“भूमिका किती मोठी आहे यापेक्षा ती किती प्रभावीपणे साकारली जाईल हे महत्वाचे” - अभिनेत्री वर्षा उसगांवकर

0

“वन्स अॅन अॅक्टर इज ऑलवेज अॅन अॅक्टर” असे म्हंटले जाते आणि अनेक कलाकारांच्या बाबतीत ही ओळ खरी ठरते. म्हणजे हिंदी मराठीत असे अनेक कलाकार आहेत जे नवनव्या भूमिकांच्या शोधात असतात आणि त्या साकारतातही. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ती अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे. लाघवी चेहरा आणि तेवढाच सुरेख अभिनय यामुळे या अभिनेत्रीने मराठीतला एक काळ गाजवला पण आजही ही अभिनेत्री नवनवीन प्रयोग करायला नेहमी सज्ज असते. गेल्याच वर्षी त्यांना त्यांच्या अभिनयातील योगदानाबद्दल गोवा सरकारचा विशेष सन्मान प्रदान केला गेला. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना दिला गेला.

वर्षाजींचा आगामी मराठी सिनेमा लॉर्ड ऑफ शिंगणापुर हा पौराणिक धाटणीचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यात वर्षा उसगांवकर एका महत्वाच्या भुमिकेत दिसतायत. या सिनेमाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते राज राठोड माझे कित्येक वर्षांचे स्नेही आहेत त्यामुळे हा सिनेमा लिहिण्यापासून ते याचे शुटिंग पूर्ण होई पर्यंत मी यात सहभागी होते. सिनेमा आता प्रदर्शित झालाय तेव्हा पहायचं की प्रेक्षक या विषयाला कसा प्रसिसाद देतायत. पण कलाकार म्हणून मी या सिनेमाबद्दल आणि यातल्या माझ्या भूमिकेबद्दल खुश आहे.

वर्षाजी सांगतात, मराठीत आता विविध विषय येतायत पण मराठी प्रेक्षकांमध्ये दोन महत्वाचे वर्ग आहेत असं मला वाटतं. म्हणजे शहरी प्रेक्षक आणि ग्रामीण प्रेक्षक. आज शहरी प्रेक्षक मराठीतल्या या नवनवीन प्रयोगांना सरावला असला तरी ग्रामीण भागात अजूनही देवादिकांचे विषय आ़वडीने पाहिले जातात. तंबूतला सिनेमा हा प्रकार याच भागात प्रसिद्ध आहे, ज्यात अशा सिनेमांना भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतो.

तुझ्यावाचून करमेना या सिनेमातनं वर्षाजींनी सिनेमाक्षेत्रात प्रवेश केला होता आणि तेव्हापासून ते आजतागायत त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या या अभिनयाच्या प्रवासाला त्या एक मॅजिकल जर्नी म्हणतात, मलाच कळले नाही की मी इथपर्यंत कशी पोहचले पण मी माझा प्रत्येक सिनेमा आणि यातली भूमिका जगले.

मी ग्लॅमरस भूमिका साकारल्याच पण गर्ल नेक्स्ट डोअर धाटणीच्या भूमिकाही मी सिनेमातनं केल्यात. आणि सिनेमा म्हंटलं की मराठी सोबत हिंदी सिनेमांचा ही उल्लेख मी करतेय. हिंदीत मी खूप जास्त काम केले नसले तरी जे काही मोजके सिनेमे केले ते एक अभिनेत्री म्हणून मला वेगळा अनुभव देणारे होते.म्हणजे मग हिरोईनची भूमिका असो किंवा हिरोच्या बहिणीची.

मी जेव्हा मराठी सिनेमात आले तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे. पण माझा अभिनय आणि भूमिका निवडण्याचे निकष अजूनही तेच आहेत. म्हणजे आता जरी मी आईच्या भूमिकेत किंवा कोणाच्या सासूच्या भूमिकेत असेन तर नक्की बघते की ती आई किंवा सासूची भूमिका ही वेगळ्या धाटणीची असेल उगाचच रडणाऱ्या किंवा मायेचे उमाळे फोडणाऱ्या टिपिकल आई-सासू मला नाही साकारायची. तुम्ही दुनियादारी सिनेमात मी साकारलेली आई पाहिली तर तुम्हाला हे जाणवेल.

वर्षाजी स्पष्ट करतात की मी एखाद्या सिनेमात भुमिका स्वीकारताना त्यांची लांबी कधीच बघत नाही तर त्या भूमिकेचे कंगोरे माझ्यासाठी महत्वाचे असतात. या भूमिकेमुळे मी माझ्या चाहत्यांच्या लक्षात राहील का आणि सिनेमा संपल्यानंतर जेव्हा ते या सिनेमांबद्दल बोलतील तेव्हा माझ्या भूमिकेचा उल्लेख करतील का याचा विचार मी करते. शेवटी चाहत्यांचं प्रेमच आहे जे आमच्यासारख्या कलाकारांना सातत्याने काम करायची प्रेरणा देत असतं.

लॉर्ड ऑफ शिंगणापूर सिनेमानंतर वर्षाजी आणखी एका मराठी सिनेमातनं दिसणार आहेत, या सिनेमाचे नावही आहे अण्णागिरी. दिवंगत दिग्दर्शक संजय सूरकर यांचा हा सिनेमा, जे एक राजकीय विडंबन आहे. सई लोकूर, अंकुश चौधरी आणि अशोक सराफ सारखे कलाकार यात वर्षाजींसोबत दिसतील.

हिंदीतल्या रेखा, रती अग्निहोत्री सारख्या अभिनेत्रींसोबत वर्षाजींची तुलना केली जाते. ज्या वयाने जरी मोठ्या होत असल्या तरी अजूनही त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा अभिनय आजच्या तरुण नायक नायिकांना विचार करायला लावेल असा आहे. ज्यासाठी वर्षाजी त्यांच्या शिस्तप्रिय लाईफस्टाईलला महत्व देतात. एक अभिनेत्री म्हणून मी नेहमीच फ्रेश आणि प्रेझेंटेबल दिसायला हवी, त्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप महत्वाची, तुम्ही ही शिस्तप्रिय दैनंदिनी पाळा तुमच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसेल.