मोदी यांच्या चलनी नोटा बंदीच्या अर्थक्रांती निर्णयाचे कर्ते : अनिल बोकील

1


मागील मंगळवारी सा-या जगाला अमेरिकेच्या अध्यक्षपदी मध्यरात्रीनंतर काय बदल होणार याचे वेध लागले होते,आणि काही तास आधी भारतात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न भुतो न भविष्यती असा होत्याच नव्हते करणारा निर्णय जाहीर करून आर्थिक क्रांतीच्या नव्या अध्यायाचे सुतोवाच केले. या निर्णयामागे होता पुण्यातील एका मराठी सेवाभावी संस्थाचालकाच्या ध्यासपर्वाचा इतिहास, अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या अनिल बोकील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा हा परिणाम होता.

ऑगस्ट २०१४मध्ये महाराष्ट्रातील या संस्थेने मोदी सरकारच्या मंत्रिमंडळासमोर एक सादरीकरण केले होते त्याचा विषय होता व्यवस्थेतून काळापैसा कसा हद्दपार करता येईल. मंत्रिमंडळाने यावर अनेक प्रश्न केले आणि या सा-या उपाय योजनांतून कोणते सकारात्मक परिणाम घडू शकतात याची माहिती मागितली. याबाबत गुप्ततेच्या अटीवर बोकील यांच्या संस्थेतील एका जाणकार व्यक्तीने सांगितले की, त्या सादरीकरणानंतर मोदी यांच्या पिएमओ मधुन वरिष्ठ अधिकारी सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होते त्यानंतर भाजपाच्या मुख्यालयात देखील याबाबतचे सादरीकरण भाजपाच्या नेत्यांसमोर पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. इतकेच नाहीतर या संस्थेचा दावा आहे की, मोदी पंतप्रधान होण्याआधीपासून त्यांनी जुन्या चलनी नोटा रद्द करण्याबाबत त्यांच्याशी संपर्क केला होता. सनदी लेखापाल आणि अभियंता असलेल्या बोकील यांच्यामते याच मुद्यावर त्यांनी त्यावेळी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांची देखील भेट घेतली होती जेणेकरून देशासमोरच्या आर्थिक संकटातून बाहेर पडता यावे आणि देशाच्या विकासाची गती मिळावी.

डिसेंबर २०१३मध्ये आपण मोदी यांची प्रथम भेट घेतली असा दाव करत बोकील म्हणतात की त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आपल्या अर्थक्रांती गटाच्या सदस्यांसह त्यांनी लालकृष्ण आडवानी यांची देखील भेट घेतल्याचा ते दावा करतात. दोन वर्षांनी ज्यावेळी मोदी पंतप्रधानपदी आले त्यानंतर जुलै २०१४ मध्ये त्यांची आपण पुन्हा भेट घेतल्याचे बोकील सांगतात. त्यानंतर ऑगस्ट २०१४मध्ये आपण मंत्रिमंडळासमोर काळापैसा कसा नामशेष करता येईल याबाबतचे सादरीकरण केले असे ते म्हणतात.

त्यांच्यामते सन २०००पासूनच त्यांनी भाजपाच्या सा-याच ज्येष्ठ मंत्र्यांना याबाबत भेटून सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या भेटीत मोदी यांनी आम्हाला ९० मिनीटे वेळ दिला होता. त्यांनी आमच्या सूचनांचा नक्कीच त्यांना उपयोग होणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते, आणि तीन वर्षांनी पुन्हा भेट झाली त्यावेळी त्याबाबत कामाला प्रत्यक्षात सुरुवातही केली होती.


मोदी यांनी आता जो निर्णय घेतला आहे त्याकडे पाहताना हा केवळ अत्यंत धाडसी आणि खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला असेच म्हणावेसे वाटते असे सांगून ते म्हणाले की, ज्या गतीने त्यांनी हा निर्णय घेतला त्यासाठी मी त्याना व्यक्तिश: धन्यवाद दिले. सा-या जगाला माहिती आहे की ते साहसी राजकारणी आहेत. त्यांच्या या निर्णयाने भारतीय आर्थिक व्यवस्था काळाबाजाराच्या कचाट्यातून वाचणार आहे. आपल्या चलनात ८०% चलनी नोटा हजार आणि पाचशे रुपयांच्या होत्या. त्याचमुळे बाजूच्या देशातून बनावट नोटा वेगाने त्यात भरणा केल्या जात होत्या. हजार रुपयांची बनावट नोट तयार करायला केवळ तीन रुपयांचा खर्च येतो. याचा अर्थ केवळ तीन रुपये खर्च करून बाजूच्या देशातून आपल्या देशात ९७७ रुपयांचे खोटे चलन टाकले जाते. आम्ही जुलै२०१६ मध्ये मोदी यांच्याशी शेवटचे बोललो होतो पण इतक्या झपाट्याने हा निर्णय घेऊन टाकतील असे आम्हाला वाटले नाही. सध्याच्या करभरणा प्रक्रिया सुध्दा सुधाराव्यात असा त्यांना आमचा आग्रह आहे त्यात एकाच कराची वसुली करून सर्व प्रकारच्या करांची वसूली करण्यात यावी हा प्रमुख मुद्दा आहे. मोदी यांनी देशाच्या आर्थिक क्षेत्रात क्रांती करणारा निर्णय घेऊन चांगली सुरुवात केल्याने आम्ही सर्वात जास्त आनंदी आहोत.

मोठ्या चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर आता ५६ प्रकारच्या करांच्या जाळ्यातून देशाच्या १३०कोटी जनतेला मुक्ती देण्याचे काम बाकी आहे. नोटबंदीने केवळ पन्नास टक्के काम झाले आहे. देशातील केवळ २०टक्के व्यवहार धनादेशाने होतात आणि ८०टक्के रोखीने होतात त्यामुळे देशात खेळते चलन किती आहे याचा कुणाला अंदाज येत नाही, त्यामुळे समाज विघातक शक्ती या खुल्या चलनाच्या मदतीने त्यांची असामाजिक कामे वेगाने करत असतात. हा व्यवहारांतील ८० टक्के असलेल्या पैशाला सरकारी दृष्टीक्षेपात आणला तर त्यातून देशाच्या करांच्या माध्यमातून सरकारचे उत्पन्न वाढेल आणि असमाजिक कामे करणाऱ्यांवर अंकूश ठेवता येईल. त्यातून बेरोजगारीच्या प्रश्नावर देखील नव्याने उपाय योजना करता येणे शक्य होणार आहे.

या प्रस्तावाबाबत आम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना वेळोवळी भेटलो आहोत, त्यात कॉंग्रेस प्रमाणे शिवसेनेचे त्यावेळचे नेते सुरेश प्रभू यांचाही समावेश होता आता ते देखील भाजपात आहेत मात्र त्यांनी त्यावेळी या योजनेबाबत उत्सुकता दाखवली होती. आम्ही माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आणि राहूल गांधी यांनाही भेटलो होतो त्यावेळी राहूल यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले मात्र आम्हाला कॉंग्रेसच्या कोअर समितीच्या सदस्यांना भेटा असा सल्ला दिला होता असा दावा बोकील करतात. मोदी यांनी आम्हाला सुरुवातीला दहा मिनिटांचा वेळ दिला होता मात्र नंतर त्यांनी सुमारे दोन तास आमचे सारे मुद्दे समजावून घेतले होते याचा उल्लेख बोकील आवर्जून करतात.

सन २०००मध्ये पुण्यातील दहा-बारा अर्थविषयक क्षेत्रात काम करणा-यांच्या या सेवाभावी संस्थेत आता लाखभरापेक्षा जास्त सनदी लेखापाल आणि अभियंता तसेच सारस्वत एकत्रित आले असून त्यांच्या मध्ये देशासमोरच्या प्रमुख मुद्यावर चर्चा आणि विचार विनीमय होत असतो असे बोकील म्हणाले.