पतीचे सुटले बोट, एकटी लढतेय झाशीराणी! विणते आहे धागा धागा, ‘रंगसूत्र’ समरांगणी!!

पतीचे सुटले बोट, एकटी लढतेय झाशीराणी!
विणते आहे धागा धागा, ‘रंगसूत्र’ समरांगणी!!

Monday October 05, 2015,

6 min Read

विणकर हा नुसतेच धागेदोरे विणतो का? नाही! तो नुसतेच कापड बनवतो का? नाही! तो एक आकार विणतो आणि एक कलाकृती साकारतो… कारखान्यांमधून विविध खात्यांत विविध यंत्रांवर विविध प्रक्रिया होत जसे कापड तयार होते तसे या विणकराचे कापड तयार होत नाही. तो एकटाच एक कारखाना असतो… कारण तो एक कलावंत असतो. यंत्र नसते ते. भारतीय खेड्यांतून ही कला एकेकाळी वैभवशाली होती. महेश्वर, पैठण ही गावे त्या-त्या गावातील विणकर साकारत असलेल्या महेश्वरी, पैठणी या साड्यांसाठी खास ओळखली जात ग्रामीण विणकरांच्या मालाला त्यांच्या कष्ट आणि कसबाच्या हिशेबाने मोबदलाच हल्ली मिळतच नाही आणि म्हणून हा कलाप्रकारच आता मोडकळीला आलेला… काही हात तो सावरण्यासाठी अलीकडच्या काळात पुढे येताहेत. ही गोष्ट अशाच एका भगिनीची आहे, जिने देशातील गावखेड्यांत जाऊन तिथल्या विणकरांच्या कलाकृतींना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचे आगळे कार्य केलेय. ‘रंगसूत्र’च्या सूत्रधार सुमिता घोष हे या विदुषीचे नाव.

सुमिता घोष यांच्यामुळेच राजस्थानसह देशातील अनेक राज्यांतील पारंपरिक ग्रामीण कारागिरांच्या कलाकृती जागतिक समाजासमोर येऊ शकल्या. या कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली. योग्य किंमत मिळू शकली. एका विणकर कारागिराला त्याच्या कष्टाचे मोल तर मिळालेच वरून ओळख आणि सन्मानही मिळाला असेल तर दुसरे आणखी त्याला काय हवे?

image


सुमिता घोष

कष्टाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो

सुमिता घोष यांचा जन्म कोलकात्याचा. मुंबईत त्यांचे बालपण गेले आणि शिक्षणही इथेच झाले. शाळेत असतानापासूनच सुमिता आत्मविश्वासाने भारलेल्या. अर्थात त्यांना सर्वांत जास्त विश्वास स्वत:वरच होता. कष्टाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, या एका तत्वावर तर त्यांची श्रद्धाच. पद्व्युत्तर शिक्षण त्यांनी अर्थशास्त्रात घेतले. सुमिता यांनी आधीपासूनच काहीतरी नवे, आगळे आणि इतरांनाही उपयुक्त ठरेल असे काही तरी करायचे ठरवलेले होते. पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांचे संजॉय घोष यांच्याशी लग्न झाले आणि ‘काही तरी’चे उत्तरही मिळालेले होते. दोघांचा प्रेमविवाह होता. दोघांनाही गावखेड्याची ओढ असणे, हे दोघांमधले एक साम्यस्थळ होतेच. नवपरिणित घोष दाम्पत्याने जणू घोषणाच केली ‘आता खेड्याकडे… शहरात नकोच…’ राजस्थानातील एका गावाकडे प्रस्थान ठेवले. खेड्यातील जीवनमानाशी समायोजन साधण्यात सुरवातीच्या काळात साहजिकच अडचणी आल्या. दोघांनी स्वत:ला मग गावाच्या हिशेबाने नव्याने घडवणे सुरू केले. नंतर या नव्या वातावरणात ते इतके रुळले, की अगदी ‘गावकरी!’

image


पहिले युद्ध दुष्काळाशी...

संजॉय आणि सुमिता यांनी राजस्थानातील ‘उर्मुल डेअरी’सोबत कामकाजाचा श्रीगणेशा केला. सुरवात बरी होती, पण पुढे १९८७ मध्ये उर्मुल डेअरीच्या कार्यक्षेत्राला दुष्काळाचा मोठा फटका बसला. जनावरे तडफडून मेली. लोकांकडे खायला काहीही नव्हते. खायला काही विकत घ्यायचे तर पैसेही नव्हते. लोकांना पर्यायी उपजिविकेचे साधन अशा परिस्थितीत उपलब्ध करून देणे, हा एक मार्ग घोष दाम्पत्यासमोर होता. हॅंडिक्राफ्ट हा एक असा मार्ग होऊ शकतो, असे दोघांनी ठरवून टाकले. गावकरी हे काम सहज करू शकतील आणि दोन पैसे मिळवू शकतील, ही पक्की खुणगाठ दोघांनी मनाशी बांधली आणि कार्यक्रम सुरू केला. गावकऱ्यांना गोळा केले. विणकरांना खास प्रशिक्षण दिले. दर्जा उत्तम असावा म्हणून ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझायनिंग’च्या तज्ज्ञांची मदत घेतली. कापडावर नक्षीकाम उत्तम करू शकणाऱ्या बायकांची वेगळी यादी केली. नवनव्या डिझाइन तयार करायला त्यांना सांगण्यात आले. जबाबदाऱ्यांचे वाटप निश्चित करण्यात आले. ‘रॉ मटेरिअल’च्या खरेदीची जबाबदारी सुमिता यांनी घेतली. सुमिता धागे आणत आणि गावकरी तागा विणत, महिला वेलबुट्टी करत. नवनव्या डिझाइन्स इथं साकारू लागल्या. राजस्थानच्या मातीचा, मरुस्थळातील रेतीचा सुगंध ल्यायलेल्या या डिझाइन्स भुरळ घालणाऱ्या अशाच… कुर्ती, बेडशिट्स, पिलो-कव्हर, लेहंगा अशा ‘मॅन्युअली मेड’ कलाकृतींना डिमांड आली. आता जवळपासच्या गावांतूनच नव्हे तर दूरदूरच्या गावांतही घोष दाम्पत्याची कीर्ती दरवळू लागलेली होती. लोक जुळू लागले. जम बसू लागला… जम बसला!

image


युनायटेड नेशन्ससमवेत प्रोजेक्ट

थोडी उसंत मिळाली अन् सुमिता दिल्लीला आल्या. राजस्थानातील काम छान चाललेले होते. दरम्यान दोन वर्षे सुमिता ‘युनायटेड नेशन्स’समवेत एका प्रोजेक्टवर होत्या. बिजिंग (चीन) येथे १९९५ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत गावखेड्यांतील २०० महिलांसमवेत सुमिताही सहभागी झाल्या होत्या.


नवी कर्मभूमी आसामही ठरली युद्धभूमी

पुढे राजस्थाननंतरची कर्मभूमी म्हणून घोष दाम्पत्याने आसामची निवड केली. इथली परिस्थिती अर्थातच वेगळी होती. सुमिता आणि संजॉय शासनाच्या तत्कालिन ग्रामीण रोजगारभिमुख योजनांबद्दल लोकांना जागरूक करू लागले. दोघांनी ही मोहीमच राबवली. सुमिता यांनी आसामी बायाबापड्यांना विणकाम शिकवायला सुरवात केली. दुसरीकडे इथे एक मोठे रॅकेट चाललेले होते. स्थानिक कंत्राटदारही या रॅकेटमध्ये होते. शासनाचा पैसा लोकांपर्यंत न पोहोचता भलतीकडेच वळत होता. घोष दाम्पत्याने त्याविरुद्ध आवाज उठवला. वर्तमानपत्रांतून लिखाण केले. मोठा धोका आपण पत्करत आहोत, याची जाणीव असूनही केवळ कर्तव्यभावनेच्या बळावर हे सारे चाललेले होते.


अतिरेक्यांकडून पतीचे अपहरण अन्‌...

आणि अखेर व्हायचे ते झालेच. उल्फा या संघटनेच्या विघटनवादी अतिरेक्यांनी संजॉय यांचे अपहरण केले, त्यांचा आजतागायत पत्ता लागलेला नाही. सुमिता यांच्या दु:खाला पारावार उरलेला नव्हता, पण त्यांनी संयम राखला. गुडगावला त्या परतल्या. स्वत:ला सावरण्यासाठी थोडा वेळ जावा लागला. किंबहुना त्यासाठीच त्या गुडगावला आलेल्या होत्या. मात खाऊन, कच खाऊन स्वत:ला बाजूला करून घेणे त्यांच्या स्वभावात नव्हतेच. राजस्थानात जाऊन टेक्स्टाइल आणि क्राफ्टच्या विश्वात पुन्हा रमण्याचे सुमिता यांनी ठरवून टाकले.

image


दहा जण, प्रत्येकी भागभांडवल दहा हजार!

राजस्थानसह अन्य प्रांतांतील परिचित तसेच अन्य विणकरांशी संपर्क साधला. यावेळी विणकरांसाठी एक रिटेल शॉप सुरू करण्याचे उद्दिष्ट होते. ‘रंगसूत्र’ नावाने २००४ मध्येच सुमिता यांनी एक उत्पादक कंपनी नोंदणीकृत करून ठेवलेली होती. दहा लोक हाताशी घेऊन आणि दहा-दहा हजार रुपयांचे भागभांडवल गोळा करून नव्या प्रतिष्ठानाचा श्रीगणेशा झाला. काम कठीण होते, पण अर्थातच अशक्य नव्हते आणि जिथे सुमिता तिथे तर नाहीच नाही. प्रशिक्षण सुरू झाले. बाजारपेठेची शोधाशोधही लगबगीने सुरू झाली.


आता युद्ध अभावाशी...

सुरवातीला कर्ज द्यायला कुठलीही बँक तयार नव्हती. सुमिता यांच्याकडे ना बॅलेंस शिट होती ना तारण करायला कुठली अशी स्थावरजंगम मालमत्ता. काम ठप्प होते. फायदा नसल्यासारखाच होता. मग ठरले की ‘रंगसूत्र’ला एका खासगी कंपनी म्हणून नोंदवायचे. स्थावरजंगम मालमत्तेपेक्षाही अधिक महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे ‘प्रतिमा’ सुमिता यांच्याकडे तर ती (प्रतिमा) अत्यंत उजळ स्वरूपात होती.


कामगार : घामाचाच नव्हे दामाचाही भागीदार

‘फॅब इंडिया’, ‘आविष्कार’सारखे ब्रँड या प्रतिमेच्या बळावर रंगसूत्रच्या सोबत जुळले. कारागिरांनाही कंपनीचे समभाग देण्यात आले. अधिक फायद्याचा हा वायदा कारागिरांचा इरादा मजबूत करून गेला आणि बघता-बघता ‘रंगसूत्र’ स्थिरस्थावर होत गेली. सुमिता यांनी विणकर कारागिरांना विश्वास दिला, की ते केवळ घामातच नव्हेत तर दामातही भागीदार आहेत. ते कंपनीत केवळ कामगार नाहीत तर कंपनीचे मालकही आहेत. सतत उपेक्षाच वाट्याला असलेल्या या वर्गाला एवढा मोठा सन्मान सुमिता यांनी दिला की विणकरांची बोटे काम नव्हे कमाल करू लागली. आज अकराशेवर कारागिर ‘रंगसूत्र’च्या सुत्रात सूत्रबद्ध आहेत! डिझायनिंगची मालिकाच इथे साकारली जाते. नक्षीकाम, वीणकाम, वेलबुट्टी असे सगळे सगळे ‘रंगसूत्र’च्या एकाच छताखाली आकार घेते.


महिला भागधारक बहुसंख्येने...

‘रंगसूत्र’चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे बहुसंख्येने असलेले महिला भागधारक. दरमहा या महिला पाच-सहा हजार रुपये कमवत आहेत. केवळ कला या एका बळावर लहानसहान कारागिरही ‘रंगसूत्र’ परिवाराचे सदस्य होताहेत… जात-पातच काय तर पतही इथं त्यासाठीचा निकष नाही. माल बनवला आणि इथं आणून दिला, की झाले. विकायला कुठे जाण्याची गरज नाही. म्हणूनच ‘रंगसूत्र’चा परिवार दिवसेंदिवस वाढतोच आहे. ‘रंगसूत्र’समोर आता स्वत:चेच आव्हान आहे. म्हणजे स्वत:ला गुणवत्तेच्या कसोटीवर कालपेक्षा आज अधिक सरस करत नेण्याचे! कामाची कुठलीही कमी नाही. इथले कापडच नव्हे तर कलाकुसरीच्या अन्य वस्तूंनाही बाजारात मोठी मागणी आहे.


सुमिता घोष यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाची एक दीर्घकथाच. लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीचा लढा असो अगर आयुष्याच्या वाटेवरून पतीचे सुटलेले बोट असो… त्या लढतच आलेल्या आहेत. प्रत्येक परिस्थितीत स्वत:लाच धीर देत त्यांनी पुन्हा रणांगण गाठले आहे. लढा सुरूच आहे. परिस्थिती कितीही विपरित असो कच खाणार नाही, हा राणीझाशीचा बाणा म्हणजेच सुमिता घोष नव्हेत काय…