हिमालयातील संस्कृती टिकवण्यासाठी झटणारा देवदूत

0

या जगात बहुतेक लोक स्वत:साठी जगतात. पण इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी आपलं सारं आयुष्य परोपकार आणि दुस-यांची सेवा करण्यात समर्पित केलं. पद्धमश्री डॉ. अनिल जोशी हे याच गटामधील व्यक्ती आहेत. जे केवळ आपल्या देशासाठी जगतात. समाजासाठी काम करतात. त्यांचं कल्याण करणे हाच त्यांचा उद्देश आहे. यासाठी ते दोन पातळीवर लढाई करत आहेत. पहिली पातळी सामान्य लोकांना स्वावलंबी करणे. दुसरी पातळी पर्यावरणाचा विचार करुन सरकारनं लोककल्याणकारी योजना कराव्या यासाठी सरकारवर दबाव ठेवणे.

डॉ. अनिल जोशींचा जन्म उत्तराखंडमधल्या कोटद्वारमध्ये झाला. अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या डॉ. जोशींनी पर्यावरण विज्ञान या विषयात पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर ते कोटद्धवारमधल्या सरकारी कॉलेजमध्ये लेक्चरर बनले. आपल्याला लोकांसाठी काही तरी वेगळं काम करायचं हा निर्णय त्यांनी घेतला होता. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी१९८१ साली हिमालय पर्यावरण अध्ययन आणि संरक्षण या संस्थेची स्थापना केली. त्यांचे काही सहकारी आणि विद्यार्थी या संस्थेमध्ये सहभागी झाले. या टीमनं अनेक प्रयोग केले आहेत. ज्याचा फायदा केवळ उत्तराखंड नाही तर काश्मीरपासून मेघालयपर्यंत राहणा-या लोकांना मिळतोय. डॉक्टर अनिल जोशी सांगतात...

“ देशाच्या संपन्न होण्यामध्ये गावाचं मोठं योगदान आहे. गावाच्या भल्यासाठी साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आवश्यक आहे. यासाठी स्थानिक उत्पादनांची सांगड अर्थव्यवस्थेशी घालता येऊ शकते.

जीडीपी हा कोणत्याही देशाच्या विकासाचा आधार असतो. जीडीपी देशाच्या अर्थव्यवस्थेचं एकक आहे. पण यामुळे देशातल्या गरीब आणि मागास व्यक्तींचं जीडीपीशी काहीही देणंघेणं नसतं असं डॉ. जोशी सांगतात. अर्थव्यवस्थेचं परिक्षण करत असताना इकॉलॉजीकल ग्रोथचाही विचार केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी ग्रॉस एनव्हॉरर्मेंट प्रोडक्ट आवश्यक आहे. त्यामुळे दरवर्षी किती जगंल वाढली. किती मातीची धूप रोखली आणि किती हवा शुद्ध झाली. किती पाण्याचं शुद्धीकरण झालं हे सारं माहिती होईल.” असं डॉ. जोशींनी स्पष्ट केलं.

उत्तराखंडच्या निर्मितीला १५ वर्ष झाली. पण सरकारचा फोकस हा केवळ शहरांच्या विकासावरच राहिलाय. या धोरणांचा विचार करुनच डॉ. जोशी आणि त्यांच्या टीमनं ‘गाव बचाव’ हे अभियान सुरु केलं. गावाच्या विकासाचा विचार प्राधान्यानं करावा यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचं काम ही टीम करते. या अभियानाच्या अंतर्गत डॉ. जोशींनी वेगवेगळ्या गावांचा दौरा केला. या गावात आजही शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी कमी आहेत. सरकारनं यावर लक्ष द्यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इकोलॉजिकल झोनच्या आधारावर उत्तरांखडच्या वेगवेगळ्या विभागांची सरकारनं ब्रँडींग करावी अशी त्यांची मागणी आहे. १९९० च्या दशकात उत्तराखंडच्या गावात वॉटर मिलच्या माध्यमातून दळण दळलं जात असे. आता हळू हळू या गिरण्या बंद झाल्यात. वीज किंवा डिझेलवर चालणा-या गिरण्यांकडे लोकांचा अधिक ओढा आहे. डॉ. अनिल जोशींनी या विषयावर गावोगाव आंदोलन सुरु केलं. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ‘घराट वॉटर डेव्हलपमेंट ’ ही योजना सुरु झाली. याच्या माध्यमातून विजेची निर्मिती सुरु करण्यात आलीय.

डॉ. अनिल जोशी यांच्या प्रयत्नांमुळेच आज उत्तराखंडमधले शंभरपेक्षा जास्त गावं त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं शेती करत आहेत. त्यामुळे कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त धान्य त्यांना पिकवता येतं. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरच्या मडुआ, चौलाई, कुट्टू सारख्या पिकांचीही लागवड केली जातेय. बद्रीनाथ, केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्रामधल्या मंदिरांमध्येही केवळ चौलाई आणि कट्टूचाच प्रसाद द्यावा यासाठी त्यांनी अभियान राबवलं. जर कुणाला या गोष्टी अर्पण करायच्या नसतील तर या गोष्टींचा वापर लाडू बनवण्यासाठी करावा यासाठी डॉक्टर जोशींची टीम प्रयत्न करते. ज्यामुळे पर्यटकांच्या पोटाची तर सोय होतेच.त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारही मिळतो. उत्तराखंडच नाही तर जम्मूच्या कटरा परिसरात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन होतं. त्या भागातल्या लोकांनाही डॉ. जोशींनी मक्यापासून लाडू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळे आज केवळ परखल या गावाचे वार्षिक उत्तपन्न ४० लाखांवर पोहचलंय. त्याचबरोबर पर्वतीय क्षेत्रातल्या धार्मिक क्षेत्राच्या परिसरात जी साधनसंपत्ती असते त्याचाच उपयोग मंदिरांमधल्या प्रसादामध्ये व्हावा यासाठी डॉ. जोशी प्रयत्न करतायत. मंदिरांमध्ये वापरली जाणारी उदबत्ती, धूप यासाठी याच वस्तूंचा वापर करण्याचा त्यांचा आग्रह आहे. डॉ. जोशींच्या या प्रयत्नांमुळे उत्तराखंडामध्ये अनेक भागात अन्न प्रक्रिया उद्योगाच्या शाखांची निर्मिती झालीय. या शाखांमुळे महिलांना रोजगार मिळालाय. या महिलांनी जॅम, जेली यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे या पदार्थाचा केवळ ब्रँड तयार झालाच.त्याशिवाय या महिलांना रोजगारही मिळाला आहे. उत्तराखंडमध्ये स्थानिक अन्नधान्याच्या मदतीनं बेकरीचे पदार्थ तयार करण्याचं काम डॉ अनिल जोशी यांच्या टीमचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे येथील नागरिकांनी कुर्रि ( जंगली गवत )पासून फर्निचर तयार करण्यातही यश मिळवलंय. उत्तराखंडप्रमाणेच बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही त्यांची टीम आता प्रशिक्षण देत आहे. यापासून तयार होणारं फर्निचर हे मजबूत आणि टिकावू असतं. अगदी बांबूच्या फर्निचरसारखं.

आज डॉक्टर अनिल जोशींचं काम केवळ एकाच क्षेत्रापुरतं मर्यादीत नाही. ते हिमालयाशी संबंधित प्रत्येक क्षेत्राशी जोडलेले आहेत. काश्मीरपासून मेघालयापर्यंत पसरलेल्या या परिसरातल्या गावांच्या विकासासाठी ते काम करतायत.

‘गाव बचाव’आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करुन देण्याचं डॉ. जोशी यांचं सध्या ध्येय आहे. गाव बचाओ आंदोलनातूनच पर्वतीय क्षेत्राचा जास्तीत जास्त आर्थिक विकास होईल असा त्यांना विश्वास वाटतो.

वेबसाइट : www.hesco.in

लेखक – हरीश बिश्त

अनुवाद – डी. ओंकार

Related Stories