पत्नीचे दागिने विकून एका नावाड्यानेच बांधला नदीवर पूल

पत्नीचे दागिने विकून एका नावाड्यानेच बांधला नदीवर पूल

Wednesday October 05, 2016,

2 min Read

आत्तापर्यंत म्हणजेच वयाच्या ४३ वर्षापर्यंत शेख लालचंद एक साधारण बोटमन अर्थात नावाडी म्हणून त्यांच्या परिसरात परिचित होते, जे मुंदेश्वरी नदी पार करून एका काठावरून दुसऱ्या नदीकाठावर प्रवाश्यांना सोडवण्याचे काम करत होते. आज मात्र त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होते आहे. लोकांसाठी ते एक प्रेरणास्त्रोत बनले आहे. त्यांनी नदी पार करण्यासाठी त्यावर एक बांबूचा पूल बांधला आहे. या पुलामुळे मुंदेश्वरी, दामोदर आणि रूपनारायण या नदीकाठी वसलेल्या घोराबेरीया-चिंतन आणि भाटोरा ही गावं तिथल्या मुख्य भागाशी जोडली गेली आहे.

शेख लालचंद

शेख लालचंद


शेख यांनी स्वतः पूल बांधण्याचा निर्णय घेतला, जेव्हा अनेकवेळा ते त्यांची नाव नदीकाठी रोवून उभी करू शकत नव्हते. ज्यामुळे प्रवाश्यांची खूप गैरसोय व्हायची. नदीकाठच्या गुडघाभर चिखलातून त्यांना मार्ग काढावा लागायचा. शेख सांगतात की, “जेव्हा माझी नाव नदीकाठावर स्थिर उभी राहू शकत नव्हती तेव्हा सगळेच प्रवाशी वैतागायचे, विशेषतः शाळेच्या मुलांना दप्तर घेऊन गुडघाभर चिखलातून पाय काढत जावे लागायचे. त्यांना नदीतून बाहेर पडायला खूप त्रास व्हायचा. मग माझ्या मनात विचार आला की एखादा पूल का बांधू नये, बांबूचा पूल तयार करण्याची संकल्पना माझ्या मनात स्थिरावली”

बांबूचा पूल बांधण्यासाठी साडेसात लाख रुपये लागणार होते. त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकून आणि नातेवाईकांकडून कर्ज घेऊन ही रक्कम जमा केली. १६ मजुरांनी २८ दिवसात हा पूल बांधून पूर्ण केला. हा पूल वापरण्याजोगा झाला याची खात्री पटल्यानंतर अनेकजण या पुलाचा वापर करू लागले. जे कोणी या पुलाचा वापर करतात त्यांच्याकडून शेख नम्रपणे टोल मागतात.

जे लोक पायी चालत जात पूल ओलांडतात त्यांच्याकडून दोन रुपये घेतले जातात. दुचाकीस्वारांकडून ६ रुपये टोल वसुली केली जाते तर चारचाकी प्रवाश्यांकडून १०० रुपये टोल वसूल केली जाते. शाळकरी विद्यार्थ्यांकडून आणि जेष्ठ नागरिकांकडून एक रुपये टोल आकाराला जातो. अम्ब्युलन्सकरिता आणि परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पुलाचा वापर मोफत करायला दिला जातो. महिना पन्नास रुपये देऊन शेतकऱ्यांना केव्हाही पूल वापरता येतो.

या पुलामुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आहे. पूल तयार झाल्यामुळे पुलाकडील गावाच्या मुला-मुलींचे लग्न होणे सहजशक्य झाले आहे. यापूर्वी तिथल्या गावात कोणी मुलगी देईना किवा तिथली लग्नस्थळं जमेना. आता मात्र सारेच काही सुलभ झाले आहे. “ या पुलामुळे माझ्या मुलीचे लग्न ठरले” अचिन्तो माय्ती तेथील एक ग्रामस्थ सांगतात.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया