डॉगी आणि माऊसाठी कस्टमाईज कपडे आणि ऍक्सेसरीजचा देशातला एकमेव ब्रॅण्ड ‘पेट्रीओट’

0

पाळीव प्राणी आपल्या मालकाला माणसापेक्षाही जास्त जीव लावतात. म्हणूनच घरातल्या पाळीव प्राण्यात मालकाचाही जीव गुंतलेला असतो. मग ते गाय-बैल असो वा कुत्रा किंवा मांजर. त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे, त्यांना पोटभर खाऊ घालणे, ते अंगाशी येऊ लागले की त्यांना लहान बाळाप्रमाणे कुरुवाळणे, त्यांच्या हालचालीमधून त्यांचे मूड ओळखणे आणि एखाद्या माणसाशी संवाद साधावा त्याप्रमाणे त्याच्याशी संवाद साधणे यामध्ये मालक तन-मन-धनाने गुंतलेला असतो. कुत्रा, मांजर यांसारख्या छोट्या पाळीव प्राण्यांना तर मालक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आणि ऍक्सेसरीजही घालू लागले आहेत. पाळीव प्राण्यांच्या मालकांची ही हौस लक्षात घेऊनच २४ वर्षाच्या श्रृती आरोलकरने आपली मैत्रिण शचि मेहता आणि मित्र पिनान्क शहा यांच्या साथीने ऑगस्ट २०१५ ला पाळीव प्राण्यांचे कस्टमाईज कपडे आणि एक्सेसरीजसाठी ‘पेट्रीओट’ हे देशातील पहिले पेट बुटीक सुरु केले.

केळकर महाविद्यालयातून बीएमएम केलेल्या श्रृतीने ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड मार्केटींगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर ऍड एजन्सी तसेच लॉजिस्टीक आणि सप्लायिंग चेनमधील कामाचाही अनुभव घेतला. आता ती ‘पेट्रीओट’ची प्रोडक्शन ऍण्ड मार्केटिंग हेड म्हणून काम पहाते. तर बीएमएस केलेल्या पिनान्कने डायमंड मर्चण्डाइजमध्ये सुरुवातीला काम केले. त्यानंतर ऍड एजन्सीमध्ये कामाचा अनुभव घेऊन त्यानंतर स्वतःची एजन्सी सुरु केली. तसेच लोणच्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड सुरु केला आणि त्याचबरोबर आता तो ‘पेट्रीओट’चे ब्रॅण्ड डिझाईन आणि टेक्नोलॉजी सांभाळतो आहे.

‘पेट्रीओट’ची स्टायलिस्ट शचि एक फॅशन डिझायनर आहे. तिने मुंबईतील नामवंत फॅशन डिझायनर निता लुल्ला यांच्याकडे चार-पाच वर्ष काम केले आणि त्यानंतर दोन-तीन वर्ष स्वतःचा स्वतंत्र ब्रॅण्ड डेव्हलप केला. शचिची मांजर म्हणजे तिचा जीव की प्राण. “आपल्या फॅशन डिझायनिंगचे कौशल्य वापरुन शचि तिच्या मांजरीलाही छान छान कपडे शिवायची. एकदा आमच्या मनात आलं की आपल्याप्रमाणेच इतरही पेट लव्हर्सना आपल्या पेटचे असे लाड करायला आवडत असतील. पण मार्केटमध्ये खास पेटसाठी कस्टमाईज कपडे आणि ऍक्सेसरीजचा तयार करणारा असा कुठला ब्रॅण्ड नाही. मग त्यामधून पेट बुटीक सुरु करण्याचा आम्ही विचार केला,” श्रृती सांगते.

मात्र ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले नाही. तेव्हा या तिघांनी स्वतःकडचे पैसे घालून सुरुवात करायचे ठरवले आणि सांताक्रूजमध्ये ‘पेट्रीओट’चे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभे राहिले. वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पब्लिसिटीला सुरुवात झाली. काम मिळत गेले आणि त्यानंतर बिझनेसमधून मिळालेला पैसा पुन्हा बिझनेसमध्ये फिरवून या तिघांनी सहा महिन्यात व्यवसाय वाढविला.

‘पेट्रीओट’ने सुरुवातीला केवळ मांजरींसाठीचे प्रोडक्ट्स बाजारात आणले. “आम्ही आमचं प्रत्येक प्रोडक्ट बनवताना प्राण्यांच्या कम्फर्टचा जास्त विचार करतो. आपल्या हौशेखातर त्यांना कम्फर्टेबल वाटत नसतील असे कपडे किंवा ऍक्सेसरीज त्यांना घालणं योग्य नाही. आम्ही प्रत्येक पीसची प्रत्यक्ष प्राण्यावर ट्रायल घेतो. याच कारणासाठी आम्ही सुरुवातीला केवळ मांजरीवर लक्ष केंद्रित केलं. कारण ट्रायल घेण्यासाठी शचिची मांजर आमच्याकडे होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या आसपास आम्ही कुत्र्यांसाठीचे प्रोडक्टस मार्केटमध्ये आणले,” श्रृती सांगते.

एखादे डिझाईन तयार झाल्यावर त्यासाठी वापरले जाणारे फॅब्रिक प्राण्यांना कम्फर्टेबल असेल का इथपासून ते शिवून तयार असलेला ट्रायल पिस प्राण्याला घालून ते त्यात कम्फर्टेबल आहे का इथपर्यंत सगळ्या बाबतीत प्राण्यांच्या कम्फर्टला ‘पेट्रीओट’मध्ये प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतरच त्या डिझाईनचे फायनल प्रोडक्शन घेतले जाते. “कपड्यांसाठी आणि ऍक्सेसरीजसाठी फॅब्रिक निवडताना ऍटरॅक्टीव्ह कलर्सबरोबरच फॅब्रिक क्वालिटीलाही महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर प्राण्यांना त्या फॅब्रिकमुळे गरम होणार नाही, कपड्याची इनर लायनिंग किंवा स्टीचींग त्यांना लागणार नाही, त्या कपड्याचा स्पर्श त्यांना सुखावेल याची काळजी घेतली जाते. स्टीचींग लागू नये म्हणून ती ओव्हरलॉक केली जाते,” श्रृती सांगते.

'पेट्रीओट'मध्ये मांजर आणि बोक्यासाठी फ्रॉक, शर्ट, टीज, नेक बो, कॉलर आणि टाय एवढेच नाही तर चनियाचोली, नेहरु जॅकेट्स, बाईकर्स जॅकेट असे विविध पोशाख, तसेच विविध प्रकारचे बेड उपलब्ध आहेत. तर कुत्र्यांसाठीही विविध प्रकारचे पोशाख आणि ऍक्सेसरीज उपलब्ध आहेत. लवकरच यामध्ये कुत्र्यांसाठीच्या हॅटचा समावेश होणार आहे. 

२९ ऑगस्ट २०१५ मध्ये सुरु झालेल्या ‘पेट्रीओट’ला अल्पावधीत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. “बाहेरच्या देशात पेट्सच्या डिझायनर कपड्यांना आणि ऍक्सेसरीजना खूप मागणी असते. पण आपल्या देशातही या संकल्पनेला एवढा चांगला प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. सुरुवातीला आम्हाला केवळ सोशल मीडिया आणि वन टू वन पब्लिसिटीच्या माध्यमातून ग्राहक मिळाले. डिसेंबरपर्यंत हळूहळू मागणी वाढत गेली. त्यानंतर डिसेंबरपासून आम्ही मुंबईतल्या रिटेलर्सला माल सप्लाय करु लागलो. त्याचबरोबर बांद्रा, अंधेरी आणि ठाण्यामध्ये शॉप्स सुरु केले. सध्या आम्हाला कुत्र्यांसाठी कस्टमाईज प्रोडक्टच्या दर महिन्याला जवळपास ४० ते ५० पीसच्या ऑर्डर येतात. मांजरी शक्यतो सहजासहजी अंगात काही घालून घ्यायला तयार नसतात. लहानपणापासून सवय केली असेल तरच घालतात. तरीसुद्धा मांजरींसाठी दर महिन्याला १० ते १५ ऑर्डर असतात. आता जानेवारी महिन्यापासून आम्हाला महाराष्ट्राबाहेरुनही ऑर्डर्स येऊ लागल्या आहेत. स्टेटस सिम्बॉल म्हणून आपल्या पेट्ससाठी डिझाईनर कपडे आणि ऍक्सेसरीज वापरणाऱ्या ग्राहकांचं प्रमाणही खूप आहे,” असं श्रृती सांगते.

“कुत्र्यांसाठीचे पोशाख आणि ऍक्सेसरीज सध्या फक्त रिटेलर्स आणि 'पेट्रीओट'च्या शॉप्समध्ये उपलब्ध आहेत. फेब्रुवारी अखेरीस ते ऑनलाईनही उपलब्ध होतील,” असं श्रृती सांगते. लवकरच कुत्र्यांच्या कलेक्शनची माहिती असलेली 'पेट्रीओट'ची नवी वेबसाईट नव्या रुपात ग्राहकांसमोर येणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात नवीन कलेक्शन बाजारात आणण्याची 'पेट्रीओट'ची योजना आहे. 'पेट्रीओट'च्या कलेक्शनमुळे आणि कस्टमाईज सर्विसमुळे हौशी मालकांच्या पेट्सचा रुबाब वाढला आहे एवढं निश्चित.