‘एजे प्लॅकल एज्युवेंचर्स’ – एक आगळावेगळा प्रयोग नवजात बालकांच्या शिक्षण आणि विकासासाठी...

‘एजे प्लॅकल एज्युवेंचर्स’ – एक आगळावेगळा प्रयोग नवजात बालकांच्या शिक्षण आणि विकासासाठी...

Saturday January 09, 2016,

6 min Read

चाईल्ड डेवलपमेंटल सायकॉलॉजी अर्थात बाल विकासात्मक मानसशास्त्रामध्ये एक सर्वसामान्य समज असा आहे की अगदी लहान वयात आलेले सेन्सरी एक्सपिरियन्स अर्थात ज्ञानेंद्रियांशी संबंधित अनुभव हे भविष्यातील विकास आणि शिक्षणावर सखोल परिणाम करत असतात. नेमकी हीच बाब लक्षात घेत २००८ साली युके स्थित बाल विकास तज्ज्ञ आणि बाल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर लीन डे यांनी बेबी सेन्सर (Baby Sensor) आणि टॉडलर सेन्स प्रोग्रॅमस् (Toddler Sense Programmes) ची निर्मिती केली.

मुलांचे पालक आणि त्यांचे संगोपन करणाऱ्यांची भूमिका ही बालकाच्या विकासात अतिशय महत्वाची असते, या विश्वासावर आधारीत, या कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती. नवजात अर्भकांसाठी (० ते १३ महिने वयोगट) हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मुलांच्या ज्ञानेंद्रीयांना चालना देण्यावर यामध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, जेणेकरुन शारीरीक आणि मेंदूचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल.

परदेशात जरी याबाबत जागरुकता असली, तरी भारतातील परिस्थिती मात्र तशी नाही. नवजात शिशुंच्या शिक्षणाबाबतच्या जागरुकतेचा भारतातील अभाव प्रकर्षाने जाणवला तो अंजू चेरीयन आणि जोस पॉल या जोडप्याला... मुख्य म्हणजे ही परिस्थिती बदलण्याचा त्यांनी निश्चय केला आणि परदेशातील कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीला रामराम करुन मुलीसह भारतात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी भारतातील तरुण पालक आणि मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणे हा त्यांचा मुख्य हेतू होता.

ऑक्टोबर, २०१४ मध्ये त्यांनी एजे प्लॅकल एज्युवेंचर्स (AJ Plackal Eduventures) ची स्थापना केली. त्यांनी सुरुवात केली ती आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नवजात अर्भकांसाठीच्या शैक्षणिक कार्यक्रमांनी आणि त्याचबरोबर खास भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या स्थानिक उपायांनी...

“ सध्या आम्ही बेबी सेन्सरी, टॉडलर सेन्स आणि मिनि प्रोफेसर्स या युकेमधील कार्यक्रमांचे प्रतिनिधित्व करत आहोत. भारत आणि शेजारी राष्ट्रांमध्ये आम्ही मास्टर फ्रॅंचायझी आहोत. त्याचबरोबर आम्ही अल्केमी नर्सरीही चालवितो, जी नवजात अर्भके आणि लहान बालकांसाठी एक विशेष बालसंगोपन आणि शैक्षणिक केंद्र आहे,” अंजू सांगतात.

पालकांबरोबर साधलेल्या संवादामधून या जोडप्याला जाणवले की, अगदी लहानग्यांसाठी बालसंगाेपन आणि शैक्षणिक केंद्रांचा असलेला अभाव पालकांना तीव्रपणे जाणवत होता. खास करुन अशी बालसंगोपन केंद्रं जी एकाच प्रतीची गुणवत्ता देऊ करतात आणि सुरुवातीच्या वर्षांतील विकासावर लक्ष केंद्रीत करतात. “ त्यांची ही मागणी पूर्ण करण्याच्या हेतूनेच आम्ही द अल्केमी नर्सरीला सुरुवात केली, ० ते ३ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हे एक विशेष बालसंगोपन केंद्र आणि प्रीस्कूल आहे. युकेतील अर्ली ईयर्स फाऊंडेशन फ्रेमवर्क स्टेज (ईवायएफएस) च्या धर्तीवर ते चालविले जाते,” अंजू सांगतात.

image


जरी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी परदेशातील आणि भारतातील सांस्कृतिक फरक लक्षात घेतल्यानंतर, अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी योग्य ती जागरुकता निर्माण करण्याची गरज त्यांना प्रामुख्याने जाणवली. त्यादृष्टीने त्यांनी मुलांशी संबंधित विविध गटांबरोबर - जसे की बाल रुग्णालये, मोठी रहिवासी संकुले आणि माता-बालकांसाठीची खास दुकाने, इत्यादी - एकत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला, जेणे करुन अर्भकांसाठी सुरुवातीच्या काळातील शिक्षणाचे महत्व ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुलभपणे करता येईल.

त्याचवेळी त्यांनी पाच वर्षांखालील मुलांसाठी टॉडलर सेन्स प्रोग्रामलाही सुरुवात केली. या कार्यक्रमाला मिळालेला अतिशय चांगला प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहून त्यांनी बंगळूरुमध्येच इतर ठिकाणीही हा कार्यक्रम सुरु केला.

“ रिअल इस्टेटवर होणाऱ्या खर्चावर मात करण्यासाठी, आम्ही आमच्या सध्याच्याच जागांमधून वर्ग देणे सुरु केले, ज्याठिकाणी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आरोग्य, सुरक्षा आणि इतर गोष्टी उपलब्ध होत्या,” जोस सांगतात. एकूणच पहिले वर्ष खूपच छान राहीले आहे, ज्यामध्ये त्यांनी तीन ठिकाणी दोन कार्यक्रमांना सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबर बालसंगोपन आणि प्रीस्कूलच्या क्षेत्रातही विस्तार केला आहे.

एजे प्लॅकल एज्युवेंचर्चची स्थापना जरी २०१४ मध्ये झाली असली, तरी या कल्पनेची बीजे रोवली गेली होती २०१२ मध्येच.. त्यावेळी आपल्या मुलीला वाढविण्याच्या हेतूने अंजू यांनी आपल्या कॉर्पोरेट नोकरीमधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या अंजू यांनी सहाजिकच आपल्या या नव्या भूमिकेसाठी तयार होण्याच्या दृष्टीने लहान मुलांच्या सुरुवातीच्या काळातील विकासाबाबत व्यापक वाचन केले. जसेजसे त्या या विषयावर अधिकाधिक वाचन करु लागल्या तसतशी ज्ञानेंद्रीयांना दिलेली चालना आणि पहिल्या पाच वर्षांतील परिणामाचे बाळाच्या विकासातील महत्व त्यांना पूर्णपणे पटू लागले.

सहाजिकच त्यांनी आपल्या पतीशी या विषयावर चर्चा केली आणि त्यानंतर या दोघांनी मुलीबरोबर जाता येईल अशा पेरेंट चाईल्ड प्रोग्रॅम्सचा शोध घेण्यास सुरुवात केली. “ त्यावेळी आम्हाला युकेमधील आघाडीचे बाल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर लीन डे यांनी तयार केलेल्या बेबी सेन्सरी प्रोग्रॅमविषयी समजले. गंभीर संशोधनांती तयार केलेल्या या कार्यक्रमाची रचना अतिशय चांगली होती आणि आम्ही तोपर्यंत हजेरी लावलेल्या कार्यक्रमांमध्ये तो सर्वार्थाने अगदी वेगळा असा होता,” अंजू सांगतात.

या कार्यक्रमाचे फायदे अनुभवल्यानंतर बेबी सेन्सरी आणि त्याच्याशी संलग्न कार्यक्रम भारतात आणण्याचा या जोडप्याने निर्णय घेतला. येथील समाजावर एक सकारात्मक परिणाम घडविण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी युकेतील पालक कंपनीशी चर्चा केली आणि एका व्यापक निवड प्रक्रियेतून गेल्यानंतर त्यांना भारत आणि शेजारी राष्ट्रांमध्ये बेबी सेन्सरी आणि त्याच्याशी संलग्न कार्यक्रमांसाठी मास्टर फ्रॅंचायझी म्हणून निवडण्यात आले.

