कॅम्पस सूत्र – भारतीय तरुणाईसाठी स्टाईलचेक

0

तुमच्या मित्रांमध्ये एक तरी मित्र तुम्ही असा पाहिला असेल ना, ज्याने एखादे चटकदार वाक्य किंवा ब्रॅंड नेम लिहिलेला टी-शर्ट घातला आहे आणि तोदेखील त्याच्या अर्थाची कोणतीही कल्पना नसताना? नक्कीच पाहिला असेल. आपल्या मित्रांमध्ये एखादा तरी असा असतोच जो बाल्टीमोर रेवन्सचा टी-शर्ट घालत असतो, मात्र हा एक अमेरिकन फुटबॉल संघ आहे, हे त्याला माहितही नसते. पण असे कपडे घालायला निश्चितच आवडत असते. मुख्य म्हणजे आजच्या तरुणांमध्ये ही आवड मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशी आवड असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसाठी कॅम्पस सूत्र हा निश्चितच स्टाईलचेक ठरेल. खास भारतीय तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन सुरु झालेल्या या ब्रॅंडची रंजक कहाणी जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

या कहाणीची सुरुवात झाली ती चार मित्रांच्या गोवा सहलीपासून.... धीरज, आदित्य, सोनल आणि खुशबू अगरवाल हे चौघे सहलीनिमित्त गोव्याला गेले असताना, स्वतःचे काहीतरी सुरु करण्याविषयी त्यांच्यात चर्चा झाली. मात्र हा निर्णय सोपा निश्चितच नव्हता कारण चौघेही जण नोकरीत स्थिरस्थावर होते. विशेष म्हणजे चौघांना त्यावेळी मिळणारा एकत्रित पगार होता एक कोटी रुपये... एवढ्या घसघशीत पगाराची सुरक्षित नोकरी सोडायची आणि एका नव्या क्षेत्रात उडी घ्यायची, हा निर्णय कठीणच होता. मात्र काही तरी नवीन करण्याचा जोशही होताच... गोव्याची ती सहल संपली आणि सुरु झाला प्रवास कॅम्पस सूत्रच्या उभारणीचा...

कपड्यांचा हा ब्रॅंड खास आजच्या तरुणाईसाठीच असेल, याबाबत हे चौघेही संस्थापक ठाम होते. एक असा ब्रॅड जो आजच्या भारतीय तरुणांच्या आयुष्याच्या एका भागाचे प्रतिनिधित्व करेल.... त्यामुळेच ते या ब्रॅंडचा उल्लेख आवर्जून करतात तो ‘युथ ब्रॅंड’ म्हणून... त्याचबरोबर ते आणखी एका गोष्टीकडेही आपले लक्ष वेधतात, ती म्हणजे, आज बाजारात उपलब्ध पोषाखांच्या माध्यमातून सिव्हील इंजिनियरींग (नागरी अभियांत्रिकी), बिझिनेस मॅनेजमेंट किंवा यासारख्या इतर शैक्षणिक शाखांची - ज्यामध्ये कारकिर्द करण्यासाठी आजचे तरुण उत्सुक आहेत – फारशी प्रशंसा होताना दिसत नाही. नेमकी हीच पोकळी भरुन काढण्याचा कॅम्पस सूत्रचा प्रयत्न असून त्यामध्ये ते यशस्वी होतानाही दिसत आहेत.

कॅम्पस सूत्रची मूळ सुरुवात खुशबू आणि सोनल यांनी केली असून सध्या ही स्टार्टअप दर दिवशी सुमारे २,५०० युनिटस् चे शिपिंग करताना दिसते. तर २०१३ च्या आर्थिक वर्षात मिळालेल्या १.६५ कोटी रुपयांच्या महसूलात घसघशीत वाढ होऊन, २०१४ च्या आर्थिक वर्षात हा महसूल १६ कोटींवर जाऊन पोहचला आहे. विशेष म्हणजे कॅम्पस सूत्रच्या आरंभापासून आजपर्यंत सुमारे ६.५ लाख उत्पादने विकण्यात कंपनीला यश मिळाले आहे.

तत्वज्ञान

आजच्या तरुणाईच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरील आणि त्यांना भावतील अशीच डिजाईन्स तयार करणे हे कॅम्पस सूत्रचे तत्वज्ञान आहे. विशेष म्हणजे एखादी संकल्पना सुचल्यापासून अवघ्या २१ दिवसांत हे डिजाईन बाजारात आणले जाते. “ कपड्यांच्या उद्योगात आम्हाला अमूलच्या जाहीरातींप्रमाणे बनायचे आहेः म्हणजेच आमच्या ग्राहकांबरोबर तत्काळ नाते जोडले जाईल, अशा बेताने, त्यांच्याशी चालू घडामोडींवरील दर्जेदार संवाद साधण्याची आमची इच्छा आहे,” कॅम्पस सूत्रचे एक सहसंस्थापक धीरज सांगतात.

कॅम्पस सूत्र आज केवळ एकाच प्रकारच माल बनवत नसून कपडे आणि आणि ऍक्सेसरिचे नानाविध प्रकार ते ग्राहकांना देऊ करत आहेत, ज्यांच्यामध्ये स्वेटशर्टस्, टी-शर्टस्, टोप्या, जॅकेटस्, स्पोर्टस् वेअर, शॉर्टस्, टॉप्स, हुडीज्, बॅग्ज, लॅपटॉप स्लीव्ज, मग्ज आणि सिपर्स यांचा समावेश आहे.

साधारणपणे १८ ते २५ या वयोगटातील तरुणांना समोर ठवून उत्पादन निर्मिती करणाऱ्या कॅम्पस सूत्रचा ७० टक्के व्यवसाय हा महानगरांबाहेर आहे.

द मेट्रीक्स

ऑनलाईन कपडे उद्योगातील बहुतेक खेळाडू हे आपले लक्ष रेव्हेन्यू ग्रोथ (महसूल वाढ), रिपिट पर्चेस क्लिक्स, इत्यादी फ्रंट एन्ड मेट्रीक्सवर केंद्रीत करत असताना, कॅम्पस सूत्र मात्र इन्वेन्टरी टर्नओव्हर रेशो, सेल थ्रु रेट आणि टाईम टू मार्केट, अशा बॅक एन्ड मेट्रीक्सचा विचार करताना दिसत आहे.

“ या क्षेत्रातील ६ ते ९ महिने या इन्वेन्टरी टर्नओव्हर रेशोशी तुलना करता आमचा हाच रेशो हा ४५ ते ६० दिवस असा आहे. तर आमचे सेल थ्रु रेटस् हे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत, जेंव्हा की या उद्योगात हेच प्रमाण सरासरी ७० टक्के एवढे आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही आमची उत्पादने केवळ २१ दिवसांत बाजारात आणतो जेंव्हा इतर ब्रॅंड मात्र यासाठी १२-१८ महिने घेतात,” धीरज दावा करतात..

यंदाच्या आर्थिक वर्षात चाळीस कोटी रुपये एवढा महसूल मिळविण्याचे कॅम्पस सूत्रचे उद्दीष्ट असून, २०१६-१७ च्या आर्थिक वर्षाअखेर शंभर कोटी रुपये महसूलाचे लक्ष्य गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संस्थापकांच्या म्हणण्यानुसार पहिल्या वर्षात त्यांनी ब्रेक इव्हन (मूळ भांडवल परत मिळविण्यात यश आले) केले आहे. तसेच येत्या वर्षात १० लाख डॉलर्स उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

व्यवसायाने दिलेला धडा

सगळ्याच उद्योगांप्रमाणे कॅम्पस सूत्रनेही आपल्या वाट्याच्या चढउतारांचा सामना केला आहेच. सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयार रहाणे, हा आपण शिकलेला सर्वात मोठा धडा असल्याचे संस्थापक मानतात.. खास करुन सुरुवातीच्या काळात, जेंव्हा कार्यपद्धती आणि व्यवस्था बांधल्या जात असतात आणि ज्या चुका घडायच्या आहेत त्या घडतातच. त्या दिवसांतील एक आठवण धीरज सांगतात, “ सुरुवातीच्या दिवसांत प्रचंड पावसाने आमचे गोदाम हे पाण्याने भरुन गेले आणि मध्यरात्री दोन वाजता आम्हाला तेथे जावे लागले आणि कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी सर्व माल तेथून हलवावा लागला. आमच्यासाठी तो अतिशय नाट्यमय क्षण होता.”

त्याशिवाय संस्थापक शिकलेले दुसरा महत्वाचा धडा म्हणजे कर्मचाऱ्यांबरोब नाते तयार करणे आणि कंपनीच्या उद्दीष्टाशी त्यांना जोडून घेणे. “ त्यावेळी नुकताच बाजारात आलेला आमचा एक स्पर्धत आमच्या सर्व तीस कर्मचाऱ्यांना आमच्याकडून मिळत असलेल्या पगारापेक्षा तीन पट जास्त पगार देऊ करत होता. पण या तीस जणांपैकी केवळ चौघांनी हा नोकरीचा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ज्या पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक जबाबदारीच्या भूमिका केल्या त्या पाहून आम्ही अतिशय आनंदीत झालो आणि त्यांच्या प्रगतीमध्येच कंपनीच्या प्रगतीचे प्रतिबिंब दिसून येते.”

