खवय्यांना रेस्टॉरंट्समध्ये सवलत मिळण्यासाठी विद्यार्थी उद्योजकांची मदत

0

सध्या अन्न तंत्रज्ञान उद्योग थोड्या कठीण काळातून जात आहे. तुम्ही कदाचित लेऑफ्स इन, टायनी आऊल आणि झोमॅटोबद्दल ऐकलं असेल. अनेक अडचणी असल्या तरीही भारतात अन्न तंत्रज्ञान उद्योगामध्ये विकासाच्या आणि व्यवसाय करण्याच्या भरपूर संधी आहेत. कारण साहजिक आहे, लोकांना बाहेर खायला आवडतं, पार्टी करायला आवडतं आणि चविष्ट खाणं ऑर्डर देऊन घरी खायला आवडतं.

रेस्टॉरंट्स आणि खवय्यांसाठी विविध पर्याय निर्माँण करण्यापासून उद्योजकांना कोणीही रोखू शकत नाही.हा व्यवसाय ऑनलाईन करण्यामध्ये झोमॅटोनं खूप मोठी भूमिका बजावली आहे. पण तरीही अजून बराच पल्ला गाठायचा बाकी आहे. या आतापर्यंत फारसं लक्ष न गेलेल्या मोठ्या बाजारपेठेत नवीन कंपन्यांना यशस्वी होण्यासाठी बराच वाव आहे.


आपल्या देशात बाहेर जेवायला जाण्याची संकल्पना हळहळू रुजतीये. सध्या शहरात राहणारा एक सामान्य नागरिक महिन्यातून तीन ते चार वेळेस बाहेर जेवायला जातो आणि त्याचे दोन जणांवर साधारणपणे १,५०० ते २,००० रुपये खर्च होतात. त्याशिवाय व्हॅट, सेवा कर,सेवा मूल्य हे सगळं मिळून त्याच्या बिलात ३० टक्के वाढ होतेच हेही विसरून चालणार नाही.

त्यामुळेच बाहेर जेवायला जाताना कुठे सवलत मिळते का त्याचा शोध घेणं हे आपल्या देशात अपरिहार्य आहे.

तुम्हाला कुपन्स कुठे मिळतायेत याचा शोध घ्यावा लागतो तेव्हा अशा प्रकारची योजना शोधणं हे एक अत्यंत थकवणारं, नीरस काम बनतं. त्यात बऱ्याचदा कुपन्सची तारीख तरी उलटून गेलेली असते किंवा ती देण्यासाठी अगदी थोडा मर्यादित वेळ उपलब्ध असतो. त्यात परत अशा कुपन्सच्या विश्वासार्हतेचाही प्रश्न असतोच आणि तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये कदाचित ओशाळवाणंही वाटू शकतं. टेबल बुक करण्यासाठी किंवा सवलतींसाठी एझीडिनर आणि डाईनआऊट यांच्याकडे तुलनेनं बऱ्यापैकी कुपन्स असतात. पण तेही ठराविकच सवलत देऊ करतात.

अशा अन्न-तंत्रज्ञान कंपन्यांच्या भाऊगर्दीत पॉकेटिन नावाचा एक आशेचा किरण उदयाला येत आहे. रेस्टॉरंट्समध्ये मिळणाऱ्या सवलतींबाबत घासाघीस करणारं हे एक एॅप आहे. या एॅपमुळे युजरला एकाच वेळेस अनेक रेस्टॉरंट्समधल्या किंमतींबद्दल अगदी सेकंदांत माहिती मिळू शकते आणि टेबलही अगदी लगेचच बुक केलं जाऊ शकतं आणि तेही अगदी युजरला आवडेल अशा पद्धतीनं...

पॉकेटिनची संकल्पना प्रत्यक्षात कशी आली याबद्दल अनिरुद्ध सांगतात. कॉलेजमध्ये असं त्यांचं अनेकदा बाहेर खाणं व्हायचं. विद्यार्थी असल्यानं उपलब्ध असलेल्या मर्यादित पॉकेटमनीत सगळं काही भागवण्यासाठी आम्ही नेहमी सवलती, योजनांच्या शोधात असायचो. पण आमच्या सोयीस्कर वेळेत या सगळ्यांची माहिती होऊ शकेल असं एकही व्यासपीठ नव्हतं. अनेकदा ही कुपन्स वैध आहेत हे तिथल्या व्यवस्थापकाला समजावून सांगण्यातही आम्हाला अनेक अडचणी यायच्या. आम्हाला अनेक व्यवस्थापक माहिती होते. आम्ही त्यांना नेहमी फोन करायचो आणि विशेष सवलत मिळवायचो. पण म्हणजे घासाघीस करण्यासाठी पाच रेस्टॉरंट्सना फोन करा आणि प्रत्येकाशी पुन्हा पहिल्यापासून बोला, असा याचा अर्थ होता, असं अनिरुद्ध सांगतात. त्यात खूप वेळही जायचा.

हीच समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक एॅप निर्माण केलं. यावर संपूर्ण प्रक्रिया ही यांत्रिक ठेवली आणि रेस्टॉरंटचे मालक-व्यवस्थापक यांच्याकडूनही यूजरचा खर्च आणि वेळ यावर आधारित डील्स मागवली.

