मुलांना निसर्गाच्या जवळ आणण्याचा सर्पतज्ज्ञांचा अनोखा प्रकल्प

मुलांना निसर्गाच्या जवळ आणण्याचा सर्पतज्ज्ञांचा अनोखा प्रकल्प

Monday March 14, 2016,

5 min Read

बेंगळुरूचे रहिवासी आणि प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ गेरी मार्टिन यांचं बालपण शेतातच गेल्यामुळे ते निसर्गाच्या एवढ्या जवळ पोहचले. त्यांच्या प्रत्येक श्वासात निसर्ग सामावलेला आहे. भारतातले पहिले नॅशनल जिओग्राफिक एडव्हेंचर म्हणून त्यांची निवड झाली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांचा पहिला पाळिव प्राणी होता त्यांच्या शेतावरील साप! शहरातल्या मुलांना निसर्ग समजायला मदत व्हावी आणि ते निसर्गाच्या जवळ यावेत याकरता त्यांनी ‘निसर्ग संवर्धन केंद्र’ सुरू केलं आहे. हे केंद्र त्यांच्या रोजीरोटीचं साधनंही आहे. आपली इच्छा असेल तर आपल्या छंदालाच आपला व्यवसाय बनवता येतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

image


साप आणि जंगल हे दोघेही गेरी मार्टिनना चांगले ओळखतात असं म्हटल्यास त्यात अतिशोयक्ती असणार नाही. अभ्यासात ते कधीच प्रवीण नव्हते. त्यांना त्यांच्या जंगल्यातल्या प्राणीमित्रांना घरी आणायला नेहमी आवडायचं. आपल्याला वाटतं, शेतावर राहणं म्हणजे खूप मजेशीर अनुभव असेल. पण गेरी सांगतात, बऱ्याचदा त्यांच्याकडे वीजच नसायची. शाळेत जायला फक्त एकच बस. माझ्या समवयीन मुलांपेक्षा मी एका वेगळ्या वातावरणात राहत होतो.

लहानपणी आजोबांसोबत वेळ घालवणं त्यांना खूप आवडायचं. निसर्ग वाचायला गेरी आपल्या आजोबांकडूनच शिकले. गेरी आपल्या आजोबांच्या आठवणीत रमतात. “मला जंगली कोब्रा आजोबांनीच पहिल्यांदा दाखवला. कोब्रा आमच्या समोर असताना त्यांनी म्हटलं, ‘घाबरु नकोस, तो निघून जाईल’. आम्ही त्याचा उभारलेला फणा आणि डोकं न्याहाळत होतो. काही सेकंदात तो गपचूप निघून गेला. त्यावेळी मला जाणवलं अरे मी सापांना न्याहाळू शकतो आणि यात काही धोकाही नाही”.

image


अशा वातावरणात वाढल्यामुळे साहजिकच गेरी यांचा कल निसर्गाकडेच राहिला आणि मग यातच करिअर करायचं त्यांनी ठरवलं. मद्रास क्रोकाडाईल बँकेत त्यांनी रोम व्हिटकेर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाचे शास्त्रोक्त धडे गिरवले. गेरींना रानात नक्की आपल्याला काय आवडतयं हे कळलं. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वातलं अनोखं दालनं त्यांच्याकरता इथं खुलं झालं. मगरींपासून ते कोब्रापर्यंत सर्वांचा जवळून अभ्यास करता आला. क्रॉक बँकेत क्यूरेटरचं काम करताना एका असाइनमेंटचा भाग म्हणून ते फिल्म बनवत होते. त्यादरम्यान नॅशनल जिऑग्राफिकडून संधी मिळाली. भारतातले पहिले नॅटजिओ एडव्हेंचरर म्हणून त्यांची निवड करण्यात आली. साप आणि मगरींच्या डॉक्युमेंटरीज बनवणे आणि जगभरातल्या प्रख्यात संशोधकांसोबत काम करण्याचा रोचक अनुभव त्यांना नॅशनल जिऑग्राफिसोबत मिळाला.

टेलिव्हिजनमधलं करिअर सुरू असताना त्यांना आता स्वतःचं काहीतरी सुरू करावसं वाटू लागलं. त्यांनी टीव्हीवरच काम थांबवलं. आणि सुरू झाला ‘द गेरी मार्टिन प्रकल्प’. मार्टिन यांचा फार्म आता बेंगळुरूवासीयांना नवीन नाही. एका दिवसाच्या सहलीकरता इथे बरेच जण येत असतात. सुरूवातीला मात्र या प्रकल्पात शेतावरची सहल आणि जंगलातलं साहस असचं काहीसं असेल असं लोकांना वाटलं. सध्या बोलबाला असणाऱ्या टुर कंपन्यांच्या ग्रीन बिजनेसमुळे असं झाल्याचं गेरी सांगतात. या कंपन्यांनी आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहावं अशी विनंती गेरी करतात.

गेरी मार्टिनच्या प्रकल्पात मुलांकरता असं आहे तरी काय?

“आम्ही मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जातो. निसर्गात दडलेल्या गोष्टींचा अनुभव घ्यायला शिकवतो. जेणेकरून त्यांच्यातल्या छुप्या क्षमता बाहेर येतील आणि त्यांचा विकास होईल. निसर्गाचा आवाज कॅमेऱ्यात कसा टिपायचा, वेगवेगळं वातावरण, प्राण्यांचा मागोवा घेणं, छोट्या पातळीवर पर्यावरण प्रकल्प हाताळणे, भोवतालच्या निसर्गाची योग्य काळजी घेणं या बाबी आमच्या प्रकल्पात मुलांना शिकता येतात. आमच्या हुणसूर इथल्या प्रकल्पाजवळील शाळांच्या मदतीने तलाव संवर्धनाचं काम आम्ही पुढील काही महिन्यात करणार आहोत”.

image


गेरींकरता सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन या तराजूच्या वेगवेगळ्या पारड्यातल्या गोष्टी नाहीत. ते म्हणतात, “हे माझं जीवन आहे आणि त्याचे काही वेगवेगळे भाग नाहीत. या सर्व गोष्टी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळेच मी माझ्या सर्व कामांकडे नीट लक्ष देऊन ती व्यवस्थितपणे करू शकतो. माझ्या पत्नीलाही निसर्गाची प्रचंड आवड आहे. निसर्गातल्या लहानसहान गोष्टींतून तिला आनंद मिळतो. मुंग्यांची रांग, कोळ्याचं जाळं विणणं किंवा सापाची कात टाकणं सर्व गोष्टी तिला भारावतात. माझ्या प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टींमध्ये मला तिची भक्कम साथ असते. माझ्या कामाचा ती आत्मा आहे”, पण या कामांमध्ये जोखिमही तेवढीच आहे. गेरी त्यांचे मार्गदर्शक रोमसोबत अरुणाचलप्रदेशला गेले होते. त्यावेळची एक आठवण सांगतात, “विषारी सापांच्या दंशावरील उतारावर आम्ही काम करत होतो. मला एका विषारी सापाने दंश केला. दंशामुळे माझ्या शरीरावर काय परिणाम होतोय याचं निरिक्षण करायचं होतं. त्यामुळे माझं रक्त गोठण्याचा कालावधी, नाडीचे ठोके याच्या दर अर्धा तासाने नोंदी घेत होतो. गंमत म्हणजे माझे नमुने घेण्याची काही मिनिटं मात्र शांतता असायची. बाकी पूर्ण वेळ रोम विनोद सांगायचा आणि आम्ही मोठमोठ्याने हसत होतो. पण या मोठ्याने हसण्यामुळे माझ्या जखमेच्या जागी तीव्र वेदना व्हायची आणि माझ्या नाडीच्या ठोक्यांची नोंदणी बाजूला पडली. आम्हां दोघांकरता हसणं हे संजीवनी आहे”.

स्वतःचा व्यवसाय उभारणं गेरींकरता सोपं नव्हतं. टीव्हीला रामराम का केला याचीही त्यांच्याकडे विचारणा होतच असते. ते सांगतात, “मी चारचौघांसारखं शिक्षणाचे धडे घेतले नाहीत या गोष्टीचा मला मोठा सामना करावा लागला. नॅशनल जिऑग्राफिकसोबत काम केल्यावर ही खंत कमी झाली. मी टीव्हीवर काम करणं का सोडलं असं लोक मला अजूनही विचारतात. पण मला या प्रश्नाचं उत्तर मला शब्दांत सांगता येत नाही. माझ्या मूळांकडे मला परत यायचं होतं. माझ्या मनाशी, विचारांशी प्रामाणिक राहून मला काहीतरी अद्भूत मिळवण्याची आस होती. स्वतःला सिद्ध करायचं होतं”. गेरी आणि त्यांच्या प्रकल्पाचा वेगळेपणा आणि यशस्वीतता त्यांच्या या विचारांच्या पायावरच आहे. लहान मोठ्या सगळ्यांनाच त्यांच्या या प्रकल्पाचं आकर्षण वाटतं. या प्रकल्पाला भेट देणाऱ्या प्रत्येक लहान मुलालाही निसर्गाची मैत्री करावीशी वाटायला हवी याकडे त्यांचा कटाक्ष असतो. प्रत्येकाला न्याय देता यावा याकरता लहान गटांसोबत ते काम करतात. शाळांचे मोठे गट किंवा कॉर्पोरेट्सचे मोठे प्रकल्प हातात घेत नाहीत.

image


स्वतःचा ग्रीन बिझनेस सुरू करण्याकरता आर्थिक समस्याही आल्या पण त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली. आपल्या या सगळ्या अनुभवांबाबत ते म्हणतात, “डायनिंग टेबलवर बसून काहीतरी काम करताना समोरच्या बारवर बदकं बसली आहेत, तळ्यात राजहंस पोहतोय यापेक्षा सुंदर अजून काय असतं? या वातावरणात कोणतीही समस्या आली तर त्यातून मार्ग सहज निघतो”.

तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला जर निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर गेरी मार्टिन प्रकल्पाला जरूर भेट द्या. पर्यावरणाशी मैत्री करून अलोट मजा कशी घेता येते याची प्रचिती गेरींच्या या प्रकल्पात येते.

लेखिका – बहार दत्त

अनुवाद – साधना तिप्पनाकजे