अंध मुलांच्या ‘प्रगती’साठी लढणार्‍या सुहासिनीताई मांजरेकर

अंध मुलांच्या ‘प्रगती’साठी लढणार्‍या सुहासिनीताई मांजरेकर

Tuesday December 08, 2015,

3 min Read

नियतीनं त्यांच्या डोळ्यातल्या प्रकाशज्योती कायमच्याच हिरावून घेतलेल्या, आयुष्य अंधःकारमय झालेलं... मात्र अशा अनेकांच्या अंधःकारमय आयुष्यात आशेचा किरण घेऊन आल्या त्या बदलापूरच्या सुहासिनीताई मांजरेकर. अंध मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनी विशेष अशा ’प्रगती अंध विद्यालया’ची स्थापना करून अनेकांचं आयुष्य सुखमय केलं. विविध उपक्रम राबवत गेली सत्तेचाळीस वर्षं अंध मुलांच्या सेवेसाठी निस्वार्थपणं झटणार्‍या सुहासिनीताईंना सलाम...

image


इतरांना आधार देणारी आजची स्त्री

महिला हा शब्द उच्चारताच प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तिसंपन्न स्त्रीही समोर उभी राहते. कारण आता स्त्री ही अबला राहिलेली नाही, उलट ती सबला झालेली आहे आणि इतरांना समाजात आधार देण्याचं काम ही नारी करत असते. जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जाणारा दिवस. या महिला दिनानिमित्त महिलांसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी आदर्श ठराव्यात अशा बदलापुरातील सुहासिनीताई मांजरेकर. आज वयाची ऐंशी वर्षं उलटून गेली तरी मोठ्या उत्साहात प्रगती अंध विद्यालयातील मुलांना त्या शिकवताना दिसतात.

image


निस्वार्थ वृत्तीनं आत्मविश्वास वाढवण्याचं काम

डोळ्यांवर काळा चष्मा अन् हातात पांढरी काठी घेऊन रस्ता ओलांडणारे, चालत्या रेल्वेमध्ये खेळणी विकणारे, कॉलेजच्या बाहेर टेलिफोन बूथ चालवणारे अंध बांधव आपण येता-जाता पाहत असतो. ’डोळा’ हा अवयव शरीरात असूनही तो निकामी झालेल्या या मंडळींसाठी ’पांढरी काठी’ म्हणजे त्यांना लाभलेला एक अवयवच असतो, नव्हे तिचं जणू त्यांची आयुष्याची साथीदार असल्याप्रमाणं असते. परिस्थितीमुळं काही वेळा हे अंध बांधव खचून गेलेले असतात. मग या अंध बांधवांचा खचलेला आत्मविश्वास वाढवण्याचं काम ताई निस्वार्थ वृत्तीनं करत आहेत.

image


अशी घडवली ताईंनी ‘प्रगती’ची शाळा

बदलापूरमध्ये गेली सत्तेचाळीस वर्षं अंध मुलांच्या सेवेसाठी सुहासिनीताईंनी स्वत:ला झोकून दिलंय. १९६८ मध्ये मोठ्या कष्टानं ताईंनी एका छोट्याशा झोपडीत अंध मुलांची ही शाळा सुरू केली. त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या होती अवघी एक. पण हळूहळू ताईंच्या कामाचा विस्तार वाढत गेला आणि आता या अंधांच्या शाळेची अख्खी एक पूर्ण इमारत उभारलेली आहे.

image



शाळेत शिकायला विविध ठिकाणची मुलं

सुहासिनीताईंच्या या प्रगती अंध विद्यालयामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग घेतले जातात. विद्यालयात आता तब्बल ११२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये बदलापुरातील ही एकमेव शाळा आहे. नागपूर, नाशिक, उत्तर प्रदेश अशा भारतातील विविध ठिकाणांहून अंध मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत. म्हणजेच ताईंनी रुजवलेल्या शाळारूपी रोपट्याचा आता भलामोठा वटवृक्ष झालाय.

image


image


मांजरेकरताईंचं कार्य आणि गौरव

मांजरेकरताईंच्या कार्याची दखल खुद्द राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली आणि अंध-अपंगांसाठी विशेष कार्य केल्याबद्दल २००७ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. आजपर्यंत त्यांच्या संस्थेला विविध प्रकारचे ७१८ पुरस्कार मिळाले आहेत. शाळेचं काम करण्याबरोबरच ताई अनाथ मुलं, हरवलेली मुलं, वेश्याव्यवसायातल्या महिलांच्या मुलांनाही सांभाळण्याचं काम करतात.

image


अंधांना दृष्टी देण्याचं काम

१५ ऑक्टोबरला ‘जागतिक अंध दिन’ साऱ्या जगानंही साजरा केला. १९६४ मध्ये अमेरिकेनं हा दिवस ‘अंध दिवस’ म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. नंतर हाच ‘जागतिक’ अंध दिवस म्हणून साजरा होऊ लागला. आज अठ्ठेचाळीस वर्षं झाली, आजही आपण हा दिवस फक्त साजरा करतो. त्यात डोळसपणा दिसून येत नाही. डोळसपणात भर पडलेली आहे, हे मात्र निश्‍चित! पण, ही भर इतकी किरकोळ आहे की, उद्दिष्ट आणि साध्य यात खूपच मोठं अंतर आहे. हा दिवस साजरा करताना अंधांसाठी काय केलं पाहिजे, याचा विचार केला जातो. हा विचार वर्षातून एकच दिवस नको, तर तो निरंतर असावा. या विचारांमध्ये अंधांना सोयीसवलती, सामाजिक जबाबदारी, सहानुभूती, सहकार्य, हळहळ, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार या बाबींनाच महत्त्व दिलं जातं. पण, ‘अंधांना दृष्टी’ या दिशेने समाजात फारसा विचार केला जात नाही. आज याच दिशेने, दूरदृष्टीने, डोळसपणे अधिक वेगाने जाण्याची काळाची गरज आहे.

image