टिक्का सफरीच्या माध्यमातून करा भारताचं खाद्य पर्यटन

टिक्का सफरीच्या माध्यमातून करा भारताचं खाद्य पर्यटन

Sunday January 10, 2016,

6 min Read

चेतना मिरचंदानीची एकही सहल अशी नाही की त्या सहलीच्या आठवणी या तिथल्या पदार्थांच्या चवीशी जोडल्या गेल्या आहेत. मग ती सहल वैयक्तिक असो किंवा कामासाठी असो. "माझ्या कुटुंबाबरोबरची माझी पहिली सहल मग ती लोणावळा, पुणे, महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी असो. या सहली दरम्यान बिर्याणीसाठी तळोज्याला थांबायचं, तर पुण्याला जाताना तळेगावला उत्तम तंदुरी आलूसाठी थांबायचं. दिल्ली सहलीच्या आठवणी म्हणजे ठेल्यांवरचे पदार्थ, सरोजिनी नगर आणि खान मार्केट मधील चाट. किंवा चंडीगड मध्ये ढाब्यावर मिळणारी रोटी आणि महकी डाळ." या सगळ्या आठवणी ती सांगते.


image


जेव्हा व्यवसाय सुरु करण्याची तीला तीव्र इच्छा झाली तेव्हा तिने तिच्या आवडींचे दोन खाद्य पदार्थ आणि फिरणं याचा संगम घडवून टिक्का सफारीची सुरवात केली, खाद्यप्रेमींना खाद्य भ्रमंती करवणारी एक कंपनी. " प्रत्येक सहल ही ५ ते ७ दिवसांची आहे यामध्ये २ ते ४ शहरांची सफर घडवली जाते. यामध्ये त्या शहरातील उत्तम खाद्य पदार्थ मिळणारी ठिकाणं, स्थानिक बाजारात खरेदी, नवनवीन पदार्थ बनवायला शिकणे, आणि स्थानिक पण पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेणे." हे ती उत्साहाने सांगते.

टिक्का सफारीच्या माध्यमातून भारतातील प्रसिद्ध ठिकाणं, शहरं, प्राचीन मंदिरं ऐतिहासिक ठिकाणं यांना भेटी देण्याबरोबरच त्या ठिकाणची उपहारगृह आणि घरांमध्ये जाऊन स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणं, तिथल्या प्रसिद्ध पदार्थांची चव चाखणं आणि तेथील खाद्य परंपरा माहित करून घेणं. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या खाद्य पदार्थांच्या माध्यमातून भारत भ्रमण करण्यास आम्ही मदत करतो," असं ती सांगते.


image


"आमच्या सहली ठरलेल्या असतात, प्रत्येक सहलीत १४ ते १६ लोकं असतात. या सहलींची नोंदणी लोकं एकट्यासाठी किंवा समुहासाठी पण करू शकतात आणि भ्रमंती करू शकतात. आमच्या वैशिष्ट्यपूर्ण सहली पण आहेत, ज्यांना भारताची खाद्य भ्रमंती त्यांच्या खास व्यक्तींबरोबर करायची आहे त्यांच्यासाठी ही सहल आहे. या सहलीच्या खर्चामध्ये प्रत्येक वेळचं जेवण, राहणं आणि प्रवास समविष्ट असतो." असं चेतना सांगते.

चेतनाने १३ वर्ष एका मोठ्या अांतरराष्ट्रीय कंपनीमध्ये सल्लागार म्हणून काम केलं आहे. पण जुलै २०१४ मध्ये तिने नोकरी सोडून पूर्णवेळ स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिचा अजून एक व्यवसाय आहे इंक पंडित या माध्यमातून ती मजकूर तयार करून देण्याचं काम करते. पण टिक्का सफारी हे तिचं लहानपणापासूनच स्वप्न होतं.


image


चेतना सांगते, "सिंधी कुटुंबात मी लहानाची मोठी झाले आणि आमच्याकडे खाद्य पदार्थ ही एकमेव महत्वाची गोष्ट असते. सगळ्या समस्या खाद्य पदार्थांच्या माध्यमातून सोडवल्या जातात आणि चर्चेचा विषय पण एकच असतो की आता पुढच्या जेवणात काय बनवायचं. खाद्य पदार्थांच्या बाबत असलेलं आकर्षण यामुळे तिला सुरवातीला इव्हेंट मेनेजमेंट कंपनी सुरु करण्याचा तिचा विचार होता, म्हणजे खाद्य पदार्थ मध्यवर्ती कल्पना आणि त्याचाशी संबंधित कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा तिचा विचार होता. " देश विदेशातले खाद्य पदार्थ, थीम पार्टी, खाद्य पदार्थाच्या कल्पनेवर आधारित पार्टी आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद," असा तिचा प्रस्ताव होता. पण ही कल्पना तितकीशी सोयीस्कर नव्हती, " हा संपूर्ण प्रस्ताव बघता वास्तव हे होतं की हजारो इव्हेंट मेनेजमेंट कंपन्या आहेत आणि मी जी सेवा देणार होते त्याचं वेगळेपण लक्षात घेता ते थोडा खर्चिक होतं. त्यामुळे प्रस्तावात थोडा बदल करून माझ्या अनुभवाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करायचं मी ठरवलं." आणि असे अनेक अनुभव तिच्याकडे होते.

" एक सल्लागार म्हणून मी भारतभर सर्वत्र आणि भरपूर भ्रमंती केली होती. प्रत्येक वेळी जेव्हा मी नवीन शहराला भेट द्यायचे तेव्हा त्या ठिकाणचे स्थानिक पदार्थ खाणे आणि तेथील वैशिष्ट्य असलेल्या स्थानिक वस्तू मी खरेदी करायचे. या सहलींदरम्यान माझ्या लक्षात आलं की, आपल्या देशात नाना प्रकारचे खाद्य पदार्थ आहेत. काही शहरं अशी आहेत की त्यांचं इतर देशांशी साम्य आहे. भारतात सुंदर समुद्र किनारे, हिमालय, वाळवंट, घनदाट जंगलं, चहाचे मळे आणि प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. या सगळ्याचा उपयोग माझ्या व्यवसायात करायचा होता." असं चेतना पुढे सांगते.

या संदर्भात अभ्यास केल्यावर तिच्या लक्षात आलं की, काही कंपन्या खाद्य सहली करवतात त्या पूर्णपणे खाद्य भ्रमंती करवत नाहीत. ज्यांना खाद्य पदार्थ आणि विविध ठिकाणं आवडतात त्यांनी हे करायलाच हवं. टिक्का सफारीची कल्पना अशीच आहे. भारतातील उत्तमोत्तम खाद्य पदार्थांची ओळख पर्यटनाच्या माध्यमातून करून द्यायची, यासाठी देशी आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करायचं." असं ती सांगते.

या नवीन व्यवसायाला नाव देणं थोडं अवघड होतं. चेतना नाराजीने सांगते," कोणतंच नाव अनुरूप नव्हतं," त्यानंतर एका दुपारी चर्चा करत असताना एका मैत्रिणीने हे नाव सुचवलं आणि ते चपखल बसलं." ती सांगते, " टिक्का सफारी या नावातून भारतातील लोकप्रिय पदार्थ टिक्का मसाला आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशभरातील लोकप्रिय आणि अजून लोकांसमोर न आलेले खाद्य पदार्थांची चव चाखणं या गोष्टींचा समावेश होतो."

टिक्का सफारी सारख्या संस्था सुरु व्हायला योग्य वेळेची गरज असते असं चेतना मानते. " २१ वं शतक हे भारतात इंटरनेट घेऊन आलं. यामुळे अनेक गोष्टींना दिशा मिळाली. गेल्या दशकात लोकांची क्रयशक्ती वाढली. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांची गरज वाढली त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंबरोबरच चैनीच्या वस्तूंची खरेदी वाढली."

लोकांना आता नवनवीन गोष्टींचा अनुभव घायला आवडतो. प्रत्येक दिवस आनंदाने जगा हे आजचं तत्व झाल्याने खाण्याच्या बाबतीत तडजोड का? आपण अशा देशात राहतो की जिथे प्रत्येक राज्याची वेगळी खाद्य संस्कृती आहे आणि ती पण वैशिष्ट्यपूर्ण आहे.

ती मान्य करते की या उत्सुकतेबरोबरच अनेक आव्हानही होती." ही आव्हानं दोन प्रकारची होती. पाहिलं आव्हान थेट आर्थिक परिस्थितीशी निगडीत होतं, भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही. बिकट आर्थिक परिस्थिती याचा परिणाम थेट चैनीच्या गोष्टींवर होते, परिणामी सहली आणि बाहेर जेवायला जाणं यावर प्रतिबंध येतात.

मुलभूत सेवा सुविधांचं आव्हान यावर टिक्का सफारी किंवा इतर मोठ्या व्यावसायिकांचं कोणाचंच नियंत्रण नसतं. पण हे वास्तव असून त्याचा व्यवसायावर परिणाम होतो. महामार्ग आणि रस्ते, दूरध्वनी सेवा, रेल्वे आणि बस सेवा, स्थानक, सार्वजनिक सेवा याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होतो."

चेतनाकडे यावर साधा सरळ मार्ग आहे," टिक्का सफारीचं काम सहकार्याने चालतं. हॉटेल्स, रेस्टोरंट, खाद्य विषयक ब्लॉग, घरगुती खानसामा, टॅक्सी चालक, गाईड, पर्यटनाचा वेगळा अनुभव, खाद्य पदार्थांचे ठेले या गोष्टींचा टिक्का सफरीमध्ये समावेश आहे. या एकत्रित भागीदारीमुळे पर्यटकांना अनेक पर्याय उपलब्ध होतात आणि पर्यटक स्वतःच त्यांचं टिक्का सफारी निवडतात. फक्त त्यांचं खाद्य पर्यटन होईल असं नाही तर त्यांची पूर्ण सहलच अविस्मरणीय ठरेल."

चेतना सध्या तिने बचत केलेल्या पैशातून हा व्यवसाय चालवत आहे." मला काही काळानंतर आर्थिक गुंतवणुकीची गरज भासेल, बघूया कसं शक्य होतंय ते. माझ्या कंपनीला लवकरच गुंतवणूकदार मिळतील याबाबत मला खात्री आहे." ती ठाम पणे सांगते.

चेतनाला तिचा आवडता पदार्थ कोणता या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे पण ती सांगते," मी चातुर्याने सांगू शकते माझा आवडता पदार्थ कोणता ते. मला सुशी आवडतात, आपल्याला प्रत्येक घास खाताना त्याची चव अधिकाधिक आवडेल आणि त्याचा परिपूर्ण आनंद घेता येईल. घरा पासून जवळ म्हणाल तर खेकडे आणि गोवन पद्धतीने केलेली कोळंबी मला आवडते."

जून महिन्यात जेव्हा टिक्का सफरीची सुरवात झाली तेव्हापासून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने चेतना समाधानी आहे. पण ही सुरवात आहे याची जाणीव तिला आहे. " अजून बराच पल्ला गाठायचा आहे," ती एक दीर्घ श्वास घेत सांगते,"येत्या ४ ते ६ महिन्यात आमच्या व्यवसायाचा पुढचा टप्पा सुरु होईल. एप तयार करणे आणि गुंतवणूकदर मिळवणे हे आमचं नियोजन आहे."

सहली तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हा तिचा छोटा मार्ग आहे. यामुळे आलेलं अपयश ती मान्य करते," ही सुरवात असून माझ्या व्यवसायाचा प्रचार करायला मी कमी पडले हे अपयश ती मान्य करते. खाद्य पदार्थांसाठी पर्यटन हे याचं वैशिष्ट्य आहे. पण अधिकाधिक ग्राहक मिळवण्यासाठी त्याचा प्रचार करणं गरजेचं आहे," असं ती सांगते. तिची शिकण्याची तयारी असून माहित नसताना त्यातून मार्ग कसा काढायचा हे पण तिची शिकायची तयारी आहे असं ती सांगते.

भविष्यात अजून अभिनव गोष्टी करण्याचा तिचा विचार आहे, " मला सगळ्यात जास्त जे आवडतं त्यापासूनच मला प्रेरणा मिळते. पहाटे चार वाजेपर्यंत काम करायला मला फार आवडतं, माझ्या पाळीव प्राण्यांच्या सानिध्यात बसून वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधून, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आणि या माध्यमातून तुम्हाला जे आवडतं ते काम करणं हाच खरा आनंद आहे." हेच चेतनाला आवडतं आणि यातूनच तिच्या व्यवसायाचा ती पुरेपूर आनंद घेते.

लेखिका : राखी चक्रवर्ती

अनुवाद :श्रद्धा वार्डे