‘ती’ची कहाणीच अनोखी!

0

नेहमीच समाजाकडून अपंगासाठी उपेक्षा होत असते. मात्र त्यांच्याकडे इतरांपेक्षा वेगळं काही तरी करण्याची जिद्द असते. अनेकजण अपंगत्व आल्याने निराश होतात, खचून जातात आणि परिस्थितीशी झुंज देण्यास ते कदापि तयार नसतात. लगेचच हार मानतात. मात्र त्यातून जोमाने उभे राहणारे क्वचितच असतात. म्हणूनच 'ती'ची कहाणी वेगळी आहे.

आयुष्यात अनेकजण हातपाय असुनही आलेल्या अपयशाने खचून जातात आणि हाती घेतलेले काम अर्ध्यावर सोडून देतात. मात्र आपल्याकडे हिंमत असेल तर यशाच्या शिखरापर्यंत सहज पोहचू शकतो हे बालपणीच अपंगत्व आलेल्या २३ वर्षीय मनालीने दाखवून दिले आहे.

मनाली कुलकर्णी ही ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारी आहे. ती तिच्या बालपणीच स्पायना बिफिडा (मणक्याचा आजार) सारख्या आजाराने ग्रासलेली. मात्र तिने तसेच तिच्या कुटुंबाने कदापि हार मानली नाही. ‘मुकं करोती वाचालम्, पंगू लंघयते गिरीम्’ या उक्तीप्रमाणे मेघाने आपल्या अपंगत्वावर मात करीत केलेल्या कलाकुसरीने सर्वांचेच लक्ष वेधले. म्हणूनच ती राष्ट्रीय पदक मिळवू शकली.

दिवसभर घरात टिव्ही पाहत पडलेली असे. कोणीही सामान्य व्यक्ती या सवयीत काही तासांतच बैचेन होणार, तीच अवस्था मनालीचीही झाली. मात्र, शरीर साथ देत नाही. उठून काही करावे म्हटले, तर ते शक्य नाही. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत मनालीवर तब्बल १० वेळा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र तिने त्यातूनही हार न मानता तब्बल ५१ विशेष पदकांची कमाई केली. अपंगत्व असून देखील चित्रकला, पाठांतर, वेशभूषा, नृत्य यासारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तिने ही पदके मिळवली.

२३ वर्षांपूर्वी विज्ञान एवढे प्रगल्भ व प्रगत नसल्याने तिच्या आजारावर उपचार होऊ शकले नाहीत, असे तिच्या आईचे म्हणणे आहे. मात्र तिचा जीवनाशी लढा असाच सुरु आहे. तिला उत्तुंग भरारी घ्यायची आहे. म्हणून तिचे अनेक उपक्रम सुरु आहेत. ती चॉकलेटचे बुके बनवते आणि तिच्याच सारख्या स्पेशल मुलांना देखील ती त्याचे शिक्षण देते.

मनालीची घेतलेली भरारी ही तिने पटकावलेल्या पदके आणि पारितोषिकांमधूनच पाहायला मिळते. मनालीला नॅशनल चिल्ड्रन सायन्स कॉंग्रेसकडून चाइल्ड सायंटिस्ट (बाल वैज्ञानिक) हा पुरस्कार २००५ साली प्राप्त झाला. २००६ साली तिला त्यावेळचे राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याकडून बेस्ट क्रिएटीव्ह चाईल्ड या पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला आहे. एका शॉर्ट फिल्मसाठी ठाणे फिल्म फेस्टीव्हलमध्ये तिला सर्वोत्तम अभिनेत्री आणि बेस्ट मेसेज फिल्मने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कोपरीतील जागृती पालक संघटनेकडून तिला सर्वोत्तम उद्योजिका आणि तिच्या २३ व्या वाढदिवसानिमित्त ठाणे महापालिकेकडून चॉकलेट गर्ल तसेच नवी मुंबई महापालिकेने देखील तिच्या या उत्तुंग भरारी बद्दल तिचा सन्मान केला आहे.

मनालीच्या आई स्मिता कुलकर्णी यांनी मनालीच्या धाडसी प्रवासावर आणि तिने आपल्या अपंगत्वावर मात देऊन दिलेल्या कामगिरीवर ‘तिची कहाणीच वेगळी’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकात मनालीचा संपूर्ण जीवनपटच त्यांनी रेखाटला आहे. ठाण्यातील शाळेपासून असलेली तिची जिद्द आणि आता सुरु झालेला मनालीचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरला आहे. कलाकुसरीने अपंगत्वावर मात करणार्‍या मनालीच्या जिद्दीला मानाचा मुजरा!

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories

Stories by Pramila Pawar