भारतामध्ये सागरी मार्गाने गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ पहिल्या जागतिक मेरीटाईम इंडिया परिषदेचे मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते थाटात उद्घाटन 

0

भारताच्या विस्तीर्ण 14,500 कि.मी. लांबीच्या समुद्रकिनारपट्टीला विकसित करुन देशाच्या इतिहासाला साजेसा सागरी व्यापार विकसित करण्यासाठी देशाने ‘सागरमाळा’ कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे भारतात सागरी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ असल्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक समुदायाला केले. मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे कन्व्हेंशन ॲन्ड एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित पहिल्या मेरीटाईम इंडिया परिषद-2016 उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोरिया हा देश सहयोगी आयोजक असणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत जगातील 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. भारताच्या सागरी किनारपट्टीवरील विविध घटकांमध्ये असणाऱ्या गुंतवणुकीच्या संधीला जगापुढे आणण्यासाठी जहाज बांधणी मंत्रालयाने या जागतिक परिषदेचे मुंबईत आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, कोरिया गणराज्याचे सागरी आणि मत्स्यपालन मंत्री किम योंग-सुक, केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री पी.राधाकृष्णन, मेरीटाईम आंतरराष्ट्रीय संस्थेचे महासचिव कितॅक लिम आदी उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री म्हणाले, वार्षिक सकल उत्पन्नाचा (जीडीपी) दर सात टक्क्यांवर ठेवणारा भारत हा जगातील गतीने वाढणारी आर्थिक सत्ता आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न हा देश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे होते, आम्ही त्याच दिशेने वाटचाल करीत आहोत. या परिषदेमध्ये 40 देशातील 4500 शिष्टमंडळ सहभागी झाल्याचे मला सांगण्यात आले. कोरियासारखा प्रगत देश यामध्ये सहयोगी देश म्हणून पुढे आला आहे. अशावेळी जागतिक समुदायाला मी आवर्जून सांगू शकतो की, जहाज बांधणी आणि बंदरे विकास क्षेत्रातील गेल्या दोन वर्षातील लक्षणीय प्रगतीचा आढावा आपल्यापुढे आहे. त्यामुळे भारतात समुद्रमार्गे गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आम्हाला आमच्या सागरी व्यापाराच्या हजारो वर्षाच्या वैभवशाली परंपरेला पुन्हा नव्याने जागतिक ख्यातीचे बनवायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भरुच, कोडुनगलुर, तुतीकोरिन, नागापट्टणम, आरियांकुप्पम आदी 2 हजार वर्षांपूर्वीच्या व्यापारी बंदराचा इतिहास नमूद केला.

‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गतच आजची मेरीटाईम इंडिया परिषद होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगाने‘मेक इन इंडिया’ची दखल घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जागतिक बँकेने घेतलेली दखल, शेजारी राष्ट्रांशी वाढलेले व्यापारी संबंध, संरक्षण खात्यातील 60 टक्के निर्माण हे परवानाविरहीत करणे, थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना तत्काळ मिळणारी मान्यता, जहाज बांधणी क्षेत्रात सहाय्यभूत ठरणारे आर्थिक सहकार्य धोरण, सागरी करासंदर्भातील दूर केलेल्या अडचणी, रेल्वे व बंदरे यांच्या विकासासंदर्भात रेल्वे-बंदर महामंडळाची उभारणी,राष्ट्रीय जलवाहतूक धोरणाबद्दल केलेले सुलभ कायदे आदी बदल त्यांनी लक्षात आणून दिले. ते म्हणाले, या बदलामुळे जहाज बांधणी आणि बंदरे विकासात लक्षवेधी विकास घडून आलेला आहे. प्रमुख बंदरातील व्यापारवृध्दी आतापर्यंतच्या सर्व विक्रमांना मागे टाकणारी आहे, गेल्या दोन वर्षात या बंदरांनी 165 दशलक्ष टनाची विक्रमी क्षमता सिध्द केली आहे. या बंदराच्या नियमित क्षमतेपेक्षा 94 दशलक्ष टनाची ही क्षमतावृध्दी आहे. दोन वर्षात 4 टक्क्यांनी वाहतुकीत वाढ झाली असून नफ्याच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे. एकट्या 2015-16 वर्षात 6.7 अब्ज रुपयांचा हा नफा आहे.

त्यामुळे या क्षेत्रात आम्हाला जागतिक समुदायाचे लक्ष वेधायचे असून सागरी मार्ग, बंदरे विकास, जहाज बांधणी आदी सर्व विकासाच्या प्रकल्पांना एकत्र बांधणारा आणि भारताच्या 14 हजार 500 कि.मी. विस्तीर्ण लांबीच्या सागरी किनारपट्टीचा व अंतर्गत नदी वाहतुकीचा विचार करणारा सागरमाला हा महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प सुरु केला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. भारताने जहाज बांधणी, बंदरे विकास, सागरी व्यापार या क्षेत्रात भरारी घेतली असून गेल्या दोन वर्षात ही प्रगती 30 टक्क्यांनी वाढली असल्याचे स्पष्ट केले. बंदरांची संख्या दुप्पट करण्यात येत असून ‘सागरमाला’ या प्रकल्पातंर्गत 1 कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. भारताच्या सागरी किनारपटटीवरील वाहतुकीला अधिक चालना मिळाल्यास वाहतुकीवरच्या अन्य मार्गाच्या खर्चात प्रचंड कपात होणार आहे. सागरी किनारपटटीवरील विकासामुळे या विस्तीर्ण भागात औद्योगिक वसाहती निर्माण होण्यास चालना मिळणार असून मासेमारी उद्योग देखील भरभराटीला येणार आहे. यासाठी बंदरे-रेल्वे जोडणी महामंडळ स्थापन करण्यात आले असून नजीकच्या काळात बंदरातील वाहतुकीसाठी थेट रेल्वे लाईन अनेक ठिकाणी उभारल्या जाणार आहेत. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी स्पष्ट केले. यावेळी या पहिल्या परिषदेला उपस्थित आंतरराष्ट्रीय मेरी टाईम संस्थेचे महासचिव किटॅक लिम, कोरीया रिपब्लिकचे सागरी आणि मासेमारी मंत्री कीम-यंग-सूक यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात भारताच्या सागरी व्यापाराचा इतिहास आणि सद्यस्थिती दर्शविणारे सादरीकरण करण्यात आले. तर ‘सागरमाला’ या अहवालाचे विमोचन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावरच वाटचाल

मेरीटाईम परिषदेचे आयोजन 14 एप्रिल 2016 या शुभदिनी आणि मुंबईमध्येच का करण्यात आला,याबद्दलचा खुलासा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. मुंबई ही बाबासाहेबांची कर्मभूमी होती. त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्या 125 व्या जयंतीला मुंबईत घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो, मात्र अनेकांना आश्चर्य वाटेल की, ते भारताच्या जलसंपदा आणि जलवाहतूक धोरणाचेही शिल्पकार आहेत. भारताला उज्ज्वल बनविण्याच्या आपल्या धोरणावरच आम्ही यापुढे जलवाहतूक आणि सागरी किनारपट्टीच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या जागतिक परिषदेच्या व्यासपीठावर बाबासाहेबांचा पुतळा ठेवण्यात आला होता. परिषदेची सुरुवातही प्रधानमंत्र्यांनी त्यांना माल्यार्पण करुनच केली.

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte