अविश्वसनीय करमणुकीची आरामदायी सहल – फील मोटरहोम

0

समजा तुम्हाला कुटुंबासोबत गावी जायचंय. मग सहा-सात जण जेमतेम बसतील अशी गाडी शोधण्यात येते. त्यात सामानही. अगदी मांडीला माडी लावून दाटीवटीनं हा प्रवास सुरु होतो. कधी एकदा गावी पोचतोय असं व्हायला होतं. पोचल्यावर काही तास प्रवासाचा क्षीण घालवण्यात जातो. पण हा प्रवास अगदी आरामात झाला तर? इतका आरामात की तुम्हाला अगदी घरी असल्यासारखं वाटलं पाहिजे. एकमेकांशी गप्पा मारत. घरी बसतो ना तसे अगदी पसरून. असा जर प्रवास झाला तर आपण अगदी ताजेतवाणे राहू इतके की प्रवास केला असं वाटणार नाही. हीच गरज लक्षात घेऊन पुण्याच्या अभिजीत वाघमारे या तरुणानं 'फील मोटरहोम' ही 'कॅराव्हॅन सर्विस' सुरु केलीय.

अभिजीत वाघमारे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. नोकरीसोबत आणखी काय करता येईल याच्यावर विचार करत असताना या फील मोटरहोमची कल्पना त्याला सुचली आणि काही महिन्यातच ही सेवा सुरु ही करण्यात आली. सहल, कॅम्पिंग किंवा मग कॉर्पोरेट मिटींगसाठी जाताना प्रवास अगदी आनंदीदायी व्हावा यासाठी ही फील मोटरहोम कॅराव्हॅन आहे.

आरामदायी प्रवासाचा विचार करुन फील मोटरहोममधली आखणी करण्यात आलीय. आपण घरी जसे एकमेकांसोबत गप्पा मारत बसतो तशी आतली बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय. मस्त पाय ताणून बसता येईल अशी ही व्यवस्था आहे. असे दोन सोफा कम बेड आहेत. शिवाय थोड्या उंचीवर तीन माणसं आरामात झोपू शकतील अशी स्लीपरची सोय ही करण्यात आलीय. शिवाय गाडीतच पॅन्ट्री आहे. आपल्याला जे हवं ते बनवून घेण्याची सोय उपलब्ध आहे. बाथरुम आणि टॉयलेट ही आतच. शिवाय या व्हॅनमध्ये मनोरंजनासाठी टीव्हीदेखील आहे. म्हणजे फील मोटरहोमची कॅराव्हॅन असा चालता-फिरता फ्लॅटच आहे.

परदेशात अशा आलीशान कॅराव्हॅन पहायला मिळतात. या प्रचंड कॅराव्हॅन कुटुंबासाठी विकएन्ड पिकनिक कार म्हणून वापरल्या जातात. भारतात कॅराव्हॅनची संकल्पना आता कुठे रुजू लागलीय. यामुळं अभितीज वाघमारेंचा हा  नवा उपक्रम स्तुत्य आहे. त्यात त्याला साथ मिळतेय त्याचे वडील शेखऱ वाघमारे यांची. भारतात कॅराव्हॅन प्रामुख्यानं सिनेमातले लोक वापरताना दिसतात. आता कॅराव्हॅनचा वापर असा कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत पिकनिकसाठी होऊ लागलाय हे विशेष .

सध्या ही सेवा फक्त पुण्यातून मुंबई, शिर्डी आणि हैद्राबादसारख्या महत्वाच्या शहरांपर्यंत मर्यांदीत आहे. पुढे देशभरात कॅराव्हॅन फ्लीट सेवा सुरु करण्याचा अभिजीतचा मानस आहे. त्यासाठी देशभरात कॅराव्हॅनचं नेटवर्क सुरु करण्यावर त्यांचा भर आहे. तुमच्याकडे असलेली कॅराव्हॅन आवडीनुसार हवी तशी बनवून देण्याची सेवा ही ते लवकरच सुरु करणार आहे, यामुळे पुढच्या काही कालावधीत संपूर्ण देशभरात फील मोटरहोम अशा करमणुकीच्या आरामदायी सहलीचा आनंद लुटता येईल.

Related Stories

Stories by Narendra Bandabe