‘संगीत मार्तंड’ पंडित जसराज यांच्या संघर्षाची एक अस्पर्श कहाणी...तरूण जसराज जेव्हा पायी दक्षिण कोलकाता ते मध्य कोलकाता दरम्यान आईकरीता औषधे शोधत फिरत होते...

0

कोणत्याही यशाच्या मागे संघर्षाची मोठी रहस्य लपलेली असतात. संघर्षाच्या या कहाण्या कधी ना कधी कुणाला तरी समजतात, परंतू त्या कहाण्या, त्या घटना यशाच्या पापुद्रयात लपल्या देखील जातात. फारच अभावाने त्या पाकळ्या कधीतरी उलगडल्या जातात आणि संघर्षाचे अस्पर्श पैलू समोर येतात. हिंदुस्थानी संगीताच्या आकाशात ब-याच काळापासून सूर्यासारखे तळपत संगीत मार्तंड पंडित जसराज आज जगातील सर्वात उच्च व्यक्तिमत्व म्हणून समोर येतात. वर्षभर ते कुठेही असोत मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या सप्ताहात तें हैद्राबादला नक्कीच येतात. आणि जेव्हा ते हैद्राबादला येतात तेंव्हा त्यांच्या संघर्षाच्या आठवणी देखील ताज्या होतात. या स्मृती जाग्या होण्याची जागा देखील एकच आहे, त्यांच्या वडिलांची समाधी तेथे बसून ते तासंतास संगिताच्या त्या देणगीला आठवतात, जी त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाली आहे. चार-पाच वर्षांचे वय फार नसते मात्र त्याच वयात वडिलांपासून कायमचे दुरावण्याचे दु:ख त्यालाच समजू शकते, ज्याच्यावर तो प्रसंग आला आहे आणि इथूनच सुरू होतो एक दीर्घ संघर्षाचा प्रवास.


हैद्राबादच्या अंबरपेट मध्ये पित्याच्या समाधीजवळ ‘युवर स्टोरी’ च्या डॉ. अरविंद यादव यांच्याशी एका अत्यंत भावूक मनोगता दरम्यान पंडितजींनी अनेक आठवणी जागवल्या. आपल्या उज्वल यशाच्या मागे दडलेल्या तत्वांबाबत पंडितजी स्पष्ट स्वरूपात स्वीकारतात की, त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे, कारण प्रत्येक दिवस, क्षण ते संघर्षच मानतात.


आज जी गोष्ट आम्ही सांगत आहोत, ती कोलकाताच्या गल्लीत आईच्या औषधांसाठी भटकणा-या जसराज यांची आहे. त्या काळातील आठवण सांगताना ते म्हणतात की, “वडिलांची सेवा नाही करायला मिळाली, आई सोबत होती मात्र तिला कर्करोगाने ग्रासले होते. पन्नासच्या दशकात या रोगाची तीव्रता काय असेल, याचा आज अंदाज करणे कठीण आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेले ओषध शोधत पायी दक्षिण कोलकाता मधून मध्य कोलकाता पर्यंत पोहोचलो. ब-याच दुकानात त्यावेळी ते औषध मिळाले नाही. मग एका दुकानात ते मिळाले तर खिशात त्यासाठी पैसे नव्हते, इतके ते औषध महाग होते. खिशातून जितके पैसे निघाले ते देत मी बाकीचे नंतर देतो म्हणालो. दुकानदार म्हणाला की, औषधांच्या दुकानात कधी उधारी ऐकली होती. मात्र त्याचवेळी कुणीतरी खांदयावर हात ठेवला आणि दुकानदाराला सांगितले ‘जेवढे पैसे आहेत घ्या आणि सारी औषधे द्या बाकी पैसे माझ्या खात्यावर लिहून ठेवा’ ते दुकान मालक होते, मला माहित नाही ते मला कसे काय ओळखत होते.”


पंडित जसराज मानतात की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या स्वत:च्या जीवनाच्या अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना नवीन मार्ग देतात. आईकरीता औषधांची व्यवस्था तर झाली, डॉक्टरांनी सांगितले होते की, दिवसातून दोनदा त्यांना इंजेक्शन द्यावे लागणार होते. त्यासाठीचा एका वेळचा खर्च पंधरा रूपये होता. दिवसाला पंधरा रूपये मिळवणे कठीण काम होते, पण प्रश्न आईचा होता मी होकार दिला होता. ज्यावेळी डॉक्टर जायला निघाले मी त्यांना म्हटले की, आज संध्याकाळी ऑल इंडिया रेडिओ ऐका, त्यात मी गाणार आहे. त्यांनी म्हटले मला गाण्यात रूची नाही. मी नाराज झालो, पण दुस-या दिवशी डॉक्टर आले तर त्यांचा नूर पालटला होता. ते म्हणाले तुझे गाणे मी माझ्या भाचीच्या घरी ऐकले आहे आणि भाची म्हणाली की या गाणा-याकडे पैसे नसतात. त्यांची ती भाची गीता राय होत्या. ज्या नंतर गायिका गीता राय-दत्त म्हणून प्रसिध्दी पावल्या. डॉक्टरांनी त्या दिवसानंतर प्रति विजीट नाममात्र दोन रूपये घ्यायला सुरवात केली. असेच संघर्षांच्या दिवसात कुणी ना कुणी माझी साथ देत गेले.


पंडित जसराज मानतात की, संघर्षांतून यश मिळते, मात्र त्याच बरोबर ते मानतात की, त्याकडे ‘मी’ च्या नजरेतून पहाता कामा नये. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले आहेत. येथील गौलीगुडा चमन आणि नामपल्ली असे मोहल्ले आहेत ज्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. त्यांना शाळेच्या रस्त्यावरच्या त्या हॉटेलची आठवण आहे जेथे थांबून ते बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते तबला वाजवू लागले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला.

पंडीतजी मानतात की या दीर्घ जीवनात जर काही प्रेरणा घेतली जाऊ शकते तर ती हीच की सातत्याने काम करत राहिले पाहिजे. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा.मुलाखत : डॉ.अरविंद यादव, व्यवस्थापकीय संपादक, युवर स्टोरी