कचऱ्याच्या बदल्यात मिळवा चॉकलेट... ‘टेकबीन’मार्फत मिळवा इतरही सुविधा

कचऱ्याच्या बदल्यात मिळवा चॉकलेट... ‘टेकबीन’मार्फत मिळवा इतरही सुविधा

Tuesday April 05, 2016,

3 min Read

स्वच्छ भारत अभियान सुरु होऊन आता एक वर्ष होत आलंय. मात्र त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. लोकांना अजूनही स्वच्छतेची तेवढी सवय झालेली नाही. म्हणजे अजूनही कचरा बाहेर टाकण्याच्या सवयीत बदल झालेला नाही. आपल्याकडे महानगरपालिका स्तरावरही अनेक गोष्टींमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येते. प्रत्येक घरातला कचरा गोळा केला जाईल याची काळजी घेतली जातेय. पण वैयक्तिक स्तरावर म्हणजे बाहेर रस्त्यावर कचरा टाकणारे खूप जण आहेत. अश्या लोकांचं आता करायचं काय यावर एशियन गॅलन्ट या कंपनीनं उपाय काढलाय. ही कंपनी आता कचरा पेटीत कचरा टाकण्याच्या बदल्यात चॉकलेट देणार आहे. म्हणजे कचरा टाका आणि चॉकलेट मिळवा अशी ही योजना लवकरच मुंबई, नाशिक आणि पुण्यात तुम्हाला अनुभवता येईल. 

image


जेव्हा स्वच्छ भारत अभियान सुरु झालं तेव्हाच या अभियानाचा आपण एक भाग असलं पाहिजे असं मुंबईत राहणाऱ्या धनेश जाधव आणि अभिजीत देवकर या दोन एमबीएच्या विद्यार्थ्यांना वाटत होतं. ते एका वेन्डींग मशिनवर काम करत होते. त्यातूनच कचरा टाकण्यासाठी अशी कचरा पेटी तयार करता येईल का यावर विचार झाला. पण त्याआधी लोकांच्या कचरा टाकण्याच्या सवयी त्यांना जाणून घ्यायच्या होत्या. त्याचा व्हिडियोही त्यांनी बनवला. या नव्या प्रोजेक्टला नाव दिलं टेकबीन. हे टेकबीन त्यांनी मुंबईच्या विविध ठिकाणी ठेवलं आणि त्यात लोकांना कचरा टाकायला सांगितलं. कचरा टाका म्हणजे तुम्हाला सरप्राईज मिळेल असं सांगितल्यानंतर अनेकांनी त्याचा वापर केला आणि त्यांना चॉकलेट मिळालं. 

image


कचरापेटीत कचरा न टाकण्याची अनेक कारण या सर्वेक्षणादरम्यान धनेश आणि अभिजीतला समजली. त्यातलं महत्वाचं कारण होतं विशिष्ट अंतरानं कचरापेटी उपलब्ध नसणे, ती नसल्यानं हातातला कचरा जिथे आहे तिथे टाकण्याची सवय लागते. दुसरं कारण म्हणजे एखादी कचरापेटी दिसलीच तरी ती इतकी घाणरडी असते की तिथं कचरा टाकायला जाण्याची इच्छाच होत नाही. आणि तिसरा आणि महत्त्वाचा अडसर म्हणजे 'थोडासा कचरा रस्त्यावर टाकला तर काय बिघडतं' अशी अनेकांची असलेली मानसिकता. या चलता है मानसिकतेतूनच कचऱ्याचा डोंगर तयार होतोय.

कसं काम करतं टेकबीन?

टेकबीनची काम करण्याची पध्दत अगदी सोपी आहे. टेकबीन एपद्वारे जवळची कचरापेटी कुठे आहे याची माहिती मिळते. सहाजिकच कचरापेटी जिथं आहे तिथं जाण्याची इच्छा निर्माण होते. ही कचरा पेटी अगदी आकर्षक आणि स्वच्छ ठेवण्यात येणारेय. यामुळे तिथं कचरा टाकायला जायला घाण वाटणार नाही. शिवाय कचरा टाकताच या पेटीतला सेन्सर काम करतो आणि तुम्हाला चॉकलेट देतो. फक्त हेच फायदे नव्हे तर या च़ॉकलेटच्या आवरणावरचा कोड आपल्या एपमध्ये टाकल्यास त्यावर अऩेक कंपन्यांचे वेगवेगळया ऑफर्स तुम्हाला मिळतात. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. 

image


सध्या नाशिक, पुणे आणि ठाणे महानगरपालिकेशी टेकबीन बसवण्यासंदर्भात बोलणी सुरु आहेत. यापैकी नाशिक महानगरपालिकेत ती प्रायोगिक तत्वावर टेकबीन लावण्याची परवानगी एशियन गॅलन्टला मिळाली आहे. पुणे आणि ठाण्यात अजूनही बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत. पण लवकरच ती मिळेल असा विश्वास अभिजीत देवकरने व्यक्त केलाय. तो म्हणतो “ आम्ही जेव्हा ही टेकबीन तयार करण्यासाठी सर्व्हे केला तेव्हा कचरा रस्त्यावर टाकण्याची जी अनेक सुरुस कारणं आम्हाला मिळाली ती खरंच गंभीर होती. महानगरपालिकांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं होतं. यामुळेआम्हाला ही संधी मिळाली. आम्हाला पालिका अधिकाऱ्यांना हे समजावून द्यावं लागलं. त्यानंतरच आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला.” 
image


टेकबीनच्या बाहेरच्या भागावर जाहिराती लावून नफा कमवण्याची संधी एशियन गॅलन्टला मिळणार आहे. यातला काही टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेला जाणारेत. यामुळे त्यांच्या तिजोरीतही भर पडणार आहे. यामुळे दोघांनाही फायदा होणार आहे. 

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्वच्छ व सुंदर भारताचे आशास्थान “बंच ऑफ फूल्स’’

'एका क्लिकवर कचरा विका' आयआयटी मुंबईच्या विद्यार्थांचा ‘स्क्रॅपक्रो’ उपक्रम

सफाई मोहिमेद्वारे जनजागृती दिल्ली विद्यापीठाचे कार्य