वॉक इन द डार्क.... एक अनोखा प्रयोग

वॉक इन द डार्क.... एक अनोखा प्रयोग

Tuesday March 22, 2016,

3 min Read

डोळे बंद करुन चालण्याचा प्रयत्न केलाय कधी. डोळे बंद केल्यावर आजूबाजूचा अंधार आपलं जग व्यापून टाकतो. मग हाताने चाचपत एक एक पाऊल टाकावं लागतं, पुढे नक्की काय आहे याचा अंदाज घेत. अंधांचं आयुष्य असंच अंदाज घेत चालतं, समोर नक्की काय आहे हे दिसत नाही. त्यामुळे त्याचा अंदाज तरी कसा लावणार, सर्व जग आवाजाचं आणि स्पर्शाचं, आवाज हाच त्यांचा वाटाड्या. हातातली काठी ठोकत ठोकत रस्त्याचा अंदाज घेत अगदी डोळस माणसांपेक्षाही जास्त वेगाने जाणारे अंध बांधव पाहिले की आश्चर्य वाटतं. आपण डोळस असतानाही अनेकदा ठेचाळतो, पण हे लोक आपल्या आवाजाच्या आणि स्पर्शाच्या जगात इतके पारंगत झालेले असतात की ठेचाळणं नसंतच, असतं फक्त अंधाऱ्या वाटेवर अभिमानानं आणि आत्मविश्वासानं चालणं. हा आत्मविश्वासच त्यांच्या जीवनाचा गाभा असतो. आसपासच्या आवाजाची दुनिया त्यांना नेहमी नवनवीन मार्ग दाखवत असते. या मार्गावर त्याची सतत वाटचाल होत असते आणि ते आपल्या इप्सीत स्थळी सुखरुप पोचत असतात. एखाद्या डोळस व्यक्तीला पट्टी बांधली तर त्याची अवस्था कशी होईल. त्या अंधाऱ्या जगाची त्याला भीती वाटू लागते. आत्तापर्यंत उघड डोळ्याने पाहिलेल्या जगाची फक्त काळ्याकुट्ट अंधारानं जागा घेतलेली असते आणि यातूनच या भीतीचा जन्म झालेला असतो. सर्वसामान्य माणूस एक दिवस काय तर काही मिनिटंही अशा अंधाऱ्या जगात राहू शकत नाही. पण मुंबईच्या वरळी सीफेसवर अनेकांनी या अंधाऱ्या जगाचा अनुभव घेतला आणि त्यांना 'वॉक इन द डार्क' ची संकल्पना सुचली. इंडिया व्हिजन इन्स्टिट्यूटनं 'वॉक इन द डार्क' अभियानाला सुरुवात केली. 

image


स्त्यावर चालताना अंधांना नक्की कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, ते त्यांचा मार्ग कसा शोधतात हे सर्व अनुभवण्यासाठी 'वॉक इन द डार्क'ची संकल्पना पुढे आली. सुमारे ७०० हून अधिक लोकांनी वॉक इन द डार्क चा अनुभव घेतला, यात प्रमुख होती अभिनेत्री नंदीता दास. सिनेमाच्या पडद्यावर वेगळ्या भूमिका करणारी नंदीता आपल्या सामाजिक कामासाठी ओळखली जाते. मग ते डार्क कॉम्प्लेक्शनविरोधातली भूमिका असो किंवा मग इतर सामाजिक समस्यांवर तिनं सिनेमातून केलेलं भाष्य असो. तिनं आपली अशी एक ओळख निर्माण केली आहे. नंदीता दास यांच्यामते " हा कार्यक्रम वेगळा यासाठी आहे की तो जगाकडे एका नव्या दृष्टीनं बघायला शिकवतो. ज्यांच्या दृष्टीनं या जगात फक्त अंधार आहे त्यांच्या दृष्टीनं या जगाचं आणखी अस्तित्व आहे ते आहे आवाजाचं जग. या जगात आल्यावर तुम्हाला अंधारात पावलं टाकताना जगाची नव्यानं ओळख व्हायला मदत होते. हे महत्त्वाचं आहे."  

image


वरळी सीफेस वर हा वॉक आयोजित करण्यात आला होता. भारतातल्या ऑस्ट्रेलिया दूतावासानं यात सह आय़ोजनाची भूमिका बजावली होती. याचा उद्देश हाच होता की डोळ्यांची काळजी घ्या. अंधाऱ्या वाटेतून जाताना अंधाना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं. नक्की काय घ़डतं याचा छोटासा अनुभव यावा अशी या वॉक इन द डार्कची संकल्पना होती. जी नंदीता दास यांनी उचलून धरली. नंदीतासहीत ७००जण वरळी सीफेसवर पोचले आणि त्यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधली. आता या नव्यानं दृष्टिहीन झालेल्या लोकांना खऱ्या खुऱ्या अंध व्यक्तींनी रस्ता दाखवला. त्यांना आवाजाचे संकेत समजावून सांगितले. हे त्यांच्यादृष्टीनं आपली ही अंधारात चालायची कला इतरांना शिकवण्यासारखं होतं. " वॉक इन द डार्क याची संकल्पना पहिल्यांदा समोर आली ती दृष्टीहीनांच्या रोजच्या जगाशी डोळस लोकांना अवगत करण्यासाठी. त्याचबरोबर डोळ्याची काळजी कशी घ्यावी, नेत्रदानासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यावं हा मुख्य उद्देश होता. असं इंडिया व्हिजन इन्स्टीट्युटचे सीईओ विनोद डॅनियल यांनी सांगितलं. 

image


नॅशनल स्कूल फॉर ब्लाईंड, कमला मेहता स्कूल फॉर ब्लाईंड, नयन फाऊंडेशन, सॅल्वेशन आर्मी वर्किंग ब्लाईंड मेन्स होस्टेल, आयटीएम मुंबई यांनी या अनोख्या वॉक इन द डार्कमध्ये सहभागी होऊन लोकांना दृष्टीचं महत्त्व पटवून दिलं. 

image