'त्यांच्या' प्रगतीचे शिल्पकार

'त्यांच्या' प्रगतीचे शिल्पकार

Wednesday December 02, 2015,

4 min Read

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहूनही कॉर्नेल युनिवर्सिटीपर्यंत मजल मारता येईल? २ लाखांपेक्षाही वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या घरात हे स्वप्न पाहिलं जाईल? किंवा गोल्डमन सेकसारख्या नामांकीत कंपनीत नोकरी मिळवता येईल? किंवा निदान आपला सामाजिक आर्थिक दर्जा वाढवण्याचे तरी स्वप्न पाहू शकतात का?

हजारो वर्षे अशीच हलाखीत काढलेल्या या कुटुंबातल्या या चार जणींनी आपली ध्येयं ठरवली होती. स्वाती, कविता,निलू आणि पूजा. यांच्यात काय साम्य आहे असं विचारलं तर या चौघीही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात वाढल्या. मात्र त्यांनी ही परिस्थिती बदलली अर्थात चांगले गुण, चिकाटी आणि कॅटलीस्ट कंपनीच्या सहाय्याने! त्यांच्या आयुष्यात " आकाशाला गवसणी घालणे ' या म्हणीचा प्रत्यंतर आलेला दिसून येईल.

दापोलीची स्वाती शिंदे महाराष्ट्रातल्या खेड्यात वाढलेली! कधी काळी तिच्या कुटुंबाची वार्षिक आर्थिक मिळकत होती ३६,००० रुपये फक्त. ती मात्र शिकली, पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन ती मेकॅनिकल इंजिनियर झाली. तिची निवड झाली आयओसीएल कंपनीत आणि आज तिचं वर्षाचं उत्पन्न आहे ८.५० लाख रुपये!

कविता खांडेकर, आपल्या ८ जणांच्या कुटुंबासोबत मुंबईतल्या एका छोट्याश्या घरात राहत होती. तिचे वडील ड्रायवर होते आणि घरी येणारं वार्षिक उत्पन्न होत एक लाख २० हजार रुपये फक्त. महापालिका शाळेत अतिशय जिद्दीने अभ्यास करून प्राविण्य मिळवत , तीन वीज़ेटीआयमध्ये प्रवेश मिळवला. तिथेही चांगले गुण मिळवत तिने आपला अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण केला आणि कनिष्ठ साईट इंजिनियर म्हणून शापूरजी पालनजी या कंपनीत तिची निवड झाली.

दोन वर्ष इथे काम केल्यावर, तिने एनआयसीएएआरमधून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. आज ती सॅमसंग बिल्डर या कंपनीत काम करत असून मोठमोठाल्या रहिवासी आणि व्यापारी संकुलांची निर्मिती करते आहे.

निलू खेड, सोलापूरमधल्या एका छोट्याश्या खेड्यात वाढलेली! तिचीही परिस्थिती, कॅट्लिस्टमधल्या अन्य सख्यांसारखीच ! तिचे वडील अंथरुणाला खिळलेले! जमिनीचा तुकडा त्यांनी दुसऱ्याला कसायला दिलेला. त्याचं जे भाड यायचं , त्यावर कुटुंब चालायचंय. बरं भाडंही पावसावर अवलंबून. पाऊस पडला लागला तर शेत येणार कुठून ? तरीही जास्तीत जास्त म्हणजे वर्षाला ७५ हजार रुपये त्यांना मिळत असत.

निलूला आपल्या मेहनतीच्या बळावर, पुण्यातल्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला , तरीही , संभाषण आणि आर्थिक गणित यावर तिचं गाडं अडलं होतं. या टप्प्यावर कॅटलिस्टनं शिकवणी शुल्क आणि राहण्याचा प्रश्न सोडवला. आपले संभाषण सुधारण्यासाठी आणि आत्मविश्वास यावा यासाठी तिने इंग्रजी शिकवणी लावली. त्याचबरोबर तिच्या एचएसबीसीतल्या गुरुंकडूनही तिला तिच्या भवितव्यासाठी मार्गदर्शन मिळालं.

कॅट परीक्षेत तिला भरघोस गुण मिळाले आणि आयआयएममध्ये तिला सहज प्रवेश मिळाला. फायनान्स या विषयात एमबीए केल्यावर तिने मागे वळून पाहिलच नाही. १३ लाखांच्या वार्षिक उत्पन्न करारावर तिला गोल्डमन सेक कंपनीनं नोकरी दिली. कंपनीन काही काळासाठी तिला अमेरिकेतही पाठवलं होत. कोर्पोरेट क्षेत्रात अश्या यशाच्या पायऱ्या चढत गेलेली निलू आज मुंबईतल्या डॉईच बँकेत नोकरी करतेय .

image


पूजा प्रकाश, जिच्या बालपणातला काही काळ अक्षरश: बेंगळूरूच्या एका बस स्टॉपच्या शेडखाली गेला. तिचे पालक विभक्त झाले आणि ती तिच्या आईसोबत राहू लागली. तिचे वडील डॉक्टर होते पण त्यांची काहीच मदत या मायलेकींना झाली नाही.

कंप्युटर सायन्समध्ये विशेष प्राविण्य मिळवून पूजाने मास्टर्स पदवीसाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता. तिला लॅपटॉप आणि शुल्क अशी मदत मिळाली. इतकंच नाही तर तिच्या गुरुंनी तिला योग्य महाविद्यालय निवडून देण्यासही मदत केली आणि प्रवेश प्रक्रियेच्या किचकट बाजू सांभाळत तिला प्रवेश मिळवून दिला आणि पूजा कॉर्नेल महाविद्यापिठाची विद्यार्थिनी झाली. कॅटलिस्टने देऊ केलेले ५ लाख रुपये तिने परत केले तेही लगेच, अमेरिकेत याहू कंपनीत नोकरी लागल्यावर!

अशाप्रकारचं काम करणारी कॅट्लिस्ट ही एकमेव कंपनी नाहीये. कुशलता वाढवणारी क्षेत्र आता भारतातही जोर धरू लागली आहेत. देशाच्या विकासासाठी, गुणवत्ताधारक तरुणांना नोकरीच्या संधी मिळवून देणं अत्यंत गरजेचं आहे. कॅट्लिस्टची सुरुवात २००७ मध्ये झाली. अभियांत्रिकी, मेडिकल, आर्किटेक्चर ,चार्टर्ड अकाउंट अशा क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यात ही संस्था कार्यरत आहे. या मुलींचं इंग्रजी संभाषण सुधारणे, इतक्यावर मर्यादित न राहता, संस्था या मुलीना स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींसाठी तयार करते. गुणवत्ताधारक मुलींना त्यांच्या राहण्याची , खाण्यापिण्याची, आरोग्याची आणि क्लासेसमधील शुल्क भरण्यासाठी मदत केली जाते. त्याशिवाय प्रत्येक मुलीला एक लॅपटॉपसुद्धा दिला जातो. इतकंच नव्हे तर प्रशिक्षणासाठी आणि नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जातात . सध्या कॅट्लिस्टच्या तीन शाखा असून त्या मुंबई, पुणे आणि बेंगळूरूमध्ये कार्यरत आहेत . २२ पेक्षा अधिक मुलींना आजवर संस्थेनं मदतीचा हात पुढे केला आणि या मुलींना जवळपास ४ ते ८ लाख वार्षिक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने, ही संस्था अनेक मुलींच्या नव्या उज्ज्वल भवितव्याची शिल्पकार ठरतेय!

मुळ लेखिका - देविशा पोद्दार

अनुवाद - प्रेरणा भराडे