यानंतर अनेक रेस्टॉरंट्सना फोन करायचा वेळ तर कमी झाला. पॉकेट इनच्या माध्यमातून तुम्ही एकाच वेळेस शेकडो रेस्टॉरंट्शी संवाद साधू शकता, असं अनिरुद्ध सांगतात.

पॉकेट इन तुम्हाला आकर्षक सवलती देऊ करते. याचा अर्थ समजा तुम्ही गर्दी नसलेल्या वेळेस साईटला भेट दिलीत तर तुम्हाला कदाचित भरघोस सवलतींचं बक्षिस मिळू शकतं.

आता आणखी काय हवंय ?तुम्ही रेस्टॉरंटमधून जास्त सवलत मिळण्यासाठी बोली लावू शकता आणि पॉकेटइन ते मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. ते तुम्हाला सवलतीची १०० टक्के खात्री देतात आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही व्हाऊचर किंवा कोड्सची गरज नाही. तुम्ही फक्त रेस्टॉरंटमध्ये जायचं, तिथे गेल्यावर तुमच्या सर्व्हरला आधीच तुम्ही तिथे आलात याची आणि तुमच्या सवलतीचीही माहिती होईल आणि तुमचं टेबल आरक्षित होईल.

यावर्षीच पदवी मिळवलेल्या तीन इंजिनिअर्सनी पॉकेटइन सुरु केलं आहे. भारतीय स्टार्टअपची अर्थव्यवस्था सध्या अशाच विद्यार्थी उद्योजकांच्या सहभागामुळे तेजीत आहे.

अनिरुद्ध यांनी थापर विद्यापीठातून तर क्षितीज आणि राहुल यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. महाविद्यालयातून नुकत्याच बाहेर पडलेल्या या नव्या दमाच्या तरुण उद्योजकांच्या अनुभवाविषयी कदाचित काहीजण शंका घेतीलही...पण पॉकेटिनचे संस्थापक मात्र जरा वेगळा विचार करतात...

उलट महाविद्यालयातून बाहेर पडल्यानं आमच्यामध्ये जी प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड उत्साह आहे...त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. कोणत्याही भितीशिवाय, प्रतिबंधाशिवाय जोखीम पत्करणं आणि अगदी शून्यापासून काम करणं हे फक्त नवीन असतानाच शक्य होतं. कारण तेव्हा तुमच्या मनात कोणतेही पूर्वग्रह नसतात, असं क्षितीज सांगतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार स्टार्टअप सुरु करण्यासाठी कोणतीही ठराविक अशी योग्य वेळ नसते. संस्थापकांना माहिती होतं की हे त्यांच्या मनावर आहे. महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक रेस्टॉरंट्सच्या मालकांसोबत विविध प्रकल्पांसाठी काम केलं होतं. त्यामुळे त्यांना विक्रेता आणि ग्राहक या दोघांचीही दु:ख माहिती होती. त्यांनी रोजगाराच्या फायदेशीर संधी सोडल्या आणि पॉकेटइनला पूर्ण वेळ द्यायचा निर्णय घेतला. राहुल एमॅझोनसोबत काम करत होते तर अनिरुद्ध यांनी प्रॅक्टोची संधी सोडली.

पॉकेटइन सुरु केल्यानंतर तीन महिने प्रचंड मेहनत केल्यावर मग त्यांना युजर्स आणि रेस्टॉरंट्स् अशा दोन्हींकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. एन्ड्रॉईड प्ले स्टोरवर त्यांचे जवळपास ५,००० डाऊनलोड्स झाले आहेत, आणि त्यांनी त्यांच्या यादीत १०० पेक्षाही जास्त रेस्टॉरंट्स सहभागी करुन घेतले आहेत.

पॉकेटइननं गेल्या ९० दिवसांत १२ लाखांपेक्षाही जास्त ऑनलाईन व्यवहारासाठीच्या मूल्यांकनासह (जीएमव्ही) ५५०पेक्षा जास्त व्यवहार केले आहेत. महिन्यातून चार वेळेस बाहेर जेवायला जाणाऱ्या भारतातील मध्यमवर्गामध्ये हे व्यवहार झाले आहेत. आपल्याला जरी ही संख्या जास्त वाटत असली तरी सिंगापूर आणि हाँगकँगच्या सरासरी ३५ या संख्येपेक्षा ही संख्या बरीच कमी आहे.

सुरुवातीला कुटुंबीय आणि मित्रांकडून भांडवल घेऊन पॉकेटिन सुरु झालं. पहिल्या फेरीनंतर ते बंद होण्याच्या स्थितीपर्यंतही पोहोचलं होतं. पण आता स्टार्टअपसाठी नवीन भांडवल उपलब्ध झाल्यामुळे येत्या १२ महिन्यांत तीन शहरांमध्ये ४२ कोटी ऑनलाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या मूल्यांकनांसह (जीएमव्ही) दोन लाख व्यवहार होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

लेखक – प्रदीप गोयल

अनुवाद – सचिन जोशी