गुराखी ते बिझनेस गुरु ;  एक जिद्दी संघर्ष!

कदाचित मी जग बदलू शकत नाही.... पण काही लोकांचं जग निश्चितच बदलू शकतो ...

0

एक दिवस असा होता की खडतर परिस्थितीशी  दोन हात करण्यासाठी लहानग्या रामला अनवाणी पायाने गुराख्याचे काम करावे लागत होते. रामने शाळा सोडून दिली होती. मात्र कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर, ध्येयाने झपाटलेल्या रामचा  एक दिवस असाही आला की त्याला इंग्लंडच्या सॅलफोर्ड महाविद्यालयात ‘स्टुडन्ट लाईफ गोल्ड अवार्ड’ आणि ‘पर्सनॅलिटी ऑफ द ईयर अवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इतरांना मदत करणे रामला मनापासून आवडते. मदत करणे हाच त्याचा छंद आहे.  त्याच्या मदतीतून इतरांची प्रगती व्हावी यासाठी तो प्रयत्नशील असतो.  प्रशिक्षणच्या माध्यमातून तो अनेकांना मदत करतोय. एक गुराखी ते आताचा  बिझनेस गुरु हा त्याचा प्रवास अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. 

रामचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती जेमतेम, आई वडील कसेबसे शिक्षणाला हातभार लावयचे, शालेय शिक्षण घेताना रामला इंग्रजी आणि गणित या विषयांची भीती वाटायची. या विषयात त्याला गती नव्हती, परिणामी दहावीची परीक्षा तो अनुतीर्ण झाला. रामने शाळा सोडून दिली, त्याचे शिक्षण घेणे बंद झाले. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांबरोबर शेतात काम करायला सुरवात केली. पण, शेतात जे पिकत होतं ते सात जणांच्या कुटुंबियांसाठी पुरेसं नव्हतं  म्हणून त्याने दुसऱ्याचा शेतात मजुरी करायला सुरवात केली. मात्र मजुरीच्या कामात सातत्य नव्हते. कधी काम मिळायचे, कधी खाली बसावे लागायचे. नियमितपणे खात्रीलायक उत्पन्न मिळावे म्हणून तो गुरे चारायला नेण्याचे काम करू लागला.

आपल्या परिस्थितीविषयी सांगतांना राम म्हणाला, "घरावर पुरेसे छत नसल्यामुळे पावसाळ्यात घर गळत असे, बऱ्याचदा मला झोपवण्यासाठी वडील रात्रभर माझ्यावर छत्री धरून बसत असत”.  लहानपणी रामला खिचडी खूप आवडायची, ज्यासाठी कधी कडू लिंबाच्या बिया म्हणजे निम्बोळ्या वेचून आणि विकून पैसे मिळवून राम खिचडीसाठी तांदूळ विकत आणायचा.


परिस्थितीचे बरेच टक्के टोणपे खाल्ल्यामुळे आणि चटके सोसल्यामुळे रामला शिक्षणाचे महत्व पटले. आपल्या थोरल्या भावाचा आदर्श घेऊन राम पुन्हा शाळेत गेला, त्यांने  कमवा आणि शिका हे तंत्र आत्मसात करत आपले पुढील शिक्षण सुरु केले. राम बारावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास मध्ये उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्यांने बीकॉम करून पुढे पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंन्ट केले आणि त्यानंतर त्याने इंग्लंडच्या सॅलफोर्ड विद्यालयातून एम.एस केले.   तिथेच तो शिक्षणासोबत स्टुडन्ट युनिअनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात सहभाग झाला. ज्यासाठी त्याला ‘न्यू स्टुडन्ट ऑफ दी ईयर’, ‘सॅलफोर्ड स्टुडन्ट लाईफ गोल्ड पुरस्कार’, ‘स्टुडन्ट युनियन पर्सनॅलिटी ऑफ दी ईयर पुरस्कार’, ‘दी स्टुअर्ट राइट मेमोरियल पुरस्कार’ इत्यादी पुरस्काराने गौरवण्यात आलं. इतरांना मदत करणे, मार्गदर्शन करणे रामचा एक छंद बनून गेला शिक्षणानंतर त्यांने एका आंतरराष्ट्रीय बँकेत नोकरी केली. नोकरी करतांनाही त्यांने इतरांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा छंद जोपासला. हे करतांना त्याच्या लक्षात आले की, त्याच्या मार्गदर्शनाची व प्रशिक्षणाची गरज इंग्लंडपेक्षा भारतातील तरुणांना आहे. आणि एक दिवस त्यांने बँकेची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ह्या निर्णयामुळे अनेकांनी त्याला वेड्यातही काढले .  

राम बेंडे हे आज अग्रगण्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा उपयोग करून ते इतरांना त्यांच्या उद्दीष्ट प्राप्तीकरिता सकारात्मक उर्जा देत आहे. त्यांनी घेतलेले उच्चतम शिक्षण, विश्लेषकात्मक दृष्टिकोन, उत्तम दर्जाचा अभ्यासक्रम, वर्तणूक बदलासाठी अत्यंत नियोजित शैली, अत्यंत प्रेरणादायी, सर्जनशील, उत्साही आणि लवचिक प्रशिक्षणाच्या पद्धतीचा राम अवलंब करतात. राम यांना दोन्ही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातला कामाचा अनुभव आहे.  लोकांमधील असलेल्या क्षमता ओळखून त्यांना विकसित करण्यासाठी ते काम करतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. स्वयंसिद्ध होण्यासाठी, आव्हाने स्वीकारण्यासाठी त्यांना प्रेरित करतात.

२०१२ पासून राम  आपल्या 'द डेव्हलपमेंट एनन्सी ' ह्या संस्थेच्या माध्यमातून व्यक्ती आणि व्यवसाय विकासामध्ये योगदान देत आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि ध्येयप्राप्तीसाठी मार्गदर्शन करत आहे.

आतापर्यंत  त्यांनी :

• राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 25,000 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रशिक्षित केले आहे.

• १८ पेक्षा जास्त स्टार्टअप्सला यशस्वीपणे प्रशिक्षण दिले आहे.

• भारतीय युवा शक्ती ट्रस्ट / ब्रिटेन व्यापारी मार्गदर्शक तत्वानुसार १५० पेक्षा जास्त व्यावसायिक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले आहे.

• प्रशिक्षणात अशा पद्धतीचा आणि धोरणांचा अवलंब केला ज्यामुळे प्रशिक्षणार्थीमध्ये असलेली न्यूनगंडाची भावना, भीती दूर करून त्यांचा आत्मविश्वास दुणावला जातो.

• भारत, पाकिस्तान, श्रीलंका, चीन, ब्रिटेन, पोलंड, स्पेन आणि इटली या ठिकाणच्या लोकांबरोबर कामाच्या अनुभवाचा प्रशिक्षणात वापर केला जातो.

कंपनींचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्याबरोबर कामाचा अनुभव असलेले राम हे आपल्याबरोबर इतरांचीही प्रगती होण्याचे ध्येय बाळगतात. आणि इतरांना मदत करण्याची आपली आवड जोपासतात. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण देण्याची एक विशिष्ट शैली आत्मसात केली आहे. राम बेंडे यांच्या या प्रवासाला युवर स्टोरीच्या शुभेच्छा !

वेबसाईट : www.tda-india.com

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्टार्टअप इंडियाच्या घोषणेआधीच या योजनेला सार्थ ठरविणारे अभिजात अभियंता व ठेकेदार शरद तांदळे !

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑटोरिक्षाचालकाच्या मुलाची युपीएससीच्या परीक्षेत गगनभरारी,जालन्याच्या अन्सार शेखची यशोगाथा

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय 'अंतराळ वीरांगना'