बिनधास्त,बेधडक ‘बायकरणी’ आव्हान देती पुरुषांच्या मक्तेदारीला. . .

0

जोश आणि जिद्द ज्यांच्यावर स्वार झाला, त्यांच्यासाठी कोणतेही काम कठीण नाही. तेंव्हाच तर चौदा वर्षांच्या उर्वशी पटोले यांनी पहिल्यांदाच बाईकला हात लावला होता तेंव्हा कधी हा विचार केला नव्हता की, पुढे जाऊन एक दिवस त्या व्यावसायिक ‘बायकर’ होण्यासोबतच ‘रेसिंग चँम्पीयन’ होतील. आज उर्वशी समूह संपर्क माध्यमांद्वारे ‘बायकरणी’ नावाची संस्था चालवतात. ज्यामध्ये सुमारे सातशेपेक्षा जास्त महिला जोडल्या आहेत, ज्या बाईक चालवण्यात प्रवीण आहेत. ‘बायकरणी’द्वारे उर्वशी केवळ महिलांचा आत्मविश्वासच वाढवत नाहीत तर महिला सबलीकरणासाठी अनेक कामेही करत आहेत. इतकेच नाहीतर ‘बायकरणी’ देशातील पहिलाच अशाप्रकारच्या महिलांचा गट आहे ज्याने मोटारसायकलने दिल्ली ते जगातील सर्वाधिक उंचीचा रस्ता लडाख ते खारदुंगला दरीपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्या नावे हा विक्रम ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंदला आहे.

उर्वशी ज्यावेळी चौदा वर्षांच्या होत्या तेंव्हा पहिल्यांदाच त्यांनी पंचरवाल्याच्या बाइकवर हात साफ केला. ‘युवर स्टोरी’ला त्यांनी सांगितले की, “मला कुणीच बाइक चालवायला शिकवले नव्हते , मी स्वत:च चालवायला शिकले. खरेतर मला रोमांच खूप आवडत असे आणि त्याचवेळी काही असे सिनेमे आले होते ज्यात बाइकचे खूप कारनामे पहायला मिळाले होते. मजेदार गोष्ट ही होती की मी ज्यावेळी बाइक चालवायला घेतली त्यावेळी ही गोष्ट घरच्यांना सांगितली नाही आणि त्यांच्यापासून लपवून ठेवली, कारण मला भिती होती की, ते मला यापासून परावृत्त करतील. त्यामुळे मी चोरून-लपून मित्रांच्या बाइक चालवत असे.”

जेंव्हा उर्वशी महाविद्यालयात होत्या त्यावेळी बाइक वरील स्टंट बाबत लोकांमध्ये खूपच आवड होती. त्यांनतर त्यांनी स्टंट बाइकवर स्टंट करण्यास सुरुवात केली. एकदा स्टंट करताना त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल व्हावे लागले. जेंव्हा त्यांचे आई-वडील रुग्णालयात पोहोचले तेंव्हा त्यांनी पहिल्यांदाच त्यांना भीत -भीत सांगितले की, त्या केवळ बाइक चालवतच नाहीत तर स्टंट देखील करतात. मात्र अनपेक्षितपणाने त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की, एकेकाळी ते देखील मोठे बायकर होते आणि स्टंट देखील करत होते. त्यानंतर वडिलांनी स्वत:च त्यांना एक बाइक घेऊन दिली.

उर्वशी सांगतात की, ज्यावेळी त्यांनी बाइकचे स्टंट शिकले त्यावेळी फारच थोड्या मुली बाईक चालवत होत्या. स्टंट शिकताना त्यांना जाणवले की, मुलींना या कामात फार प्रतिष्ठा दिली जात नाही जी त्यांनाही मिळायला हवी. त्यांना कोणत्याही स्टंटमध्ये अग्रस्थानही दिले जात नव्हते. त्याचवेळी त्यांनी निश्चय केला की, पुढे जाऊन त्या काहीतरी वेगळे करतील ज्यातून मुलांना जो सन्मान मिळतो तसाच मुलींनाही मिळू शकेल. हळूहळू उर्वशी यांच्याबाबत ऑटोमोबाईल क्षेत्रात चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका ऑटोमोबाइल कंपनीने त्यांना आपल्या बाइकच्या चाचणी करीता ‘रायडर’ म्हणून संधी दिली. त्यावेळी त्यांची भेट अशाच काही मुलींशी झाली ज्यांच्याद्वारे उर्वशी यांना समजले की, इतर राज्यातील मुली देखील बाइक चालवण्याच्या शौकीन आहेत. त्यावेळी त्यांनी विचार केला की, का नाही असा एक मंच तयार केला जावा ज्यातून इतर राज्यांच्या मुलींना जोडता येईल.

२०११मध्ये उर्वशी यांनी एक फेसबूक पेज तयार केले आणि त्याचे नाव ठेवले ‘बायकरणी’. पहिल्यांदाच पंधरा जणी या गटात जोडल्या गेल्या. हळूहळू त्याचे सदस्य वाढले आणि त्यांची संख्या चाळीसपर्यंत पोहोचली तेंव्हा त्यांनी ठरवले की, सा-या जणी मिळून बाइकवरून दूरच्या प्रवासाला जातील. त्यांनी ‘रॉयल ऐनफिल्ड’ कंपनीशी चर्चा केली तेंव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला. त्यांनतर सप्टेंबर २०११मध्ये ‘बायकरणी’ गटाच्या अकराजणी मिळून दिल्ली ते खारदुंगलापर्यंत बाइक चालवत गेल्या. त्याआधी मुलींचा कोणताही गट तेथे पोहोचला नव्हता. त्यामुळे त्यांचे नांव ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सामील झाले.

या कारनाम्यानंतर ‘बायकरणी’ला खूप प्रसिध्दी मिळाली. त्यांनतर इतर शहरातील मुलीदेखील यांच्यासोबत येण्याचा प्रयत्न करु लागल्या. त्यामुळे प्रत्येक शहरासाठी वेगवेगळे गट तयार करण्यात आले. आज त्यांचा हा गट पुणे, मुंबई, दिल्ली,बंगळुरू, हैद्राबाद,कोलकातामध्ये अस्तित्वात आहे. ‘बायकरणी’मध्ये आता सातशेपेक्षा जास्त मुली आहेत. ‘बायकरणी’चा मुख्य उद्देश बाइकच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण करणे हा आहे. त्यांचा प्रयत्न हा आहे की, याद्वारे मुलांना हे सांगावे की, मुलीदेखील कोणतेही काम करू शकतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची मर्यादा नाहीत. कुणी मुलगी जर बाइक चालवू इच्छित असेल तर ती चालवू शकते आणि त्यात कोणताही अडथळा असता कामा नये, कारण त्यात काहीच अवघड नसते.

त्या महिलांना बाइक चालविण्यासाठी प्रेरित करतात. त्याशिवाय कोणत्याही सामाजिक कार्यासाठी स्वयंसेवकाची भूमिका देखील बजावतात. त्या ‘क्राय’सारख्या सामाजिक संस्थेसाठीदेखील काम करतात. ‘बायकरणी’च्या सद्स्यांना बाइक चालविताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी बाइकदुरुस्तीसाठी प्रशिक्षणही दिले जाते, याशिवाय ज्या नवीन मुलींना बाइक चालविता येत नाही त्यांना चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ‘बायकरणी’ एखाद्या शहरापुरती मर्यादीत नाही त्या नेहमी लहान-मोठ्या यात्रा करत असतात. त्यांचे काही सदस्य वेगवेगळ्या स्टंट स्पर्धांमध्येदेखील भाग घेतात.

उर्वशी यांच्या मते, “ आमच्यातून अनेक महिला प्रेरणा घेतात ज्या सांगतात की आमच्या सोबत जोडल्याजाण्याआधी त्या तणावात होत्या किंवा त्यांच्या कोणत्या न कोणत्या कौटूंबिक समस्या होत्या. मात्र ‘बायकरणी’त आल्यानंतर त्यांनी आमच्याकडून शिकले की एखाद्या अडचणीवर कशी मात करता येते.” याचे एक कारण आहे की, या महिला बाइकर एकमेकांची मदत देखील करतात. मग ती कौटूंबिक अडचण असो किंवा अन्य काही. त्या घरच्यांना समजावतात की, त्यांनी आपल्या मुलीला किंवा पत्नीला यासाठी विरोध करु नये. आज ‘बायकरणी’ गटाचे यश पाहता इतरही काही बायकर गट समोर येत आहेत.

‘बायकरणी’ गटात महाविद्यालयीन विद्यार्थीनीपासून साठ वर्षांच्या आजीपर्यंतच्या महिला सहभागी होतात. या गटात अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधीत महिला सदस्या आहेत, महिला पत्रकार आणि व्यावसायिक महिलाही आहेत. भविष्यात त्यांची योजना महिलांकरिता प्रशिक्षण आणि स्पर्धा अकादमी उघडण्याची आहे. याशिवाय त्यांचा प्रयत्न प्रत्येक मोठ्या शहरात मोटारसायकलच्या देखभालीकरिता कार्यशाळा उघडण्याचा आहे. त्यासोबतच त्यांची इच्छा आहे की, जास्तीत जास्त महिला त्यांच्या या उपक्रमात सहभागी व्हाव्या. त्यांचा पुढचा प्रयत्न आहे की, देशाबाहेर बाइक चालविण्याचा. ‘बायकरणी’च्या सद्स्या राष्ट्रीयस्तरावर दरवर्षी दोनदा बैठक घेतात. वार्षिक बैठक प्रत्येकवर्षी जानेवारीत असते. सन २०१६ची बैठक हैद्राबाद येथे होणार आहे तर दुसरी बैठक मे महिन्यात ‘आंतरराष्ट्रीय महिला राइड दिवस’च्या निमित्ताने होत आह.

उर्वशी सांगतात की, “यंदा आतापर्यंत मी दोन स्पर्धा जिंकल्या आहेत, यापैकी एक स्पर्धा मागच्या तीन वर्षांपासून जिंकते आहे, जी गोव्यात असते. विशेष म्हणजे ही स्पर्धा मातीच्या ट्रॅकवर होते.”

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे.