पडदयावरच्या व्यक्तिरेखांना प्रत्यक्ष कलाकारांशी जोडण्याचा प्रयत्न -चैत्राली डोंगरे

0

बाइकर्स अड्डा हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेता संतोष जुवेकर बाईकवेड्या तरुणाईचा प्रतिनिधी म्हणून समोर आला आणि अक्षरशः छा गया. बाइकर्स अड्डामधल्या विकीच्या व्यक्तिरेखेमध्ये संतोष एकदम चपखल बसला जणू काही विकी हा त्याच्यामध्ये फार आधीपासूनच दडलेला होता. संतोषमधला हा विकी प्रेक्षकांनी रुपेरी पडद्यावर पाहिला पण प्रेक्षकांआधी एका व्यक्तीने संतोषमधला हा विकी पहिला होता आणि ही व्यक्ती आहे बाइकर्स अड्डा सिनेमाची कास्टिंग डिरेक्टर चैत्राली डोंगरे.

कास्टिंग डिरेक्टर आणि कास्टिंग कोऑर्डिनेटर म्हणून सिनेसृष्टीत गेली दहा वर्ष सक्रिय असलेल्या चैत्रालीला ओळखत नाही असा आज एकही कलाकार नसेल. पण दहा वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. “मी मुळची पुण्याची. पुण्याच्या ललित कला केंद्रमधून मी ड्रामाटिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर कामाच्या शोधात मुंबईत आली. तेव्हा माझे ध्येय हे फक्त आणि फक्त अभिनय एवढेच होते. योग्य संधीच्या निमित्ताने मी इथल्या मनोरंजन वर्तुळात वावरायला लागले.”

“मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या व्यक्तीला भेटायचे तिचा किंवा त्याचा फोन नंबर सवयीने मी स्वतःजवळ नोंदवून घ्यायचे, हळूहळू मला मराठी मनोरंजन वर्तुळात फोन डिरेक्टरी म्हणायला सुरुवात झाली म्हणजे कुठल्याही कलाकाराशी संपर्क साधायचा असेल तर चैत्रालीला विचारा असा ट्रेंडच बनला. यातनं माझा संपर्क वाढला आणि माझ्याही नकळत कास्टिंग डिरेक्टरच्या माझ्या कामाला सुरुवात झाली. ”

आज चैत्राली जाहिरात, टेलिव्हिजन आणि सिनेमा या क्षेत्रात कास्टिंगची ही जबाबदारी पार पाडतेय. अनेकांना कास्टिंग डिरेक्शन आणि कोऑर्डिनेशन सारखंच वाटतं पण असं नाहीये या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. “कास्टिंग डिरेक्शनमध्ये मी सर्वात आधी संबंधित सिनेमाची तयार फायनल स्क्रिप्ट वाचते, त्यातल्या व्यक्तिरेखांचे विस्तृत प्रोफाईल बनवते आणि मग त्यासाठी योग्य कलाकारांचे ऑडिशन्स घेऊन मग अंतिम निवड झालेल्या कलाकारांची यादी बनवली जाते, यात मुख्य कलाकारापासून ते सहाय्यक कलाकार आणि अगदी फिल्म एक्स्ट्राज पण मीच ठरवते.

कास्टिंग कोऑर्डिनेशनमध्ये मात्र मला माझ्याकडच्या कलाकारांची नावं आणि फोटोज संबंधित निर्माता दिग्दर्शकला पाठवायची असतात ते यातनं कलाकार निवडतात आणि मग मी त्या कलाकारांशी संपर्क साधून त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणे, त्यांचे मानधन ठरवणे, तारखा निश्चित करण्यासारखी कामे मला करावी लागतात.”

मराठी सिनेमात चैत्राली सध्या आघाडीची कास्टिंग डिरेक्टर आणि कोऑर्डिनेटर मानली जातेय, पण सुरुवात इतकी सहज सोपी नव्हती. “काही वर्षांपूर्वी मराठीत कास्टिंग करणे ही प्रथाच मानली जायची नाही ज्याचा मला सुरुवातीला त्रासही झाला. अनेकदा निर्मात्याच्या म्हणण्यानूसार मी कास्टिंग सुरु करते पण मग दिग्दर्शक किंवा सहकलाकाराला एखाद्या भुमिकेसाठी त्याच्या आवडीचा कलाकार सिनेमात हवा असतो. तो निर्मात्याला सांगतो आणि मला ते ऐकावं लागतं.

मराठी सिनेमात तर सुरुवातीला मुख्य भुमिकेसाठी नवीन चेहऱ्यांचा विचारच नाही व्हायचा. मग मी मला मिळणाऱ्या सिनेमांमध्ये नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देऊ लागले, निर्मात्यांना ही गोष्ट आर्थिकदृष्टया आणि कामाच्यादृष्टीने फायदेशीर वाटू लागली आणि तेव्हापासून मराठीत नायक नायिकांसाठी नवीन चेहरे येऊ लागले. सनई चौघडे सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकरला अशाच पद्धतीने लॉन्च केले गेले, आज चिन्मय मराठीत आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

३५६ किल्लारी सिनेमात हिंदीतला स्टार जॅकी श्रॉफची एंट्रीही अशीच झाली. आधी त्या व्यक्तिरेखेसाठी दुसऱ्या मराठी नायकाचे नाव विचाराधीन होते, पण जॅकीमुळे या सिनेमाला एक वेगळी उंची मिळाली.”

“कुठलंही काम यातल्या सातत्याशिवाय यशस्वी बनत नाही, मला जेव्हा एका सिनेमासाठी विचारलं जातं तेव्हा सगळ्यात आधी मला माझ्याकडची कलाकारांची नावं आणि फोटोजची यादी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तपासावी लागते, ही यादी आज लाखांच्या घरात आहे. पण ती तपासण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो. दुसऱ्या दिवशी मला एखाद्या जाहीरातीसाठी विचारलं जातं आणि मग पुन्हा मला ही यादी पहिल्यापासून तपासावी लागते. या प्रक्रियेत नो शॉर्टकट.

हे तर झाले मनोरंजन क्षेत्रातल्या प्रस्थापित लोकांबद्दल पण नवोदित कलाकारांसोबत चैत्रालीला रोज एक वेगळीच लढाई लढवावी लागते. चैत्राली सांगते की “मनोरंजन क्षेत्रात काम करायचे असेल तर पोर्टफोलिओ बनवावा लागतो हा चुकीचा समज आहे. मी इच्छुक कलाकाराकडे कधीच पोर्टफोलिओ मागत नाही, पण त्याला कॅरेक्टराईज्ड फोटो सेशन करायला सांगते आणि कधी कधी तर त्यांना मोबाईल वरुन फोटो काढून तात्काळ मला पाठवायला सांगते, यातनं त्याचं खरं दिसणं कळतं. यातही परत अनेकजण मला त्यांचे एडिटेड फोटोज पाठवतात मग पुन्हा त्यांना सांगा, समजावा यात शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्ची लागते ते वेगळेच.

चैत्रालीच्या कामाचे हे स्वरुप वर्षानुवर्ष असेच आहे. उत्तम कास्टिंग करायचं असेल तर चोखंदळपणा हवाच. बाइकर्स अड्डा, मोहर, ३५६ किल्लारी, दगडी चाळ सारख्या यशस्वी सिनेमांचे कास्टिंग डिरेक्शन चैत्रालीने केलेय तर उत्तरायण, ३ इडियटस्, फरारी कि सवारी, चीनीकम सारख्या सिनेमांची ती कास्टिंग कोऑर्डिनेटर होती. आताही ती सहा आगामी मराठी सिनेमा आणि दोन हिंदी सिनेमांच्या कास्टिंगमध्ये व्यस्त आहे.

मनोरंजन क्षेत्र हे दिखाव्याचं क्षेत्र मानल जातं. म्हणजे कलाकार हा व्यस्त नसला तरी खूप व्यस्त आहे हेच म्हणताना दिसतो, चैत्रालीकडे मात्र हा दिखावा चालत नाही. उलट माझ्याकडे वेळ आहे मला काम दे ना हेच कलाकार मागत फिरतात, त्याचं खरं मानधन, त्याच्या कामाची क्षमता सर्वकाही चैत्रालीकडे उघड असतं. पटकथेतल्या काल्पनिक व्यक्तिरेखांना पडद्यावर जिवंत करायचं शिवधनुष्य शेवटी तिनेच तर एकहाती पेललंय ना.