आपल्या संगीताने नवी चेतना निर्माण करण्याच्या प्रयत्नात सुरज निर्वाण! 

0

संगीत समजण्यासाठी भाषेचे ज्ञान तर आवश्यक आहेच असे नाही, शिवाय त्याला कुठल्याही सीमेच्या बंधनात देखील बांधले जाऊ शकत नाही. संगीत ते आहे, जे लोकांना एकमेकांशी जोडते. त्यांच्या भावनांना शब्द देते आणि त्यांच्या विचारांना व्यक्त करते. संगीत स्वतःमध्येच संपूर्ण आहे, त्यामुळे लोक त्याच्याशी स्वतःच जोडले जातात. संगीत जेथे लोकांचा थकवा घालविते, लोकांना स्वस्थ मनोरंजन देते, तेथेच दुसरीकडे देशप्रेमात देखील संगीताचे महत्वाचे योगदान नेहमीच राहिले आहे. स्वातंत्र्याच्या काळात देखील देशभक्तीवर अनेक गाणी बनली, ज्यामुळे लोक प्रेरित झाले, एकमेकांसोबत सामील झाले आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात आली.

भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. कारण, येथे तरुणांची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे. हेच कारण आहे की, जग भारताकडे मोठ्या आशेने बघते. भारताचे तरुण देखील, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत आणि तसेच देशातच नव्हे तर, जगात देखील आपले नाव उज्ज्वल करत आहेत. असेच एक तरुण आहेत सुरज निर्वाण, जे आपल्या प्रतिभेने म्हणजेच संगीताच्या माध्यमातून देशाला आणि समाजाला एकत्र करत आहेत आणि लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्याचे काम करत आहेत. 

स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतो. मात्र, सूरज आपल्या कामामुळे देश आणि समाजासाठी जे काम करत आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिमा देखील उंचावली आहे. ३०वर्षाचे सूरज देशातच नव्हे तर, संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.

सूरज यांच्या रक्तात पहिलेपासूनच संगीत आहे. त्यांची आई कथ्थक नृत्यांगना आहेत, तर त्यांचे वडील स्व. सुभाष निर्वान एक शानदार तबलावादक होते. जेव्हा सूरज केवळ चार वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मंचावर आपले संगीत गायले होते. सूरज सांगतात की,“माझ्या आजोबांनी मला गाण्यासाठी प्रेरित केले आणि माझे मनोधैर्य वाढविले”, त्यानंतर सूरज यांनी गाणे शाळा आणि विभिन्न मंचावर सादर केले. जेव्हा मी ११वीत होतो, मी स्वतः गाणे लिहिणे आणि त्याला तयार करणे सुरु केले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग आपले काम करत आहे.”

सूरज दिल्लीचे आहेत. ते एक प्रशिक्षित तबलावादक आहेत आणि त्यांनी अनेक प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांसोबत काम केले आहे. त्या व्यतिरिक्त ते स्वतः गाणे लिहितात आणि तयार करतात आणि गातात. ते सांगतात की, काही वर्षांपूर्वी ते सँम ग्रुपमध्ये सामील झाले. सँम ग्रुपम म्हणजे सेल्फ असेसमेंट आणि मैनेजमेंट वर्कशॉप. सँम सामाजिक कार्य करते. हे विभिन्न वर्कशॉप आयोजित करतात, जेथे व्यसनाधिनता (ड्रग्स एडीक्शन) आणि विभिन्न प्रकारांनी तरुणांना वाचविण्याचे कार्य करतात. सँममध्ये सामील झाल्यानंतर सूरज यांनी स्वतःमध्ये खूप बदल पाहिले, त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी निश्चय केला की, ते आता नेहमीच समाज आणि देशासाठी समर्पित राहतील. 

सूरज आपल्या संगीताच्या माध्यमाने तरुणांचे देशप्रेम जागविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या सलग वाढणा-या प्रसिद्धीने हे सिद्ध केले की, त्यांचा हा प्रयत्न देखील यशस्वी होत आहे. 

नुकत्याच झालेल्या पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावर देखील सूरज यांनी गाणे लिहिले आहे. ज्याला त्यांनी शहीद झालेल्या हुतात्म्यांना समर्पित केले आणि तरुणांमध्ये गायले. सूरज सांगतात की, “गाणे लिहिताना मी एका गोष्टीकडे विशेष लक्ष देतो की, गाण्यातील प्रत्येक शब्द सहज असला पाहिजे, जो लोकांना सहजतेने समजेल आणि त्यांच्या आत्म्याला भिडेल आणि विचार करण्यास बाध्य करेल”.

सूरज सांगतात की, ते आपल्या संगीताच्या माध्यमातून आपल्या भावनांना समोर आणू इच्छितात. पठाणकोट व्यतिरिक्त देखील त्यांनी देशभक्तीवर अनेक गाणी लिहिली आहेत आणि त्याला विभिन्न मंचावर गायले आहे. निर्भया अत्याचारानंतर जेव्हा देशातील तरुण रस्त्यांवर उतरले होते, त्यावेळी देखील सूरज यांनी आपल्या गाण्याने लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला होता.

सूरज यांनी गायलेले प्रसिद्ध हरियाणवी रॉक गाणे ‘रॉकीनी’ हे त्यांच्या मनाच्या खूप जवळ आहे. या गाण्यालादेखील खूप प्रसिद्धी मिळाली आणि या गाण्याने त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला. त्यानंतर त्यांची कारकीर्द  गतीने वाढली. 

आज सूरज दिल्ली विद्यापीठात ‘फँकल्टी ऑफ म्यूजिक आणि फाइन आर्ट्स’ मध्ये फँकल्टी मेंबर आहेत. सूरज यांनी पंडित बिरजू महाराज, डॉक्टर बालमूर्ती क्रिशनन, कुमार गणेशन, सुश्मित सेन इत्यादी मोठ्या लोकांसोबत देखील काम केले आहे.

सूरज सांगतात की, “केवळ पैसे कमविणे माझे लक्ष्य कधीच नव्हते. मी केवळ आपल्या संगीताच्या माध्यमातून तरुणांना प्रेरित करू इच्छितो आणि त्यांच्यात उर्जा आणू इच्छितो, जेणेकरून तरुण समाज आणि देशासाठी आपले योगदान देऊ शकतील.”

लेखक : निकिता पुंदिर
अनुवाद : किशोर आपटे