहे.”

मुंढे यांनी सरकारी महाविद्यालयातून पदवी मिळवली, १९९६ मध्ये इतिहास, राज्य शास्त्र, आणि सामाजिक विज्ञान हे विषय घेवून. त्यानंतर ते मुंबईला गेले राज्य प्रशासनिक सेवा परिक्षा देण्यासाठी.  त्याचवेळी त्यांनी पदव्योत्तर शिक्षणासाठी दाखला घेतला. १९९७ मध्ये ते प्रथम सनदी सेवा परिक्षेत उत्तिर्ण झाले.  मुख्य परिक्षेत त्यांना ८७० गुण मिळाले. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये दुसरी परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण  केली. त्याच वेळी त्यांनी त्यांच्या JRF-NET, चे शिक्षण पूर्ण केले होते आणि त्यांना पाच हजार रूपयांच्या शिष्यवृत्ती राज्यशास्त्रातील संशोधना साठी सुरू झाल्या होत्या. त्यातून ते स्वयंपूर्ण होत गेले. २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असल्याने मुंढे यांनी दोन महिने जळगाव मध्ये व्याख्याता म्हणून काम केले. डिसें २००४मध्ये ते राज्य सेवेत रूजू झाले आणि त्यांनी केंद्रीय सेवा परिक्षा देण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर ११मे २००५ला ते यशदा पुणे येथे प्रशिक्षणा दरम्यान विपश्यना करत असतानाच त्यांच्या मित्रांनी त्यांना ते केंद्रीय सेवा परिक्षेत  उत्तिर्ण झाल्याचे सांगितले. त्यानंतर यशदा मध्ये सहकारी मित्रांसोबत हे यश त्यांनी साजरे केले! 


त्यानंतरच्या काही दिवसांत त्यांनी मराठवाड्यातील तरुणांना स्पर्धा परिक्षेत कसे यश मिळवावे यावर मार्गदर्शन देखील केले. ते म्हणतात की, “ दरम्यान माझ्या वडीलांना अर्धांग वायूचा झटका आला, २००४ पर्यंतचा काळा माझ्यासाठी खूप परिक्षा घेणारा होता. मात्र अशा वेळी तुम्ही खंबीर होवून निर्णय घ्यायचे असतात. दरम्यान राज्य सेवा परिक्षेच्या प्रशिक्षणात सरकारच्या कामकाजाची पध्दत समजावून घेता आली.” सनदी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेताना जीवनात प्रथमच त्यांना जीवनाचा आनंद घेता आला.

कर्तबगार माणूस

मुंढे यांना महाराष्ट्र केडर देण्यात आले आणि त्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रथम नेमणूक देण्यात आली. तेथे गेल्यावर सर्वात प्रथम त्यांनी बेकायदा दारू दुकानांवर धाडी सुरू केल्या. तो त्यांच्या सेवेतील तिसरा किंवा चवथा दिवस होता त्यांनी एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या बारवर छापा घातला.

त्यानंतर मार्च २००७मध्ये ते बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असताना त्यांनी बेकायदा बांधकामे कारवाई करून काढून टाकली त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. मुंढे म्हणाले की हे पाडकाम सुरू असताना एका बेकायदा दारू दुकानदाराने पथकला बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यांनी पाडकाम थांबवले आणि संबंधित घटनेच्या व्हिडीओ चित्रीकरणाच्या आधारे संबंधित इसमाला धमकी दिल्या प्रकरणी अटक करण्याचे आदेश दिले. दुस-या दिवशीच विधानसभेत त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली मात्र जिल्हाधिकारी यांनी त्यांची बाजू घेतली आणि त्यांचा बचाव केला. त्यानंतर मुंढे यांचा संघर्ष माढा मध्ये वाळू माफिया सोबत झाला. 

Nagpur chapter – how to deal with press
Nagpur chapter – how to deal with press

नागपूर जिल्हा परिषदमध्ये नियुक्ती झाली असताना त्यांना वेगळा अनुभव आला, तेथे सिंचन विभागात भ्रष्टाचार होता, ज्यावेळी प्रथमच माध्यमांचे लोक मुंढे यांच्याकडे आले त्यावेळी त्यांना त्यांनी 'नंतर या' असे सांगितले कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नव्हते. त्यानंतरही माध्यमांशी त्यांचे संबंध कधीच जवळचे राहिले  नाहीत. त्या काळात त्यांना काही सरकारी शाळा बंद असल्याचे दिसून आले. त्याचे कारण माहिती करून घेताना शिक्षक अधिवेशनाला गेल्याचे समजले त्यांनी त्या शिक्षकांना नोटीसा दिल्या आणि काही जणांना निलंबित देखील केले. शिक्षक संघटनांच्या मुजोरीला त्यांनी दाद दिली नाही. त्यानंतर कुणीही अशाप्रकारे त्यांच्या समोर बेशिस्त वागण्याचे धाडस केले नाही.

त्यांच्या नागपूरच्या नियुक्तीच्या काळात त्यांचे लग्न झाले, अनेकांना असे वाटले की आता ते त्यांचे व्यस्त कामकाज कमी करतील मात्र नाही, त्यांचे खाजगी जीवन त्यांनी कार्यालयीन कामात कधीच आड येवू दिले नाही.

जुलै २००९मध्ये त्यांना नाशिक जिल्हापरिषदेत नेमणूक देण्यात आली. त्यानंतर तीनच महिन्यात त्यांना वाशिम येथे बदली करण्यात आले. तेथे त्यांनी दहा महिने काम केले. त्यानंतर त्यांना मुंबईत खादी ग्रामोदयोग मध्ये बदली करण्यात आली तेथे त्यांना सरकारी घर मिळण्यास सहा महिने लागले, तोट्यात असलेल्या या महामंडळाला त्यांनी वर्षभरानंतर फायद्यात आणून दाखवले.

२०११मध्ये त्यांची नियुक्ती जालना येथे झाली तेथे बेकायदा खाणीच्या विरोधात त्यांनी कारवाई सुरू केली आणि पाणी टंचाईच्या मुद्यावर काम केले. ज्या भागात पाच दिवसांनी एकदा पाणी मिळत होते तेथे त्यांनी दिवसाआड पाणी कसे देता येईल याचे नियोजन केले. त्यासाठी २५० किमी वरून जायकवाडी येथून पाणी आणण्याची योजना तयार केली. निजामाच्या काळातील काही जुन्या प्रकल्पांना त्यांनी पुनरूज्जीवित करण्याची योजना देखील आखली. कार्यालयातील दलालांच्या साखळ्या त्यांनी उध्वस्त केल्या आणि लोकांची कामे वेळेवर व्हावीत असा प्रयत्न केला.   

लेखक : आलोक सोनी
अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील