मुखलाच्या जन्माने लोकांनी हिणवले, मारण्याचा सल्लाही दिला, पण तिच्या पायांनीच रचला एक नवा इतिहास

0

आयुष्यात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे नियतीने दिलेले ‘पदरात पाडून पवित्र मानणारे’ तर दुसरे जे नियतीलाच बदलण्याची ताकद ठेवणारे. असे लोक आपला आवेश, विश्वास व दृढ निश्चयाने नियतीला लोळण घालायला विवश करतात. समाजासाठी असेच एक उदाहरण आहे मुखला सैनी. जयपूर जिल्यातील कोटपुतली या लहानशा शहराजवळील नारेह्डा गावामध्ये मुखलाचा जन्म झाला तेव्हा सगळ्यांनी गळा दाबून मारण्याचा सल्ला दिला. परंतु वडिलांना पाझर फुटले त्यांनी तिला वाढवण्याची जिद्द दाखवली. पण आज त्याच मुखलावर पूर्ण गांव, समाज आणि कुटुंबाला गर्व आहे. मुखलाला हात नाही. आपल्या नित्य कर्मापासून मुखलाने प्रत्येक काम पायांनीच केले. हात त्यांच्या यशाला बाधक ठरतील असे मुखलाने होऊ दिले नाही. हातां ऐवजी मुखलाने पायांनी लेखणी धरली आणि असा लिखाणाचा श्रीगणेशा केला की प्रत्येकाची छाती गर्वाने मोठी झाली. मुखला आता विवेकानंद सिनीअर सेकेंडरी आदर्श विद्या मंदिराच्या १२ वीच्या वर्गात शिकत आहे. मोठी गोष्ट म्हणजे त्या १२वीत असून अभ्यासाप्रती आवड, हिंमत आणि मेहनतीने ११ वीच्या वर्गात ८०% गुण मिळवून सगळ्यांना अचंबित केले.


मुखलाचे वडील फुलचंद सैनी आपल्या गावात पंक्चर काढण्याचे काम करतात व त्यांची आई गीता देवी ह्या गृहिणी आहे. आपल्या मुलीला अभ्यासाच्या या उंचीवर बघून वडिल कृतकृत झाले. मुलीला सामर्थ्यवान बनविण्यासाठी पूर्ण कुटुंबाने आर्थिक तसेच सामाजिक संघर्षाला तोंड दिले. फुलचंद यांनी युवर स्टोरीला सांगितले की,

जेव्हा मुखलाचा जन्म झाला तेव्हा सुईणबाईनी गळा दाबून मारण्याचा सल्ला दिला. पण मी आणि माझ्या बायकोने प्रत्येक आव्हानांचा सामना करत मुखलाला सांभाळले. आज तिच्या अभ्यासाच्या निरंतर प्रगतीने आम्हाला गर्वाची अनुभूती होते. मला आशा आहे की अभ्यास करून ती मोठे नाव कमवेल’’.


काळाबरोबरच मुखलाचा उत्साह वाढवायला अनेक लोक येऊ लागले. तसेच तिला नित्यासाठी गरजेच्या वस्तू या उपहाराच्या रूपाने देऊ लागले. सहाजिकच यामुळे मुखलाला पुढे जाण्याची हिंमत मिळते.

मुखला सैनी सांगतात की, “ लहानपणी मला बघून घरचे हळहळ व्यक्त करायचे, हिचे कसे होईल, ही शिकू शकत नाही, हिचे लग्न पण नाही होऊ शकत. इतर मुलींना अभ्यास करतांना बघून वाटायचे की आपण पण अभ्यास केला पाहिजे, पण काय करणार हातच नव्हते. मग पायाने लिहिण्याचा सराव सुरु केला. सुरवात खूपच कठीण होती, हळूहळू अभ्यास सुरु झाला हाताचे काम पायांनीच करते. शाळेत गेली तेव्हा शिक्षकांनी उत्साह वाढवला. माझी इच्छा शिकून शिक्षक बनण्याची आहे’’.


मुखलाचे शिक्षक रतन सैनी सांगतात की, “ मुखला अभ्यासात हुशार असल्यामुळे तिला अजून शिकण्याची इच्छा होते. इतर मुलांच्या अपेक्षेपेक्षा मुखला गंभीरतेने अभ्यास करते. हात नसल्याचे कधी तिच्या मनात सुद्धा येत नाही. हात असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा ती चांगले आणि पटकन लिहिते. दु;ख एकाच गोष्टीचे वाटते की शिक्षण विभागाला वेळोवेळी सांगून सुद्धा कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही’’.

मुखला सैनी या एक असा प्रेरणास्त्रोत आहे ज्या अनेक लोकांना कठीण समयी विचार करायला भाग पाडतात की, आता काय आणि कसे करायचे? सहाजिकच मुखलाच्या या यशामागे तिची कठीण तपश्चर्या आहे. पण हे तितकेच खरे आहे की मेहनत ही शिखरापर्यंत घेऊनच जाते. युवर स्टोरी तर्फे मुखला सैनी यांच्या जिद्दीला सलाम.

लेखिका : रुबी सिंग

अनुवाद : किरण ठाकरे