सैनिक पतीच्या मृत्यूनंतर स्टाॅफ सलेक्शन बोर्डाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावत निधी दुबे बनली मध्यप्रदेशची पहिली महिला सैन्य अधिकारी

सैनिक पतीच्या मृत्यूनंतर स्टाॅफ सलेक्शन बोर्डाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावत निधी दुबे बनली मध्यप्रदेशची पहिली महिला सैन्य अधिकारी

Tuesday September 27, 2016,

3 min Read

नुकतच लग्न होऊन सासरी आलेली निधी आपल्या पतीच्या सहवासात संसारिक सुखात रममाण झाली होती. हातावर अजूनही पुसटशी मेहंदी होती आणि अचानक नुकताच सुरु झालेला संसार कोलमडून पडला. निधीच्या सैनिक पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि एका मिनिटात होत्याच नव्हतं झालं. पतीच्या मृत्यूनंतर निधीला जगायची इच्छा नव्हती. आयुष्याला काही अर्थ नाही असे तिला वाटत होते मात्र तिच्या गर्भात असलेल्या छोट्याशा जीवाने तिला जगायला भाग पाडले. फक्त २५ वर्ष वय असलेल्या निधी समोर भयानक परिस्थिती उद्भवली होती.

पती गेल्यानंतर पोटापाण्यासाठी निधीला बाहेर पडावे लागले. सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. संघर्ष करत असताना तिच्या एका मैत्रिणीने तिचे मनोबल उंचावले, तिला मार्ग दाखवला. निधीने मग तिच्या पतीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिता भारतीय सैन्यदलात दाखल व्हायचे ठरवले. चार वेळा तिच्या प्रयत्नांना अपयश आले. मात्र तिने हार न मानता पुन्हा लढा दिला आणि त्याचे परिणाम आज तुमच्या समोर आहे. निधीची सैन्यात अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.

image


विधवा शहिदांच्या श्रेणीत सैन्य अधिकारी बनणारी निधी मध्यप्रदेशची पहिली महिला अधिकारी आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बीना येथे निधीचे शिक्षण झाले. २००८ मध्ये लग्न झाल्यानंतर ती सासरी सागर जिल्यात राहायला आली. पती मुकेश दुबे सैनिक होते. हैद्राबाद मध्ये सैन्य दलात ते तैनात होते. लग्न झाल्यानंतर दोघेही आनंदी होते. त्यांच्या भावी सुखी संसाराची स्वप्न पाहात होते. मात्र मोठा अनर्थ झाला. मुकेशच्या मृत्यूनंतर निधी सैरवैर झाली. जगावे की मरावे तिला समजत नव्हते. आयुष्याचा जोडीदार तिला सोडून गेला होता. पण त्यांच्या प्रेमाच्या निशाणीला तिला जगात आणायचे होते. 

अनेकांनी तिला दूर लोटले. मात्र तिचा भाऊ आणि वडील खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले पेन्शन मिळवण्यासाठी भोपाळमध्ये राहणाऱ्या ब्रिगेडियर आर. विनायक यांच्या पत्नी डॉ. जयलक्ष्मी यांच्याशी तिची गाठ पडली. दोघीही मैत्रिणी झाल्या. निधीची कहाणी ऐकून जयलक्ष्मी यांनी तिला धीर दिला. मार्गदर्शन केले तेव्हाच निधीने ठरवले की सैन्यात दाखल होऊन देशसेवा करायची आणि पतीचे स्वप्न पूर्ण करायचे. ध्येय निश्चित झाले. मग काय ध्येयप्राप्तीसाठी कमालीचा संघर्ष सुरु झाला. स्वतःसाठी आणि मुलासाठी राहण्याखाण्याची व्यवस्था तिला करायची होती. तिने सैनिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपाची नोकरी करायला सुरुवात केली. मुलाला सांभाळणे, नोकरी करणे आणि सैन्यात दाखल होण्यासाठी प्रशिक्षण क्लासेसला जाणे म्हणजे निधीला तारेवरची कसरत करावी लागली. तिने चार वेळा एसएसबी (स्टाॅफ सलेक्शन बोर्ड) ला मुलाखत दिली. चारही वेळा तिला नाकारण्यात आले. मात्र निधीने प्रयत्न सुरूच ठेवले. तिच्यातल्या कमतरता जाणून घेऊन त्यावर मात केली आणि पाचव्या प्रयत्नात मात्र मुलाखतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. ३० सप्टेंबरला चेन्नईत प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर निधी देशसेवेत रुजू होईल.

यशस्वी झाल्यानंतर निधी सांगते की मुकेशच्या मृत्यूनंतर ती पूर्णतः हताश झाली होती मात्र मुकेशच्या प्रेमाने तिला जगायला शिकवले. तिच्या भावाने, वडिलांनी आणि मैत्रीण जयलक्ष्मी यांनी तिला पावलोपावली मदत केली. म्हणूनच ती मुकेशचे स्वप्न पूर्ण करण्यास सज्ज झाली आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

    Share on
    close