त्यानंतर त्यांनी काही काळ युके मध्येच घालविला आणि विविध कार्यक्रम आणि व्यावसायिक बाबींविषयी प्रशिक्षण घेतले. अखेरीस त्यांनी सहकुटुंब भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमांना भारतात यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रीत केले. “ आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या आणि पालकत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तरुण पालकांना मदत केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” जोस सांगतात.

अंजू पुढे सांगतात की बेबी सेन्सरी कार्यक्रमातील प्रत्येक घटकाची रचना ही शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आहे, जेणेकरुन मुलांना एक समृद्ध वातावरण देऊ करणे शक्य होईल, ज्यामध्ये मनोरंजक दृष्ये, आवाज, वास, रंग आणि साहित्याचा समावेश असतो, जे मुलाच्या मेंदूचा विकास करण्यासाठी पायाभरणी करण्यास मदत करतात.

तर टॉडलर सेन्सची रचना ही वय वर्षे एक ते पाच या वयोगटातील मुलांच्या दृष्टीने केलेली आहे. या वयोगटातील बालकांच्या विकासासाठी घेतले जात असलेले हे पुरस्कार प्राप्त वर्ग मुलांची ओळख शब्दांच्या जादुई जगाशी करुन देतात. यामध्ये संरचित कार्यक्रमाच्या बरोबरीनेच मुलांना शोध घेण्याचे आणि कल्पनांच्या जगात रमण्याचे स्वातंत्र्यही दिले जाते. प्रत्येक आठवड्यात एक वैशिष्ट्यपूर्ण थीम असते, जी मुलांचा मेंदू, समन्वय आणि शारिरीक विकास यांना चालना देण्याच्या हेतूने काटेकोरपणे तयार केलेली असते.

सुरुवातीला केवळ एकाच ठिकाणी आणि आठवड्यातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या बेबी सेन्सरी वर्गापासून सुरु झालेल्या एजे प्लॅकल एज्युवेंचर्सची आज बंगुळूरुमध्ये तीन केंद्रे आहेत, जी बेबी सेन्सरी आणि टॉडलर सेन्स असे दोन्ही प्रकारचे वर्ग देऊ करतात. तसेच दर आठवड्याला या वर्गाला हजेरी लावणाऱ्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या संख्येत आता सुमारे दसपट वाढ झालेली आहे.

महिन्यागणिक या वर्गासाठी नोंदणी करणाऱ्या मुलांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. “ आमचे महसूलाचे मॉडेल अगदी साधे आहे. वर्ग, शिक्षण आणि संगोपन सेवेसाठी आम्ही आमच्या ग्राहकांकडून सदस्यता शुल्क आकारतो. तर यापुढे जात, आगामी काळात आमच्या स्वतःच्या केंद्रावरुन येणारे शुल्क आणि देशभरातील आमच्या फ्रॅंचायझींकडून येणारे शुल्क यांच्या दोन्हीमधून एकत्रितपणे हा महसूल येईल,” जोस सांगतात.

नुकतीच सुरुवात केलेल्या या जोडीने सध्या आपले संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे ते बेबी सेन्सरी, टॉडलर सेन्स आणि द अल्केमी हे तीनही कार्यक्रम भारतातील अधिकाधिक पालक आणि मुलांपर्यंत पोहचवण्याकडे...

“ स्वतःच्या सोयीप्रमाणे काम मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्त्रियांना व्यवसायाच्या संधी देण्याच्या दृष्टीनेही आमच्या फ्रॅंचायझींग कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे,” अंजू सांगतात.

त्याचबरोबर आतंरराष्ट्रीय स्तरावरील विविध अर्ली लर्निंग प्रोग्रॅम सुरु करण्यावरही त्यांचे काम सुरु आहे. २०१६ च्या पूर्वार्धात सुरु होणाऱ्या मिनि प्रोफेसर्सपासून त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. “ आगामी दोन वर्षांच्या काळात, देशभरातील सर्व महत्वाच्या महानगरांत बेबी सेन्सरी, टॉडलर सेन्स आणि मिनी प्रोफेसर कार्यक्रम उपलब्ध होतील,” जोस सांगतात.

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन