एक अशी बँक जिने सरकारी मदतीशिवाय महिलांना बनविले आहे स्वावलंबी, गावातल्या महिलांना जिथे कर्जात दिले जातात गहू!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा आपल्या जनधन योजनेची सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांचा मुख्य उद्देश हाच होता की, गावात राहणा-या लोकांचे बँकेतील खाते उघडले जावे आणि पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हावेत. गावातल्या सरळ साध्या लोकांना बँकेची जास्त माहिती नसते, जेव्हा त्यांच्या खात्यात पैसे असतील, तेव्हा ते आपल्या पैशाने आवश्यक कामे करू शकतील. त्यामार्फत सरकारने करोडो लोकांच्या खात्यात पैसे जमा देखील केले आहे. मात्र, काही लोक असेही आहेत, जे पंतप्रधानांच्या या योजनेपूर्वी काही असे करत आहेत, जे खूपच आश्चर्यचकित करणारे आहे.

आम्ही तुम्हाला अशा काही महिलांबद्धल सांगू इच्छितो, ज्या उत्तर प्रदेशच्या कानपूर खेडेगावात राहतात. ज्यांनी एका नव्या विचाराला नवी आशा दिली आणि महिलांना आत्मनिर्भर बनविले. कानपूर खेडच्या भिखमपूर गावातल्या महिलांनी अशी एक बँक बनविली आहे, ज्याबाबत ऐकून कुणीही आश्चर्यचकित होईल, कारण या गावातल्या महिलांनी एका गव्हाच्या बँकेची निर्मिती केली आहे. या गव्हाच्या बँकेत गावातील प्रत्येक स्त्री आपापले गहू येथे जमा करते. महिलांकडून जमा करण्यात आलेले गहू व्यवस्थित राहावे याची जबाबदारी गव्हाच्या बँकेची असते. या बँकेतून गावातल्या गरजूंना गरज भासल्यास गव्हाचे कर्ज दिले जाते. या बँकेतून गव्हाचे कर्ज घेणा-या महिला आपले काम झाल्यानंतर विना व्याजाने कर्ज म्हणून घेतलेले गहू दुपटीने परत बँकेत जमा करतात.

गव्हाच्या बँकेची सुरुवात करणा-या रश्मी यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले की, “तीन वर्षापूर्वी आमच्या गावात दुष्काळ पडला होता, ज्यात अनेक कुटुंब अन्नाच्या एकेका दाण्यासाठी तरसत होती, तेव्हा आम्ही सर्व महिलांनी मिळून, या गव्हाच्या बँकेची सुरुवात केली होती, ज्यात सर्वांनी मिळून गहू एकत्र करून ‘पूजा ग्रेन बँके’ची निर्मिती केली. त्यानंतर या बँकेपासून त्या महिलांना गव्हाचे कर्ज देण्यात आले. जेव्हा पिक उगवले, तेव्हा त्या लोकांनी स्वतःहूनच गहू जमवून बँकेला परत केले. त्यानंतर आमची ही बँक इतकी यशस्वी झाली की, आज अकबरपूरच्या क्षेत्रातील २०पेक्षा अधिक गावात ही गव्हाची बँक यशस्वीपणे चालत आहे.

या बँकेची एक विशेष बाब आहे की, गव्हाचे कर्ज घेणारी प्रत्येक महिला वेळेवर आपल्या गव्हाचे कर्ज चुकवते. आणि हीच मोठी बाब आहे की, या गव्हाच्या बँकेसाठी महिलांना सरकारच्या कुठल्याही मदतीची गरज पडत नाही, किंवा कुठल्याही व्यापाराची गरज जाणवत नाही.

गावातील एक महिला विमला यांचे म्हणणे आहे की, “माझ्या मुलाचा वाढदिवस होता. घरात गहू नव्हते. मी बँकेतून गहू कर्जावर घेतले आणि नंतर जेव्हा माझ्याकडे गहू आले, तेव्हा मी स्वतःहूनच त्यांना दुपटीने गहू परत केले.” मोठी बाब ही आहे की, महिलांमध्ये आपसातील ताळमेळ इतके चांगले आहेत की, प्रत्येक जण दुस-यांच्या मदतीसाठी तयार राहतात. यामागे एकच उद्दिष्ट आहे की, प्रत्येक घरात चूल पेटावी, कुणी उपाशी राहू नये. गावातील महिला नकळत ते काम करत आहेत, जे सरकार करत आहे. म्हणूनच तर म्हटले जाते की, महिलांनी जर एखाद्या गोष्टीचा निश्चय केला तर, त्या यशस्वी होतातच. याचे जिवंत उदाहरण आहे, गव्हाची बँक.!

लेखक: विजय प्रताप सिंह

अनुवाद : किशोर आपटे.