स्वतःच्या मुलाच्या रस्ते अपघातातून धडा घेऊन सुरु केली रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

स्वतःच्या मुलाच्या रस्ते अपघातातून धडा घेऊन सुरु केली रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

Friday December 18, 2015,

3 min Read

प्रत्येक मनुष्याला आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट काळाचे सोबती बनावे लागते. चांगला काळ हा चांगल्या कर्माचे फळ देतो पण तेच विपरीत परिस्थितीत माणूस विचलित होतो, त्याचा धीर खचून जातो. तेच जर लोकांनी संयमाने दुःख पचवून आपल्या मनाच्या शक्तीला एकवटले तर आपल्याद्वारे केलेले काम हे इतरांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनू शकते म्हणून सदैव सकारात्मक विचारातून पुढील वाटचाल केली पाहिजे.

लखनऊ स्थित आशुतोष सोती यांची ही कहाणी आपल्याला बरेच काही शिकवून जाते, प्रसंगी लढण्याची आपल्याला प्रेरणा देते. जे आपल्याला कठीण परिस्थितीत सकारात्मक विचारांनी देश व समाजासाठी काम करण्यास प्रोत्साहित करते. आशुतोष हे लखनऊच्या एका दवाखान्यात उच्चपदावर काम करीत आहेत. जुलै २०१० मध्ये आशुतोष यांचा १५ वर्षाचा १२ वीत शिकणारा मुलगा शुभम सोती हा एका रस्ते अपघातात मृत्युमुखी पडला. या घटनेनंतर त्यांचे पूर्ण कुटुंब खचून गेले. पण याही परिस्थितीत आशुतोष यांनी एक पण केला की, ते आपल्या मुलाच्या नावाने समाजात एक सकारात्मक संदेश देवून त्याचे नाव अमर ठेवतील.


image


शुभमच्या मृत्युनंतर काही काळाने आशुतोष यांनी शुभम सोती नावाने एक संस्था स्थापन केली. त्यांचा हेतू रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी होता. आशुतोष सांगतात की, भारतात दरवर्षी रस्त्याच्या दुर्घटनेत हजारो बळी जातात, याचे मुख्य कारण म्हणजे बेजबाबदार पणा हा होय. लोकांनी जर नियमांचे काटेकोर पालन केले तर आपण अनेक दुर्घटनांपासून वाचू शकतो. परदेशात नागरिक रस्त्यांच्या नियमांबाबत खूप जागृत आहेत. ते गाडीच्या मागील सीटवर बसलेले असतील तरी सीटबेल्ट बांधता पण भारतात आपण फक्त दंड वाचवण्यासाठी त्याचा वापर करतो. हीच मानसिकता आपल्याला दुचाकीस्वारांची आहे, ते केवळ पोलिसांच्या भीतीने हेल्मेट घालतात. याच लोकांनी दंडाला घाबरण्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षेच्या भावनेने ही कृती केली तर दुर्घटनाग्रस्त होण्याचे प्रमाण बरेच कमी होईल. आशुतोष सांगतात की, ‘भीती ही कोणत्याही समस्येचे समाधान नाही तर जागरुकता हा समस्येचा उपाय आहे. जर लोकांनी जागरूक होऊन स्वतः बद्दल विचार करून नियमांचे पालन केले तर समोर पोलीस आहे किंवा नाही याचा त्यांना मुळीच फरक पडणार नाही'.


image


आशुतोष पुढे सांगतात की,"रस्त्याच्या नियमांच्या पालनाचे धडे मुलांना देणे जास्त गरजेचे आहे. या गोष्टींच्या शिकवण्याने भविष्यातील पिढी जास्त जागरूक राहील".

शुभम सोती संस्थेच्या वतीने वर्षाच्या ठराविक दिवशी जसे ५ जानेवारी या शुभमच्या जन्मदिनी एक मोठा कार्यक्रम आयोजित करतात ज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा (क्विज ) असते ज्यात ते हेल्मेट भेटस्वरूप देतात. याशिवाय १५ जुलै शुभमच्या पुण्यातिथीच्या दिवशी रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत काही कार्यक्रम आयोजित केले जातात. या दोन दिवसांव्यतिरिक्त वर्षभर सरकार आणि इतर संस्थांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षेचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यांना सर्वांकडून भरपूर योगदान पण मिळते.


image


शुभम सोती संस्थेला जवळजवळ ३५ स्वयंसेवकांचे नियमित योगदान मिळते. हे लोक शाळेत जाऊन रस्ता सुरक्षेबाबत मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. त्यांना रस्त्यावर वाहन चालविण्याचे छोटे छोटे नियम सांगतात जसे वाहनाचा वेग किती ठेवला पाहिजे, लाल, हिरवे, पिवळा दिव्यांची माहिती देतात. आशुतोष अशा प्रयत्नात आहेत की, राज्य सरकारने रस्ता सुरक्षा हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात सामील केला पाहिजे. त्यांनी काही दिवसांपूर्वी शुभम सोती रोड संस्कृती क्लबची स्थापना केली असून अनेकजण त्याला जोडले गेले आहेत आणि हे लोकजागृतीचे काम पण करीत आहेत.

शुभम सोती संस्थेद्वारे बरेच उपक्रम राबवले जातात, जसे मुलांसाठी वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आशुतोष यांना वाटते की, मुलांचा सर्वांगीण विकास गरजेचा आहे, यासाठी ते खेळांचे आयोजन करतात. याच दरम्यान त्यांनी शुभम सोती क्रिकेट क्लबची स्थापना केली, ही टीम वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेते.

आशुतोष सांगतात की, भविष्यात आम्ही लखनऊ व्यतिरिक्त इतर राज्यात आपल्या मोहिमेचा विस्तार करू इच्छित आहोत. यासाठी ते लोकांना आवाहन करतात की त्यांच्या संस्थेला हातभार लावावा आणि जनकल्याणासाठी पुढे यावे.

जर आपण रस्ता सुरक्षेच्या या मोहिमेत सहभागी होऊ इच्छित असाल त्यांच्याशी संपर्क साधावा -:

www.shubhamsoti .org /

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close