एचआयव्ही/एड्सबाबत कोणत्याही शंकेचं निरसन करणारं लायब्रेटचं एॅप..

एचआयव्ही/एड्सबाबत कोणत्याही शंकेचं निरसन करणारं लायब्रेटचं एॅप..

Wednesday December 09, 2015,

3 min Read

जगभरात एचआयव्हीची लागण झालेल्या लहान मुलांची संख्या तीन कोटी २० लाख आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्यापैकी बहुतेकांना एचआयव्हीचा संसर्ग त्यांच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह आई गर्भवती असताना, प्रसुतीदरम्यान किंवा बाळ अंगावर पिताना झाला आहे. या रोगाचे जगभरात सध्या एचआयव्ही आणि एड्सचे ३५ कोटी रुग्ण आहेत.

एड्सविषयी जनजागृती व्हावी आणि लोकांनी खुलेपणानं यावर चर्चा करावी यासाठी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. सध्या आरोग्य आणि औषधांसंबंधी अनेक स्टार्टअप्स सुरू झाल्यानं लोकांना एचआयव्ही आणि एड्सबाबतच्या शंका ऑनलाइन विचारता येतात.

यावर्षीच्या जानेवारीपासून आमच्याकडे एड्सशी संबंधित जवळपास एक लाखांपेक्षाही जास्त प्रश्न, शंका विचारण्यात आल्या आहेत. या विषयाबद्दलची जागरूकता कमी असल्यानं दिवसेंदिवस प्रश्नांची संख्या वाढतेच आहे, असं लायब्रेट या आरोग्यविषयक स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ अरोरा सांगतात. लायब्रेट हे रुग्ण आणि डॉक्टरांना एकमेकांशी जोडणारं व्यासपीठ आहे.

image


फोटो सौजन्य- शटरस्टॉक

एड्सबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये ७० टक्के संख्या पुरुषांची आहे.

वयोगट

• <18: 5%

• 18-25: 52%

• 26-40: 36%

• 41-60: 6%

• 60+: 1%

महानगरांमधून विचारले जाणारे प्रश्न-४०%,

छोट्या शहरांमधून विचारले जाणारे प्रश्न- ६०%

एचआयव्ही/एड्सबद्दल सर्वांत जास्त प्रश्न विचारले जाणारी सहा शहरे

दिल्ली

मुंबई

चेन्नई

कोलकाता

बंगळुरु

हैद्राबाद

सौरभ यांच्या मते एड्स म्हणजे नक्की काय, तो कसा होतो आणि त्यावरचे उपचार काय आहेत हे प्रश्न सर्वांत जास्त विचारले जातात. त्यांपैकी काही प्रश्न-

- एखाद्या व्यक्तीला एड्सची बाधा कशी होते आणि त्यामुळे त्याच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो आणि आपण त्यावर नियंत्रण कसं मिळवू शकतो?

- एचआयव्ही आणि एड्स या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत का?

- माझे पती एचआयव्ही बाधित आहेत, तरीही मी त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवून गर्भवती राहू शकते का?

- एचआयव्ही बाधित व्यक्तिशी संबंध आला तर त्याच्यानंतर घ्यायचे एखादे विरोधक औषध उपलब्ध आहे का?

- एचआयव्ही बाधित व्यक्तीची लक्षणे काय आहेत?

त्याशिवाय या विषयाबद्दल किती गैरसमज आहेत, किती कमी जागरुकता आहे हे लक्षात येणारे काही प्रश्न आहेत.त्यापैकी काही-

• मी २३ वर्षांचा तरुण आहे. मी पाच दिवसांपूर्वी सुरक्षित संभोग केला आहे. पण आज माझा घसा खवखवतोय आणि थोडासा तापही आल्यासारखं वाटतंय. माझ्या मानेभोवती एकदोन पुरळही उठलेलं दिसतंय. मला एचआयव्हीची लागण झाल्याची भीती वाटत आहे. कृपया मार्गदर्शन करा.

• मी रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे सामोसा मागवला. तो खाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्या वेटरनं मला तो सामोसा आणून दिला त्याच्या हातावर ओली जखम होती. तो तोच हात वापरत होता. जर त्याच्या बोटातलं रक्त सामोश्याला किंवा अन्नाला लागलं असेल आणि समजा तो वेटर एचआयव्ही बाधित असेल तर मला अन्नामार्फत एचआयव्हीची लागण होऊ शकते का?

अनेकदा डॉक्टर्सना एचआयव्ही/एड्स /शरीरसंबंधांविषयी काही शंका विचारायच्या असतील तर पूर्वग्रहांमुळे अडथळे येतात. त्यांच्याशी रुग्ण मोकळेपणानं बोलू शकत नाहीत. त्यामुळेच लायब्रेटनं त्यांच्या युजर्सची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्याच्या दृष्टीनंच आराखडा तयार केला आहे. त्यांची माहिती, संपर्क अगदी डॉक्टरांना कधीही सांगितली जात नाही. आपली माहिती डॉक्टरांना सांगायची की नाही हे संपूर्णपणे यूजर्सवर अवलंबून आहे. त्यांची इच्छा असेल तरच ती माहिती सांगितली जाते, असं सौरभ सांगतात.

image


या एॅपमार्फत विचारल्या जाणाऱ्या शंकांचं निरसन डॉक्टर्स करतात. त्यामध्ये सेक्सॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, गुप्तरोगतज्ज्ञ आणि होमियोपॅथिक डॉक्टर्स यांचा समावेश आहे.एचआयव्ही किंवा एड्सशी संबंधित कोणतेही प्रश्न या सर्व तज्ज्ञांना आमच्या एॅपमार्फत अगदी मोफत विचारले जाऊ शकतात आणि त्यांच्याकडून विविध मतं मिळवू शकतात.

त्यांना हव्या असलेल्या डॉक्टरांकडून ते नंतर वैयक्तिकरित्या शुल्क भरून मार्गदर्शन मिळवू शकतात. पण महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांची संपर्क माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते.

त्याशिवाय लायब्रेटवर एचआयव्ही/ एड्स आणि शारिरीक संबंधांशी निगडीत आरोग्याबद्दल डॉक्टरांनीच लिहिलेले मार्गदर्शनपर लेखही वाचायला मिळतात.

आजही एड्स किंवा एचआयव्ही म्हणजे समाजाला कलंक समजला जातो. त्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, विज्ञानानं कितीही प्रगती केली तरीही एचआयव्ही बाधित किंवा त्याचा धोका असलेल्या लोकांना काळजी घेण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपायांसाठी किंवा नंतरच्या उपचारांसाठी कोणताही मार्ग किंवा संधी उपलब्ध नाही.

अशी अनेक आव्हानं असतानाही केले जाणारे प्रयत्न नक्कीच आशेचा किरण दाखवतात. प्रतिबंधात्मक उपायांमुळे काही देशांमध्ये एड्स किंवा एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद- सचिन जोशी