मराठी सिनेमातला नवा ग्लॅमरस चेहरा सीमा कदम

0

हिंदीबरोबरच आता मराठी सिनेमातही प्रत्येक आठवड्याला नवनवीन चेहरे दिसू लागलेत. यापैकी काही चेहरे हे स्टारपुत्र किंवा कन्या असतात तर काही फक्त आणि फक्त अभिनयाच्या जोरावर प्रवेश करतात. अशा या अभिनयाच्या पॅशनवर सिनेसृष्टीत प्रवेश करणाऱ्या कलाकारांमध्ये एक नवे नाव समाविष्ट झालेय आणि हे नाव आहे नवोदीत अभिनेत्री सीमा कदम हिचे.

आगामी सिनेमा कॅरी ऑन देशपांडेमध्ये सीमा अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या तीन बायकांपैकी एका बायकोची भुमिका सीमा साकारतेय. सीमा यात प्रथमाची भुमिका साकारतेय. कुठलीही सिनेमातली पार्श्वभूमी नसताना सीमा या ग्लॅमरस क्षेत्रात प्रवेश करतेय, आपल्या या डेब्युबद्दलचे श्रेय ती अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांना देते. नॉट टू फरगेट पण कॅरी ऑन देशपांडे या सिनेमाचे दिग्दर्शन विजयजींनी केले शिवाय यात त्यांनी एक महत्वाची भुमिकाही साकारली आहे.

सीमा या संधीबद्दल भरभरुन बोलते, “मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि या क्षेत्राबद्दल आकर्षणही होते, त्यामुळे जेव्हा या क्षेत्रात प्रवेश करायचा मी विचार केला तेव्हा सर्वात आधी मला माझे घर म्हणजे मराठवाडा सोडून मुंबईत यावे लागले. कलाक्षेत्रातली कार्यरत अशी एकही व्यक्ती तुम्हाला माझ्या घरात मिळणार नाही, मीच पहिली असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही.

त्यामुळे मी मुंबईत आले तेव्हा सर्वात आधी अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली, त्या प्रशिक्षणादरम्यानच माझी भेट विजय पाटकर यांच्यासोबत झाली, तुम्हाला विश्वास नाही बसणार पण आमच्या पहिल्याच भेटीत विजय सरांनी मला कॅरी ऑन... सिनेमासाठी माझी निवड झाल्याचे सांगितले होते, माझ्यासाठी ही खुप मोठी अचिव्हमेंट होती.”

मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि तेही सिनेमाच्या माध्यमातनं, सीमासाठी ही खरंच मोठी अचिव्हमेंट आहे. याबद्दल सीमा सांगते की “माझा हा पदार्पणातला सिनेमा, त्यामुळे उत्सुकतेसोबत थोडा ताणही वाटतोय, मी स्क्रिनवर कशी दिसेन, माझा अभिनय, प्रेक्षक मला कसे स्वीकारतील वगैरे वगैरे खुप सारे प्रश्न होते. पण मला विश्वासही होती की मी साकारत असलेली प्रथमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

कुठलाही सिनेमा हा टीमवर्कने पूर्ण होत असतो. या सिनेमादरम्यानही पुष्कर श्रोत्री, मानसी नाईक, सविता मालपेकर, संजय खापरे, जयवंत वाडकर आणि खुद्द विजय सर यांचे मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळाले, या सर्वांमुळे खरेतर ही भूमिका मी यशस्वीपणे साकारु शकलेय.” कॅरी ऑन सिनेमा प्रदर्शित झाला, सिनेमाच्या निर्मितीपासून ते त्याचे प्रमोशन, सिनेमाचं रिलीज, परत रिलीज नंतरचे प्रमोशन असे विविध टप्पे सीमाने यानिमित्ताने अनुभवले.

अर्थात या क्षेत्रात तग धरुन रहायचे असेल तर अभिनयाशिवाय पर्याय नाही हे ती मानते आणि त्यादृष्टीने ती स्वतःला तयार करतेय.