एका लहानशा उपहारगृहात झाडू मारणा-याने बनविले ‘सरवणा भवन’, आज आहे ८० उपहारगृहांचा मालक!

एका लहानशा उपहारगृहात झाडू मारणा-याने बनविले ‘सरवणा भवन’, आज आहे ८० उपहारगृहांचा मालक!

Friday December 18, 2015,

6 min Read

घराबाहेर संपूर्ण कुटुंबासोबत जेवायला जायचे असेल तर, सर्वात पहिले तुम्हाला कोणत्या गोष्टीचा विचार येतो, अशा जागेवर जावे जेथे जेवण स्वादिष्ट असेल, जास्त खर्चिक नसेल आणि त्या उपहारगृहात स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवलेले असेल. त्यानंतर तुम्ही याचा विचार करता की, घराजवळ असे कोणते ठिकाण आहे. तेव्हा तुम्हाला अचानक लक्षात येते की, आपल्या घराजवळच सरवणा भवन आहे. जेथे तुमच्या इच्छेनुसार सर्वकाही मिळते. प्रत्यक्षात हे सर्व प्रश्न तुमच्या आणि आमच्या विश्वासावर जुळलेले आहेत. सरवणा भवन असे एक उपहारगृह आहे, ज्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.

सरवणा भवन बनविण्याचे आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यामागे विचार आहेत पी राजगोपाल यांचे. झाले असे की, एकदा कुणीतरी पी राजगोपाल यांना सांगितले की, ते चेन्नईच्या टी नगर भागात यासाठी जात आहेत, कारण के के नगर मध्ये कुठलेही उपहारगृह नाही. चेन्नईच्या के के नगर मध्येच राजगोपाल राहत होते. या गोष्टीने पी राजगोपाल यांच्या मनाला आतून ठेच लागली. त्याच दिवशी राजगोपाल यांनी निश्चय केला की, ते उपहारगृह उघडतील आणि जनतेचा विश्वास देखील जिंकतील. काम कठीण होते, मात्र अशक्य नव्हते. मजबूत विचारांनी पी राजगोपाल यांनी तयारी सुरु केली आणि परिणाम हा झाला की, आज देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सरवणा भवनच्या एकूण ३३ आणि विदेशात ४७ शाखा आहेत.

image


लहानपण आणि गरीबीचे दिवस

आज लाखो लोकांचे पोट भरणारे पी राजगोपाल यांचे लहानपण खूपच हलाखीत गेले. ज्यावर्षी देश स्वतंत्र झाला त्याचवर्षी पी राजगोपाल यांचा जन्म तामिळनाडूच्या एका लहानशा पुन्नईयादी या गावात झाला. शेतकरी वडीलांनी कसे बसे करून त्यांचे पालन पोषण केले. मोठे झाल्यावर हिंम्मत करून शाळेत देखील पाठविले. ज्या घरात एक वेळच्या जेवणाची सोय नव्हती, तेथे शिक्षण महागच मानले जायचे. त्यामुळे पी राजगोपाल यांना सातवी नंतर शिक्षण सोडावे लागले आणि पोट भरण्यासाठी एका उपहारगृहात भांडे घासणे आणि झाडू पोछा करण्याचे काम करावे लागले. परिस्थितीसोबत प्रत्येकाला वेळ सर्वकाही शिकविते. हळू हळू राजगोपाल चहा बनविणे शिकले. त्यानंतर जेवण बनविण्यास देखील शिकले. मात्र, वेळेने एक इशारा केला आणि राजगोपाल यांनी देखील त्या इशा-याला समजण्यास उशिर केला नाही. त्यानंतर त्वरितच त्यांना एका किराणा दुकानावर साफ सफाई करणा-या सहायकाची नोकरी मिळाली. याच नोकरीने राजगोपाल यांना एक दिशा दिली. ही दिशा स्वतःचा व्यवसाय करण्याची होती. राजगोपाल यांनी आपले वडील आणि दुस-या नातेवाईकांच्या मदतीने कमी खर्चात लवकरच एक किराण्याचे दुकान उघडले. दुकान उघडले, मात्र त्या समोरील आव्हाने डोंगरा एवढी होती. ज्या योजनेसोबत राजगोपाल यांनी दुकान उघडले होते, ते अचानक बंद पडले. एका क्षणासाठी वाटायला लागले की, सर्वकाही बेकार झाले. पण म्हणतात ना, आशेहून मोठे कुठले हत्यार नसते आणि धीरापेक्षा अधिक कुठले औषध नसते. नाजूक परिस्थितीत सलग हरल्यानंतर राजगोपाल यांच्या मनाच्या एका कोप-यात विश्वास अद्यापही जिवंत होता. हा विश्वास काहीतरी करून दाखविण्याचा होता. विश्वासाची परीक्षा वेळ संपली. आता वेळ होती जगासमोर स्वतःला सिद्ध करण्याची. १९७९ ची ही गोष्ट आहे, जेव्हा एका विक्रेत्याने त्यांना सांगितले की, के के नगर मध्ये जेवणासाठी एक उपहारगृह देखील नाही. त्या विक्रेत्याची ती गोष्ट केवळ उपहासानेच होती, मात्र हाच उपहास पी राजगोपाल यांच्यासाठी प्रेरणा बनला. दोन वर्षाच्या आत म्हणजेच १९८१ मध्ये राजगोपाल यांनी सरवणा भवनची स्थापना केली. हा तो काळ होता, जेव्हा जेवण जेवणे ही मौज मजा नसून गरज होती. राजगोपाल यांनी जनतेच्या या मागणीला पूर्ण केले आणि उपहारगृहातील व्यवसायात अंगदासारखे पाय रोवले.

काम आणि कर्मचारी यांच्यासाठी अनुशासन

उपहारगृह चालविण्यासाठी पी राजगोपाल यांनी काही नियम बनविले. या नियमात ग्राहकांच्या विश्वसनीयतेला सर्वात अव्वल ठेवण्यात आले. उपहारगृहात ग्राहकांचा विश्वास वाढतो तो स्वच्छतेसोबतच शुद्ध आणि स्वादिष्ट जेवणाने. त्यांच्या ज्या कर्मचा-यांनी जेवणाच्या गुणवत्तेसोबत काटकसर करण्याचा सल्ला दिला, त्यांना राजगोपाल यांनी बाहेरचा रस्ता दाखविला. ज्या खानसामाने जेवण बनविताना चांगल्या प्रतीच्या नसलेल्या मसाल्यांचा वापर केला, त्यांचे मानधन देखील अनेकदा कापण्यात आले. या गोष्टींचा सरळ अर्थ होता की, जेवणाची गुणवत्ता सर्वात महत्वाची आहे. कारण, ग्राहकांची संतुष्टी सर्वोपरी आहे. याचा परिणाम असा झाला की, सरवणा भवनाला नुकसान झेलावे लागले. त्यावेळी राजगोपाल यांनी प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयापर्यंतचे नुकसान झेलले. मात्र, म्हणतात की, ज्यांचे मन साफ असते, त्यांची भरभराट होणे देखील निश्चित आहे. अनेकदा यश हे उशिराने मिळते, मात्र जेव्हा मिळते तेव्हा ते नैसर्गिक वाटायला लागते. पी राजगोपाल यांचे सरवणा भवन लोकांसाठी एक उदाहरण बनले आणि लोक तेथे आवर्जून येतात. त्यामुळे आज राजगोपाल यांना त्यांच्या या निर्णयाचा फायदाच झाला.

सरवणा भवनच्या यशाचे गुपित केवळ शुद्ध जेवणच आहे, असे नाही. तर, एक कुटुंब बनविण्याचे आहे. राजगोपाल यांनी आपल्या कर्मचा-यांना नोकरासारखे नाहीतर, एका कुटुंबातील सदस्यासारखे ठेवले आहे. त्यांच्या दु:खाना आपले दु:ख त्यांनी मानले आहे. राजगोपाल यांचे मत आहे की, कर्मचारी खुश राहिले तरच उपहारगृहाचे वातावरण चांगले राहील. त्यामुळे उपहारगृहा सोबतच कर्मचा-यांच्या स्वच्छतेचे देखील विशेष लक्ष ठेवले जाते. त्याचे एक लहानसे उदाहरण आहे, सरवणा भवन मध्ये जेवणासाठी थाळी नसून पानांचा वापर केला जातो. राजगोपाल यांचा हा प्रयोग ग्राहकांना पसंत आलाच शिवाय तो कर्मचा-यांसाठी देखील फायदेशीर ठरला. कर्मचा-यांना थाळी धुण्याचा त्रास नाही. त्याव्यतिरिक्त राजगोपाल यांनी आपल्या कर्मचा-यांसाठी हे नियम बनविले की, महिन्यात एकदा प्रत्येकजण आपले केस नक्की कापतील. यामुळे जेवणात केस पडण्याची कोणतीही तक्रार येत नसे आणि सोबतच कर्मचारी चांगले आणि स्वच्छ देखील दिसतात. कर्मचा-यांना सक्त उपदेश आहे की, त्यांनी रात्रभर जागून सिनेमे पाहू नये. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर फरक पडतो. परंतु जेवढी सक्ती आहे त्यांच्यावर, तितक्याच सुविधा देखील आहेत. सरवणा भवनच्या कर्मचा-यांच्या नोकरीच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जाते. सोबतच त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून, त्यांना घर देखील दिले जाते आणि काळासोबतच त्यांचे मानधन वाढविले जाते. कर्मचा-यांना आपल्या कुटुंबाकडे गावी जाण्यासाठी देखील वर्षाचे पैसे दिले जातात. विवाहित कुटुंबाचा आणि त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील सरवणा भवनच उचलते. जर एखाद्या कर्मचा-याची तब्येत खराब झाली तर, त्यांची देखरेख करण्यासाठी दोन लोकांना त्यासाठी विशेष ठेवले जाते.

गुन्हा दाखल

हजारो कर्मचा-यांची देखरेख आणि चिंता करणारे पी राजगोपाल यांच्यासाठी २००९ हे वर्ष चांगले नव्हते. त्यांच्या विरोधात हत्या करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. राजगोपाल यांच्यावर आरोप होता की, त्यांनी आपल्या व्यवस्थापकाच्या मुलीच्या मित्राची हत्या केली. सांगितले जाते की, राजगोपाल आपल्या व्यवस्थापकाची मुलगी जीवाज्योती सोबत विवाह करू इच्छित होते. मात्र, जीवाज्योती आणि संथारम एकमेकांना पसंत करत होते. अनेक धमक्यानंतरही जेव्हा जीवाज्योती आणि संथारम यांचे प्रेम हारले नाही, तर संथारम यांचे अपहरण करण्यात आहे आणि काही दिवसानंतर त्याचे प्रेत मिळाले. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि पी राजगोपाल यांना अटक करून कोठडीत टाकले. मात्र राजगोपाल यांच्या विरोधात सबळ पुरावे न मिळाल्यामुळे त्यांना जामीन मिळाला.

एकदा एका पत्रकाराने जेव्हा सरवणा भवनच्या एका अधिका-याला विचारले की, सरवणा भवनमध्ये जाऊन जेवण जेवण्याचा अर्थ आहे, एका हत्या-याचा खिसा भरणे. त्याच्या उत्तरात अधिका-याने सांगितले की, आपल्या आयुष्यात आपण न जाणो अशा किती लोकांना भेटतो, ज्यांच्याबद्दल आमच्याकडे कुठलीही माहिती नसते. त्यांनी आतापर्यंत काय चांगले आणि काय खराब केले, असे असूनही आम्ही त्यांच्यासोबत व्यवसाय करतो. अशातच जर कुणी चांगले जेवण बनवत असेल, तर त्यांच्याकडे जाण्याला काहीच हरकत नाही.

लेखक: धीरज सार्थक

अनुवाद : किशोर आपटे.