“त्या चार वर्षात अनेकदा अपमानित झालो, धक्के खाल्ले, तेंव्हा मिळाले यश”

“त्या चार वर्षात अनेकदा अपमानित झालो, धक्के खाल्ले, तेंव्हा मिळाले यश”

Friday March 11, 2016,

5 min Read

असे म्हणतात की हजारो वाईट दिवसांवर एक चांगला दिवस भारी पडतो. अगदी तसेच जसे अनेक त्रासातून आणि दु:खातून अपेक्षित लक्ष्य गाठले की सारा थकवा निघून जातो. परंतू एक चांगला दिवस येण्यासाठी किंवा लक्ष्य गाठण्यासाठी सातत्याने चालत राहण्याची हिंमत ठेवावी लागते. तुकडे होण्याचे किंवा विखरुन जाण्याचे प्रसंग आले तरी स्वत:मध्ये साहस आणावे लागते. परंतू तुम्ही मोठे तेंव्हाच होता जेंव्हा आकाश गाठले तरी त्या जमिनीला कधीच विसरत नाही ज्यात तुमच्या गतजीवनाच्या आठवणी आजही जिवंत आहेत. यासा-या गोष्टींना जोडून जर कुणा एका माणसाला व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर तो असेल, मनोज तिवारी. उत्कृष्ट अभिनेता, चांगला गायक, संगीताची अद्भूत जाण असणारा, कुणालाही त्रासात पाहून विचलीत होणारा, सा-यांना सोबत घेऊन जाणारा, केवळ ४३व्या वयात देशाच्या प्रसिध्द व्यक्तींमध्ये ओळखला जाणारा, त्याचे नाव आहे मनोज तिवारी.

image


आजमितीस दिल्लीच्या उत्तर-पूर्वेतील खासदार मनोज तिवारी यांना ही उंची गाठणे सहजशक्य नव्हते. पण म्हणतात ना जो हिम्मत न हारता, अनेक अडचणींवर मात करत पुढे जाऊ इच्छितो त्याच्यासाठी आपोआप मार्ग मोकळे होतात. युअर स्टोरी सोबत एका खास मुलाखती दरम्यान मनोज तिवारी यांनी आपल्या जीवनातील काही अशा गोष्टी समोर ठेवल्या ज्या प्रत्येक त्रासलेल्या जीवाला प्रेरणादायी ठरु शकतात.

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात राहणा-या मनोज तिवारी यांनी बालपणाबाबत बोलताना सांगितले की, “ माझे बालपणही गावात सामान्य मुलांसारखेच गेले. अनेक अडचणींसह. शिकण्यासाठी रोज चार किलोमीटर चालत शाळेत पोहोचणे, दिवसभर शिकणे आणि सायंकाळी चार किलोमीटर चालत घरी परत जाणे. अर्धी विजार आणि बनियान, हाच आमच्या गावातील मुलांच्या अभावामुळे गणवेश बनविण्यात आला होता.”

मनोज तिवारी यांनी हे मान्य केले की ज्या स्थितीतून ते इथपर्यत पोहोचले ते एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नक्कीच नाही. ते म्हणतात की खरेतर आता विचार केला तर वाटते की हे सारे वरच्याचे वरदान आहे. पण ज्या स्थितीत ते लहानाचे मोठे झाले ती हालाखीची होती. वडिलांचे छत्र अगदी लहान वयातच हरपल्यानंतर घरची सारी जबाबदारी आईवर येऊन पडली होती. त्यामुळे मनोज यांच्या आईने आई-वडिल अशी दोघांची जबाबदारी घेतली. आईबाबत बोलताना मनोज तिवारी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले की, “आज मी जे काही आहे त्यात केवळ फक्त आणि फक्त आईचेच योगदान आहे. आईने जीवनाच्या सा-या वऴणांवर मला केवळ दिलेच आणि आजही कुठल्या ना कुठल्या स्वरुपात ती काहीतरी देते आहे. मी माझ्या जीवनात सर्वात जास्त त्रासलो तेंव्हा जेंव्हा मी माझ्या आईला त्रासात पाहिले. आणि सर्वात जास्त आनंद तेंव्हाच झाला जेंव्हा तिला आनंदात पाहिले. त्यामुळे आईच्या सा-या इच्छा पूर्ण करतो”

मनोज तिवारी यांचे म्हणणे आहे की, "शाळेत सरकारच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती मिळाली होती. पण पुढच्या शिक्षणाच्या दरम्यान त्यांना असंख्य अडचणी आल्याच. मी बनारस हिंदू विद्यापीठातून माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या दरम्यानही गरीबीचे चटके मी सोसले आहेत. मला या गोष्टीची खंत होती की आई कोणत्या स्थितीत पैसे पाठवत असेल. जेंव्हा धान्य विकले जाईल तेंव्हाच पैसे मिळतील आणि नंतर ते पाठवणे तिला शक्य होईल. अनेकदा धान्य खराब झाल्याने अनेक अडचणी येत.” शिक्षण कसेबसे पूर्णतर झाले. नोकरीचाही प्रयत्न केला पण सातत्याने निराशाच पदरी पडली. त्याचेवेळी मनोज तिवारी यांना जाणीव झाली की, ते गाणे गाऊ शकतात. एक घटना त्यांनी युअर स्टोरी सोबत सांगितली. ते म्हणाले, “ पदवी घेतल्यानंतरही जे़व्हा नोकरी मिळाली नाही, तेंव्हा वाटले की आता काय करावे? त्याचवेळी १९९२ मध्येच एका कार्यक्रमात मी एक गाणे म्हटले. त्या बदल्यात मला १४००रुपये मिळाले. जेंव्हा माझ्या हाती इतके सारे पैसे आले तेंव्हा मला वाटले की मी गायनाच्या क्षेत्रात का जाऊ शकत नाही? आपल्या वडिलांचा संगिताचा वारसा का नाही पुढे घेऊन जाऊ शकत? त्याचवेळी मी दिल्लीत आलो. कुणा खासदारांच्या नोकरांच्या खोलीत राहिलो. आपली गाणी लोकांना एकवित असे. गाण्यासाठी इकडे-तिकडे खूप भटकलो. त्या चार वर्षात न जाणो लोकांनी मला कितीदा अपमानित केले. न जाणो कितीवेळा लोकांनी मला त्यांच्या कार्यालयातून धक्के मारत बाहेर काढले. पण मी हारलो नाही. मी सातत्याने प्रयत्नात राहिलो. म्हणतात ना तुमच्यात जर गुण असतील तर एक दिवस तुमचाच असतो ना? तेच माझ्याबरोबर झाले. टी सिरीज चे मालक गुलशन कुमार यांना माझे गाणे आवडले आणि मी मग मागे वळूनही पाहिले नाही. माझे गाणे सुपरहिट राहिले”

पंजाबी कवी अवतारसिंह पाश यांनी म्हटले होते की, “ सर्वात धोकादायक असते ते म्हणजे स्वप्नांचा मृत्यू होणे,” मनोज तिवारी यांचेही मत आहे की, युवकांनी आधी हे निश्चित करावे की त्यांना कोणत्या दिशेने जायचे आहे. त्यानंतर ते ठरवावे की ज्या दिशेने जायचे आहे त्यात त्यांनी स्वप्न काय पाहिली आहेत. जर स्वप्नच नाही पाहिली तर पूर्ण होणार नाहीत. मनोज तिवारी यांनी सांगितले, “ मी जीवनात तीन अशी स्वप्ने पाहिली जी एकदम पूर्ण झाली. प्रथम मी स्वप्न पाहिले की कुण्या मोठ्या घरच्या मुलीने माझे गाणे ऐकले आणि तीने त्याला दाद दिली. याशिवाय मी नेहमी पहात असे की अमिताभ बच्चन यांना भेटेन आणि ते त्यांचा मुलगा अभिषेक यांच्याशी माझा परिचय करुन देतील. हे स्वप्न जसेच्या तसे पूर्ण झाले. मी अमितजींना यशराज फिल्म्स मध्ये भेटलो. सोबत अभिषेक बच्चन देखील होते. आणि नेमके तसेच घडले जे मी स्वप्न पाहिले होते. अशा प्रकारचे स्वप्न ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतही पाहत असत. खरेतर अटल हल्ली अस्वस्थच असतात पण त्यामुळेच त्यांच्याशी मुलाखत मात्र नाही झाली पण आताही पंतप्रधांनाच्या निवास स्थानी जातो तेंव्हा वाटते की, याच जागी अटलजी देखील राहत असत. हे सारे स्मरताच मी रोमांचित होऊन जातो.”

परंतु तरीही मनोज तिवारी यांचे एक स्वप्न असे आहे की, जे अद्याप पूर्ण व्हायचे आहे. ते आहे भोजपूरीला एका भाषेचा दर्जा देण्याचे. त्यांचे म्हणणे आहे की, “ भोजपूरी आमच्या आईसारखी आहे. तिची जी गोडी आहे ती दुर्लभ आहे. जर आठ देशात भोजपूरी मान्यताप्राप्त झाली आहे तर या देशात का नाही? कारण भोजपूरी आईसमान आहे त्यामुळे तिचा सन्मान झाला पाहिजे. मला आशा आहे की, २२-२४कोटी लोकांची जी भाषा आहे त्यावर पंतप्रधानांनी गंभीरतेने विचार करावा. भोजपूरीला मान्यताप्राप्त भाषा म्हणून मान्यता देण्याच्या कामी प्रयत्नशील आहे.”

मनोज तिवारी मानतात की, ते वर्तमानात राहणे पसंत करतात. जेंव्हा जे काम करत असतात तेंव्हा ते पूर्णत: पूरे करतात. त्यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम केल्याने प्रत्येक काम गांभिर्याने केले आणि हेच कारण आहे की यश मिळत राहिले. ते म्हणतात की, “ जेंव्हा मी गाणे गात राहतो तेंव्हा त्यात पूर्णत: डुबतो. जेंव्हा मी लोकांमध्ये असतो तेंव्हा पूर्णत: त्यांचाच होऊन जातो. त्यामुळे नेहमीच वर्तमानाची कदर करतो.”

यशस्वी तोच होतो जो स्वत:ला प्रमाणिकपणाने न्याय देतो, सार्थक तोच आहे जो आपल्यातील कमतरता आणि गुण ओळखतो. स शक्त तोच आहे जो जीवनात अनेक वादळांना धडकल्यानंतरही उभाच राहतो आणि लक्ष्य चालत जाऊन पूर्ण करतो. मनोज तिवारी या तीन बाबतीत स्वत:ला उभे करु शकले, त्यामुळे त्यांचे यश स्वत:पासून मिळवलेले आहे, जे करोडोंसाठी प्रेरणादायक आहे.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

लेखक : डॉ अरविंद यादव, व्यवस्थापकीय संपादक (भारतीय भाषा), युवर स्टोरी

अनुवाद : किशोर आपटे 

    Share on
    close