शाळाबाह्य मुलाने कसा उभारला ६० कोटींचा व्यवसाय

शाळाबाह्य मुलाने कसा उभारला ६० कोटींचा व्यवसाय

Friday February 05, 2016,

9 min Read

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी राज नायक घरातून पळून गेले. गरिबीमुळे शिक्षेसारख्या भोगाव्या लागणाऱ्या जगण्यापासून सुटका करून घेण्यासाठी जसे याआधी हजारो जण घरातून पळून गेले त्यांच्यासारखाच तोही. ‘मला माहिती होतं की मला पैसे कमवावे लागतील. मला प्रचंड पैसे कमवायचे होते. त्यावेळी माझं लक्ष केवळ त्यावरच केंद्रीत होतं,ʼ बेंगळुरूतील त्यांच्या नव्या कोऱ्या कार्यालयात मी त्यांची मुलाखत घ्यायला गेले तेव्हा ५४ वर्षांचे राज सांगत होते. ‘मला आणि माझ्या चौघा भावंडांना शाळेत पाठवणं माझ्या पालकांना खूप कठीण जाणार होतं हे मी तरुणवयातच जाणलं होतं. माझ्या वडिलांची कमाई स्थिर नव्हती आणि आईला महिन्याच्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी तिच्याकडे जे काही असतील ते दागिने गहाण ठेवायला लागत होते,ʼ असं ते म्हणाले.


image


आपल्या शेजारपाजारच्या मित्रांसोबत रेंगाळणारा राजा जेव्हा हिंदी चित्रपट पहायला गेला तेव्हा त्याच्या आयुष्यात आशेची ठिणगी पेटली. तो चित्रपट होता १९७८ चा त्रिशूल. ज्यामध्ये कफल्लक अमिताभ बच्चन हळूहळु एक रिअल इस्टेट क्षेत्रातील दादा होतो. थिएटरमधील काळोखात घालवलेल्या त्या तीन तासांनी राजाच्या मनात ठिणगी पेटवली आणि त्याचे भविष्य घडवले.

‘खरोखरच त्या कथेने माझा ताबा घेतला होता. मला ती खूपच खरी वाटली. अचानकपणे, माझी स्वप्नं पूर्ण होऊ शकतात, असा विश्वास मला वाटायला लागला. मला रिअल इ्स्टेटमधील दादाही व्हायचे होते,ʼ

चटकन आपल्या प्रेरणास्रोताची आठवण सांगत राजा मिष्किलपणे हसले.

आपल्या या विश्वासाच्या साथीने ते मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) गेले. पण ते तितकं सोपं नव्हतं, नाही का? खट्टू मनाने ते घरी परतले; पण त्यांचं मन सतत योग्य संधी शोधण्यात गुंतलं होतं.

राजा यांनी १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि लॉजिस्टिक्ससाठी स्थापन केलेली एमसीएस लॉजिस्टिक्स, करोगेटेड पॅकिंगमधील अक्षय एंटरप्रायजेस, बाटलीबंद पिण्याचे पाणी बनवणारी जाला बेव्हरेजेस, बेंगळुरूमध्ये तीन सलून स्पा सेंटर्स असणारी आरोग्य क्षेत्रातील पर्पल हेझ या सर्व व्यवसायांची मिळून आज राजा यांची एकूण उलाढाल ६० कोटी रूपयांची आहे. न्युट्री प्लॅनेट (इतर तीन संचालक आणि भागीदारांसोबत) सीएफटीआरआयच्या सहाय्याने चिया बियांपासून एनर्जी बार आणि तेल तयार करण्याचा व्यवसाय करते. याशिवाय समाजातील उपेक्षित व गरीब विद्यार्थ्यांसाठी कलानिकेतन एज्युकेशनल सोसायटीच्या अंतर्गत ते शाळा आणि कॉलेजही चालवतात.


image


‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या (डीआयसीसीआय) कर्नाटक चॅप्टरचे अध्यक्ष म्हणूनही राजा काम करतात. ते म्हणाले, ‘ या संस्थेत आम्ही समाजातील उपेक्षित घटकांना मोठी स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देतो. त्यांची स्वप्नं सत्यात आणण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीची आम्ही त्यांना जाणीव करून देतो,ʼ असं राजा सांगतात.

पहिली संधी : छोटी पण आश्वासक

कर्नाटकातील एका गावातून विस्थापित झालेल्या दलित कुटुंबातील राजा यांचा जन्म बेंगळुरूत झाला आणि त्यांनी वयाची सुमारे १७ वर्षे बेंगळुरूत काढली. त्या काळात त्यांना बाहेरचे जग अजिबात माहिती नव्हते. राज म्हणाले, ‘ त्या काळात म्हणजे ७०-८० च्या दशकात बेंगळुरू हे तसं निद्रिस्त शहर होतं; पण माझा दीपक नावाचा (जो आता हयात नाही) एक पंजाबी मित्र होता, वडिल सरकारी नोकरीत असल्यामुळे बदलीच्या निमित्ताने त्याने त्याने माझ्यापेक्षा अधिक ठिकाणं पाहिली होती. आम्ही एकाच परिसरात रहायचो आणि मी दिवसातील बहुतांश काळ त्याच्यासोबतच घालवायचो.ʼ

राजा यांनी पीयूसीच्या पहिल्या वर्षातच शिक्षण सोडून दिलं आणि आपला पार्टनर दीपकसोबत फुटपाथवर शर्ट विकण्याचं ठरवलं. आपल्या आठवणी सांगताना ते म्हणाले, ‘ माणसांना फुटपाथवर चीजवस्तू विकताना मी पाहिलं होतं किंबहुना काही व्यापाऱ्यांनी आम्हाला त्यांच्या वस्तू विकण्यासाठी पैसे देण्याची तयारीही दर्शवली होती. आम्हाला हे लक्षात आलं की जर ते चांगला धंदा करू शकतात, तर मग आम्ही का नाही?ʼ ही उत्तम संधी असल्याचे राजांनी चट्कन ओळखले.


image


त्या दोघा मित्रांनी १०,००० रुपये जमवले आणि तमिळनाडूतील कापडासाठी प्रसिद्ध अशा तिरप्पूर या शहराची वाट धरली. ‘माझी आई कधीकधी स्वयंपाकघरातील डब्यांमध्ये पैसे लपवून ठेवायची आणि मी तिचा लाडका असल्याने तिने मला ते पैसे दिले,ʼ राजा सांगत होते. तिरप्पूरमध्ये त्यांनी एक्स्पोर्टसाठी नाकारण्यात आलेले जादाचे शर्ट प्रत्येकी ५० रुपयांना खरेदी केले. त्या शर्टांचे गाठोडे बांधून राज्य सरकारच्या बसमध्ये टाकून ते बेंगळुरूला बॉश कंपनीच्या ऑफिससमोर असलेल्या फूटपाथवर आपले ‘दुकानʼ थाटण्यासाठी घेऊन आले. ‘आम्ही या आधी बॉश कंपनीच्या ऑफिसच्या गेटबाहेर फूटपाथवर फिरते विक्रेते पाहिले होते, आणि सुरुवात करण्यासाठी हेच उत्तम ठिकाण असल्याचे मनात निश्चित केले होते. आणि दुसरं कारण म्हणजे आमच्या घरापासूनही ते ठिकाण जवळच होते,ʼ असे राजा यांनी सांगितले.

त्यांची योजना सर्वोत्तम होती. त्यांनी आणलेल्या बहुतांश शर्टचा रंग निळा किंवा पांढरा होता. बॉश कंपनीच्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या गणवेशात निळा शर्ट होता. एका तासाभराच्या जेवणाच्या सुटीत राजा आणि त्यांच्या मित्राने आणलेले सगळे शर्ट प्रत्येकी १०० रुपये किमतीने विकून टाकले, आणि दमदार ५००० रुपयांचा नफा मिळवला. आयुष्यातील हे अत्यंत महत्त्वाचे क्षण उलगडून सांगताना राजा म्हणाले,‘मी आयुष्यात इतके पैसे कधीच पाहिले नव्हते. मला अत्यानंद झाला होता.ʼ पहिल्या प्रयत्नात मिळालेल्या या यशाच्या आनंदामुळे या दोन्ही मित्रांनी ते पैसे पुन्हा गुंतवले आणि विविध वस्तू विकायला आणल्या. त्या विकण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले.

‘जणू काही त्यावेळी आमच्या पायांना चाकंच लावलेली होती. ही तर केवळ सुरुवात होती. आम्ही प्रचंड पैसा कमावल्याशिवाय शांत बसणार नव्हतो,ʼ हसत हसत राजा यांनी सांगितले.

त्यांनी सुती होजियरी आणि अंतर्वस्रे किलोमध्ये विकत घेतली आणि मोठ्या प्रदर्शनांमध्ये त्यांचे स्टॉल लावले. हे स्टॉल चालवायला त्यांनी हाताखाली काही मुलेही ठेवली. जो माल उरला असेल तो त्यांनी फुटपाथवर विकला. तीन वर्षांतच या दोन मित्रांनी एक उत्तम व्यवसाय उभा केला. त्या दोन्ही मित्रांनी कोल्हापूरी चप्पल आणि पादत्राणांच्या व्यवसायात जाण्याचा विचार केला होता.

आतापर्यंतच्या व्यवसायात तुमची जात कधी तुमच्या वाटेत आडवी आली का, या माझ्या आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,‘ आतापर्यंत माझी जात कोणती असं मला कोणीही विचारले नव्हते. बहुतेकदा लोक चांभार समाजाला दलित समाजाशी जोडतात आणि तिथेच मला माझी जात विचारली जाण्याची शक्यता होती.ʼ

महत्त्वाची घटना जोखीम घेण्याची

राजांच्या सांगण्यानुसार त्यांच्या सगळ्या व्यवसायांमध्ये त्यांना कधीच तोटा झाला नाही. दरम्यान, त्यांच्या मित्राला बेंगळुरू सोडून बाहेर जावे लागले, त्यामुळे संपूर्ण व्यवसाय राजा यांच्या खांद्यावर टाकून तो निघून गेला. आर्थिक उदारीकरणानंतर साधारणपणे १९९१ च्या काळात राजा यांनी करोगेटेड पॅकेजिंगचा अक्षय एंटरप्रायजेस हा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये राजांचा दुसरा भागीदार होता त्याला या विषयातील आणि बाजाराबद्दल इत्यंभूत माहिती होती. ते म्हणाले, ‘कोणतीही संधी असेल, मी तिचा पुरेपूर उपयोग करून घेतला.ʼ

त्या काळात रिअल इस्टेट क्षेत्राचीही चांगलीच चलती होती. त्यामुळे राजा यांनी प्रॉपर्टीत गुंतवणूक करून चांगले पैसे कमावले आणि पुन्हा गुंतवणूक केली.

म्हणजे आता तुम्ही घटनाक्रम पाहू शकता? जसं सगळ्यांनाच पैसे कमवावेसे वाटतात तसंच त्यांनाही वाटत होतं; पण त्यांनी केवळ इच्छा व्यक्त करत किंवा परिस्थितीच्या नावानं बोटं मोडली नाहीत, त्यांनी कोणती संधी मिळते का, याकडे अगदी बारीक लक्ष ठेवलं आणि काबाड कष्टांची कधीच लाज वाटून घेतली नाही, त्यामुळेच राजा हे इतरांपेक्षा वेगळे ठरले.

‘इतर अनेकांप्रमाणे मलाही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, पण सुदैवाने मी व्यवसायात घेतलेल्या जोखीमींनी मला नेहमीच चांगले परतावे दिले आणि मी यशस्वी झालो,ʼ राजा म्हणाले. त्यांच्याशी झालेल्या खासगी गप्पांमध्ये त्यांनी अनेक जणांची फसवणूक केल्याचे मान्य केले; पण त्याबद्दल सविस्तर सांगण्यास मात्र स्पष्ट नकार दिला.

‘लोकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला जेव्हा आमंत्रित करण्यात येते तेव्हा मी हे नेहमी त्यांना सांगतो की, माझ्या आयुष्याचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेऊ नका. ते केवळ नशीबामुळे आहे,ʼ असं स्पष्टपणे सांगायलाही राजा विसरत नाहीत.

पण खरोखरच, ते केवळ नशीब असेल का? जर तसंच असेल तर नशीब धाडसी माणसाच्याच बाजूने असतं असं म्हणावं लागेल. ‘जर तुम्हाला तुमची स्वप्नं पूर्ण करायची असतील तर जोखमी पत्करणं खूप महत्त्वाचं आहे,ʼ असं जे राजा म्हणतात ते खरं आहे. त्यांनी घेतलेल्या जोखमींनी त्यांना त्याबदल्यात नेहमीच यश दिलं हे सांगताना ते म्हणाले,

‘माझ्यासोबत लहानाचे मोठे झालेली शेजारीचे मुले, मित्र अजूनही तिथेच आहेत, कंपनीत क्लार्क म्हणून नोकरी करत आहेत किंवा मजूर आहेत. कधीकधी ते माझ्याकडे पैसे मागायला येतात मी त्यांना पैसे देतो; पण त्या काळात त्यांची परिस्थिती माझ्यापेक्षा खूप चांगली होती. त्यांच्या वडिलांना नोकरी होती ही मुले शाळेत गेली होती. मला नाही जाता आलं; पण आज मी देशातील महत्त्वाच्या व्यक्तिंसोबत व्यासपीठावर बसतो. केवळ पैसाच याला कारणीभूत नाही. गेल्या ३५ वर्षांत मी जे काही काबाडकष्ट केले आणि माझी समजात पत निर्माण केली त्यामुळे हे घडतं.ʼ

एक शांत, अँग्री यंग मॅन

त्यांच्या जातीच्या नावावर त्यांना कधीही भेदभावाचा सामना करावा लागला नाही, असा राजा यांचा दावा आहे. कदाचित ते ‘पाॅलिटिकली करेक्टʼ असतील. पण कधीकधी शांतता शब्दांपेक्षा जास्त बोलते.

राजा आणि त्यांचं कुटुंब बेंगळुरूतील ज्या गल्लीत राहत होतं त्याच गल्लीतील राजा यांच्या घरापेक्षा मोठ्या असलेल्या ऑफिसमध्ये आम्ही भेटलो, (हे पर्पल हेझचं नवं दालन होतं, ज्याचं त्याच दिवशी सकाळी उद्घाटन झालं होतं.) राजा यांनी तिथे चार मजली इमारत बांधली आहे. जिथे वरच्या मजल्यावर त्यांचे ऑफिस आहे आणि खालच्या मजल्यावर त्यांची शाळा.

केवळ राजा आपलं शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत म्हणून शाळा सुरू केलेली नाही, तर त्यांच्या बहिणीलाही शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. ‘ माझ्याकडे जेव्हा थोडेसे पैसे आले तेव्हा मी एक छोटं घर भाड्याने घेतलं, काही शिक्षकांना सोबत घेतलं आणि उपेक्षित मुलांसाठी नर्सरी सुरू केली,ʼ त्यांनी सांगितलं. खरोखरच, मी ज्या शांतपणे बोलणाऱ्या, साध्या उद्योजकाशी बोलत होते तो कधीकाळी अँग्री यंग मॅन होता.

खालच्या जातीतील व्यक्तिने दिलेले अन्न खाणं किंवा पाणी पिणं वाईट असल्याचा पूर्वग्रहही समाजात होता. त्यामुळे राजा यांनी अन्न उद्योगात प्रवेश करायचे ठरवले. जरी त्यांनी सुरू केलेला अन्नाचा व्यवसाय बंद करावा लागला असला तरीही, त्यांनी सुरू केलेला बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा जाला बेव्हरेजेस हा व्यवसाय उत्तम चालू आहे.


image


एक रोमँटिक मध्यंतर

अनेक उद्योग लीलया चालवणाऱ्या राजा यांच्या पाठीशी असलेली आणखी एक शक्ती म्हणजे त्यांची पत्नी अनिता. ‘मी सतत विविध व्यवसाय करत राहिलो कारण मला माहीत होतं की, या व्यवसायांकडे माझ्या मागे लक्ष देणारं कोणीतरी आहे,ʼ राजा म्हणाले. अनिता जेव्हा साधारण १६ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या नोकरी शोधत राजा यांच्या शाळेत आल्या होत्या. त्या पण गरीब दलित परिवारातील असून, त्यांनाही शाळा सोडावी लागली होती. त्यांचे वडिल ऑटोरिक्षा चालवायचे. अनिता यांनी शाळेच्या कामात मदत करायला सुरुवात केली आणि नंतर पूर्ण व्यवस्थापन हातात घेतलं.

‘आम्ही घरातून पळून जाऊन देवळात लग्न केलं. एकमेव साक्षीदार होते शाळेतील एक शिक्षक,ʼ

राजा सांगत होते. त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्याकडे अजूनही लग्नाचे अधिकृत प्रमाणपत्र नाही.

आनंदी शेवट

हैदराबाद विद्यापीठातील हुशार दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येबाबत सध्या खूप चर्चा होत आहे आणि लिहिलंही जातंय; पण आपल्या समाजातील भेदभावांमुळे पीडित लाखो व्यक्तिंना राजा यांच्यासारख्या माणसांच्या उदाहरणातून आशेचा किरण सापडतो.

‘मी आरक्षणाची कोणतीही सवलत घेऊन यश मिळवलेले नाही. माझ्या मुलांनीही कोणत्याही आरक्षित कोटाअंतर्गत शिक्षण घेतलेलं नाही (त्यांना तीन मुले आहेत). चांगलं शिक्षण घेण्यासाठी फॅन्सी इमारतींची आवश्यकता नसते, असं माझं मत असल्यानं मी मुलांना माझ्याच शाळेतून शिकवलं. माझ्यासाठी जिथं उत्तम इंग्रजी शिकवलं जातं, तीच उत्तम शाळा,ʼ राजा म्हणाले.

राजा म्हणतात, ‘सवलतींमुळे नाही तर तो कोणाच्या संपर्कात राहतो त्यावरून तो दलित ठरतो.ʼ

‘दुर्दैवाने, माझ्या समाजातील सगळेजण सरकारी नोकऱ्यांच्या मागे धावत आहेत. त्यांचा स्वयंरोजगाराकडे कल नाही. डीआयसीसीआयमध्ये आम्ही त्यांना उपलब्ध असलेल्या संधींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार निर्मात्यांची गरज आहे,ʼअसेही राज सांगतात.

तरुणपणी रजतपटावर पाहिलेल्या स्वप्नाचा पाठलाग करत आपल्या आयुष्यात घडवलेल्या चमत्कारांचा आलेख मांडता मांडता राजा यांचे तीन तास कसे गेले कळाले नाही. त्यांचे अजून मोठे स्वप्न आहे. ‘मला १०० कोटी रुपयांच्या क्लबचा सदस्य व्हायचंय. तिथे काही कंपन्या आहेत. तर मग त्यांनाही भेटू (मला त्यांच्यासोबतही खांद्याला खांदा भिडवायचा आहे),ʼ या शब्दांत ते आपला विश्वास व्यक्त करतात.

हो, हा खरा लेव्हलर. जसं राजा म्हणतात, ‘जेव्हा व्यवसायाची गोष्ट असते तेव्हा केवळ पैसा बोलतो.ʼ

अशा अजून प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या पेज Facebook ला लाईक करा

आता वाचा या संबंधित कहाण्या :

डोळे गेले, पण दृष्टी यशाच्या वाटेवरच... आशिष गोयल जगातले पहिले ‘ब्लाइंड ट्रेडर’

एक चहा बनविणारा बनला चार्टर्ड अकौंटंट, महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रांड एम्बेसडर !

उत्तरप्रदेश ते ऑस्ट्रेलियाचा प्रवास करत देशाची आघाडीची गुंतवणूक सल्लागार बनली 'हंसी महरोत्रा'

लेखिका : दीप्ती नायर

अनुवाद : अमोल आ.


    Share on
    close