नोकरी देणारे बना!!! डिक्कीचा नारा....

नोकरी देणारे बना!!! डिक्कीचा नारा....

Friday March 25, 2016,

3 min Read

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. जातीच्या जोखडात अडकलेल्या भारतीय समाजाला त्यातून बाहेर काढून देश सक्षम बनवण्याचं त्यांचे ध्येय होतं. याचाच ध्यास घेत त्यांनी संविधानात समाजातल्या या उपेक्षित घटकाला खास जागा मिळवून दिली. आरक्षण दिलं आणि त्यांना सवर्णांबरोबर खांद्याला खांदा लावून जगण्याचा अधिकार दिला. यंदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली जातेय. याचाच एक भाग म्हणून डिक्की अर्थात दलित इंडस्ट्रीयल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियानं पाचव्या डिक्की एक्स्पोचं आयोजन केलंय. मुंबईत शुक्रवारी या दिमाखदार सोहळ्याचं उदघाटन केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दलित उद्योग जगताशी निगडीत सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

image


डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षीत असलेला भारत घडवता यावा आणि दलित युवकांमध्ये उद्योगशीलता विकसित व्हावी यासाठी डिक्कीची स्थापना करण्यात आली. यंदा डिक्कीचं दहावं वर्षे आहे. तसंच यावर्षी बाबासाहेबांची १२५ वी जयंती आलेली असताना डिक्कीनं दलित उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या डिक्की एक्स्पोच्या माध्यमातून दिला आहे. १०० हून जास्त दलित उद्योजकांनी आपले स्टॉल इथं लावले आहेत. याद्वारे दलित उद्योजकांकडून केल्या जाणाऱ्या विविध उद्योजकांची माहिती मिळतेय. यात गृह उद्योगापासून ते मोठी उपकरणे बनवण्यापर्यंत आणि माहिती तंत्रज्ञानासंदर्भातल्या कंपन्यांचाही समावेश आहे. 

image


उदघाटनाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिक्की करत असलेल्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले “ समाजाच्या तळागाळातून आलेल्या या उद्योजकांसाठी डिक्की करत असलेल्या कामाचा गौरव करावा तेवढा कमी आहे. दिल्लीतल्या भाजपा सरकारनं दलित उद्योजकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्र सरकारही याबाबतीत प्रयत्नशील आहे. आणि दलित युवकांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी आमचं राज्य सरकार नवनव्या योजना आखत आहे. त्याचा फायदा या युवकांनी घ्यावा आणि नव्या कल्पनांना मुर्तरुप द्यावे” 

image


केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी उद्योगवाढीसाठी खासकरुन दलित समाजासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले “ या विविध योजनांमुळे दलित समाजातल्या उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे, ही जमेची बाजू आहे. बाबासाहेंबानाही हेच अपेक्षित होतं. यामुळे जास्तीत जास्त उद्योजकता वाढीला लागेल आणि एकूण समाजाचा फायदा होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे.” 

image


यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दलित उद्योजकांना चालना मिळावी म्हणून बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीचं निमित्त साधून दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम दलित युवकांच्या उद्योगासाठी देण्यात येईल. शिवाय बँकांच्या मार्फेत ही या युवकांना सरळ आणि सोप्यापध्दतीनं कर्ज मिळावं यासाठी तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे स्टार्टअप सुरु करणाऱ्या दलित युवकांना एक खिडकी योजनेद्वारे निधी मिळवता येईल. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी याबद्दल आनंद व्यक्त केलाय. “ केंद्र सरकारच्या या तरतूदीमुळे पुढच्या तीन वर्षांमध्ये अडीच लाख नवे दलित उद्योजक तयार होतील” असा कांबळे यांना विश्वास आहे. 

image


मुंबईत आयोजित करण्यात आलेला हा पाचवा डिक्की एक्स्पो अनुसुचित जाती आणि जमातीच्या उद्योजकांना चालना मिळावी यासाठीच आहे. याद्वारे डिक्की आणि एनएसआयसीतर्फे दलित समाजाने केलेल्या औद्योगिक प्रगतीचं प्रदर्शन मांडण्यात आलंय. असे एक्स्पो पुणे आणि नागपूरमध्येही आयोजित करण्यात येणार आहेत. या एक्स्पोद्वारे दलित उद्योजकांना नेटवर्किंगची संधी उपलब्ध करुन देणं हे सर्वात मोठं उद्दीष्ट आहे. सरकारी अधिकारी तसंच खासगी उद्योजकांशी थेट संवाद साधता येणार आहे. अनुसुचित जाती आणि जमातींसाठी नेमक्या कोणत्या योजना आहेत. त्याचा हे उद्योजक कशाप्रकारे फायदा उठवू शकतात यासाठी मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले आहे. बँकीग क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बँकांद्वारे थेट निधी आणि कर्ज उपलब्ध करुन देण्याची सोयही आहे. मागच्या काही वर्षांपासून रतन टाटा आणि गोदरेज सारख्या नामावंत उद्योजकांनी या एक्स्पोला उपस्थिती लावली होती. यंदाही उद्योगक्षेत्रातले अनेक नामवंत इथं येणार आहेत. आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी नवीन उद्योजकांना मिळणार आहे. शिवाय इथल्या चर्चासत्रात आपल्या उद्योगासंदर्भात माहिती देण्याची संधी ही मिळणारेय. यामुळे दलित उद्योजकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. 

image


'डेवलपिंग बिजनेस लीडरशीप' हे डिक्कीचं ब्रीद वाक्य आहे. य़ा एक्स्पोद्वारे 'बी जॉब गिवर' अर्थात 'नोकरी देणारे बना' असा नवा संदेश देण्यात आलाय. यामुळे इथं येणाऱ्या नव्या तरुणांमध्ये उद्योजक घडवण्याचं काम करण्यात येणार आहे. हे विशेष......  

image