मैथिली भाषेतील पहिल्या ई-वृत्तपत्राला आकार देणा-या कुमूद यांनी पाहिली नाही शाळा!

0

बदलत्या काळासोबत समाजात महिलांची भागीदारी आणि त्यांची भूमिका देखील बदलली आहे. कारण काही दशकांपूर्वी हे समजले जायचे की, महिलांकडे कठीण परिस्थितीत निर्णय घेण्याचे धैर्य नसते. मात्र, आता ही बाब जुनी झाली आहे. येणाऱ्या काळासोबतच महिलांबद्धल लोकांचे विचार देखील बदलले आहेत. आज महिला घरांच्या चार भिंती बाहेर पडून स्वत:ची ओळख निर्माण करत आहेत. आज महिलांमध्ये इतका आत्मविश्वास वाढला आहे की, त्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याची क्षमता ठेवतात. याचे उत्तम उदाहरण आहेत, पटना येथे राहणाऱ्या कुमुद सिंह. ज्यांनी कधी शाळेत जाऊन शिक्षण घेतले नाही, त्या आज मैथिली भाषेत ‘इसमाद’ नावाचा ई-पेपर चालवत आहेत. मैथिली भाषेचा हा पहिला ई-पेपर आहे.

कुमुद सिंह यांनी आपले शिक्षण घरी राहूनच केले. कारण त्यांचे आई – वडील मधुबनी येथील छोट्याशा गावात रहायचे आणि तेथून शाळा खूप लांब होती. त्यामुळे घरीच शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक येत असत. काळासोबतच जशा त्या मोठ्या झाल्या, तसाच त्यांचा विवाह देखील झाला. त्यांचे पति पत्रकार होते. कुमुद यांच्या मते, त्यांच्या घरी संगणक होता, ज्यात त्यांचे पति अनेकदा काम करत असत आणि जेव्हा त्यांची मुले देखील संगणक वापरू लागली तेव्हा त्या देखील त्याच्याकडे आकर्षिल्या जाऊ लागल्या. हळूहळू कुमुद यांना संगणकाची इतकी आवड निर्माण झाली की, आज त्यांची फेसबुकवर एक वेगळीच ओळख आहे, जेथे त्या निसंकोचपणे आपले म्हणणे मांडतात. आज त्या संगणकावर आपल्या ई – पेपरशी संबंधित काम करतात. बातमी लिहायची असो वा

शोधायची असो, त्या स्वतःच आपल्या ई- पेपरचे पान तयार करतात.

कुमुद यांना ई-पेपर सुरु करण्याची कल्पना आपल्या पतीच्या समस्या बघून आली. त्या म्हणतात की, माझे पति पत्रकार आहेत, अशातच त्यांच्या बातम्यांना वर्तमान पत्रात स्थान मिळत नसे. त्यामुळे अनेकदा ते घरी येऊन खूप दु:खी होत असत. त्यावेळी कुमुद यांनी पतीचा त्रास कमी करण्यासाठी काहीतरी उपाय शोधून काढण्याचा विचार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी ई-पेपरची कल्पना शोधून काढली. जेणेकरून त्यात त्यांचे पति देखील आपल्या बातम्या छापू शकतील, ज्या त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याव्यतिरिक्त कुमुद यांनी लोकांपर्यंत सुख - दु:खाच्या गोष्टी देखील पोहोचवण्याचा विचार केला. ज्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या पति सोबत चर्चा केली आणि त्यांनी देखील कुमुद यांचे समर्थन केले. तसेच या कामाला सुरु करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देखील दिले.

मैथिली भाषेचा ई- पेपर वर्ष २००७ पासून अविरत सुरु आहे. जेव्हा कुमुद यांनी या कामाची सुरुवात केली तेव्हा तेथे फक्त ६ लोकांचा गट होता. विशेषकरून या सर्व महिलाच होत्या. मात्र, येणाऱ्या काळात अनेक पुरुष देखील या कामात त्यांच्या सोबत आहेत. कुमुद यांचे म्हणणे आहे की, सुरुवातीस लोकांसाठी बातम्या पाहण्याची ही नवीच पद्धत होती. त्यामुळे लोकांना याची कल्पना अनेक दिवस पसंतच पडली नाही. मात्र, कुमुद आणि त्यांच्या गटाने हिम्मत न हारता सतत मेहनत करणे सुरुच ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे हळूहळू लोकांना ‘इसमाद’ पसंत येऊ लागले आणि त्यांची लोकप्रियता वाढू लागली. मैथिलीला ओळखणारे आणि बोलणारे लोक आता ‘इसमाद’ ची वाट पाहू लागले आहेत.

मैथिली भाषेतच ई – पेपर का? याच्या उत्तरात कुमुद म्हणतात की, मला मैथिली भाषेतच सहजता वाटते, जितकी मला हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषेत वाटत नाही. त्यामुळे माझ्यासाठी मैथिली भाषेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भाषेत वर्तमानपत्र काढणे शक्यच नव्हते. त्या आनंदात सांगतात की, या वर्तमानपत्राला मैथिली भाषेत काढण्याचा एक फायदा हा झाला की, ज्या लोकांना मैथिली भाषा माहित नाही, ते देखील आता ही भाषा वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘इसमाद’ ई –पेपरमध्ये राजकारण आणि सामाजिक वृत्तांव्यतिरिक्त विदेशातील बातम्या देखील असतात. इतकेच काय तर, लंडन सारख्या शहरांचे वृत्त देखील या वर्तमानपत्रात वाचायला मिळते. मात्र, बिहार शहराशी संबंधित वृत्त या वर्तमानपत्रात प्रामुख्याने छापली जातात. तसेच या वर्तमानपत्रात हत्या, चोरीचकारी यांसारख्या वृत्तांना ई- पेपर मध्ये अजिबात स्थान नाही. बातम्यांची निवड करताना कुमुद अनेकदा आपल्या पतीची देखील मदत घेतात. मात्र, वृतांबाबत कुठलाही अंतिम निर्णय हा कुमुद यांचाच असतो. आपल्या ई-पेपरसाठी दुसऱ्या शहरातून बातम्या कशाप्रकारे मागवल्या जातात, बातम्यांची निवड कशाप्रकारे होते,त्यांना कशाप्रकारे लिहिले जाते, या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी आपल्या पति कडूनच घेतली आहे. कुमुद सांगतात की, आज त्यांनी जे काही शिकले आहे, ते त्यांना आपल्या पतीमुळेच शक्य झाले आहे.

कुमुद यांचा दावा आहे की, हा ई-पेपर जितका बिहार मध्ये वाचला जात नाही, त्याहून जास्त तो विदेशात वाचला जातो. कारण, त्यांना नियमितरीत्या वेगवेगळ्या देशातून लोकांच्या विभिन्न प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. घरातल्या जबाबदारी सोबतच ई-पेपरची जबाबदारी सांभाळण्याच्या प्रश्नावर त्यांचे म्हणणे असते की, त्या घरच्या जबाबदारीतून थोडा वेळ काढत ई-पेपरसाठी थोडा वेळ काढतातच. कुमुद यांचा दावा आहे की, “ मला सुरुवातीपासूनच या गोष्टीचा विश्वास होता की, हा ई-पेपर स्थापित होणारच. कारण, मला पुढची पायरी गाठायचीच होती, मागे वळून पाहणे शक्य नव्हते. म्हणूनच त्यांचा हा ई-पेपर आज इंटरनेटच्या जगात खूप प्रसिद्ध आहे.


लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे