दुर्गम खेडी उजळवणारे अनोखे स्टार्टअप ग्राम उर्जा सोल्यूशन्स

दुर्गम खेडी उजळवणारे अनोखे स्टार्टअप

ग्राम उर्जा सोल्यूशन्स

Wednesday March 30, 2016,

8 min Read

१५ फेब्रुवारी २०१५. दिवस महत्त्वाचा होता. दरेवाडी या गावाच्या दिशेने अनेक तरुणांच्या गाड्या धावत होत्या. काही जण पायीच दरेवाडीत पोहोचण्याच्या तयारीत होते. कारण काय, दरेवाडीचा उरूस होता?, कोणी फिल्म स्टार येणार होता का? का कोणी आमदार-खासदार येणार होता दरेवाडीत? तसं काहीच नव्हतं. तरुणांच्या या गर्दीमागे कारण तसंच होतं. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतविरुद्ध पाकिस्तान सामना. दरेवाडीच्या आजुबाजूच्या १५ वाड्या वस्त्या आणि गावांमध्ये महावितरणची (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी) वीज पोहोचली आहे. स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनीही दरेवाडीत सरकारी वीज पोहोचलेली नाही. तरीही तरुणांचे पाय या गावाकडे वळत होते, कारण दरेवाडीत ग्राम उर्जा सोल्यूशन्स कंपनीने उभारलेल्या सोलर ग्रीडमुळे आता सौर उर्जेवर सगळी उपकरणे चालतात आणि वीज पुरवठा खंडितच होत नाही. आपल्या गावातील सरकारी वीज पुरवठा कधी बंद होईल याचा काहीच भरवसा नाही, त्यामुळे केवळ दरेवाडीतच निर्विघ्नपणे क्रिकेट सामन्याचा आनंद लुटता येईल, असा विश्वास या तरुणांना होता.

image


स्वातंत्र्यानंतर प्रगतीची अनेक एव्हरेस्ट शिखरे सर केलेल्या भारताच्या ग्रामीण भागांत अजूनही अशी अनेक खेडी, वाड्या-वस्त्या आहेत, जिथे सरकारी इलेक्टिक ग्रीड पोहोचलेले नाही. विविध तंत्रज्ञानामुळे जगाशी जोडल्या गेलेल्या शहरी भारतीयंपेक्षा या गावांत राहणारे भारतीय वेगळेच म्हणायला हवेत. कारण मोठी शहरे जवळ असूनही यांच्या घरांत अजूनही वीज न पोहोचल्यामुळे रॉकेलच्या दिव्यांच्या प्रकाशात स्वयंपाक केला जातो. काही किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. शेतीपंपालाही वीज नसल्याने शेतीचं मोठं नुकसान होतंय. अशापैकीच एक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणारं दरेवाडी.

दुर्गम असलेल्या या गावाचं ४ जुलै २०१२ला नशीबच पालटलं. ५०-६० वर्षे रॉकेलचे दिवे, सरकारी सौर दिवे यांच्यामुळे दिवसातील काही काळ प्रकाशमान होणाऱ्या दरेवाडीला सौर उर्जा प्रकल्पातून तयार झालेल्या वीजने उजळून टाकलं. आपली उभी हयात अंधारात घालवलेल्या ज्येष्ठांना आनंद झाला की पुढच्या पिढीला तरी प्रकाश दिसणार आणि त्यांचे भविष्यही उजळणार.

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, गावकऱ्यांच्या एकमताने, उच्च तंत्रज्ञानाची साथ घेऊन हा प्रकल्प उत्तमरित्या यशस्वी करून दाखवणाऱ्या ग्राम उर्जा सोल्यूशन्स प्रा. लि. या सौर उर्जा क्षेत्रातील अनोख्या स्टार्टअपची वाटचालही रोचक आहे.

image


अंशुमन लाट, समीर नायर, प्रसाद कुलकर्णी या तीन उच्चविद्याविभूषित तरुणांचे करिअर उत्तम धावत होतं. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करत असूनही सामाजिक जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. केवळ मी आणि माझं कुटुंब सुखात राहून भागणार नाही, समाजही सुखी झाला पाहिजे ही तळमळ तिघांच्याही मनात होती. यातूनच चर्चा झाल्या आणि नवा मार्ग चोखाळण्याचा निर्णय झाला. ठिकाण होतं पुणे विद्यापीठातलं ओपन कँटीन आणि काळ होता ऑगस्ट २००७चा. पारंपारिक उर्जास्रोतांच्या दिवसेंदिवस होत असलेल्या ऱ्हासावर पर्याय असलेल्या अपारंपरिक उर्जा स्रोतांशी संबंधित ग्रामीण भागाला उपयुक्त ठरेल असं काम करण्याचा विचार पक्का झाला. त्यानंतर २४ एप्रिल २००८ ला सुरू झाली ग्राम उर्जा सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनी.

कंपनीच्या सुरुवातीच्या प्रक्रियेबाबत संस्थापक सदस्य प्रसाद कुलकर्णी म्हणाले, ‘सौर उर्जा, बायो गॅस, जल व्यवस्थापन अशा ग्रामीण भागांत थेट उपयोगी पडणाऱ्या प्रकल्पांना पहिल्यांदा आम्ही भेटी दिल्या आणि त्यांचा अभ्यास केला. पुदुच्चेरीच्या स्वामी अरविंद आश्रमातील सौर उर्जेवरील प्रकल्प, मराठवाड्यातील काही जल व्यवस्थापनाचे प्रकल्प, बायोगॅसचे काही प्रकल्प कसे उभारले, त्याला लागणारे तंत्रज्ञान, अर्थ सहाय्य याचा आम्ही २०११पर्यंत सखोल अभ्यास केला. तंत्रज्ञानातील एक्स्पर्टसोबत काम करून अनुभवही घेतला.ʼ

image


‘हा अभ्यास सुरू असतानाच २०११ मध्ये आम्हाला पहिली संधी मिळाली. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात सोनारी या खेडेगावांत ‘रूरल शोअरʼ हे बीपीओ सुरू होतं. ४० कम्प्यूटरवर खेड्यातील तरुण-तरुणी डेटा एंट्रीचे काम करत होते. हे बीपीओ पूर्ण डिझेल जनरेटरवर सुरू होतं. बीपीओला लागणारी वीज आम्ही सौर उर्जेच्या माध्यमातून तयार करून दिली तर त्यासाठी मासिक भाडे देण्याची तयारी त्यांनी दाखवली. आमच्या अनुभवाच्या जोरावर आम्ही ८ किलो वॅट पीक वीज निर्माण करणारी सोलर सिस्टीम डिझाइन केली. या पहिल्या प्रकल्पासाठीची १५ लाख रुपयांची गुंतवणूक कंपनीनेच केली. आमची पहिली सिस्टीम यशस्वी झाली आणि आम्ही निर्माण केलेल्या विजेवर ४० कम्प्यूटर आठ तास काम करू लागले. सौर उर्जा तयार करून ती विकण्याच्या आमच्या पहिल्या कल्पनेला मिळालेल्या यशाने आमचा आत्मविश्वास वाढला,ʼ असंही कुलकर्णी यांनी सांगितले.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यांत कंपनीचे सर्वेक्षण सतत सुरू होते. दुर्गम भागांतील गावांत सरकारी योजनांतून घरगुती वापराचे सौर दिवे, रस्त्यावरचे सौर दिवे पोहोचले आहेत; पण त्यापैकी ८० टक्के दिवे बंद पडल्यावर दुरुस्त केले जात नाहीत आणि पुन्हा ती गावं अंधारात बुडतात असे ग्राम उर्जाच्या संशोधकांना लक्षात आलं. या गावांना केवळ घरातील दिव्यांसाठीच नव्हे तर शेतीचा पंप, पाणी योजना, गिरणी, टीव्ही अशा अनेक गोष्टींसाठी विजेची आवश्यकता आहे, असेही निदर्शनास आले. ज्या खेड्यांमध्ये सरकारी वीजेचे ग्रीड पोहोचलेले नाही किंवा पुढच्या दहा वर्षांत पोहोचण्याची शक्यता नाही अशा गावांसाठी सौर उर्जा प्रकल्पांतून वीज पुरवठा केल्यास उपयुक्त ठरेल असे या संशोधनानंतर कंपनीने निश्चित केले. प्रत्येक राज्यातील अशी खेडीही कंपनीने शोधून ठेवली होती.

image


कंपनीच्या दुसऱ्या प्रकल्पाबाबत संचालक अंशुमन लाट म्हणाले, ‘पहिला प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आमचे संशोधन सुरू होते. त्याचदरम्यान मुंबईत सौर उर्जेशी संबंधित एका प्रदर्शनात जर्मनीच्या बॉश कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. बॉश कंपनीचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग संपूर्ण गुंतवणुकीसह सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी बिहार, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांत वीजेचे ग्रीड न पोहोचलेली गावं शोधत होता. आमच्याकडे अशी गावं तयारच होती. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दरेवाडी गावाचे संपूर्ण सर्वेक्षण आम्ही आधीच पूर्ण केले असल्याने गावात किती घरं आहेत, त्यांची घरगुती, शेतीची व इतर विजेची गरज किती, तिथे किती क्षमतेची सिस्टीम उभारावी लागेल या प्रश्नांच्या इत्यंभूत माहितीसह आम्ही बॉश कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर हा प्रकल्प चालवण्याचे सादरीकरण केले. आम्ही उत्तर प्रदेशात यशस्वी केलेल्या प्रकल्पाचे उदाहरण होतेच. बॉश कंपनीने या प्रकल्पाला मंजुरी दिली.ʼ ग्राम उर्जाने गावातील ३९ घरे, शेतीचे पंप, रस्त्यावरचे दिवे, गिरणी, कम्प्यूटर यांना पुरेल अशी ९.४ किलो वॅट पीक वीज निर्माण करणारी यंत्रणा दरेवाडीमध्ये बसवली. यासाठी आलेला ३० लाख रुपये खर्च बॉश कंपनीने केला. ४ जुलै २०१२ ला ग्राम उर्जा कंपनीचे सर्व इंजिनीअर्स, गावकरी, जर्मनीवरून आलेले बॉश कंपनीचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जॉर्ज हना यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आणि अनेक वर्षे अंध:कारात बुडालेली दरेवाडी प्रकाशात न्हाऊन निघाली. सामाजिक काम कोणत्यातरी अनुदानावर, सरकारी मदतीवर, कर्जाच्या रकमेवर पूर्ण करण्याचा प्रघात आपल्या देशात आहे. ‘निमित्तमात्रं भवʼ हे श्रीमद्भगवतगीतेतलं वचन ब्रीद असणाऱ्या ग्राम उर्जा सोल्यूशन्सने मात्र संपूर्ण स्वावलंबी तत्वावर दरेवाडी प्रकल्प उभा केला.

image


‘दरेवाडीतील प्रकल्प आपला स्वत:चा आहे अशी गावकऱ्यांची धारणा झाली तरच तो योग्य प्रकारे चालेल असे आमचे मत होते. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यापूर्वीच गावकऱ्यांशी त्याबाबत चर्चा केली होती. अजिबात वीज नसल्याने काळ्या बाजारात मिळणाऱ्या रॉकेलवर त्यांचे दिवे सुरू होते. पूर्ण वेळ व्यवस्थित वीज मिळणार हे कळाल्यावर गावकऱ्यांनी होकार दिला. पण त्या विजेसाठी दरमहिना बिल भरावं लागेल हेही आम्ही त्यांना सांगितलं. चांगली वीज मिळाली तर आम्ही बिल भरू अशी तयारीही त्यांनी दाखवली. गावकऱ्यांच्या सहकार्यातूनच हा प्रकल्प उभा राहिला. सौर उर्जा प्रकल्प चालवण्यासाठी गावात एक रजिस्टर्ड ट्रस्ट स्थापन केला. त्यामध्ये ग्राम उर्जा कंपनीचा कोणीही सदस्य नव्हता. गावकरीच दर महिन्याला प्रतियुनिट वापरानुसार बिलं तयार करतात. वापरानुसार १२५ ते २५० रुपयांदरम्यान मासिक बिल ग्राहकांना येतं. जमा झालेली रक्कम बँकेतील खात्यात भरण्यात येते. गावात एका व्यक्तिला प्राथमिक तांत्रिक प्रशिक्षण देऊन यंत्रणेची देखभाल करण्यास सांगितले आहे. तोच युनिट मोजून बिले तयार करतो. अशाप्रकारे गेली चार वर्षे हा प्रकल्प उत्तम चालू आहे. या निमित्ताने आम्ही सामाजिक जबाबदारीचे नवे मॉडेल विकसित केले आहे. तेच आम्हाला पुढे वापरता आले,ʼ असं समीर नायर यांनी सांगितलं.

या यशानंतर बॉश कंपनीने ग्राम उर्जाच्या मदतीने कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात विरल या गावातही प्रकल्प उभा केला. ग्राम उर्जाच्या इंजिनिअर्सने इथे ५ किलो वॅट पीक क्षमतेचा प्रकल्प उभारून २१ घरांना वीज पुरवली आहे. या प्रकल्पात संजिवनी सेवा ट्रस्ट या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने ग्राम उर्जाला मदत केली आहे.

image


ठाणे जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात सात गावांतील २०० घरांना वीज पुरवठा करणारी ३८ किलो वॅट पीकची सौर उर्जा यंत्रणा, १५ शेती पंप यंत्रणा तयार करून ग्राम उर्जाने आणखी मोठी उडी मारली. प्रगती प्रतिष्ठान ही संस्था या भागात आधीपासून कार्यरत आहे. या संस्थेच्या मदतीने ही सात गावं उजळून निघाली. त्यांना नळ योजनेतून घराजवळ पाणी मिळू लागलं. पाणी भरण्यासाठी दिवस खपवणाऱ्या घरातील महिलांना मुलांच्या शिक्षणाकडे, संगोपनाकडे लक्ष द्यायला वेळ मिळू लागला. स्वच्छ पाणी मिळू लागल्यामुळे आरोग्यातही सुधारणा झाली. इतकी वर्ष जगापासून तुटलेल्या या पाड्यांवरील लोकांचा टीव्हीमुळे जगाशी संपर्क आला. या प्रकल्पाला आयसीआयसीआय बँकेने एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले. कंपनीने सौर उर्जेबरोबर बायोगॅस प्रकल्पही उभे केले आहेत. मुंबईजवळ केशवसृष्टीत तसंच एस्सेल प्रोपॅक कंपनीत हे प्रकल्प उत्तमरित्या सुरू आहेत. पुण्याजवळ कोळवण इथं पाइपलाईनमधून गावातील घरांत गॅस पुरवठा करण्याचा प्रकल्पही यशस्वी झाला आहे.

image


‘ग्राम उर्जा सोल्यूशन्सच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. जर्मनी, स्वीडन, जपान, स्पेन, आफ्रिका खंडातील देशांतील अनेक विद्यापीठांचे प्राध्यापक, विद्यार्थी अभ्यासासाठी ग्राम उर्जाच्या प्रकल्पांना भेटी देऊन गेले. अनेकांनी त्यावर निबंधही सादर केले आहेत. ऑब्झर्व्हर्स रिसर्च फाउंडेशनने ग्राम उर्जाला सोलर हिरो - २०१४ हा पुरस्कार देऊन गौरवले आहे. आजही इंटरनेटवर माहिती वाचून अनेक इंजिनीअर्स आमच्याकडे नोकरी करण्यासाठी सीव्ही पाठवतात,ʼ असे प्रसाद कुलकर्णींनी आवर्जून सांगितले.

'नंदुरबारमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सौर उर्जा प्रकल्प, ओरिसा, झारखंडमध्ये २०० घरांना वीज देण्याचा प्रकल्प यावर सध्या कंपनीचे इंजिनीअर्स काम करत आहेत. ‘देशांत अनेक खेड्यांत अद्याप वीज पोहोचलेली नाही. भविष्यात ती पोहोचणे अवघड आहे. ही गावे शोधून रूरल इलेक्ट्रिफिकेशन करणे, आवश्यक तिथे बायोगॅस प्रकल्प उभारणे आणि निमित्तमात्र बनून खेड्यांतील भारतीयांचे जीवन सुसह्य करणे हाच आमचा प्रयत्न आहे. दरेवाडीतील विजेमुळे क्रिकेटचा सामना पहायला जमलेल्या तरुणांनी आमच्या प्रयत्नांवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. असाच विश्वास देशातील अन्य भागांत निर्माण करायचा आहे,ʼ असं अंशुमन लाट यांनी सांगितलं.

शहरांत राहून, टीव्हीवरच्या बातम्या पाहून मते मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्रामीण भागात काम करणाऱ्या व बदल घडवणाऱ्या ग्राम उर्जा सोल्यूशन्सच्या टीममधील अनंत कवडे, किरण औटी, प्रिया पुरवार, आशीष कुमार सिंग, राहुल कारेकर, गणेश शेणॉय, आशुतोष, प्रियम काकोटी बोरा, श्रेयस भालेराव हे तरुण शिलेदार प्रयत्न करतात नवा भारत घडवण्याचा. त्यांच्या कार्याला युवर स्टोरीच्या शुभेच्छा. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

ग्रामीण भारताचे चित्र पालटणे हेच ध्येय : झरिना स्क्रूवाला 

पुणे स्थित ऑटो-रिक्षा जाहिरात स्टार्टअप प्रॉक्झिमिटीने '1क्राऊड'च्या सहाय्याने उभारला एक कोटी रुपयांचा निधी

गावांच्या विकासासाठी व्यावसायिक कारकीर्दसोडून २२वर्षाच्या मोना कौरव बनल्या महिला सरपंच, वर्षभरात पालटले चित्र!

    Share on
    close