समाजसेवा आणि फिटनेसचे अनोखे गणित मांडणारा हौशी सायकलस्वार

समाजसेवा आणि फिटनेसचे अनोखे गणित मांडणारा हौशी सायकलस्वार

Monday November 23, 2015,

5 min Read

सायकलिंग आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग... या दोन कामांना एकत्र आणणे हे अनेकांना एक कोडे वाटेल. तथापि, खूप गुंतागुतीचे वाटणारे हे कोडे वास्तवात खूप सरळ आहे. पुण्यापासून जवळपास ७५ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आणि पाण्याचा दुष्काळ असणाऱ्या भागात असणारे मांढरदेवी याचे जिवंत उदाहरण आहे. येथील ग्रामस्थ शेती आणि इतर कामांसाठी पावसाच्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात. मात्र त्यांच्या वाट्याला नेहमी निराशाच येते. त्यांची ही समस्या पाहून ‘सेवावर्धनी’ ही स्वयंसेवी संस्था रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रभावी उपाय घेऊन ग्रामस्थांच्या मदतीकरिता पुढे आली.

हा उपाय कागदावर तर खूप चांगला वाटत होता, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध आर्थिक मुद्द्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागणार होता. या प्रकल्पाचा एकूण खर्च सात लाख होता. मिळालेल्या देणगी व्यतिरिक्त या लोकांना यासाठी जवळपास दीड लाख रुपये कमी पडत होते. अशातच त्यांना ‘अर्न ब्लेसिंग’च्या रुपात आशेचा किरण दिसला. एकूण ११ सायकलस्वारांनी पुढाकार घेऊन पुण्यात कात्रज ते मांढरदेवीच्या गडागेवाडीपर्यंत १५४ किलोमीटरचा रस्ता सायकलिंग करुन पार करण्याचे आव्हान स्वीकारले आणि प्रकल्पासाठी जवळपास १.१ लाख रुपयांची व्यवस्था करण्यात यश मिळविले. सोहम सांगतात की यामधील सर्वात चांगला भाग हा होता की या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामस्थांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. ते स्वतःला याचा एक भाग मानू लागले होते.

image


‘अर्न ब्लेसिंग’ने पुढाकार घेऊन दुसऱ्यांची यशस्वीपणे मदत करण्याच्या अनेक उदाहरणांपैकी हे केवळ एक उदाहरण आहे. २०१४ नंतर या लोकांनी विविध उद्देश्यांच्या पूर्ततेसाठी ७ सायकलस्वारींचे यशस्वी आयोजन करुन जवळपास ४ लाख रुपये जमविले आहेत. या रक्कमेचा वापर गरीब मुलांचे शिक्षण, एचआयव्ही बाधित मुलांना सहाय्य, तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन, वॉटर हार्वेस्टिंग, ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब मुलांसाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करुन देणे यासारख्या कामांसाठी केला जातो. सोहम सांगतात, “आम्ही देणगीची व्यवस्था करण्याव्यतिरिक्त एनजीओंना रिपोर्ट तयार करायला, सीएसआर प्रस्ताव तयार करायला आणि त्यांच्यासाठी ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग साहित्य तयार करायला मदत करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. या व्यतिरिक्त आम्ही स्वयंसेवी संस्थांना विविध कार्यक्रमांच्या आयोजनातही मदत करतो.”

‘अर्न ब्लेसिंग’चा मूळ आधार सोहम यांचे सायकल वेड आणि त्यांच्या सकारात्मक पुढाकाराद्वारे समाजाचे ऋण फेडण्याच्या सहज भावनांचे मिश्रण आहे. सोहम सांगतात, “हे एक खूप सामान्य तथ्य आहे की आपण दुसऱ्याला चांगले जीवन जगण्यासाठी मदत करु शकतो आणि हे तथ्य आपल्या चेहऱ्यावर खूप मोठे हसू आणते आणि आम्ही आमच्या प्रत्येक स्वारी किंवा आयोजनानंतर असेच करतो. यालाच आम्ही आशीर्वाद कमवणे म्हणतो आणि तेही एकदा नाही तर वारंवार.”

ही टीम समाजातील प्रत्येक क्षेत्रातून येणाऱ्या स्वार आणि स्वयंसेवकांचे मिश्रण आहे. आपल्या एका वेगळ्या विचारावर विश्वास ठेवणारे सोहम आपल्या टीममध्ये अशा सायकलस्वारांची भरती करू इच्छितात जे सायकलस्वारीवर मनापासून प्रेम करतात आणि समाजाचे ऋण फेडण्याचा विचार बाळगतात. सोहम सांगतात की स्वार त्यांच्याकडे अधिकच्या शोधात परत येत रहातात. ते पुढे सांगतात की ‘अर्न ब्लेसिंग’ आता त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि यामध्ये एकदा सहभागी होणारा नेहमीच पुढच्या सायकलस्वारीसाठी उत्साहित असतो. त्यांच्याबरोबर येणाऱ्या स्वारांना सायकलस्वारीचा जास्तीत जास्त आनंद घेता यावा यावर सोहम यांचा भर असतो. यासाठी ते स्वारांना कुठलेच लक्ष्य निश्चित करुन देत नाहीत. सायकलिंगसाठी उत्साही लोक आपले लक्ष्य स्वतःच ठरवून समाजाच्या मदतीसाठी घेतलेल्या या पुढाकाराचा हिस्सा बनू शकतात.

