मानवतेच्या सेवेसाठी प्रथमवर्ग अधिकारी होण्याचे स्वप्न बाजुला ठेवणा-या गुंजन गोळे यांची अनोखी कहाणी!

1

महाराष्ट्राच्या मातीमध्ये लहानाची मोठी झाली.असंख्य स्वप्न उराशी बाळगुन आयुष्याच्या वाटेवर चालत असताना छोट्याश्याच प्रवासामध्ये तिने अनेकांची दु:खे पाहिली अन् इतरांच्या वाट्यातील दु:ख दुर करण्यासाठीच आपला जन्म झाल्याची जाणीव एका युवतीला होते, अन् ती युवती स्वत:ची स्वप्ने, इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून उभी रहाते ती आयुष्याच्या वाटेवर चालणाऱ्या रोगी, मनोरुग्ण, अनाथ, कृष्टरोगी आदी वाटसरुंच्या वाटेवर सुखाची,आनंदाची अन् प्रेमाची सावली देवुन त्यांचे अास्तित्व स्विकारण्यास समाजास भाग पाडण्यासाठी तीची धडपड सुरु होते. ही कहाणी आहे अमरावती मधील गुंजन सविता गोळे यांची ..!

गुंजन सविता गोळे ही युपी.एससीची सिडीएसची परिक्षा उतीर्ण आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस निरिक्षकाची अंतिम परिक्षा उतीर्ण आहे, शिवाय ती एक उत्तम गिर्यारोहक आहे.  महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसुबाई शिखर तिने १४ वेळा सर केले आहे. 

एकदा गुंजनने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका गरोदर मनोरुग्ण महिलेला पाहिलं अन् तिच्यातल्या माणुस पण जागा झाला. त्या महिलेची अवस्था अतिशय भयानक होती, अंगावर नीट कपडे नाहीत, केस वाढलेले, कित्येक दिवस अंघोळ नाही त्यामुळे ती अतिशय विद्रुप दिसत होती त्यातच गरोदर असल्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते. ती कुणाची तरी शिकार ठरली असावी अन् त्यातून तिच्या नशिबाला आलेला भोग पोलिस निरिक्षक झालेल्या गुंजन यांना सहन झाला नाही. तिने ठरविले आज पासुन आपला जन्म हा पोलिस निरिक्षक किंवा अधिकारी होवुन लालदिव्याच्या गाडीत फिरण्यासाठी नाही तर अशा बेवारस मनोरुग्णांच्या, अनाथांच्या, कृष्टरोग्यांच्या सेवेसाठी झाला आहे. तेव्हापासुन गुंजन दररोज सायंकाळी अमरावतीचे रस्ते शोधत फिरत असते, स्वत:ची दुचाकी...साधी राहणी ...बाजुला एक मोठी पर्स !

गुंजनच्या पर्समध्ये पाण्याच्या बाटल्या , बिस्किटांचे पुडे, छोटेसे टॉवेल असतात, वाटेत पुटपाथवर एखादा मनोरुग्ण दिसला की त्याला/तिला पाणी पाजते. खायला बिस्किटांचे पुडे देतेे. क्षणार्धात त्यांच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पाहुन गुंजनला खूप आनंद होतो असं ती सांगते.....! थंडीच्या दिवसात उघड्या अवस्थेत झोपलेल्या मनोरुग्णांना संध्याकाळी त्यांच्या अंगावर ब्लँकेट घालुन जाते पण दुसऱ्या दिवशी त्या मनोरुग्णाकडे दिलेले ब्लँकेट नसते.

सुरवातीला मनोरुग्णांशी संवाद साधताना मनोरुग्ण घाबरुन दगड मारायचे आत्ता मात्र गुंजनला पहाताच त्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट आनंदाची भावमुद्रा बघायला मिळते अन् तोच माझा अांनद आहे असं गुंजन सांगते. एकदा असंच रस्त्यावरुन जाताना अमरावतीमधील बियाणी चौकात तीला एक मनोरुग्ण दिसला. तो अत्यंत रागीट स्वभावाचा होता त्याच्या जवळुन जरी कुणी चालेले तरी तो शिव्या द्यायचा. कित्येक दिवसांचा अर्धपोटी जेवलेला, अंगावर मळकटलेले कपडे वाढलेले, केस अन् दाढी पाहुन त्याच्या जवळ कोणीही जाणार नाही अशी त्याची अवस्था..! अन् त्यातच त्याचा आक्रमक स्वभाव..! एकदा गुंजनने दुरुनच पाणी दिले, दुसऱ्या दिवशी दुरुनच बिस्कीटे व खाऊ दिला. रोज खाऊ दिल्याने तो शांत झाला होता, गुंजनला बघताच तो हात पुढे करायचा. तिही लगेच पर्स मधुन त्याला आणलेली फळे, खाऊ द्यायची. हळहळु तो गुंजनशी बोलायला लागला. त्याला मराठी येत नव्हतं अन् कळतही नव्हती. पण त्याला इंग्रजी व हिंदी चांगलं यायचं, तो आणखी एक कोणती तर भाषा बोलायचा, कदाचित तमिळ किंवा मल्याळम असावी..! त्याला समजणारी दुसरी भाषा म्हणजे प्रेम , जिव्हाळा..!


त्याच दुसऱ्या भाषेमुळं त्याचं नाव कृष्णा असल्याचं कळलं.! एकदा त्याला फळे देताना गुंजनची नजर त्याच्या बोटावर गेली. त्याच्या बोटात एक धातुची अंगठी होती ती पूर्णपणे बोटात बुडाली होती त्यातून रक्त वाहत होते. गुंजन त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घेवून गेली, डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरानीं गुंजनला मदत केली तिला सांगितले ऑपरेशन करुन आंगठी बाहेर काढावी लागेल. शेवटी त्याच्या बोटाचे ऑपरेशन करुन त्याच्या बोटात बुडालेली अंगठी काढली. त्याचे लांबलचक वाढलेले केस तिने कापले त्याचे अंग पुसले  व त्याला नविन कपडे घालायला दिले. इतकी उच्चशिक्षित युवती आज मनोरुग्णांची माता ठरते आहे. नेपाळ येथे झालेल्या भुंकप दुर्घटनेतील मदत कार्यात गुंजन सहभागी होती, केदारनाथ येथील मदत कार्यात ती सहभागी होती. इतकेच नाही तर अनाथ मुलांच्या शिक्षणासाठीही गुंजन धडपडतेय. ग्रामीण भागातील मुलांना ती सैन्यात भरतीसाठी तयारी करुन घेते. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचें ती अमरावती मध्ये क्लासेस घेते.

महाराष्ट्रामध्ये प्रथमच तिने गावीलगड ढोल पथक काढुन राज्यात पहिले महिला ढोल पथक चालविण्याचा मान फटकावला आहे. या ढोलपथकामध्ये १५० हुन अधिक मुली-मुलांचा सहभाग आहे. तिचं हे गावीलगड ढोलपथक अमरावतीसह राज्यभर गाजते आहे. ढोलपथका मधुन येणारा पैसा ती सर्व मनोरुग्णांच्या सेवेसाठी, अनाथ बालकांसाठी तसेच निराधार वयोवृध्दाच्यां सेवेवर खर्च करते. अमरावती बसस्थानक परिसरातील १० निराधार वयोवृध्दानां रोजचे एक वेळचे जेवण देते. तिला अात्ता अमरावतीमध्ये एकाही निराधाराला उपाशी पोटी झोपु द्यायचं नाहीये. पूर्वी हे सारं ती एकटी करायची, आज सोशलमिडियामुळं तिचं काम राज्यभर पसरत आहे . त्यामुळे राज्यभरातुन अनेक तरुण तरुणीांचे हात गुंजनला सेवेसाठी लाभत आहेत. अनेक समाजसेवी संस्था गुंजन च्या कामात हातभार लावुन माणुसकी धर्म टिकवत आहेत

समाजसेवेच्या प्रवाहात गुंजनला संपूर्ण  राज्यात एकही मनोरुग्ण, न निराधार वयोवृध्द रस्त्यावरुन फिरु द्यायचे नाही, त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन करायचा तिचा मानस आहे. तिचा हा मानस पूर्ण  करण्यासाठी आपल्या सर्वाच्यां हाताची गरज तिला भासणार आहे, आपले हातभार लागले तर गुंजनचा मानस पूर्ण होऊन  राज्यातील रस्त्यावर एकही मनोरुग्ण व निराधार वयोवृध्द दिसणार नाही. स्वत:ची स्वप्नेे ,स्वत:चं आयुष्य, इच्छा,आकांक्षा चुरगाळुन टाकुन निराधार वयोवृध्द, मनोरुग्णांच्या, अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी लढणाऱ्या गुंजन सविता गोळे हिचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे.                                                                                                   (शब्दांकन - तानाजी गोरड)