पण सुरुवात करण्याचा अतिशय आनंददायी अनुभव हे संस्थापक आजही विसरलेले नाहीत. त्यांच्या मते असे अनेक क्षण आहेत ज्यांच्यामुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला आहे. गोवा सहलीपासून झालेली सुरुवात असो किंवा कंपनीसाठी पहिल्या कर्मचाऱ्याची केलेली भरती असो किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १५ जानेवारी २०१५, या एकाच दिवशी ११,००० ऑर्डर्सचे केलेले शिपींग असो, असे कितीतरी अविस्मरणीय प्रसंग आहेत.

त्याचबरोबर ही गोष्टदेखील त्यांच्यासाठी खूप आनंददायी आहे की, एखाद्या पत्त्यावरुन (उदाहरणार्थ महाविद्यालयाचे वसतीगृह) आलेल्या एका ऑर्डरपासून सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही काळातच त्याच पत्त्यावरुन अनेक ऑर्डर्स येणे. अर्थातच कॅम्पस सूत्रच्या डीजाईन्सची लोकप्रियता आणि मालाची गुणवत्ता पाहून त्या वसतीगृहातील इतरांनीही या ब्रॅंडच्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात करणे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.

भविष्यातील योजना

उत्पादनात नाविन्य आणण्याचा कॅम्पस सूत्रचा प्रयत्न आहे. तरुणांच्या जीवनशैलीशी (प्रवास, खेळ किंवा मनोरंजन) – निगडीत पोषाख आणि ऍक्सेसरिजचे नानाविविध प्रकार बाजारात आणण्याचा या ब्रॅंडचा प्रयत्न आहे.

या दिशेने टाकलेले पाऊल म्हणजेच कॅम्पस सूत्र नव्याने बाजारात आणत असलेले विविध प्रसंगानुरुप घालण्यायोग्य कपडे..

ट्रॅव्हल बडी हे त्यांचे या मालिकेतील पहिले उत्पादन आहे, ज्यामध्ये प्रवासासाठी पिलो हुडी, पॅडेड एल्बो पॅच, आय पॅच, फोन किंवा आयपॉडमधून हुडपर्यंत जाणारे हेडफोन वायर लुप यांचा समावेश आहे. त्याचबरोबर हे उत्पादन टुथब्रश आणि पेस्ट, आयपॅड, फोन, किल्ल्या, पासपोर्ट आणि तिकिटे, इत्यादी गरजा सामावून घेण्यासाठी सुसज्ज आहे. येत्या डिसेंबरपर्यंत कॅम्पस सूत्रातर्फे बाजारात येणाऱ्या आठ उत्पादनांपैकी हे पहिले उत्पादन आहे.

युवर स्टोरीचे मत

बाजारावर एक नजर टाकल्यावर असे लक्षात येते की कपडे आणि संबंधित मालाचा व्यवसाय सुरु करुन वाढविणे ही सर्वात सोपी गोष्टी आहे.

या क्षेत्रात अल्मा मॅटर, जॅक ऑफ ऑल ट्रेडस् आणि व्हॉक्सपॉप यासारखे अनेक ब्रॅंडस् नी आपला ठसा उमटवला आहे. मुख्य म्हणजे फारसे नाविन्य न दाखविताही केवळ डिजाईन्सचा वेगळेपणाच या क्षेत्रात महत्वाचा दिसतो.

फ्रिकल्ट्र आणि शॉपो यासारख्या संकेतस्थळांनी हे क्षेत्र अधिक स्पर्धात्मक झाले असून, व्यक्तींना पुढे येऊन या संकेतस्थळांवरुन आपली डिजाईन्स विकण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

कॅम्पस सूत्र हे एक आशावादी चित्र दाखवित असून ट्रॅव्हल वेअर विभागात वैशिष्ट्यपूर्ण ठरताना दिसत आहे.

पण एक गोष्ट मात्र आपण नक्कीच नाकारु शकत नाही, ती म्हणजे, या क्षेत्रात वास्तववादी नाविन्य आणण्याची असलेली गरज...

संकेतस्थळः www.campussutra.com


लेखक – तरुष भल्ला

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन