सलाम ‘एकहाती’ जिद्दीला!

0

अपंग म्हणून आम्ही कधीही समाजावर ओझे होऊन राहणार नाही. आम्हालाही संधी द्या, त्या संधीचे सोनं करण्याची आमचीही ताकत आहे. आम्हा अपंगांना समाजाने एक शाबासकीची थाप आमच्या पाठीवर दिली, तर नक्कीच आम्ही चांगली नव्हे उच्च दर्जाची कामगिरी करू....हे बोल आहेत जन्मतः असलेल्या पोलिओ मुळे पायातील कमकुवतपणामुळे अपंगत्व प्राप्त झालेल्या; पण खचून न जाता अपंगांच्या राष्ट्रीय विशेष ऑलिम्पीक मधील व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत भारतीय संघाला सहाव्या स्थानी आणणार्‍या तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पदके प्राप्त करणार्‍या अपंग खेळाडू संदीप प्रल्हाद गुरव याचे....

जन्मतःच अपंग असूनही कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग यश मिळवण्याचे ध्येय व चिकाटीच्या जोरावर नागोठणे यासारख्या छोट्याशा खेड्यात राहणारा संदीप प्रल्हाद गुरव या तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राष्ट्रीय पातळीवरील व्हिलचेअर स्पर्धेप्रमाणेच इतर क्रीडा प्रकारांमध्येही घवघवीत यश प्राप्त करून अनेक पदके प्राप्त केली आहेत.स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे भाग्य दैवानं त्याला दिलेच नाही; पण आपल्या ‘मनगटा’च्या जोरावर त्याने सगळ्या धडधाकटांना अचंबित करून सोडलं आहे! स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही तरीही आपल्या हातानं तलवार पकडत समोरच्या खेळाडूला ‘पळता भुई थोडी’ करण्याचं कसब त्याच्यात आहे!

संदीप गुरव याचे वडील प्रल्हाद गुरव हे कुस्तीपटू आहेत. तसेच आई रेखा गुरव या सायकलींग आणि ऍथलेटिक्समध्ये तरबेज आहेत. त्यामूळे संदीप गुरव यांना त्यांच्या लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राचे बाळकडू प्राप्त झाले होते. संदीप याने इयत्ता ५ वी पासूनच तलवारबाजीचे धडे घेण्यास सुरवात केली. त्यानंतर शाळेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या प्रत्येक क्रीडा स्पर्धेत तो सहभाग घेऊ लागला. हळहळू राज्यस्तरीय पातळीवर तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पदके प्राप्त केली. आपल्या पायांत ताकद नाही म्हणून काय झाले? आपल्या हातात तर ताकद आहे ना.... असे बोलून राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास सुरवात केली. ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतःच्या क्रीडाकर्तृत्वाची चोख प्रचिती देत अपंगाच्या राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत १ रौप्यपदक, २ कांस्यपदक, तसेच राष्ट्रीय वूडबॉल स्पर्धेत ६ वेळा सहभागी होत १ सुवर्णपदक, ४ कांस्यपदक प्राप्त केले आहेत. तसेच मस्कतच्या दुसर्‍या एशियन बीच गेम स्पर्धेत सहभाग घेऊन भारतीय ऑलिम्पिक संघाचे प्रतिनिधित्व करून भारताला सहाव्या स्थानावर आणण्याचा झेंडा त्याने रोवला आहे. फक्त व्हिलचेअर तलवारबाजीतच नव्हे तर राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पदके मिळविली आहेत. तसेच ३ वेळा वरिष्ठ गटातील राष्ट्रीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याचप्रमाणे कराटे, किक बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय व राज्य स्तरावर अनेक पदके मिळविली आहेत. एव्हढेच नाही तर राज्यस्तरीय तलवारबाजीच्या वरिष्ठ गटात आठ वेळा, वरिष्ठ राज्यस्तरीय रिंग टेनिसस्पर्धेत सहावेळा सहभागी झाले आहेत. अपंगांच्या राज्यस्तरीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत चार पदके व एथेलेटीक्समध्ये १ सुवर्ण व १ रौप्य, तायक्वांदो मध्ये सुवर्ण तसेच जिल्हास्तरावर विविध खेळांमध्ये अनेक पदके प्राप्त केली आहेत. २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोंबर दरम्यान पुण्यात झालेल्या रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून नागोठणे शहराचे नाव उंचावले आहे. गुरव यांच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाकडून त्यांना रायगड जिल्ह्यातील २०१२ सालातील गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे. १६ ते २० डिसेंबर दरम्यान यु.ए.ई. मधील शारजा शहरात जागतिक व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धा होत आहे. नुकतेच या स्पर्धेसाठी संदीप गुरव या खेळाडूची भारताच्या संघात निवड झाली असून त्यांच्या निवडीबाबतचे पत्र चेन्नई येथील व्हीलचेअर फेन्सींग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव के. आर शंकर अय्यर यांच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे. भारतीय संघात निवड झालेले संदीप गुरव हे रायगडचे व पर्यायाने महाराष्ट्राचे सुद्धा एकमेव खेळाडू असल्याने ५५ ते ६० देशांचा सहभाग असलेल्या या जागतिक स्पर्धेत नागोठणे व रायगडचा खेळाडू सहभागी होतोय ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. संदीपच्या या उंचभरारीचे कौतूक नक्कीच आहे, मात्र वाईट एकाच गोष्टीचे वाटते की जागतिक व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही. नियतीनं दिलेल्या अपंगत्वावर मात करुन संदीप ऑलिम्पिकच्या पटलावर चमकला खरं. मात्र, हा खेळाडू आपल्या आर्थिक परिस्थितीने अपंग झाला आहे. संदीप गुरव हा गरीब परिस्थितीतून यशस्वी लढा देणारा खेळाडू असून त्याच्या पुढील प्रवासासाठी आर्थिक अडचणींना त्याला सामोरे जावे लागत आहे. नुकतीच त्याची निवड झालेल्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महागडे साहित्य लागत असल्याने एकूण अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामूळे इतका मोठा खर्च आपल्या बिकट परिस्थितीमुळे उचलू शकत नसल्याची खंत संदीप याने व्यक्त केली आहे. त्यामूळे दानशूर क्रीडाप्रेमींनी, व्यापारीमंडळ, उद्योगपतींनी गुरव यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या raigad.dist.fencing.assogmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा किंवा सदर मदत संदीप गुरव A/c no-125210110003259,IFC- BKID0001252 या बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करू शकता. आपल्या सहकार्याने नक्कीच तो आपल्या भारत देशाचे, महाराष्ट्राचे व रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल. भारतातल्या क्रीडाक्षेत्राची अवस्था पाहता संदीपसारख्या युवकाचं हे यश आणखीच डोळ्यांमध्ये भरतं. मात्र, हा खेळाडू पदवीप्राप्त असून सुद्धा अद्याप त्याला कोणत्याही प्रकारची नोकरी प्राप्त झाली नाही, याचीच एक खंत वाटते. तरीही त्याच्या ‘एकहाती’ लढ्याला सलाम!