झीरोइन्फीः पश्चिम बंगालच्या छोट्या शहरांपर्यंत ज्ञानगंगा घेऊन जाण्याचे कोलकत्ता स्थित स्टार्टअपचे लक्ष्य...

झीरोइन्फीः पश्चिम बंगालच्या छोट्या शहरांपर्यंत ज्ञानगंगा घेऊन जाण्याचे कोलकत्ता स्थित स्टार्टअपचे लक्ष्य...

Monday February 29, 2016,

5 min Read

शिक्षणात सुधारणा करण्यात तंत्रज्ञानाचा मोठाच हात आहे आणि त्याचबरोबर एकूणच सध्याच्या मजबूत एज्युटेक बाजारपेठेला आकार देण्यातही तंत्रज्ञानाचे असलेले योगदान महत्वपूर्णच म्हणावे लागेल. तंत्रज्ञान आणि शैक्षणिक साधनांना एकत्र आणून, विद्यार्थ्यांसाठी शिकविण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती देऊ करणाऱ्या अनेक स्टार्टअप्सनी सध्या ही बाजारपेठ गजबजलेली आहे. आदित्य बजाज, अभिषेक बजाज आणि रोहीत बजाज या तीन तरुणांनीही आपली सीएची परीक्षा पूर्ण केल्यानंतर लवकरच स्वतःचे एखादे उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी, २०१५ मध्ये झीरोइन्फीडॉटकॉम (Zeroinfy.com) ला सुरुवात झाली.

image


झीरोइन्फीडॉटकॉम हे एक कोलकत्ता स्थित इंटरएक्टीव्ह एज्युकेशनचे माध्यम असून, त्याद्वारे शिक्षकांच्या व्याख्यानांचे व्हीडीओ विद्यार्थी विकत घेऊ शकतात. त्याशिवाय पीअर टू पीअर लर्निंगची संधीही विद्यार्थ्यांना दिली जाते, ज्यामुळे विद्यार्थी आपापाल्या सहअध्यायींकडूनही अनेक गोष्टी शिकू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी तयार केलेल्या नोटस् इतर विद्यार्थ्यांशी वाटून घेण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. सीए, सीएस, सीएफए, युपीएससी आणि आयआयटी-जेईई यांसारख्या अभ्यासक्रमांसाठीचे साहित्य हे माध्यम देऊ करते.

आदित्य, अभिषेक आणि रोहीत या तिघांनी भारतभर प्रवास करुन विविध शिक्षकांना या उपक्रमाशी जोडून घेतले आहे. कोलकत्ता, दिल्ली, मुंबई, पुणे, चैनई, जयपूर आणि जोधपूर येथील शिक्षकांना आपल्या बरोबर घेण्यात त्यांना यश मिळाले आहे.

“ शिक्षकांची सर्व माहिती मिळविल्यानंतरच आम्ही त्यांच्याशी भागीदारी करतो. आमच्याशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला किमान पाच वर्षे आणि कमीतकमी हजार विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. एकदा त्यांच्याबरोबर भागीदारी झाली, की आम्ही त्यांचे व्हिडीओ आमच्या सर्व्हरवर अपलोड करतो. हे माध्यम विकसित करण्यासाठी आम्हाला सहा महिन्यांचा अवधी लागला. तर त्यापुढील दोन महिने आम्ही या साईटची चाचणी घेतली,” आदित्य सांगतात.

कल्पना प्रत्यक्षात उतरविताना

या तिघांनीही त्यांच्या स्वतःच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून काही शिकवणी वर्गांचे पैसे भरले होते, पण प्रत्यक्षात त्या वर्गांना हजेरी मात्र लावलीच नाही. त्यावेळची आठवण सांगताना आदित्य सांगतात की, ऑनलाईन पोर्टल्सने त्यांचा हेतू साध्य होत नव्हता, कारण एकाच विषयाकरता खूपच जास्त शिक्षक उपलब्ध असत. आदित्य आणि रोहीत हे दोघेही कोलकत्त्याच्या सेंट झेवियर्सचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी २०१५ मध्ये चार्टर्ड एकाऊंटसी पूर्ण केली आहे.

बाजारपेठेचा नीट अभ्यास न करताच एक परीपूर्ण उत्पादन घेऊन येण्याकरीता या जोडगोळीने सुरुवातीचा बराच मौल्यवान वेळ वाया घालविला. जेंव्हा त्यांना ही चूक जाणवली, तेंव्हा त्यांनी त्यामध्ये दुरुस्ती केली.

झीरोइन्फीची सुरुवात झाली ती दहा लाख रुपये भांडवलापासून (मित्र आणि संस्थापकांच्या कुटुंबियांकडूनच हा निधी उभारण्यात आला होता). आतापर्यंत या माध्यमाने ८,५०० वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळविले आहे. विद्यार्थी संकेतस्थळावर डेमो व्हिडीओ पाहून त्यानुसार अभ्यासक्रमांची खरेदी करतात. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमासाठीची खरेदी तर करता येतेच, पण त्याचबरोबर अभ्यासक्रमातील केवळ एखाद्या ठराविक विषयाबाबतचीच खरेदी करण्याचाही पर्याय देऊ करण्यात आला आहे. या पर्यांयानुसारच किंमत निश्चित करण्यात आली असून ती पाचशे रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत आहे. आदित्य यांच्या मते ऑफलाईन अभ्यासक्रमाचा दर हा त्यांच्या किंमतींपेक्षा साठ टक्क्यांनी जास्त आहे.

सध्या झीरोइन्फीकडे आठ कर्मचारी असून, विविध विषयांचे पंचवीस शिक्षक आहेत, जे शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतात आणि त्याचबरोबर या साहित्याचा दर्जा राखण्यातही महत्वाची भूमिका बजावतात.

डिजिटल मार्केटींगच्या सहाय्याने झीरोइन्फीला दुर्गापूर, असनसोल, भुवनेश्वर आणि विजयवाडा यांसारख्या टीअर २ शहरांमधूनही मागण्या मिळविण्यात यश येत आहे. जानेवारी, २०१६ मध्ये त्यांना ३.२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले तर या महिन्यात २.५ लाख रुपयांची प्राप्ती होण्याचा त्यांचा अंदाज आहे.

भविष्यातील योजना

येत्या काही महिन्यांत झीरोइन्फीडॉटकॉम विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे ते विपणनावर.... पश्चिम बंगालमध्ये, खास करुन टीयर २ आणि टीयर ३ शहरांमध्ये, बाजारपेठेचा विस्तार करणे, हा या मागचा हेतू आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठीचे एक महत्वाचे साधन म्हणून सध्या त्यांच्याकडून फेसबुकचा वापर केला जात आहे, त्याचबरोबर याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी म्हणून महाविद्यालयांमध्ये परिसंवादाचे आयोजनही करण्यात येत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपले ‘मेंटॉर मॉड्युल’ सुरु करण्याची या स्टार्टअपची इच्छा आहे. यासाठी त्यांनी सीए परीक्षेत अव्वल ठरलेले गुणवंत विद्यार्थी आणि आयआयटीच्या विद्यार्थ्यांबरोबर भागीदारी केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी या विद्यार्थ्यांना बरोबर घेण्यात आले आहे. याद्वारे झीरोइन्फीवरुन खरेदी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक मार्गदर्शक उपलब्ध करुन देण्याची त्यांची योजना आहे.

झीरोइन्फीच्या वाढीसाठी म्हणून निधी उभारणीवरही भर देण्यात आला असून, यासंबंधी काही गुंतवणूकदारांशी चर्चाही सुरु आहे.तर पुढील आर्थिक वर्षांत सहा कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.

स्मार्टफोन्सचा उदय, इंटरऍक्टीव्ह पाठ्यपुस्तके, गेमिफिकेशन आणि डेटा ऍनॅलिसिस यामुळे शैक्षणिक क्षेत्रात ना भूतो असे क्रांतीकारी बदल घडून आले आहेत. आयबीईएफच्या एका अहवालानुसार भारतातील ऑनलाईन शिक्षणाची बाजारपेठ २०१७ पर्यंत ४० बिलियन डॉलर्सपर्यंत जाऊन पोहचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील स्टार्टअप्स आज रिअल-टाईम बुक अपडेट, ऑनलाईन शिकवणी, एज्युटेनमेंट, एचडी दर्जाचे शैक्षणिक व्हिडीओ आणि ऑनलाईन परीक्षेची तयारी, यांसारख्या अनेक गोष्टी देऊ करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या, ज्यामध्ये टीयर २ आणि टीयर ३ शहरांचाही समावेश आहे, गरजा पूर्ण होत आहेत. वेदांतू, सिम्पलीलर्न, बीवायजेयु, टॉपर, आयप्रॉफ लर्निंग सोल्युशन्स, मेरीटनेशन, एज्युकार्ट, टॅलेंटएज,सुपरप्रोफ आणि एम्बाईबडॉटकॉम हे एज्युटेक उद्योगातील काही महत्वाचे खेळाडू.... शैक्षणिक क्षेत्राचा चेहरा बदलून टाकण्याच्या कामात आपली ताकद दाखवून देत, मोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करुन घेण्यात हे यशस्वी ठरले आहेत.

टायगर ग्लोबल आणि एस्सेल पार्टनर्सकडून वेदांतूने पाच मिलियन डॉलर्सचा निधी उभारला तर टॉपरने एसएआयएफ, हेलिओन आणि फिडिली ग्रोथ यांच्याकडून १० मिलियन डॉलर्सचा निधी उभारला आहे. मेरीटनेशनने इन्फोएजकडून पाच मिलियन डॉलर्सचा निधी तर सिम्पलीलर्नने मेफील्ड फंड आणि कलारी कॅपिटलकडून १५ मिलियन डॉलर्सचा निधी मिळविला आहे. तर एज्युकार्टला युवीकॅन वेंचर्स आणि युनायटेड फिनसेक कडून एक मिलियन डॉलर्सचा निधी उभारण्यात यश मिळाले आहे.

“ आजचे शिक्षक स्मार्टफोनचा वापर एक महत्वाचे शैक्षणिक साधन म्हणून करत आहेत. ऍनॅलिटीक्सचा वापर करुन शिक्षक सहजपणे विद्यार्थ्यांची कामगिरी तपासू शकतात. त्याचबरोबर याच माध्यमातून संस्थांही शिक्षकांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी सुसज्ज झाल्या आहेत,” विझआयक्यू या क्लाऊडबेस्ड शैक्षणिक व्यासपीठाचे मुख्य महसूल अधिकारी मनीष शर्मा सांगतात.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा 

पदवीपरिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील बदलांचा परिणाम: ‘व्हालोनिआ’!

परदेशात शिक्षणासाठी अवघ्या जगाची एक खिडकी!

स्पर्धा परीक्षेला बसलाय, कनेक्ट व्हा ‘टेस्टबुक’शी!

लेखक – अपराजिता चौधरी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन