‘इंडिया’सोबतच ‘भारता’चीही प्रगती व्हावी म्हणून...

‘इंडिया’सोबतच ‘भारता’चीही प्रगती व्हावी म्हणून...

Tuesday October 20, 2015,

4 min Read

गेल्या ५-६ वर्षांच्या काळात भारतात ई-कॉमर्सचा विकास अतिशय जलद गतीने झालेला आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागात त्याची म्हणावी तशी छाप पडलेली दिसत नाही. जाणकारांच्या मते या क्षेत्रात जेव्हा ग्रामीण भागाची भागीदारी होईल तेव्हाच ख-या अर्थाने ई-कॉमर्स क्षेत्राचा विकास होऊ शकेल.

एकीकडे फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन सारख्या युनिकॉर्न्स ग्रामीण भागात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे आयपे, स्टोअरकिंग आणि इनथ्री सारख्या ई-कॉमर्स स्टार्टअप्स कंपन्या मुख्यत्वे ग्रामीण भागावरच आपले लक्ष केंद्रीत करत आहेत.

दुकानदारांना ग्रामीण बाजारांमध्ये प्रवेश करता यावा यासाठी 'इनथ्री'चे 'कंझ्युमर फेसिंग प्लॅटफॉर्म' असलेली 'बूनबॉक्स' ही कंपनी एक वाहनाच्या रूपात काम करत आहे. विविध उत्पादनांसाठी होणा-या मागण्या एकत्रित करून व्यापा-यांना त्या त्या उत्पादनाच्या ऑर्डर्स दण्याचे काम हे प्लॅटफॉर्म करते. 'बूनबॉक्स' ही 'इनथ्री'ची सहकारी संस्था आहे. ही संस्था नुकतीच तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमधील निवडक जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.

शहरांपासून अतिशय दूर असलेल्या ग्रामीण भागांमध्ये वाड्या, वस्त्या आणि गावांमध्ये पोहोचता येईल असे सक्षमीकरण करणारे नेटवर्क या संस्थेकडे आहे. ही संस्था ग्रामीण भागातील ग्राहकांना उत्पादनांचा आणि सेवांचा पुरवठा करून ग्रामीण गाहकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. या साठी संस्थेला यापूर्वी केलेल्या वितरणाच्या अनुभवाच आणि ग्रामीण बाजारांमध्ये काम करण्याच्या ज्ञानाचा विशेष फायदा होतो.

image


'इनथ्री'ने भारतीय 'पीटर ड्रकर'कडून प्रेरणा घेतली आहे – सी. के. प्रल्हाद

नवे उद्योजक स्टीव्ह जॉब्स, जॅक मा, सचिन बंसल आणि कुणाल बहससारख्या व्यक्तीमत्त्वाकडून प्रेरणा घेतात, तर 'इनथ्री'चे संस्थापक आर. रामनाथन यांनी दिवंगत डॉ. सी.के. प्रल्हाद यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. त्यांच्या एका भेटीमुळे ग्रामीण बाजारामध्ये जाण्यासाठी इनथ्रीला प्रेरणा मिळाली आहे.

प्रल्हाद हे मिशिगन विद्यापीठामध्ये व्यवस्थापन या विषयाचे प्राध्यापक होते. प्रल्हाद यांना भारताचे पीटर ड्रकर मानले जाते. आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला रामनाथन यांनी 'आरपीजी', 'आयसीआयसीआय' आणि 'टीव्हीएस' ग्रुपमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक या पदांवर काम केले होते.


इनथ्रीचे सुरूवातीचे दिवस


सुरूवातीच्या दिवसांमध्ये 'इनथ्री'ने ग्रामीण विपणन बाजारांमध्ये सल्लागाराचे काम केले. कारण वितरण व्यवसायात उतरता येईल इतके भांडवल कंपनीकडे नव्हते. रामनाथन सांगतात, “ आम्ही भारतात फिलीप्ससाठी धूर नसलेल्या शेगड्या लाँच केल्या. याबरोबर युरेका फोर्ब्स, नोकिया, टायटन इंडस्ट्रीज आणि हेंज फाऊंडेशनसारख्या कंपन्यांसाठी सल्लागाराचे काम सुद्धा केले.

२०११ च्या अखेरीपर्यंत कंपनीने तामिळनाडूमधील काही निवडक पोस्ट कार्यालयांच्या माध्यामातून सौर दिव्यांची विक्री सुरू केली. या उत्पादनाच्या मागणीत वाढ झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण तामिळनाडू राज्यात या उत्पादनाची विक्री सुरू केली आणि ती संपूर्ण तामिळनाडू राज्यात पसरली सुद्धा. रामनाथन पुढे सांगतात, “ आम्ही नंतर पुढे गैर-सरकारी संस्थांना, अॅग्री बोर्डांना आणि ग्रामीण भागातील पन्नास लाख ग्राहकांना विविध प्रकारच्या उत्पादनांचे सात लाख युनिट्स विकले.”


ई-कॉमर्स ग्रामीण भागांमध्ये जीवनशैली उंचावू शकतो.


रामनाथन सांगतात, “ सौरदिव्यांच्या विक्रीमध्ये आम्हाला चांगले यश मिळालेले आहे. असे असताना सुद्धा ग्रामीण ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, त्यांच्या आवडीची उत्पादने त्यांना मिळावीत यासाठी आम्ही या उत्पादनांचा ई-कॉमर्समध्ये समावेश केला आहे.

'इनथ्री' आणि 'बूनबॉक्स'ला याच विचाराने बाजारात उतरवण्यात आले आहे. कारण जास्तीत जास्त बाजार हे महानगर आणि शहरी भागांवर आपले लक्ष केंद्रीत करूनच व्यवसाय करत असतात. यामुळे ज्या उत्पादनांमुळे ग्रामीण ग्राहकांची जीवनशैली ऊंचावू शकेल अशी उत्पादने वापरण्यापासून ग्रामीण भागातला एक फार मोठा ग्राहकवर्ग वंचित राहिलेला आहे.


व्यावसायिकांसाठी 'बूनबॉक्स' कसे काम करते?


ग्रामीण भागात आपला शिरकाव करण्याच्या दृष्टीने 'बूनबॉक्स' हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे. इनथ्री विविध उत्पादनांच्या मागणीचे संकलन करते आणि पुढे दुकानदारांना देते. सध्या 'बूनबॉक्स' तामिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. नुकतेच 'बूनबॉक्सने' आंध्रप्रदेशच्या बाजारांमध्ये देखील प्रवेश केलेला आहे.

'इनथ्री'च्या माध्यमातून संकलित करण्यात आलेली उत्पादने, त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी कंपनीच्या वेयरहाऊसमध्ये पाठवली जातात. ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या उत्पादनांची इथेच पॅकिंग केली जाते.


कर आकारणी आणि महसूल


सौरदिवे आणि वॉटर प्युरिफायरसह इतर उत्पादने, अशी सात लाख युनिट्सची विक्री इनथ्रीने आत्तापर्यंत केलेली आहे. हा उद्योग अनेक वर्षे फायद्यात चालला. इनथ्रीने २०१४ मध्ये 'इंडियन एंजेल नेटवर्क' ( आयएएन) कडून फंड सुद्धा मिळवला.

५० कोटी रूपयांहून अधिक किंमतीचे जीएमव्ही आणि दोन कोटी रूपयांच्या एकूण नफ्यानंतरच कंपनीच्या व्यवसायाला आत्तापर्यंत अंतर्गत स्त्रोतांमधून फंड दिला जात होता.


मुख्य आव्हाने आणि भविष्यातील योजना


आव्हानांबाबत रामनाथन सांगतात, “ वाजवी किंमतीवर ग्राहकांची खरेदी, इंटरनेटचा नगण्य वापर. क्रेडिट कार्डचा नसलेला वापर आणि शेवटच्या ग्राहकापर्यंत नसलेली कनेक्टिव्हिटी हे ग्रामीण क्षेत्रांत व्यवसाय करणाऱ्यां समोर मोठं आव्हान आहे.”

सध्या, इनथ्री हा ४० लोकांचा एक संघ आहे. हा संघ पुढील एका वर्षात वाढून हीच संख्या १००० वर जाईल अशी अपेक्षा आहे. आव्हानांबाबत सांगितल्यानंतर आपल्या बोलण्याचा समारोप करताना रामनाथन म्हणतात, “ ग्रामीण ई-कॉमर्सने बाजाराचे नेतृत्व करावे अशी बूनबॉक्सची इच्छा आहे. आम्ही उत्पादनांची संख्या वाढवू आणि आम्ही आमचा कारभार आता उत्तर भारतात देखील घेऊन जाणार आहोत.”


युवरस्टोरीचे मत


संघटित किरकोळ व्यापारात आवश्यक साहित्य सहजपणे उपलब्ध होत नाही. शिवाय पर्याय सुद्धा पुरेसे नसतात. याच कारणामुळे भारतात ई-कॉमर्सचा व्यवसाय आपले हातपाय गतीने पसरतो आहे. सद्यस्थिती पाहिली, तर ग्रामीण भाग हा संघटित किरकोळ व्यापारापासून दूर राहिलेला आहे. याच कारणामुळे ई-कॉमर्सला ग्रामीण भागात मोठे यश मिळण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे. परंतु पुरवठा साखळीचा अभाव आणि शेवटपर्यंत नसलेली कनेक्टिव्हिटी या गोष्टी ई-कॉमर्सच्या प्रगतीच्या आड येऊ शकतात. पंरतु 'इनथ्री', 'आयपे' आणि 'स्टोअरकिंग' सारख्या काही स्टार्टअप्स कंपन्यांनी दक्षिण भारतात या अडचणी दूर करण्यात यश मिळवले आहे.

अशा परिस्थितीत भारत सरकारने प्रत्येक गाव ब्रॉडबँडने जोडण्याची मोहिम सुरू केल्यामुळे ई-कॉमर्सचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसू लागले आहे. या स्टार्टअप्स कंपन्या उत्तर भारत आणि इतर ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करून दाखवतात हे बघणे औस्तुक्याचे ठरेल.