त्यांच्या सायकलस्वाऱ्या १२० किलोमीटर ते १५० किलोमीटरच्या मधल्या असतात आणि त्यांचे आयोजन फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये केले जाते. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्वारांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळत नाही. प्रत्येक स्वारीवेळी निश्चित केले जाणारे अंतर पाहता सायकलस्वारांचा सर्वात मोठा फायदा हाच असतो की यामुळे त्यांना त्यांचे शरीर सुडौल राखण्यास मदत होते. सोहम म्हणतात, “म्हणूनच आमची टॅगलाईन आहे, ‘आम्ही चरबी जाळतो आणि तुमचे आशिर्वाद कमवतो’.”

image


त्यांचा दृष्टीकोन खूप सरळ आहे. ते ज्यासाठी योगदान करु इच्छितात त्याची सुरुवातीला निवड करतात. त्यानंतर ते काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्याची पार्श्वभूमी व्यवस्थित जाणून घेऊन त्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड करतात. निवड करण्यात आलेली स्वयंसेवी संस्था आणि दुसऱ्या विविध स्रोतांच्या माध्यमातून ते अशा क्षेत्रांबाबत माहिती घेतात ज्यांना कामाची आवश्यकता असते. त्याचबरोबर त्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी किती निधी आवश्यक आहे त्याचा अंदाज घेतात.

त्यानंतर पैसे जमविण्यासाठी ते प्रवासातील प्रत्येक किलोमीटरमागे जमविली जाणारी रक्कम प्रतिज्ञेच्या रुपात विभागून देतात. सोहम सांगतात, “ उदाहरणार्थ, समजा आम्ही वीकएण्डला १०० किलोमीटरची सायकलस्वारी करण्याचा निर्णय घेतला आणि लोकांनी पाच रुपये प्रति किलोमीटरची प्रतिज्ञा घेतली. अशा प्रकारे ५०० रुपये दान केले जातात. लोक आपल्या योगदानासाठी स्वारांची संख्या निवडू शकतात आणि अशा प्रकारे दानाची रक्कम वाढत जाते. जसजशी सहभागी स्वारांची संख्या वाढते तसतशी मदतीची रक्कम वाढते.”

सोहम सांगतात की सायकलस्वारीमध्ये सहभाग घेणाऱ्या स्वारांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळत नाही. पारदर्शी व्यवहार ठेवण्यासाठी ‘अर्न ब्लेसिंग’च्या वेबसाईटवर एक विस्तृत ऑडीट रिपोर्ट प्रकाशित केला जातो. आपला खर्च आणि मिळालेल्या देणगीसंदर्भात उघडपणे माहिती द्यायची त्यांची नेहमी तयारी असते.

ते शून्य बँक बॅलन्स प्रिन्सिपलने काम करतात. ज्या अंतर्गत ते त्यांच्याकडे असलेली संपूर्ण रक्कम देण्यासाठी तयार असतात. सोहम पुढे सांगतात, “आम्ही देणगीदारांकडून पैसे जमा करतो आणि पूर्ण रक्कम विविध स्वयंसेवी संस्थांना सुपूर्द करतो. आम्हाला कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. किंबहुना आम्ही आमच्या प्रत्येक सायकलस्वारीचा, एवढंच नाही तर जेवणाचाही संपूर्ण खर्च स्वतःच्या खिशातून करतो. मात्र जर कोणी सायकलस्वारीच्या कुठल्या भागाला, जसे की बॅक अप वाहनांवर होणारा खर्च, जेवण इत्यादी प्रायोजित करु इच्छित असेल तर त्यांचे स्वागत आहे.”

सोहम सांगतात की तरुणांच्या सहभागाचा अभाव आणि त्यांची उपरी वृत्ती त्यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. देणगी स्वरुपात मिळणारी रक्कम ही स्वारांच्या संख्येनुसार वाढत असल्यामुळे ते अधिकाधिक लोकांना आपल्याबरोबर जोडण्याच्या प्रयत्नात असतात. सहभागी लोकांची संख्या वाढवा आणि पैसे उभारण्याच्या मोहिमेला फिटनेसबरोबर जोडा अशी त्यांची सरळ सोपी योजना आहे.

‘अर्न ब्लेसिंग’ला देशभरातील स्वयंसेवी संस्थांच्या एका केंद्राच्या रुपात स्थापित करण्याचे सोहम यांचे स्वप्न आहे. ते त्यांच्या या चांगल्या उद्देशाला केवळ पैशाच्या कमतरतेमुळे अपूर्ण राहिलेले पाहू इच्छित नाही. त्याचबरोबर ते एक असा निरोगी समाज निर्माण करु इच्छितात जो एक चांगली जीवनशैली आत्मसात करण्यावर विश्वास ठेवत असेल आणि त्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्यास मदत करु शकेल.

लेखक : स्निग्धा सिन्हा

अनुवाद : अनुज्ञा निकम

    Share on
    close