परंपरावादी मुस्लिम कुटुंबातील रजियाच्या धेय्यवेडाची यशस्वी कहाणी !

परंपरावादी मुस्लिम कुटुंबातील रजियाच्या 
धेय्यवेडाची यशस्वी कहाणी !

Thursday October 08, 2015,

4 min Read

मुस्लिम समाजातली एक मुलगी. बालपणीच पितृछत्र हरपलेले. भावांचा आधार होता म्हणून बरे. पुढे तिच्या करिअरचा विषय आला तेव्हा परंपरावादी कुटुंब हिच एक अडचण ठरू पाहात होती, पण तिने मार्ग काढला. स्टेजिलासारख्या ऑनलाइन बाजारात काम करणे आणि यशाचा झेंडा रोवणे म्हणजे गंमत नाही. ‘मी चुकीचे काही करते आहे काय’, असे आपल्या आप्तांनाही अगदी ठणकावून सांगत सगळी अनुचित बंधने तिने झुगारली. आपले रजिया बेगम नावही सार्थक केले. रजियाने जे करून दाखवले, ते रजिया सुलतानच्या कतृत्वापेक्षा तसूभरही कमी भरणार नाही. शिक्षणात, करिअरमध्ये महिलांचे मागासलेपण लक्षणीय असलेल्या समाजासमोर तिच्या रूपाने एक आदर्शच उभा ठाकलेला आहे.

रजियाचे कुटुंब परंपरावादी आणि जुनाट विचारसरणीचेच होतेच, गरिबही होते. ‘मी शिकली-सवरली आहे. काम करून घराला हातभार लावू शकते’, असे रजियाचे म्हणणे, तर इथेही कुटुंबाचा विरोध. आपल्यात मुली काम करत नाहीत. घर चालवत नाहीत, असेच चाललेले. मुलगी काय दुसऱ्याच्या घरचे धन, हा दुसरा टोमणा.

image


‘स्टेजिला’च्या सीईओ रूपल योगेंद्र यांना रजियाचा भारी अभिमान. रजियाबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांतून वेगळीच चमक दिसते. रूपल म्हणतात, ‘‘रजिया आमच्या कंपनीत अगदी सुरवातीपासून आहे. तिचा उत्साह, तिची उर्जा आणि काम करण्याची तिची पद्धत पाहिली, की तुम्हाला आमच्या कंपनीची कार्यसंस्कृती मूळातच कळलीच म्हणून समजा.’’

रूपल पुढे सांगतात, ‘‘रजिया इतरांपेक्षा वेगळी आहेच. कामातील अडचणी सोडवण्यात आणि आव्हानांचा मुकाबला करण्यात ती आपले धैर्य पणाला लावते. अडचण सोडवतेच. मुकाबला करतेच. ‘जमणार नाही’ हे वाक्यच तिच्या शब्दकोषात नाही. जिद्द हिच तिच्या यशाची गुरुकिल्ली आहे.’’

पदवी प्राप्त केल्यानंतर आता आपणही दोन पैसे मिळवू अशी तिची इच्छा होती, पण ‘नोकरी-बिकरीच्या भानगडीत पडायचे नाही’, या कुटुंबाच्या दपटशासमोर तिला नमते घ्यावे लागले. पुढे सहा महिने घरीच बसून होती. रजिया या काळातही स्वस्थ बसलेली नव्हती. नमते घेतलेले असले तरी पराभव स्वीकारलेला नव्हता. सगळी संकटे पार करायचीच. यशस्वी होण्याचा मार्ग शोधायचाच, हे मनात पक्के होते. धडपड चाललेली होती. बहिणीने मदत केली. तिने ‘स्टेजिला’मधील संधीबाबत सांगितले. रजियाने अर्ज केला. मुलाखतीला गेली. रजियाची निवड झालेली होती. आकाश दोन बोटे उरलेले होते.

रजियाची ही पहिलीच नोकरी. पाठीशी अनुभव नाही. सुरवातीला अडचणींचे जसे डोंगर उभे राहिले. उमेदवारीचा हा काळ आठवताना रजिया सांगतात, ‘‘२००५ मध्ये मी इथे नोकरीला लागले. नंतरचे अनेक वादळांचा सामना करावा लागला. सगळं काही शिकून घेण्याला मी पुरेसा वेळ दिला. मी जसजशी शिकत गेले तसतसे मला यशही मिळत गेले.’’

रजिया म्हणतात, ‘‘अगदी सुरवातीला सरळ गणना करणे आणि डेटा एंट्रीसारखी कामेही मला अवघड जात असत. कितीतरी वेळा मी तेव्हा नोकरी सोडण्याचा विचार करायचे.’’

‘‘आज मी जे काही आहे, ते केवळ रूपल यांच्यामुळे. सुरवातीच्या त्या अडचणीच्या काळात केवळ रूपल अशा एक होत्या, ज्यांनी मला स्वत:वर, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवले. हिंमत जो हरला, त्याने किंमत हरवली, हा विचार त्यांनी माझ्या मनात पक्का ठसवला.’’ रजिया यांच्या डोळ्यातून हे सांगताना कृतज्ञभाव दिसतात.

रजिया यांचा रूपल गौरव एवढ्यावर संपत नाही. त्या म्हणतात, की रूपल नसत्या तर सुरवातीच्या त्या हताश अवस्थेत नोकरी सोडली असती. रूपलनी मला सांगितले, काम करत रहा.जीवनात काही मिळवायचे असेल तर हे काम एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागेल. तुला जे काही शिकायचे असेल ते सारे कंपनीतील अन्य सहकारी शिकवतील. रूपल नुसत्या बोलल्या नाहीत. तशी तजवीजही त्यांनी रजियासाठी केली.

एकेकाळी अर्जुनाप्रमाणे धनुष्य गळालेल्या हतबुद्ध अवस्थेतून गेलेल्या रजिया आज टीम लिडर बनण्याचे प्रशिक्षण इतरांना देत आहेत, यातून त्यांच्या आयुष्यातील रूपल योगेंद्र यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित होते.

रजिया पुढे म्हणतात, ‘‘मला माझ्या कामाविषयी आत्मियता आहे. इतरांसह आणि इतरांसाठी काही करायला मिळणे मला आनंद देऊन जाते. समोर येणाऱ्या नवनव्या आव्हानांना तोंड देणे आता माझ्यासाठी सहजसोपे आहे.’’ हा आत्मविश्वास यशाचे एक गमकच नाही काय?

आज रजिया आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. पती आणि तीन वर्षांच्या मुलासमवेत एक आनंदी आयुष्य जगताहेत. आईलाही आता त्यांचा आधार आहे. मातृऋणातून उतराई होण्याची कुठलीही संधी रजिया सोडत नाहीत.

‘‘मी आतापर्यंतच्या आयुष्यातून काही शिकले असेल तर ते हे, की सुरवातीच्या काळात कुठलेतरी काम तुम्ही झोकून करायला हवे. त्या कामातले सगळे तंत्र आत्मसात करायला हवे. भावी आयुष्य स्वावलंबनाने जगायचे तर केवळ हे क्षण तुम्ही अगदी अधाशीपणे वेचायला हवेत. आयुष्य जगण्याचा तुमचा दृष्टिकोनही तुम्ही याच एका मार्गाने बदलू शकता.’’

आपले हे तत्वज्ञान सांगताना रजिया यांचा शब्दन् शब्द आत्मविश्वासाने ओथंबलेला असतो!