मानसिकरित्या वैतागलेल्या व तणावग्रस्त लोकांसाठी एक डॉक्टर तयार करत आहे “हॅप्पीनेस आर्मी”

0

देवाने दिलेले त्यांच्याकडे सगळे काही आहे, प्रतिष्ठित बनारस हिंदू विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत. चांगल्या पगाराची नोकरी, समाजात प्रतिष्ठा, संपन्न कुटुंब त्यांच्याजवळ हे सर्व काही आहे ज्याची अपेक्षा एक सर्वसाधारण माणूस आपल्या आयुष्यात बाळगतो. यानंतर सुद्धा कुणी समाजातील वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करून व फावल्या वेळेत दुसऱ्यांसाठी समर्पून  आयुष्याला अलंकृत करीत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही काय नाव द्याल? आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ते आहेत मानसोपचारतज्ज्ञ  डॉ. प्रा. संजय गुप्ता. बनारस व त्याच्या जवळपासच्या जिल्ह्यात ते ‘ खुशहालगुरु’या नावाने लोकपरिचित आहेत. जर कधी तुम्ही तणावात असाल व एकदा या ‘खुशहाल गुरुंना’ भेटलात तर मग ‘बघा’ आणि’ विश्वास’ ठेवा तणाव मिनिटात गायब. न औषध न महागडा उपचार बस् यांच्या संगतीत काही क्षण घालावा व परिणाम बघा.

आजच्या आधुनिक युगात अनेकजण  धकाधकीचे जीवन जगत आहेत. अपेक्षांचे डोंगर, पुढे जाण्याच्या धडपडीत आनंद दुरापास्त झाला आहे. परिणामी माणूस तणावात राहून धैर्यहीन होत आहे. बीएचयू आयएमएसच्या मनोचिकीत्सा विभागात नियुक्त डॉक्टर संजय गुप्ता यांनी लोकांच्या या अडचणीला हेरले. त्यांनी बघितले की दवाखान्यात उपचारासाठी येणारा रोगी जितका तणावात असतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याच्याबरोबर आलेले लोक काळजीत असतात. त्यांना जाणवले की कोणत्याही आजाराशिवाय लोक तणावग्रस्त आहेत. या लोकांच्या यादीत विद्यार्थ्यांबरोबरच भिन्न वयातील नोकरदार व व्यापारीवर्ग आहे. त्यातील अनेक जणांना कोणत्याही प्रकारची व्याधी नसून फक्त मानसिक रूपाने अस्वस्थ आहेत. लोकांच्या या समस्येवर संजय गुप्ता यांनी खोलवर अभ्यास केला. देशातील तज्ज्ञ व विद्यार्थ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांना आभास झाला की आपल्या आरोग्यप्रणालीमध्ये अनेक त्रुटी आहेत त्या अगोदर सुधारल्या पाहिजेत. त्यांनी निष्कर्ष काढला की अनेक आजारांचे कारण तणाव आहे. त्यामुळे आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी तणावाला प्रतिबंध लावून लोकांच्या मनातील अंधार मिटवून आनंदाचे दिवे पेटवले पाहिजेत. डॉक्टरांनी एका अशा समाजाचे स्वप्न बघितले जिथे ताण-तणावाला दूर सारून संपन्न आयुष्य जगता यावे. आपल्या ध्येयपूर्तीसाठी मार्च २००५ मध्ये ‘खुशहाली’ नामक एका अभियानाची सुरुवात केली.

लोकांना देतात ‘खुशहाली मंत्र’

लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी त्यांनी ही मोहीम सुरु केली. काही दिवसांनी त्याचे ध्येयात रुपांतर झाले. पैशांची तमा न बाळगता समाजाला नवीन दिशा देण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यांना बीएचयूच्या विद्यार्थ्यांना शिकवण्या व्यतिरिक्त रोग्यांच्या उपचाराची जबाबदारी होती. तरीही आपल्या व्यस्त दिनचर्येतून ते आपल्या अभियानासाठी वेळ काढत होते. ते आपल्या काही सहकाऱ्यांच्या साथीने बनारसच्या गल्ल्यांमध्ये आनंदाची ज्योत पेटवण्यासाठी निघाले होते. अभियानाने जोर पकडला. बघता बघता या अभियानाने आंदोलनाचे रूप घेतले. मानसिक रुग्णांशी ते स्वतः संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून त्यांच्यावर उपचार करीत असे.

कामाची पद्धत 

निश्चितच संजय गुप्ता बीएचयू सारख्या प्रतिष्ठित दवाखान्यात मनोवैज्ञानिक आहेत पण त्यांच्या कामाची पद्धत निराळी आहे. ते इतर डॉक्टरांसारखे महागडे उपाय किंवा एखाद्या थेरपी मध्ये विश्वास ठेवत नाहीत परंतु लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी काहीशा वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. ‘खुशहाली’ शिबिरात येणाऱ्या लोकांचे संजय गुप्ता खास उपचार करतात. ते लोकांना दोन प्रकारचे व्यायाम करण्यास सांगतात. यात एक वायू शक्तीचा अभ्यास व दुसरा मनाच्या शक्तीचा अभ्यास आहे. वायुशक्तीमध्ये नकारात्मक उर्जेला कमी करण्यावर जोर दिला जातो तर दुसऱ्या मनशक्तीमध्ये संगीत व ध्यानाने उपचार केला जातो. तसेच ‘खुशहाली गुरु’ लोकांच्या मानसिकतेला समजून आपल्या स्तरावर ती बदलण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या सात मंत्रांद्वारे लोकांच्या तणावाला कमी करण्याचा प्रयत्न करतात. हे मंत्र अतिशय साधे आहेत. आपल्या शिबिरात ते लोकांशी मनमोकळा संवाद साधतात. त्यांच्या शिबिरात येणाऱ्या लोकांसाठी त्यांनी खुशहाली पगडी तयार केली आहे तिचा रंग उगवत्या सूर्याप्रमाणे आहे जो आपल्या शरीराला स्फूर्ती प्रदान करण्यासाठी उर्जेचे काम करतो. युअर स्टोरीशी बोलताना प्रा. गुप्ता सांगतात की, ‘या अभियानाच्या माध्यमातून आयोजित शिबिरांमध्ये तणावमुक्ती बरोबरच आपल्याला आचरणात आणण्याचे काही उपाय सांगितले जातात. एक आनंदी व्यक्तीच संपन्न समाजाचे निर्माण करून समाजात पसरलेली विकृती व कुप्रथांना आळा घालू शकेल.’

अभियानाशी जोडले गेलेले काही हजार लोक :

खुशहाली अभियानात देशभरातील सुमारे २५  हजार लोक जोडले गेले आहेत. ‘खुशहाली गुरु’ बनारस व्यतिरिक्त उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, हरियाना व राजस्थान सहित अनेक राज्यात या अभियानांतर्गत ७०० पेक्षा अधिक शिबीर आयोजित केले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातपण ‘खुशहाली गुरु’ च्या नावाचा डंका आहे. जर्मनी, अमेरिकासहित अनेक देशात ते व्याख्यान देण्यासाठी जातात. आपल्या अभियानाच्या विस्तारासाठी संजय यांनी तांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे. येणाऱ्या काही दिवसात डॉ. संजय अॅपच्या आधारे ऑनलाईनने लोकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्येचे निवारण करणार आहेत. युअर स्टोरीशी झालेल्या गप्पांमध्ये डॉ. संजय सांगतात की, ‘येणाऱ्या दिवसात ते “हॅप्पीनेस आर्मी” ची स्थापना करणार आहेत.’ त्यांचा हेतू शहरातील मानसिक रूपाने वैतागलेल्या व तणावग्रस्त लोकांची मदत करण्याचा आहे.

‘खुशहाली' चा हा रस्ता सोपा नव्हता’ :

सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या ‘खुशहाली गुरु’ साठी हा रस्ता सोपा नव्हता. अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या डॉ. संजय यांच्या कुटुंबात सदैव संपन्नता नांदत असे. त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक मुल संजय प्रचंड हुशार होते. बारावीच्या अभ्यासानंतर देशातील सात वैद्यकीय महाविद्यालयांची पूर्व परीक्षा त्यांनी पास केली. पण त्यांनी बीएचयूची निवड करून यालाच आपली कर्मभूमी बनवली. आध्यत्मिक प्रवृत्तीच्या संजय यांची ओढ नेहमीच समाजसेवेकडे होती. पण या निर्णयाने बऱ्याच लोकांनी त्यांची टर उडवली पण त्यांचा निश्चय पक्का होता. प्रा. गुप्ता यांच्या प्रभावाने २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने २० मार्चच्या तिथीला ‘वर्ल्ड हॅप्पीनेस डे’ च्या रुपात घोषित केले व हे मान्य केले की प्रगत समाजासाठी त्यांचे योगदान नितांत गरजेचे आहे. प्रा. संजय यांच्यासाठी हे एक मोठे यश आहे. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

... आम्ही आणि तुम्ही शांतीने झोपू शकू, यासाठी जागतात ‘चेतन’!

पोलिस शिपाईची नोकरी सांभाळून रेल्वे अपघातातील ५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नयना दिवेकर

‘विचारांमधील बदल महत्वाचा,’ कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या वसुता अगरवाल यांचा महिलांना कानमंत्र  

लेखक : आशुतोष सिंग
अनुवाद : किरण ठाकरे