श्वे‘तालेरंग’... कुशल कर्मचाऱ्यांची सैन्यउभारणी!

0

श्वेता रैना एक व्यावसायिक म्हणून जगावेगळ्या आहेत. श्वेता यांच्या ‘तालेरंग’चा तालही जगावेगळाच आहे. श्वेता हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकल्या. भारतीय युवकांना नोकरी अन्‌ रोजगारात कुशल करून सोडण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊनच त्या मायदेशी परतलेल्या होत्या. इथे आल्यानंतर श्वेता यांनी आपल्या स्वप्नामध्ये जो एक रंग मिसळला… तो म्हणजे… तालेरंग! ‘तालेरंग’ची स्थापना जणू एक ‘जंग’ लढण्यासाठीच झालेली होती. विद्यार्थी, युवक अन विविध आस्थापनांमधून कार्यरत नवोदितांमधील कौशल्याच्या अभावाविरुद्ध युद्ध पुकारायचे होते… आणि हा अभाव परास्त करून कुशल कर्मचाऱ्यांचे एक सैन्यच उभारायचे होते.

वयाच्या सतराव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी श्वेताने मुंबई सोडली आणि ब्राउन युनिव्हर्सिटीत ती दाखल झाली. तेव्हा कुणी विचारही केला नव्हता, की श्वेता पुढे जाऊन कमालीची आव्हाने असलेल्या या क्षेत्रात स्वत:ला आजमावतील आणि यशस्वीही होतील म्हणून. आपल्याच वयाच्या अन्य महत्त्वाकांक्षी तरुण मंडळीप्रमाणे सुरवातीला त्या इंटर्नशिप करत राहिल्या. आणि नंतर न्युयॉर्कमधील ‘मॅक्किंसे अँड कंपनी’साठी एक विशिष्ट जबाबदारी पार पाडायला सुरवात केली. पुढे एक काळ लोटला तसे ‘टीच फॉर इंडिया’ आणि ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’साठीही त्यांनी आपली सेवा दिली. या सगळ्या अनुभवांनंतर ‘तालेरंग’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

‘तालेरंग’ सुरू करण्यामागे काय प्रेरणा होती, याबद्दल सांगताना श्वेता म्हणतात, ‘‘पदवीदरम्यानच मला पुढे नेमके काय करायचे आहे, त्याचा विचार मी करत असे. उन्हाळ्याची सुटी मी फ्रांसमध्ये एका संज्ञापन कंपनीसाठीच्या कामात घालवली. अशीच दुसरी दीर्घ सुटी मी मुंबईतील एका बँकेत काम करत घालवली. पुढल्या उन्हाळ्यात मी अमेरिकेत होते. ‘गोल्डमॅन सॅच्स’साठी तेव्हा काम केले. पदवीनंतर न्युयॉर्कमधली ‘मॅक्किंसे’ जॉइन केली. ‘मॅक्किंसे’मध्ये जे काही मी करत होते, त्यात प्रत्येक बाबतीत प्रचंड वाव होता, पण वेळ पुढे सरकत गेली तसा, अरे आपले खरे क्षेत्र सामाजिक उद्योग हेच आहे, असे मला वाटत गेले आणि पटतही गेले.’’


श्वेता : ‘तालेरंग’ संकल्पनेबद्दल…

‘‘त्यावेळी ‘मॅक्किंसे’ ‘टिच फॉर इंडिया’शी संलग्न होती. ‘टिच फॉर इंडिया’ आणि तिच्या नेटवर्कबद्दल मी जाणून घेतले. भारतात परतल्यावर ‘टिच फॉर इंडिया’च्या ‘सीईओं’ची भेट घेतली. आघाडीच्या चमूतील सदस्य म्हणून त्यांनी माझी निवड केली. विपणन आणि भरतीशी संबंधित कामाची जबाबदारी माझ्याकडे होती. या दरम्यान मी देशभरातील शंभराहून अधिक आणि निवडक अशा महाविद्यालयांचा दौरा केला. त्या-त्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ‘टिच फॉर इंडिया’ची फेलोशिप निवडावी म्हणून त्यांना (विद्यार्थ्यांना) तयार करणे, असे या दौऱ्यांचे उद्दिष्ट होते.’’

‘‘मागे वळून पाहताना मला हे वाटतेच, की खरंतर ‘तालेरंग’च्या कल्पनेचे अंकुर त्या दौऱ्यांदरम्यानच फुटलेले होते. कायदा, अभियांत्रिकी आणि अन्य क्षेत्रांतील हजारो लोकांना त्या काळात भेटण्याचा योग आला. भारतीय तरुण आपल्या आयुष्याबद्दल कित्ती दुविधांमध्ये अडकलेला आहे, हे त्यातून मला प्रकर्षाने जाणवले. एका चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला म्हणजे समस्या सुटली, असे काही नाही. ‘हॉर्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये असतानाच मी पूर्ण उन्हाळा ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’मध्ये काम करत घालवलेला होता. ‘सर्व्हिस टिम’समवेत काम करत असलेल्या अनेक लोकांशी मी तेव्हाही बोललेले होते. अर्थात ते फारच हुशार लोक होते, पण शिक्षण प्रक्रियेतून त्यांच्या भूमिकांसाठी (पदांसाठी) बरेच काही त्यांना मिळायचे राहून गेलेले आहे, हे मला खास जाणवले. सर्व्हिस सेंटरमधल्या या लोकांना विविध परिस्थितींमध्ये त्या-त्या अडचणींचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन मी केले. जेणेकरून विशिष्ट परिस्थितीचा अगर आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे.’’

‘‘नंतर पुढे पुन्हा मी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलसाठी परतले. कामगार आणि त्यांच्या उत्पादकतेशी निगडित मुद्दे हाताळण्यासाठी माझ्यासोबत भारतात काम करायला उत्सुक असलेले एक प्राध्यापक महोदय मला याचदरम्यान भेटले. आम्ही भारतातल्या काही महाविद्यालयांची निवड केली आणि त्यांतून पायलट प्रोजक्टवर काम सुरूही केले. पुढे ‘तालेरंग’ची स्थापना झाली.’’

श्वेता : आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल…

‘‘स्टार्टअपचे वातावरण कसे असते, हे मला आधीपासून ठाऊक होते. आधीही मी ते केलेले होते. स्टार्टअपच्या पहिल्या दिवसापासूनच ‘तालेरंग’च्या माध्यमातून हा व्यवसाय आपण कायमस्वरूपी म्हणून करायचा हे मी ठरवून टाकलेले होते. समाजाचेही आपल्या या उपक्रमातून भले व्हावे, हा उद्देशदेखिल होताच. खरं तर ही सामाजिक भावनाच मला अधिक समाधान देते. म्हणजे आत्मिक समाधान देते. केवळ पैसे नाहीत म्हणून एखाद्या उमेदवाराला परत पाठवणे मला कधीही जमले नाही. एखादा बांधव अंध आहे, त्याला आधार हवा आहे आणि मग काठीने नाही म्हणून कसे चालेल.’’

श्वेता : प्रशिक्षण तंत्राबद्दल…

‘‘आम्ही आजकालच्या युवकांच्या मानसिकतेचा सर्वे केला. कितीतरी कंपन्यांच्या सीईओंशी आम्ही यासंदर्भात बोललो. बहुतांश सीईओंनी हेच सांगितले, की आजकालच्या तरुणांना ते कुठल्या टोकावर उभे आहेत, हेच नेमके कळेनासे झालेले आहे. सहा-सहा महिन्यांत आजकालचे तरुण नोकऱ्या बदलतात. एके ठिकाणी थोडेही टिकत नाहीत. पुढे सुरवातीला हवीहवीशी वाटणारी नवीन नोकरीही एकदा मिळाली, की पुढे लवकरच नकोशी व्हायला लागते. देशभरातल्या कंपन्यांतून हेच चित्र आहे.’’

‘‘म्हणून पहिल्या टप्प्यात आम्ही हे जाणून घेतो, की कमी कालावधीत कोण काय करू इच्छितो. दुसऱ्या टप्प्यात मूल्य आणि दृष्टी हा विषय येतो. अशा प्रकारे हे पहिले दोन्ही टप्पे म्हणजे एक प्रकारे ‘ग्रुप थेरेपी’सारखेच आहे. भारतात तर हे असे ‘तालेरंग’मध्येच होते. दोन्ही संत्रातून आम्ही अनेकांना हुमसून हुमसून रडताना बघितलेले आहे. गतआयुष्यात आपल्याला नेमके काय करायचे आहे, याबद्दल साधा विचारही कधी न केलेली ही मंडळी. काही असे की जे व्हायचे ठरवलेले आहे, त्यासाठी खरं तर ते नाहीतच. त्यांच्या क्षमता वेगळ्याच कामासाठीच्या. असो. पण, एक खरे प्रशिक्षणाचा हमखास लाभ सगळ्यांना होतो. मुळात ही मंडळी हुशार असतेच. हुशारीवर इथे एक अखेरचा हात फिरतो एवढेच. इथून परतताना सर्वांनीच आपल्या सोबत एक न संपणारी उर्जा नेलेली असते.’’

‘‘पुढल्या टप्प्यात उद्दिष्टाची प्राप्ती कशी करावी, हे आम्ही शिकवतो. तोंडी आणि लेखी अशा दोन्ही अध्ययन तंत्रांचा वापर आम्ही करतो. ‘सफाईदार काम करा’ नावाचे एक तंत्र आहे. प्राथमिकता ठरवणे, समस्या सोडवणे, उद्दिष्ट प्राप्ती या गोष्टी त्यात शिकवल्या जातात. मग नोकरीच्या संधी कशी मिळवावी, ते सांगितले जाते. ‘बायोडाटा’, ‘मुलाखत तंत्र’, ‘एक्सेल’ आणि ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’मध्ये विद्यार्थी, तरुण आणि एकुणात सर्वच उमेदवारांना पारंगत केले जाते. इतरांसह नातेसंबंध कसे दृढ करावेत, ते शिकवण्यातही आम्ही मदत करतो.’’

श्वेता : आगामी योजनांबद्दल

‘‘येत्या तिन ते पाच वर्षांत ‘तालेरंग’ला राष्ट्रीय पातळीवर न्यायचे आहे. सध्या आम्ही दिल्ली आणि मुंबई इथेच कार्यरत आहोत. येत्या तीन वर्षांत १० हजारांहून अधिक विद्यार्थी आणि कंपन्यांतील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्ही निर्धारित केलेले आहे. आमच्यासोबत जुळलेल्या कुणालाही नोकरी मिळते, तो क्षण आमच्या दृष्टीने सर्वाधिक आनंदाचा असतो. तो आपल्या पायावर उभा राहिलेला असतो. त्याच्या खिशात पैसे खुळखुळू लागलेले असतात. थोडक्यात काय तर त्याची कळी खुललेली असते. हे सगळे आनंद देणारेच आहे ना. या आनंदाची कमाई आम्ही भरपूर केलेली आहे. करतो आहोत आणि भरपूर करायचीही आहे.’’

रोजगार कौशल्य काळाची गरज

प्रशिक्षणानंतर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी विविध आस्थापनांतून संधी मिळवून देतो. त्यांच्या कार्यकौशल्याला धार यावी, हा त्यामागचा उद्देश असतो. देशभरातल्या आघाडीच्या विद्यापीठांतल्या ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून शिकत असताना इंटर्नशिपची संधी मिळत नाही. परिणामी प्रत्यक्ष कामकाज ही मुले आपल्या पहिल्या नोकरीनंतरच शिकायला लागतात. आणि त्यांच्या लक्षात येते, की जे जे म्हणून आपण अभ्यासक्रमात शिकलो, त्या-त्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी कौशल्य म्हणून इथे गरजेच्या आहेत. म्हणून मुलांना शैक्षणिक कौशल्यांसह प्रत्यक्ष रोजगारात परिवर्तित होऊ शकेल असे कौशल्यही आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देणे, ही आता काळाची गरज आहे.

Related Stories

Stories by Chandrakant Yadav