अश्विनी तेरणीकर : फिल्ममेकिंगप्रमाणे त्याचे प्रमोशनही एकजुट प्रयत्नांचा उत्तम नमुना बनू शकतं.

0

नटसम्राट हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तो हिट ही झाला. इतकेच नाही तर सिनेमाला भेडसावणाऱ्या सध्याच्या पायरसीच्या समस्येवर तोडगा म्हणून नुकताच हा सिनेमा नव्या प्रसंगाला समाविष्ट करुन पुनः प्रदर्शित केला गेला. मराठी सिनेमात अशापद्धतीने एकाच सिनेमाचे दोन वेळा प्रदर्शन करणे हा ब्रँड न्यु फॉर्म्युला होता. ज्यासाठी नटसम्राटची टीम, एस्सल व्हिजन यांच्यासोबतच लीड मिडीया पब्लिसिटीची नोंद विशेष करुन घ्यायला हवी. आणि नाव घ्यायला हवे लीड मिडीया पब्लिसिटीच्या अश्विनी आणि विनोद सातव यांचे.

नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, राजवाडे अँड सन्स, बायोस्कोप, टाईमपास 2, सारख्या 2015मधल्या हिट मराठी सिनेमांना प्रमोट करण्याचे स्ट्रॅटेजिकल नियोजन लीड मिडीया ग्रुपने केले. “ फिल्मचे प्रमोशन हा खरंतर फिल्ममेकिंगचाच भाग असतो, म्हणजे सिनेमा बनताना ज्याप्रमाणे टीमवर्क लागतं त्याप्रमाणेच तो सिनेमा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी टीमची आवश्यकता असते. आणि जेव्हा हे टीमवर्क घडते तेव्हा त्याचे सकारात्मक निकालही पहायला मिळतात. राजवाडे अँड सन्स, बायोस्कोप, कट्यार...हे अशाच टीमवर्कची उदाहरणं असल्याचे ” अश्विनी सांगते.

“ बायोस्कोप हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमातला आत्तापर्यंतचा एक आगळा वेगळा प्रयत्न मानायला हवा, कारण चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चार वेगवेगळ्या कथा आणि त्या प्रत्येक कथांशी संबंधित कलाकारांचा वेगवेगळा समूह, संगीत सगळेच खुप विस्तारीत होतं. अशावेळेला त्या सिनेमाचे प्रमोशन योग्य पद्धतीने करुन प्रत्येक कथा आणि यातल्या कलाकारांना न्याय मिळेल हा अर्थातच आमचा प्रयत्न होता. जो बहुतांश यशस्वीही झाला.”

अश्विनी सांगते “ बायोस्कोप सिनेमाची टीमही खरेतर खुप मोठी होती, प्रत्येकजण त्यांचे त्यांचे विचार मांडायचे पण जेव्हा अंतिम निर्णय घेतला जायचा तेव्हा सर्व टीमच्या वतीने चार दिग्दर्शकांपैकी एक असलेला रवी जाधव याचा शब्द अंतिम मानला जायचा. ज्यामुळे या सिनेमाचे विविध पद्धतीने प्रमोशन आम्हाला करता आले.”

बीकॉम एमबीए केलेल्या अश्विनीसाठी फिल्म प्रमोशन हा भाग खरंतर करिअरच्या उत्तरार्धात आला असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. अश्विनीने आपल्या करिअरची सुरुवात इव्हेंट मॅनेजमेंटपासून केली आणि मग हळूहळू कॉर्पोरेट तसेच कल्चरल इव्हेंट करता करता फिल्म प्रमोशनची नवी वाट तिला दिसू लागली यात तिचा सहकारी आणि लीड मिडीया ग्रुपमधला तिचा पार्टनर विनोद सातवही तिच्यासोबत होता. किरण यज्ञोपवितच्या सलाम सिनेमापासून झालेली त्यांची सुरुवात यानंतर अनेक उत्तमोत्तम सिनेमांच्या प्रमोशनने समृद्ध होत गेली.

पण अजूनही अश्विनीला फिल्म प्रमोशनचा हा व्यवसाय म्हणजे एक कौटुंबिक व्यवसाय असल्यासारखा वाटतो. “अनेकदा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पंधरा दिवस आधी निर्माते दिग्दर्शक आमच्याकडे येतात, त्यांना या पंधरा दिवसामध्ये आमच्याकडून एखाद्या पत्रकार परिषदेची आणि कलाकारांच्या मुलाखती आयोजित करुन देण्याची अपेक्षा असते. आम्हीही या अपेक्षा पुर्ण करतो. शेवटी आमच्यासाठी हा एक व्यवसाय आहे आणि येणाऱ्या निर्मात्याच्या अपेक्षा पुर्ण करणे ही आमची जबाबदारी असतेच. ”

“अर्थात मराठीतल्या सगळ्याच सिनेमांच्या बाबतीत असे होत नाही. अतुल कुलकर्णीची पहिलीवहीली निर्मिती असलेला राजवाडे अँड सन्स सिनेमा जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा अतुलच्या डोक्यात या सिनेमाचे प्रमोशन कसे व्हावे याबद्दल स्पष्ट आयडिया होती. आम्हीही त्याच पद्धतीने काम केले ज्यामुळे सिनेमाचे योग्य आणि पुर्वनियोजित पद्धतीने प्रमोशन केले गेले. ”

अश्विनीच्या मते फिल्म प्रमोशन आणि ते करणाऱ्या लोकांना अनेकदा गृहित धरलं जातं. “ सिनेमा पुर्ण झाला की मग ते प्रमोशनसाठी आमच्याकडे येतात. सिनेमाचे प्रोमोज, कलाकारांचे फोटोज दिले म्हणजे सगळं झालं असं त्यांना वाटतं. मग आम्ही आमचं आमचं काम करायचं आणि त्यांना रिझल्ट द्यावे हा त्यांचा हट्ट असतो. या क्षेत्रात गेली आठ वर्ष काम करताना मला हे सगळ्यात मोठं आव्हान वाटतं. ”

“ फिल्म प्रमोशन क्षेत्रात होणारे व्यवहार हे व्यक्ति संबंधित असतात त्यात कुठलेही लेखी करार होत नाही ज्यामुळे फसवणुकीचे अनुभवही आम्हाला येतात. अनेकदा दिलेले चेक्स बाऊंस होतात, तर कधी ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन आम्हाला गप्प बसवले जाते. अर्थात प्रत्येक व्यवसायाच्या चांगल्या वाईट बाजू असतातच. ”

अश्विनी सध्या जाऊंद्या ना बाळासाहेब सिनेमाच्या प्रमोशन स्ट्रॅटेजीमध्ये व्यस्त आहे. मराठीत आता नवनवीन निर्मात्या संस्था येतायत, हिंदीतले अनेक प्रतिष्ठीत प्रॉडक्शन हाऊस मराठी सिनेमात पैसे गुंतवतायत अश्विनी याकडे एक सकारात्मक बदलाच्या दृष्टीने बघते.

मराठी सिनेमा बदलतोय पण त्याला प्रमोट करण्यासाठी अजूनही तशाच सरधोपट पद्धती आणि प्रक्रिया वापरल्या जातायत. नवीन निर्मिती संस्था आल्यानंतर त्यांचे नवे विचार आणि नव्या स्ट्रॅटेजीही येतील ज्यावर सध्या अश्विनी नजर रोवून आहे.